आगीतून चित्राला जन्म देणारा अवलिया कलाकार राम देशमुख.
‘चित्र’थरारक कलाकार राम…
गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर हातात पेटतं लाकूड घेऊन चित्र काढणाऱ्या कलाकाराचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. केवळ पेटवलेल्या लाकडाचा उपयोग करून तयार केल्या गेलेल्या चित्रांचं विविध स्तरांतून कौतुकं होतंय. या अनोख्या कलेमागाचा चेहरा म्हणजे राम देशमुख. फाईन आर्ट्समधून शिक्षण पूर्ण केलेल्या राम यांना ‘फायर पेंटिंग’ची अनोखी कल्पना सुचली आणि त्यांनी सत्यातही उतरवली. डिजिटल पेंटिंगच्या शॉर्टकटला हाताने रेखाटण्याची मजा नाही असं म्हणणाऱ्या राम यांच्या ‘चित्र’थरारक कलेविषयी जाणून घेऊयात……
कलाकार हा शब्दांपेक्षा त्याच्या कलेतून व्यक्त होणं पसंत करतो असं म्हणतात. कोणतही चित्र रेखाटण्यासाठी फक्त पेन्सिल, कागद आणि रंग यांचीच आवश्यकता नसते. तर कलात्मक नजर असेल, तर प्रत्येक गोष्टीतून काहीतरी नवीन साकारलं जाऊ शकतं हे या अवलियाने त्याच्या कलेतून दाखवून दिलं आहे. तो अवलिया कलाकार म्हणजे मराठमोळा राम देशमुख. रामच्या लहानपणी वडील चित्र काढायचे, त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन राम यांना चित्रकलेची आवडं लागली. घरातील भिंती रंगवण्यापासून सुरु झालेला रामचा प्रवास आज त्याच्यातील कल्पकतेमुळे अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत.
औरंगाबादमध्ये एका गावात जन्मलेल्या राम यांना खरंतर या क्षेत्राविषयी पुरेशी माहितीही नव्हती. शाळेत चित्रकला ही फक्त नावापुरती… त्यातही अनेकदा चित्रकलेसाठी शिक्षकांचा अभाव. अनेकांना विचारून मग त्यांनी औरंगाबादच्या शास्त्रीय कला महाविद्यालयात प्रवेश मिळवला. तिथे एक वर्ष प्रशिक्षण घेतल्यानंतर मुंबईत एका नामांकित कंपनीसाठी काम करण्याची संधी त्यांना मिळाली. अवघ्या सोळाव्या वर्षी तब्बल ३५० उमेद्वारांमधून राम यांची निवड करण्यात आली होती. एक वर्ष काम केल्यानंतर पुन्हा पुढील शिक्षणासाठी राम यांनी औरंगाबादच्या यशवंत कला महाविद्यालयात प्रवेश मिळवला. सध्या मुंबईच्या चित्रनगरीत विविध सिनेमांसाठी कॅरेक्टर डिझाईन, बॅग्राउंड पेंटिंग अशी अनेक काम त्यांनी केली. ‘बिल्लू सफारी, लुटेरा, कमलू ही त्यातील काही महत्त्वाची नावं.
सध्या डिजिटल पेंटिंगच्या क्षेत्रात काम करणाऱ्या रामला कॅनव्हासवर ब्रशने रंगांचे फटकारे ओढल्याशिवाय चैन पडतं नाही असं तो आवर्जून सांगतो. त्यामुळे स्वतःची कला जपण्यासाठी त्याने वेळ मिळेल तसा चित्रकला सुरु ठेवण्याचं ठरवलं. काही दिवसांपूर्वी रामने वेगळा प्रयत्न म्हणून चित्रकलेचा थरारक विचार डोक्यात आणला आणि तो सत्यातही उतरवला. पेटतं लाकूड हातात घेऊन त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक भन्नाट चित्र घराच्या भिंतीवर रेखाटलं. सहजच तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि अल्पावधीतच त्यांचं हे चित्र लोकांच्या चांगलचं पसंतीस उतरलं.
त्यानंतर त्याने बिग बी अमिताभ बच्चन आणि संगीतकार-गायक जोडी अजय-अतुल यांचही चित्र रेखाटलं. विशेष म्हणजे रामच्या या चित्राला थेट अतुल गोगावले यांच्याकडून दाद मिळाली आहे. आयुष्यावर महाराजांचा प्रभाव असणार्या रामला येत्या काळात महाराजांचा इतिहास मांडणारी मालिका रेखाटण्याचा मानस आहे. त्यांच्या या कलेमागे कुटुंबियांची मोलाची साथ लाभत असल्याचं राम नमुद करतो.
अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)