{"source_sid":"88C4D871-59EA-4362-A5D6-BF20078FF5B2_1602407448776","subsource":"done_button","uid":"88C4D871-59EA-4362-A5D6-BF20078FF5B2_1602407448760","source":"other","origin":"gallery"}
तुझी रूपं अनेक पण तू एकच आहेस जिच्यावाचून प्रत्येक भावना, संवेदना अपूर्ण आहे.
माणूस जसा जन्माला येतो तसाच तो देवाघरी जातो. देवाच्या दारात माणूस हा कोणत्याच प्रकारे विभागला जात नाही. मग एक बाळ जेव्हा जन्माला येतं त्याच्या लिंगानुसार त्यात भेद करणारे आपण कोण? एक खेळ आहे ज्यात आपल्याला एक शब्द सांगितला जातो त्या शब्दाशी संबंधित पहिला मनात येणारा शब्द कोणता तो आपल्याला सांगायचा असतो. जर मुलगी असा शब्द म्हणला तर आपल्या मनात खरोखर पहिला शब्द काय येईल? आपलं मुलींविषयीचं मत त्यावर निर्भर आहे. आपण मुलींना कसं वागवतो, त्यांच्याशी कसं बोलतो, कसे सामोरे जातो हे त्या मनात पहिल्या येणाऱ्या शब्दामुळे कळतं. आपल्याकडे प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे आहेत,मुलांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत ही प्रगती करतानाची चित्र अनेकदा दाखवली आहेत पण हे चित्र दिसत तितकं खरं आणि शत प्रतिशत बरोबर आहे का? ह्या International Girl Child Day च्या निमित्ताने स्वतःला थोडे प्रश्न विचारू.
आपल्याकडे मुलगी म्हणलं की आपण कायम तिचा बचाव करण्यासाठी का धडपडतो? तिला कोणत्यातरी बंधनात अडकवायला का जातो? एक माणूस म्हणून ती ही स्वतंत्र आहे हे का नाही समजून घेत? असे निरुत्तर प्रश्न घेऊन आपल्या समाजात आज अनेक मुली वावरत आहेत आणि ह्याचं कारण पुरुषांनी स्त्री ला दिलेली वागणूक हे नसून स्त्री च्या दृष्टीने केला जाणारा विचार हे आहे. मुलगी जन्माला घालायची का नाही इथूनच तिच्या असण्यावर, अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. उदरात वाढणारी मुलगी पदरात पाडून घ्यायची का नाही ह्यावर ठाम नसलेले, तिला जन्माला घातल्यावर एक ओझं म्हणून बघणारे पालक हे मुळात तिच्या मनात दुःख आणि भय निर्माण करतात. दरवेळी मुलगी ही स्वतःचं रक्षण करण्यासाठी कमकुवत आहे हे दाखवणं मुळात बंद केलं पाहिजे. तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांसाठी तिला दोष देणं बंद केलं पाहिजे.
मुलगी आणि तिच्या वागण्यावर असलेली बंधन कदाचित बऱ्याच वर्षांपासून असतील पण त्या चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करण्याची क्षमता आपण कोणीच तितकी निर्माण करू शकत नाही आहोत आणि कदाचित त्याचमुळे मुलींनी एखाद्या साचेबद्ध गोष्टी केल्या पाहिजेत हा विचार अधिक प्रमाणात लोकांच्या मनावर बिंबवला गेला. लोकांचं एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल मत तयार करणं आणि ते बदलणं, लोकांना नवे विचार देणं हे चित्रपट, सिरीज अश्या मनोरंजनाच्या माध्यमातून सहजपणे करता येतं. अश्या साधनांचा वापर मुलींना अधिकाधिक सबळ करण्याच्या दृष्टीने केला गेला पाहिजे. मालिकांमध्ये स्त्रीचं दाखवलेलं साधं, सालस आणि सरळ मार्गी चालणारं रूप तिला एका अर्थी संस्कारी दाखवत असलं तरी तिला स्वतंत्र विचारांची न दाखवता कोणावर तरी अवलंबून आहे का असा प्रश्न पडून जातो.
आपल्याकडे स्त्रियांच्या बाबतीत वाढणारे अत्याचार बघता आपल्या मनात असलेली एक ममत्वाची, आदराची भावना मरत चालली आहे का असा प्रश्न पडतो. आपल्याकडे मुलीच्या प्रत्येक रुपाला देवीच्या रुपात पाहिलं जातं आणि सध्या आपण स्वतःच तिची ती प्रतिमा स्वतःच्या हाताने कमी करतोय आणि प्रत्येक बाबतीत मुलींची होणारी चूकच एवढ्या सगळ्या अत्याचारांना जबाबदार आहे हेच दाखवत आलोय. आजही भारताच्या अनेक भागात मुलींना बंधनात अडकवून ठेवलं जातं. शिक्षणासारख्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवलं जातं. वयाआधीच अंगावर घर आणि संसार ह्यांची जबाबदारी त्यांच्या अंगावर पडते आणि परिणामी मुलींना त्यांच्या आवडी निवडी मारून आयुष्य काढावं लागतं. घरात मिळणारी असमान वागणूक, स्वतःचं मत व्यक्त न करता जगत राहणं ही दिनचर्या असलेल्या अनेक मुली आजही भारतात आहेत. हे सगळं बघितल्यावर पुढे जाणाऱ्या, प्रगती करणाऱ्या आणि मागे राहिलेल्या भारतात दुवा म्हणून हात पुढे करायला कोणी नाहीये ह्याची जाणीव होते.
And here you are living, despite it all- Rupi Kaur
हा रुपी कौर ह्यांचा विचार इथे लागू पडतो. हे घडत असलेलं सगळं खरं असूनही एक मुलगी म्हणून आपलं आयुष्य ती जगत आहे. रोज येणाऱ्या अडचणींवर मात करून आनंदी राहत आहे. प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटवत आहे पण कधीतरी ह्या हसऱ्या चेहऱ्यामागे असलेली भीती, दुःख ह्या खऱ्या भावनांचं काय करायचं हा प्रश्न मुलींसमोर आहेच. जेव्हा ह्या हसऱ्या चेहऱ्यामागे कोणत्याच दुःखाच्या झालरीचा वेगळा मुखवटा लपवावा लागणार नाही तेव्हा कदाचित एखादी मुलगी कोणत्याही भितीशिवाय मोकळेपणाने समाजात फिरू शकेल.
ह्याच विषयावर प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव असं म्हणते “मला एक मुलगी असल्याचा अतिशय अभिमान आहे. मुलीइतकं समंजस, सहनशील आणि संवेदनशील दुसरं कोणी नसू शकतं. प्रत्येक ठिकाणी आज मुलगी मुलाच्या खांद्याला खांदा लावून चालते आहे पण तिचं कार्य हे कायम मुलांपेक्षा एक पाऊल पुढे आहे. आज जरी मुलींना समाजात वावरताना समस्यांना तोंड द्यावं लागत असेल तरी निसर्गाने मुलींना अनेक वरदान दिलेले आहेत. तिच्यावर अन्याय अत्याचार होत असतील तरी त्यांना तोंड देऊन लढणारी, स्वतःच आयुष्य सावरणारी सुद्धा मुलगीच आहे. जिथे जिथे मुली स्वतःला उभं करण्यासाठी झटत आहेत तिथे नक्कीच त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या अन्यायचं पारडं कमी होऊन त्या अधिक सक्षम होतील.”
रसिक नानल (प्लॅनेट मराठी)