‘ती’चा प्रवास… : ५ (परदेशी भाषा अभ्यासक अमृता जोशी आमडेकर)
‘अमृता लॅग्ज’ हे नावं अमृता यांच्या कर्तृत्व आणि सोशल मीडियावरील त्यांच्या लक्षवेधी मुलाखती यांमुळे अनेकांना माहित असेल. अमृता जोशी आमडेकर यांच्या विविध भाषांवरील प्रेमामुळे, पुढे ‘भाषा’ हिच त्यांची ओळख बनली. भाषांमुळे (‘लॅग्यूजेस’मुळे) ओळख मिळाली आणि ‘अमृता लॅग्ज’ म्हणून त्या नावारूपास आल्या. पुढे अनेकांना त्यांनी त्यांना अवगत असलेल्या भाषांचं ज्ञान दिल. भाषा प्रशिक्षक आणि आयुष्यभर नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असणाऱ्या अमृता प्रत्येक भाषे इतक्याच मधाळ आणि प्रसंगी कणखर आहेत. ‘प्लॅनेट मराठी’च्या नवरात्री विशेष मालिकेच्या निमित्तान जाणून घेऊया भाषाप्रेमी अमृता यांच्या बद्दल…..
अमृता यांना बावीस परदेशी भाषा अवगत आहेत. खरंतर, हे एक वाक्य अमृता यांचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पुरेस आहे. दादरच्या किग्ज जॉर्ज (आताची राजा शिवाजी विद्यालय) शाळेत शिकणारी चुणूकदार अमृता अभ्यासाबरोबरच शाळेतील इतर उपक्रमांमध्येही अत्यंत हुशार होती. बास्केटबॉल, स्विमिंग, बॅटमिंटन आणि रोप-मल्लखांब (राष्ट्रीय पातळी) अशा विविध कलांमध्येही निपुण होती. शाळेत आठवी, नववी आणि दहावी या वर्षांत अभ्यासक्रमांमध्ये फ्रेंच भाषा होती. पण, ती परीक्षेत उत्तरं लिहिण्यापुरतीच मर्यादित राहिली. मात्र दहावीनंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खरंतर विविध भाषांची गोडी लागल्याचं अमृता सांगतात. सुट्टीत माझे आजोबा (आईचे वडील) मला मॅक्सम्युलर भवनला घेऊन गेले होते. तिथूनच, माझ्या भाषा वारीला सुरुवात झाली असं म्हणता येईल, असं अमृता म्हणतात. वयाच्या पाचव्या वर्षी अमृता यांनी भारतभर जादूचे खेळ केल्याचं त्या सांगतात. त्यामुळे अमृता या त्याकाळी भारतातील तरुण जादुगार होत्या, असं म्हणणं वावग ठरणारं नाही. या बरोबरच नाटकांमधून बाल शिवाजी, बाल संभाजी अशा विविध भूमिकाही त्या साकारत होत्या.
प्रत्येक भाषेला त्याची एक वेगळीच गोडी असते. अमृता यांना मात्र एक-दोन नव्हे तर तब्बल बावीस भाषांची गोडी लागली आणि या भाषांनीही अमृता यांना आपलसं केलं. आपली मातृभाषा वगळता दुसरी एखादी नवीन भाषा शिकायची म्हटल्यावर आपल्या नाकी नऊ येतात. पण, अमृता यांच्यासाठी हा भाषेचा बागुलबुवा त्यांच्या लहानपासूनच दूर पळाला होता, तो आजोबांमुळे… असं त्या आवर्जून सांगतात. तुम्हालाही अशा इतर भाषा शिकायच्या असतील तर आधी भाषेची भीती दूर करा आणि मन मोकळेपणे त्या भाषेचा आनंद घ्या असं अमृता सांगतात.
अमृता यांच्या बालपणी घरी वडीलांचा त्यांच्या आई ज्योती यांना होणारा त्रास आणि त्याची झळ आईने अमृतापर्यंत केव्हाच पोहचू दिली नाही. कदाचित त्याचसाठी आईने विविध उपक्रमांमध्ये मला गुंतवून ठेवण्यासाठी अनेक शिकवण्या लावल्या आणि त्याचा उपयोग खरंतर माझ्या भविष्यासाठी झाला असं त्या सांगतात. “प्रत्येकाच्या आयुष्यात काही चांगलं घडण्यासाठी त्याला वाईटाची किंवा दुःखाची पार्श्वभूमी असायलाच हवी असा काही नियम नाही.” घरच्या परिस्थितीमुळे ना माझी आई कधी रडतं बसली…. न मी तिला कधी त्या दुःखात पाहत बसले, असं अमृता कणखरपणे बोलतात. ‘आपल्या कामावर विश्वास ठेवणं आणि सतत काम करतं राहणं’, या एका तत्त्वावर अमृता गेली अनेक वर्ष काम करत आहेत.
घरी आणि आजूबाजूला घडणाऱ्या प्रकारांमुळे मी कणखर झाले… स्वतः अन्याय सहन करायचा नाही, इतरांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा हे अमृता यांच्या जणू रक्तात भिनलेलं. पुरुषांना कमी लेखून स्त्रीत्वाच्या ओव्या गाणं हे साफ चुकीचं असल्याचं त्या म्हणतात. समानता आणि समानतेची वागणूक हा सगळ्याचा मुलभूत अधिकार आहे असं त्या सांगतात. त्यामुळे जात, लिंग, वय, रंग अशा कोणत्याही चौकटीत कोणालाही न विभागता प्रत्येकाला समान संधी मिळणं आणि ती संधी मिळवण्यासाठी धडपड करणं आवश्यक असतं असं अमृता सांगतात. आयुष्यात पुढे जाताना आपल्याला मनोबळ गरजेचं असतं. तो खंबीरपणा मला माझे आजोबा(आईचे बाबा) आणि आई (ज्योती) यांच्याकडून सतत मिळतं होता, असं त्या आवर्जून नमुद करतात. दिवसागणिक बदलत्या युगाबरोबर आपणही बदलून, समानता नव्याने आत्मसात करतं जीवनाचा आनंद घेतं जगणं हे खूप महत्त्वाचं आहे असं त्या म्हणतात.
अमृता यांच्या कडून विविध भाषा शिकण्यासाठी आणि भाषांची गंमत अनुभवण्यासाठी त्यांच्या युट्यूब चॅनला भेट द्या
https://www.youtube.com/user/amruthaglangs
मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)