‘ती’ चा प्रवास… : १ (महिला मूर्तिकार रेश्मा विजय खातू)
दिग्दर्शन, जाहिराती आणि इव्हेंट मॅनेज करणारे हात चक्क मूर्ती घडवतं आहेत. थोडं नवल वाटलं ना…? पण आपल्या ‘प्लॅनेट मराठी’च्या नवरात्री विशेष मालिकेच्या निमित्तान आपण प्रसिद्ध मूर्तिकार रेश्मा विजय खातू यांच्याशी गप्पा मारल्या आहेत. “वडिलांचं निधन झाल्यानंतर महिला मूर्तिकार म्हणून नावारूपास येणं, फार कठीण नव्हतं. पण ते नावं टिकवण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अनेक अडचणी ही आल्या”, सांगतेय मुंबईतील प्रसिद्ध महिला मूर्तिकार रेश्मा खातू.
बालपण मुंबईतल्या लालबाग परिसरातलं. लालबागच्या त्या चाळींमधील वातावरण रेश्मा आणि कुटुंबियांमध्ये एवढं भिनलय की, आजही खातूंच्या घरी चाळ संस्कृती नांदते. लालबाग आणि तिथल्या संस्कृतीने एका वेगळ्या पद्धतीने आम्हाला घडवलं, असं रेश्मा सांगते. खरंतर, रेश्माचं मूर्तिकार बनण हा एक अपघात म्हणता येईल. दिग्दर्शन, जाहिरात क्षेत्र आणि इव्हेंट मॅनेजमेंट हा खरा रेश्माचा पिंड. पण, गणेश चतुर्थीच्या आधी ते थेट घटस्थापनेपर्यंत दिग्दर्शन करणारे हे हात बाप्पााच्या आणि देवीच्या सुबक मूर्ती बनवण्यात दंगून जातात.
रेश्मा ही सुप्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांची कन्या. २०१७ साली विजयजींचं ऐन गणपतीपूर्वी निधन झालं आणि मुर्तीकलेची सगळी जबाबदारी रेश्माच्या खांद्यावर आली. पण, आजवर ही जबाबदारी रेश्मा लिलया पेलते. मूर्तिकार म्हणून पुरुषांची जास्त गर्दी असलेलं हे क्षेत्र खरंतर रेश्मासाठी अगदी नवीन. पण, विजय खातू हे नावं जपण्यासाठी आणि हा वारसा पुढे सुरु ठेवण्यासाठी या क्षेत्राकडे वळल्याचं रेश्मा आवर्जून सांगते. “बाबांच्या हातून बरेचं मूर्तिकार घडले… ते नावारूपाला आले. या क्षेत्रात नाव कमावलं, त्यामुळे बाबांचा हा प्रवास आणि धडपड अगदी जवळून पाहिल्याचं रेश्मा सांगते. अथक परिश्रम करतं यशाच्या शिखरावर पोहचलेल्या खातू सरांनी जगाचा निरोप घेतला आणि मुलगी म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी रेश्माने हे महत्त्वाचं पाऊल उचललं. आजही मुंबईतील अनेक नामांकित मुर्तीकारांमध्ये ‘खातू’ हे नाव टिकवण्यात तिचा मोलाचा वाटा आहे.
शिक्षण अगदीच वेगळ्या क्षेत्रातून झालं असल्यामुळे, आपल्याला हे जमेल की, नाही? हा प्रश्न असतानाही ती या क्षेत्राकडे वळली आणि रूळलिही. महिला मूर्तिकार म्हणून, या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागला असं रेश्मा सांगते. ‘स्त्रीत्वा’ची आपल्या सोयीनुसार व्याख्या करून, महिलांना कमकुवत बनवण्याचं काम आपल्या समाजात हमखास होतं. पण ‘स्त्री’ असण्याचा मला असलेला अभिमान मी ढाल म्हणून कधीच वापरत नाही, वापरणार नाही. स्त्री-पुरुष समानता असायला हवी. कारण दोघंही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. पण, एखादी बाई आपल्यावर रागावते आपल्यावर वर्चस्व गाजवते या गोष्टी आपल्या समाजात आजही न पटणाऱ्या आहेत. याचा अनुभव मीही घेतला आहे. पण या गोष्टींना फारस महत्त्व न देताना माझ्या संपूर्ण टीमला सोबत घेऊन पुढे चालणं माझ्यासाठी महत्त्वाच होतं आणि मी तेच करतं मार्गस्थ होते.
मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)