{"source_sid":"88C4D871-59EA-4362-A5D6-BF20078FF5B2_1602178150884","subsource":"done_button","uid":"88C4D871-59EA-4362-A5D6-BF20078FF5B2_1602178150868","source":"other","origin":"gallery"}
पत्रं, मनातील भावनांची मोकळी वाट.
“अहो आजोबा तुमचं पत्र आलंय”, हे वाक्य काळानुसार गायब होत जाणार यात शंका नाही. आजची एवढी कमालीची टेक्नॉलॉजी असलेल्या देशात हल्ली पत्र वगैरे कोण लिहितंय…? पण आज पत्राविषयी बोलण्याच कारणही तेवढंच खास आहे, ‘जागतिक टपाल दिना’चं. पूर्वी गावी किंवा घरी पोस्टमन आला की सगळी घरची मंडळी जमा व्हायची. पोस्टकार्ड, पत्र यांची जागा आजच्या ई-मेल आणि मेसेजने घेतली, पण पोस्टातून आलेल्या पत्राची सर या मेल्स आणि मेसेजला नक्कीच नाही. आपल्याला कोणीतरी पत्र लिहावं आणि ते पोस्टातून यावं ही अनेकांची भन्नाट इच्छा असते. २१ व्या शतकात जगताना आपल्याला कोणी तरी पत्र लिहिलं तर नक्कीच तुम्ही फार खास आहात.
स्मार्टफोनच्या जमान्यात हे ‘पत्र’ खरंच हरवत चाललं आहे. लहानपणी ‘मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं’, हा खेळ खेळण्यात जी गंमत होती, ती आजच्या कोणत्याच खेळात नाही. नाइंटीज् साठी हा खेळ म्हणजे अनोखी पर्वणी असायची पण आता हे सगळे खेळ विस्मरणात गेले आहेत.
जगभरात आजसुद्धा लोकं एकमेकांना पत्र लिहितात याचं नक्कीच समाधान आहे, पण हल्ली पत्र हे फक्त व्यवसायासाठी वापरलं जातंय. दरवर्षी १० ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगभरात ‘जागतिक टपाल दिवस’ साजरा केला जातो.
सध्या आपण इमेल्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांची माहिती जाणून घेतो जुन्या काळात मात्र पत्रं आणि टपाल यांची स्वतःची एक अनोखी शान होती. पत्र हे भावनांच अनोखं माध्यम होत. आजच्या घडीला एका सेकंदात येणारा संदेश तेव्हा १ महिन्याने किंवा १ आठवड्याने लोकांपर्यंत पोहचायचा पण खरंच पत्र हे विस्मृतीत गेलंय. पत्र येण्याची रुखरुख असायची पण आता एका क्षणात मिळणारा मेसेजमुळे आपण ही गंमत कुठेतरी हरवून बसलोय. पोस्टमन काका आणि त्यांच्याकडे असलेलं पत्रांच गाठोडं बघून तर वेगळीच मज्जा यायची किती लोकांनी आपल्या प्रियजनांना लिहिलेली असंख्य पत्र यात असतील ना… हा भाबडा प्रश्न असायचा. अजून एक गोष्ट म्हणजे पत्रावर चिटकवले जाणारे विविध रंगेबेरंगी स्टॅम्पस हे गोळा करण्याचा छंद फक्त पत्रामुळे लागला.
म्हणून पत्र आहे खास…
मनातील भावना शब्दांतून मांडून ते पत्र टपालात टाकण्यापासून ते त्या पत्रांच उत्तर येईपर्यंतचा सगळा प्रवास मनाला हुरहूर लावून जाणारा असतो. स्वतःच्या हाताने सुंदर अक्षरात लिहिलेले ते पत्र खरंच किती खास असत ना. आताच्या इंस्टाग्राम, व्हाट्सॲप आणि फेसबुकवरच्या मेसेजिंगमध्ये ही गंमत नाही. तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं आणि आपण कितीही स्मार्ट टेक्नोसेव्ही झालो तरी आपल्या प्रत्येकासाठी ‘टपालाच/पोस्टाच’ स्थान आपल्या मनात अढळ आहे. पत्र वाचून मिळणार मानसिक समाधान आजच्या मेसेज आणि इमेल्स मध्ये नाही. तुम्ही कोणाला आणि कधी शेवटचं पत्र लिहिलंय? आजच्या जागतिक टपाल दिनी तुम्ही सुद्धा जरा हातात पोस्टकार्ड / वही-पेन घेऊन तुमच्या भावना पत्रात नक्की लिहा!
नेहा कदम (प्लॅनेट मराठी)