‘ती’चा प्रवास… : ८ (शेफ अदिती लिमये कामत)
‘शेफ’ म्हणजे आपण हॉटेलमध्ये गेल्यावर रुचकर जेवण करून आपल्या तृप करणारा पुरुष स्वयंपाकी असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं. पण, आजची स्त्री ही, ‘घरी चूल आणि मूल सांभाळणारी नसून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी रणरागिणी आहे. गेली अनेक अनेक वर्ष रेस्टोरंट इंडस्ट्रीमध्ये काम करून आपल्या रुचकर मेजवानीने ग्राहकांना तृप करणाऱ्या शेफ अदिती लिमये कामत हे महत्त्वाचं नावं. ‘प्लॅनेट मराठी’च्या नवरात्री विशेष मालिकेच्या निमित्ताने जाणून घेऊया आदिती यांच्या रुचकर आणि खमंग प्रवासाविषयी….
‘होम शेफ’ आणि त्यामुळे अदिती लिमये कामत हे नाव अनेकांच्या ओळखीच. लहानपणापासून पणजी-पणजोबा, आजी-आजोबा, आई-बाबा अशा तीन पिढ्या एकत्र राहणाऱ्या कुटुंबात आदिती वाढल्या. वडिल राहुल लिमये यांना बघूनचं अदिती यांनी या क्षेत्राची निवड केली असल्याचं त्या सांगतात. त्याकाळीही आधुनिक विचारांनी परिपूर्ण असणाऱ्या लिमये कुटुंबीयांनी स्त्री-पुरुष असा भेद कधीच केला नाही. अदिती यांच्या आजी स्वतः काम करतं. त्यासोबतच त्यांनी अदिती यांच्या आईलाही नोकरीसाठी नेहमी प्रोत्साहन दिलं. ‘स्त्रियांनीही काम करावीत, घराबाहेर वेळ घालवावा, स्वतःच्या पायावर उभं रहावं’, या मताच्या कुटुंबामुळेच लहानपणापासूनच अदिती यांच्यावर तसे संस्कार झाले. बाबा शेफ आणि आजी सामाजिक कार्यकर्त्या त्यामुळे समाजकार्य किंवा रेस्टोरंट इंडस्ट्री या दोनपैकी काहीतरी एक निवडण्याचं अदिती यांनी लहानपणीच ठरवलं होतं. अखेर अस्सल खव्वये असणाऱ्या अदितीने शेफ बनण्याचा निर्धार केला.
वडील या क्षेत्रात असूनही कामाच्या अनिश्चित वेळा आणि इतर काळजी खातर वडिलांनी अदिती यांच्या या निर्णयावर नाराजी दर्शवली होती. परंतु, आदिती त्यांच्या निर्णयावर ठाम असल्यामुळे पुढे वडिलांसह संपूर्ण कुटुंबाने त्यांना पाठिंबा दिल्याचं त्या सांगतात. शेफ म्हणजे चटकदार-चमचमीत जेवण बनवणारा पुरुष हे अनेकांच्या डोक्यात ठरलेलं समीकरणं. पण या क्षेत्राकडे वळणाऱ्या मुलींची संख्या कमी असल्यामुळे अनेकांचा हा गैरसमज होतो, असं अदिती म्हणतात. परंतु, “मी हे क्षेत्र माझं करिअर म्हणून निवडल्याच मला समाधान आणि त्यामुळे मिळणारी सकारात्मकता माझ्यासाठी महत्त्वाची आहे. शिवाय, हे क्षेत्र मी माझ्या इच्छेनुसार निवडल्यामुळे, त्यात कसं यशस्वी व्हावं, यासाठी माझी मेहनत करण्याची तयारी होती, अजूनही आहे.” असं अदिती सांगतात.
कॅटरिंग कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर तुम्ही स्त्री किंवा पुरुष आहात या पेक्षा तुम्ही कोणत्या कामात रमता आणि तुम्हाला कोणतं काम सर्वाधिक आवडतं यावर भर दिला जातो. त्यामुळे अदिती यांच्यासाठीही ही एक जमेची बाजू ठरली असं म्हणता येईल. अर्थात सगळ्या कॉलेजप्रमाणे इथेही रॅगिंगचे प्रकार घडतात. पण, आपण स्त्रिया असलो तरी आपण खंबीर असलो तर कोणीही आपल्या वाटेला जात नाही असं त्या म्हणतात. आजवर काम केलेले सगळेच पुरुष सहकारी माझ्यासाठी फारच समंजस वागल्याचा मला आनंद आहे, असं त्या म्हणतात. सगळ्याच क्षेत्रांमध्ये पुरुषांची काम करण्याची संख्या अर्थात जास्त असली तरी, आपण सकारात्मक आणि काम करण्याची जिद्द ठेऊन वावरलो तर तेच पुरुष आपल्याला सहकार्य करतात असं आदिती आवर्जून सांगतात.
लग्नानंतर लिमयांच्या घरातून कामतांच्या घरी आले, तेव्हाही माझ्याएवढी नशीबवान मीचं होते असं म्हणण चुकीचं ठरणारं नाही असं आदिती म्हणतात. करिअरच्या प्रत्येक निर्णयात मला माझ्या माहेरच्या मंडळींइतकाच सासरीही पाठिंबा मिळाला. दोन्ही कुटुंब आधीपासूनच या क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे रेस्टोरंट सुरु करणं आणि ते चालवणं हे सोपं नसतं हे त्यांनाही माहिती असल्याने माझ्या प्रत्येक निर्णयात मला या सगळ्यांची साथ लाभली. शिवाय माझ्या या यशात माझ्या पतीचाही मोलाचा वाटा आहे असं आदिती सांगतात. मला जसा माझ्या प्रत्येक निर्णयात कुटुंबियांची साथ लाभली तशी साथ आज अनेक स्त्रियांना लाभायला हवी अशी इच्छा त्या यानिमित्ताने व्यक्त करतात. येत्या काळात नवनवीन बदलांसह फुड इंडस्ट्रीमध्ये अमुलाग्र बदल घडवण्याचा आदिती यांचा मानस असल्याचं त्या सांगतात.
मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)