‘स्वप्नवन’ स्वप्न
कोणाला डॉक्टर बनायच असतं, तर कोणाला फॅशन डिजाईनर म्हणून स्वतःला सिद्ध करायच असतं. पण, या तरुणाला चक्क ‘जंगल’ उभारायचं आहे! वाचून बुचकळ्यात पडलात ना? हो, पण हे अगदी खरं आहे… पर्यावरणप्रेमी श्रीयश चांगळे या तरुणाने वृक्ष संवर्धनासाठी ‘स्वप्नवन फाउंडेशन’ या संस्थेची निर्मिती केली आहे. स्वप्नवन अंतर्गत त्याला एक सुंदर वन उभारायचं आहे. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी वकिलीच्या शिक्षणासोबतीने त्याने स्वप्नवन फाउंडेशन उभं केलं. त्याच्या या स्वप्नवत स्वप्नाच्या अनोख्या गोष्टीबद्दल जाणून घेऊया….
स्वप्नवनचा प्रवास
“स्वप्नवन संस्थेत माझ्यासारखी अनेक तरुण मंडळी, काही बच्चे कंपनी, मोठी माणसं आम्ही एकत्र येऊन प्रत्येक जण वृक्ष संवर्धनासाठी काम करतो. ही सर्व मंडळी या संस्थेअंतर्गत आपली वृक्षारोपणाची आवड जपतात. स्वप्नवन अंतर्गत आम्ही पर्यावरणाशी निगडित अनेक उपक्रम राबवतो. आपण सगळेच या पर्यावरणाचा भाग आहोत. मग पर्यावरण संवर्धनासाठी आपणही काहीतरी करणं गरजेचं आहे ओळखून ‘स्वप्नवन’ने एक छोटं जंगल उभारण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला. जर एखादी मोकळी जागा असेल, त्याठिकाणी आपण झाडं लावली किंवा वनीकरण करण्याच्या उद्देशाने या संस्थेचा पहिला उपक्रम कर्जतमधल्या मांडवणे गावात सुरू केला.
महाराष्ट्र शासनाच्या वन खात्याकडून इथे आम्हाला १५ एकर जागा वनीकरणासाठी मिळाली. या जागेत सुमारे दहा हजार झाडं लावून एक छोट वन तयार करण्याचा आमचा संकल्प आहे”, असं श्रीयश सांगतो. कर्जतमधील हा उपक्रम सुरू झाला असून इथे आजवर अनेक झाडं लावली आहेत. वनीकरणासाठी आम्हाला विविध वृक्षाची रोप वन खात्याकडून त्यांच्या नर्सरी मधून मिळतात. त्याचबरोबर अनेकांनी घरी लावलेली रोपं आम्ही डोनेशन म्हणून घेतो आणि या वनात लावतो. इथे वेगवेगळ्या प्रकारची झाड लावतो, ही इकोसिस्टीम म्हणजे आमच्यासाठी एक वेगळ जग आहे, असं तो म्हणतो. विविध प्रजातींच्या झाडांची लागवड आम्ही येथे केली आहे.
आंबा, बदाम, पेरू, काजू, करंज, अर्जुन, साग, बेहडा, चिंच, आवळा, जांभूळ, बांबू अशी नानाविध प्रकारची झाडं आम्ही येथे लावली आहेत. झाडांचा अभ्यास करून इथल्या गावात असणारी झाड इथे लावली आहे. या सगळ्या उपक्रमामधून आम्ही इथे एक सुंदर वन उभारण्याचा अनोखं संकल्प हाती घेतला आहे.
गुलजार वृक्षभेटीला…
सुरवातीपासून जेव्हा आम्हाला ही जागा मिळाली तेव्हापासून माझ्या घरच्याचा मला खूप पाठींबा होता. जेव्हा सुरवात केली तेव्हा या जागेला छान फेनसिंग केलं. आमचं एवढं भाग्य की कवी गुलजार सर यांचं इथे एक छोटं घर आहे. आमची वन उभारण्याची संकल्पना त्यांना खूप आवडली आणि आमच्या या जागेला भेट देतं ‘स्वप्नवन’च्या उद्घाटनाच्या वेळी चक्क गुलजार सर इथे आले होते. २८ जुलै २०१९ या दिवशी आम्ही इथे पहिलं रोपं लावलं. झाड लावण्यासाठी आम्ही आजूबाजूच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना आमंत्रित करून, त्यांना झाडाची माहिती सांगून वृक्षारोपण आम्ही केलं. मुंबईतील शाळा, कॉलेजातल्या विद्यार्थ्यांचाही यात सहभाग होता. दहा रोपांच्या लागवडीपासून सुरु झालेला हा प्रवास आज वर्षभरात तब्बल तीस हजारांचा टप्पा ओलांडून रान बहरतंय असं म्हणावं लागेल.
वन्यजीवांचा हक्काचा निवारा
आपल्याकडे मोठ्या प्रमाणात झाड तोडली जातात. परंतु हे पर्यावरणासाठी पर्यायी आपल्यासाठी घटक ठरणारं असल्याचं आपण विसरतो. शिवाय, यामुळे अनेक प्राणी, पक्ष्यांचा निवारा दूर होतो. त्यामुळे या मुख्य जीवांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून ही अनोखी संकल्पना मनात आली आणि ‘स्वप्नवन’ साकारायला सुरुवात झाली.
पर्यावरण प्रेमी असून ही आवड जपत ती सत्यात उतरवण्यासाठी आणि वृक्ष संवर्धनासाठी अनोखी मोहिम हाती घेऊन एक सुंदर वन उभारण्याच्या या अनोख्या कल्पक प्रकल्पाला प्लॅनेट मराठी कडून “श्रीयश आणि स्वप्नवन फौंडेशन” ला खूप खूप शुभेच्छा!
मुलाखत : नेहा कदम ( प्लॅनेट मराठी )