‘ती’चा प्रवास… : ९ (अभिनेत्री – उद्योजिका तेजस्विनी पंडित)
एकीकडे देशावरील कोरोनाचं सावट आणि दुसरीकडे प्रसन्नता घेऊन येणारा नवरात्रोस्तव… नवं चैतन्याच्या या उत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. अंबा, चंडी, राज्ञी, रेणुका या आणि अशा विविध नावांची तिची ओळख प्रचलित असली तरी कोरोना काळात मात्र तिच्यातील परिश्रम, कणखरता, जिद्द, दया अशा अनेक भावनांचं दर्शन ‘स्त्री’ रुपी देवीत घडलं. कधी ती झाडू घेऊन स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरली, तर कधी ती डॉक्टर रुपात रुग्णाच्या हाकेला धावली. ‘ती’च्या अशा एक ना अनेक रूपांच दर्शन अभिनेत्री तेजस्विनी पंडित च्या फोटोशूटमधुन घडलं. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. गेले ३ वर्ष नवरात्रीत विविध संकल्पनांवर आधारीत फोटो सिरीज घेऊन तेजस्विनी आपल्या समोर येत आहे. यंदाच्या या फोटोशूट बद्दल तिच्याकडून जाणून घेऊया. ‘प्लॅनेट मराठी’च्या नवरात्री विशेष मालिकेच्या निमित्ताने….
दैवी कार्याला सलाम
यंदाच्या नवरात्रीच्या फोटोशूटबद्दल खरंतर काहीच कल्पना नव्हती. परंतु माझ्या टीमच्या खंभीर पाठिंब्यामुळे हे शक्य झालं. दरवर्षी मी नवरात्रीत वेगवेगळ्या विषयांवर शूट करत असते पण यातून प्रबोधन होईल असा काही हेतू नसतो. मागच्या वर्षी मला खदखदणाऱ्या गोष्टींवर आम्ही शूट केलं तर यावर्षी सगळीकडे कोरोनाचं वातावरण आहे आणि यात आपल्याला मदत करणाऱ्या लोकांना आपण धन्यवाद म्हणू, म्हणून यंदा आमच्या शूट मधून कोरोनासाठी लढणाऱ्या कोरोना योध्यांना आमच्या शूट मधून एक ‘थँक्स’ बोलण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोरोनासारख्या महामारीत अनेक लोक आपल्याला दिवस रात्र मदत करतात. त्यांच्या अविरत कामाला सलाम म्हणून हे शूट आहे. दैवी कर्म करणाऱ्या सगळ्यांना आमच्या शूट मधून एक सलाम करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न…
‘थँक्स’ बोलण्याची एक संधी
२०१७ पासून मी नवरात्रीसाठी फोटो शूट करते आहे. २०१७ साली आपल्या देशातील काही महान स्त्रियांच्या कथा मांडल्या. २०१८ साली देवीची नऊ रूप आणि २०१९ साली त्या वर्षात घडलेल्या अश्या गोष्टी ज्यांने मला त्रास झाला एक माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून ज्या गोष्टी मला खटकल्या अश्या गोष्टींवर भाष्य करणार मी फोटोशूट केलं आणि यावर्षी मला सगळ्या लोकांचे आभार मानावेसे वाटले म्हणून हा यंदाचा वेगळेपणा. यावर्षी जरी परिस्थिती भयंकर असली तरी आपण त्यातून नकळत अनेक गोष्टी शिकलो. आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने कसं बघावं हे या वर्षाने शिकवलं. संकल्पना सुचवण्यात धैर्यशील मदत करतो आणि मग यातून कामाला सुरुवात होते. एक वेगळा आर्टफॉर्म या शूट निमित्ताने आम्हाला अनुभवता आला.
आमची आवडही महत्त्वाची…
समाज प्रबोधन करण्याचा आमचा उद्देश नसतो. पण यावर्षी नवरात्री आधीपासून मला लोकांचे मेसेज आले, “यंदा नवरात्रीत नवीन काय?” आम्हाला जे आवडतं, आम्हाला जे पटतं, आम्हाला जे खदखदतं असे लोकं एकत्र येऊन हे शूट करतो. जेव्हा आम्ही लोकांसमोर अशा संकल्पना घेऊन येतो तेव्हा पाठीवर थाप मिळते. कौतुक होत तेव्हा पुढच्या वर्षीसाठी काम करण्यासाठी हुरूप मिळतो. तेव्हा कुठेतरी जवाबदारी वाढली आहे यांची जाणीव होते. प्रेक्षकांमुळे आम्हाला नवी ऊर्जा मिळते. नवनवीन विषयाचा खोलवर अभ्यास करून काहीतरी कल्पक करण्याची नवीन उमेद मिळते.
ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करायला शिकले
नवरात्रीच्या नऊ दिवसांतून आम्ही स्वतःला व्यक्त करतो. प्रत्येक वेळी खूप सुंदर आणि वेगळ काहीतरी करता यावं हा आमचा हेतू असतो. एखाद्या विषयाचा खोलवर अभ्यास करून आम्ही हे शूट करतो. मागच्या वर्षी अनेक फोटोंवरून ट्रोल झालो. पण, मला जे आवडतं, ज्यातून मला आनंद मिळतो, ते मी करते. अशावेळी स्वतःला आणि स्वतःच्या आनंदाला महत्त्व देतं, ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करायला मी शिकले आहे. आपल्याला जे आवडतं तेच आपण करावं म्हणून नवनव्या संकल्पना घेऊन आम्ही गेली ३ वर्ष नवरात्रीत शूट करतोय. या फोटोशूट मधून आम्ही स्वतःचा शोध घेऊ शकतो. यावर्षी खरंच मी काही शूट करणार नव्हते. पण धैर्यने मला यासाठी आपण काहीतरी करायचंच असं सांगितलं. शूट झालं, आणि लोकांनाही ते आवडलं.
समाजासाठी लढणाऱ्याना सलाम…
समाजासाठी ज्यांनी आजच्या परिस्थितीत स्वतःचे प्राण पणाला लावून सगळ्यांना मदत केली त्यांच्यासाठी आम्ही हे खास शूट केलंय. यावर्षी आपल्या समाजातील एक सकारात्मक बाजू दाखवण्यासाठी आम्ही हा वेगळा प्रयत्न केलाय. आपण एक कलाकार म्हणून या समाजाचं देणं लागतोय या भावनेतून आम्ही हे काम करतोय. – धैर्यशील घोलप (दिग्दर्शक)
मुलाखत – नेहा कदम (प्लॅनेट मराठी)