आपल्याकडे इतर कोणत्याही युद्धापेक्षा सगळ्यात जास्त वैर हे चहा आणि कॉफी प्रेमींमध्ये दिसून येतं.”आलं घातलेला टपरीवरचा चहा पिऊन जे आत्मिक सुख मिळतं ना ते कशातच नाही”… असं एखादा माणूस किंचितश्या दुधात कॉफी टाकून ढवळत ढवळत बोलताना दिसला तर त्याचा एक पाय हा सीमेच्या ह्या भागात आहे आणि एक पाय त्या हे समजून जावं. कॉफी पिणं हे श्रीमंतीचं लक्षण आहे वगरे म्हणणं सपशेल चूक आहे. हल्ली तर मोठ्या मोठ्या हॉटेलच्या मेनूमध्ये ही कटिंग चहाला एक स्थान दिलंय. आज इंटरनॅशनल कॉफी डे च्या निमित्ताने श्रीमंतांच्या यादीत पोहोचलेल्या कॉफीला आपलंसं करूया.
टपरीवरचा चहा पिऊन जशी तरतरी येते तशी टपरीवरची कॉफी प्यायलीये कधी? स्वतःच्या नावाच्या कपापेक्षाही पितळ्याच्या किंवा स्टीलच्या चपट्या वाटीसारख्या कपातली कॉफी पिणं हे ही वेगळं सुख आहे. जसा आलं घातलेला चहा तशी जायफळ घातलेली कॉफी. भल्याभल्या ब्लॉक्स आणि आळसाला घालवणारा रामबाण उपाय म्हणून मानला जातो. कॉफी हे साधारणपणे भारताच्या दक्षिण भागातलं प्रमुख पेय आहे. आसाम हे चहा उत्पादनाचं प्रमुख ठिकाण आहे तर दक्षिण भारत हे कॉफीच्या पिकाचं माहेरघर आहे. आसाममध्ये जसं चहाच्या मळ्यात फिरायला पर्यटकांसाठी एक वेगळी टूर तयार केली जाते तसं दक्षिण भारतातील कॉफीच्या बागेत मनमुरादपणे फिरायला पर्यटकांना संधी मिळते. मुन्नार, येरकौड, चिकमग्लुर, अरकु इथल्या कॉफीच्या बागा अतिशय प्रसिद्ध आहेत. एखाद्या कॉफी लव्हरसाठी तर एखाद्या मेजवानीसारखी ही जागा आहे.
कॉफी हे पेय पहिल्यांदा कोणी शोधून काढलं ह्याबद्दल अनेक कथा आहेत. त्यातली एक अत्यंत लोकप्रिय कथा अशी सांगितली जाते की एथोपिया येथील काफा गावात एक बकऱ्यांचा कळप पाळणारा कल्दी नावाचा माणूस होता. ज्याने स्वतःच्या बकऱ्यांना बेरीज सारखी गोष्ट खाताना पाहिली. त्यांनंतर त्याने स्वतः पहिल्यांदा कॉफीच्या बेरीज खाऊन पाहिल्या आणि त्यानंतर त्यांना उकळून, वाळवून त्यापासून कॉफी बनवायला सुरवात केली. जुन्या काळात हे पेय झोप घालवण्यासाठी अधिकपणे वापरलं जायचं.
कॉफी आणि ट्रेंड
लॉकडाऊनच्या सुरवातीला आपण वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. कधी फिल्म्स, जुन्या मालिका, त्याच सोबत आपली भरपूर करमणूक केली ती म्हणजे ट्रेंड्स नी. कोरोना आल्यापासून अनेक ट्रेंड्सना बेलगाम उधाण आलं होतं. एखाद्याने मजेमजेत सुरू केलेल्या गोष्टीला लोकं अक्षरशः डोक्यावर घेत होती. त्यातलाच एक ट्रेंड म्हणजे दालगोना कॉफी करण्याचा. कॉलेज मध्ये परीक्षेच्या आदल्या दिवशी जितका पटकन अभ्यास होत नाही तितका पटकन लोकांनी ह्या नव्या कॉफी प्रकाराला प्रतिसाद दिला ही कॉफी बनवायचा ट्रेंड ज्याने कोणी सुरू केला तो जिथे असेल तिथे बसून त्याने असंख्य लोकांच्या डोक्याला खुराख द्यायचं काम केलं. अशी ही एक वेगळी कॉफी असते ह्याची लोकांना जाणीव झाली. ह्याच काळात अनेक नेटकऱ्यांना चर्चेला विषय मिळाला, मिम्स साठी कंटेंट मिळाला. युट्युब वर वेगवेगळ्या व्हिडिओज च्या माध्यमातून दालगोना कॉफी घराघरात पोहोचली.
कोरोना आणि कॅफे
ह्या वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या महामारीमुळे अनेक उद्योग धंद्यांवर मोठा परिणाम झाला त्यातील एक म्हणजे कॅफे आणि हॉटेल्स. दररोज हजारोंच्या संख्येने गजबलेले कॅफेज कोरोनामुळे अक्षरशः ओस पडले. अश्या वेळीही अनेक कॉफी लव्हर्सनी थोडी कळ सोसून अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात हॉटेल्स आणि कॅफे उघडल्यावर कॉफी चा आस्वाद घेतला. साधारण रोज स्वतःची आवडती स्ट्रॉंग, मीडियम स्ट्रॉंग, माईल्ड कॉफी पिणाऱ्या अनेकांना अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात कॅफे उघडल्यावर वेटर दादांना स्वतःच्या आवडीच्या कॉफी ची ऑर्डर देताना किती छान वाटलं असेल!!
सिनेविश्वात प्रसिद्ध असलेली अभिनेत्री खुशबू तावडे ही स्वतःच कॅफे चालवते ती आजच्या इंटरनॅशनल कॉफी डे बद्दल काय म्हणते “कॉफी ही माझ्यासाठी मनमुराद आस्वाद घेण्याची गोष्ट आहे.तुम्हाला कमी वेळात आनंद द्यायचं काम कॉफी करते. कोरोनाच्या काळात कॅफे बंद असताना टेक अवे कॉफीची सेवा देऊन त्याचा आनंद मला हिरावून घ्यायचा नव्हता. कोरोनाचा आमच्या कॅफेवर पण तसाच परिणाम झाला. मार्च पासून कॅफे बंद करायला लागला. कारण प्रत्येक परिस्थितीत कॅफेच्या स्टाफची सुरक्षा महत्त्वाची आहे. पण ह्या काळात लोकांचं कॅफेवर किती प्रेम आहे हे जाणवलं. लोकं आतुरतेने कॅफे उघडायची वाट बघत आहेत. कॉफी हे आपलं स्वतःचं भारतीय पीक आहे. भारतात मोठ्या प्रमाणात कॉफी पिकवली जाते. अनेक भारतीय कॉफीचे प्रकार प्रसिद्ध सुद्धा आहेत. त्यामुळे आपल्याकडच्या गोष्टीला जास्तीत जास्त लोकांनी उचलून धरावं असं वाटतं, ह्याचा अर्थ मनाविरुद्ध कॉफी प्यावी का तर नाही पण ज्यांना आवड आहे त्यांनी कॉफीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना थोडी आपण आपल्याकडून मदत करावी असं वाटतं”
रसिक नानल (प्लॅनेट मराठी)