जेष्ठ मालिका आणि सिनेनिर्माते महेश कोठारे यांची विशेष मुलाखत
प्रेक्षकांचं समाधान हेच माझं सुख : महेश कोठारे
बालकलाकार म्हणून कामाची सुरुवात करून, पुढे स्वतःची कंपनी सुरु करतं त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं. ‘झपाटलेला’, ‘धूमधडाका’, ‘माझा छकुला’, ‘थरथराट’, ‘जबरदस्त’, ‘पछाडलेला’ या आणि यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता अशी तिहेरी भूमिका त्यांनी लिलया पेलली. सिनेविश्वातील यशस्वी घौडदौड सांभाळत त्यांनी मालिका विश्वात पदार्पण केलं, ‘जय मल्हार’, ‘गणपती बाप्पा मोरया’सोबतच सध्याच्या त्यांच्या ‘दख्खनचा राजा जोतिबा’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिका जोरदार सुरु आहेत. टीआरपीच्या गणितातही या मालिका अव्वल ठरताहेत. मनोरंजन विश्वातील बहुचर्चित आणि आयामी व्यक्तिमत्व अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश कोठारे. सिनेमा आणि आता छोट्या पडद्यावरील या यशाबद्दल ‘प्लॅनेट मराठी’ने घेतलेली ही त्यांची खास मुलाखत….
मराठीतील बहुसंख्य खलनायक हे कोठारेंनी निर्माण केले. त्यांची नावं, लुक या सगळ्याच गोष्टी वेगळ्या होत्या. येत्या काळात कोणता नवा खलनायक कोठारे घेऊन येणारं?
आमचे सगळेच चित्रपट आणि त्यातील प्रत्येक पात्र या न त्या कारणामुळे एकमेकांपासून वेगळे ठरतात. त्यांच्यातील वेगळेपणामुळे चित्रपटाच्या नायकाबरोबरच खलनायकानेही प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळवली आहे. ‘माझा छकुला’, ‘झपाटलेला’, ‘थरथराट’, ‘धडाकेबाज’, ‘धूम धडाका’ असा एक एक म्हणता प्रत्येक चित्रपट त्याकाळीही प्रेक्षकांनी उचलून धरला. त्यातील ‘तात्या विंचू’, ‘कुबड्या खवीस’, ‘कवट्या महाकाल’असं प्रत्येक खलपात्र त्यावेळीही सगळ्यांच्याच पसंतीस उतरले आणि त्यांचे संवाद आजच्या पिढीच्याही तोंडी ऐकायला मिळतात याचा आनंद आहे. नुकताच आमची मालिका ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेतील नवा खलनायक ‘कोल्हासूर’ आणि त्याचा लुक प्रेक्षकांना आकर्षित करतोय.
चित्रपट आणि मालिका निर्मिती अशा दोन वेगळ्या विश्वात काम करताना नेमका काय फरक जाणवतो?
चित्रपट आणि मालिका या दोनही खरतरं वेगळ्या बाजू आणि दोन्हीसाठी काम करण्याची पद्धतही तशी अगदी वेगळी. परंतु, आमच्या विविध प्रोजेक्ट्ससाठी काम करणारी आमची टीम आणि त्यांची मेहनत हे आमच्या प्रत्येक प्रोजेक्टच्या यशाचं गमक आहे असं म्हणण चुकीचं ठरणारं नाही. मालिका आणि चित्रपट या दोन्हींसाठी काम करण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी, प्रत्येक प्रोजेक्टच्या माध्यमातून येणाऱ्या आवाहनातून नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते हेही तितकंच खरं.
कोठारे व्हिजनची निर्मिती असलेल्या पौराणिक मालिका आणि मालिकांचे भव्य सेट ही तुमची खासियत आहे. त्यात तुमची प्रत्येक मालिका हिट ठरते, याबद्दल काय सांगाल?
आमच्या बऱ्याच मालिका पौराणिक विषयांवर आधारित असतात. या काळातही प्रेक्षक प्रत्येक मालिकेला भरभरून प्रतिसाद देतात. मालिकेची कथा, पटकथा, संवाद, कलाकार यांच्या बरोबरीनेच मालिकेच्या सेट बाबतीतही आमची टीम कटाक्षाने लक्ष देऊन असते. प्रेक्षकांना गोष्टी खऱ्या भासाव्यात, प्रत्येक गोष्ट पाहताना समाधान मिळावं, याचं उद्देशाने प्रत्येक बारीकसारीक गोष्टवर आम्ही लक्ष देतो. सध्या एकाच वाहिनीवर आमच्या ‘दख्खनचा राजा जोतिबा’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या दोन वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका सुरु आहेत. दोन्ही मालिका टीआरपीच्या बाबतीत अव्वल ठरताहेत. अनुक्रमे कोल्हापूर आणि मुंबई अशा दोन ठिकाणी या मालिकांचं चित्रीकरण सुरु आहे. ‘जय मल्हार’ मालिकेच्या वेळी मुंबई चित्रनगरीतील भव्य सेट. तर, आता ‘दख्खनचा राजा…’ मालिकेचा कोल्हापूर चित्रनगरीतील डोळे दिपवून टाकणारा सेट प्रेक्षकांना खऱ्या ठिकाणांसारखे भासतात आणि त्याचं कौतुकही होतंय याचा आनंद आहे.
आदिनाथला सोबत घेऊन ‘माझा छकुला’ चित्रपट केलात, तो प्रचंड गाजलाही. जिजाला घेऊन कोणता चित्रपट किंवा मालिका असा काही विचार आहे का?
तूर्तास, असा काहीच विचार नाही. ‘माझा छकुला’च्या वेळी आदिनाथची चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. त्यासाठी तो स्वतःही तेवढीच मेहनत घेत होता. अजूनही घेतो. सध्या, जिजाच्या बाबतीत मालिका किंवा चित्रपट असा काही विचार नसला तरी, तिच्या तोंडून निघणारे आमच्या माझ्या चित्रपटांमधील बोबडे संवाद ऐकून भारावून जायला होतं. मध्यंतरी तिचा ‘तात्या विंचू’च्या तोंडातील संवाद जिजाच्या व्हिडीओच्या माध्यमातून पुन्हा एकदा व्हायरल झाले होते.
येत्या काळातील नव्या प्रोजेक्ट्सविषयी काय सांगाल?
लवकरच, आमच्या निर्मिती संस्थेच्या नव्या मालिका आणि चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतील. याबद्दलची अधिकृत माहिती लवकरच प्रेक्षकांपर्यंत पोहचवू. शिवाय, सध्या ओटीटीच्या लाटेत लवकरच कोठारे व्हिजनची निर्मिती असलेलं काहीतरी भन्नाट प्रेक्षकांसाठी घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न आहे.
तुमच्या प्रदीर्घ कारकीर्दीच्या पार्श्वभूमीवर तुमच्या मते ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’?
प्रत्येक कालाकृतीवरील प्रेक्षकांचं नितांत प्रेम आणि मिळणारा उदंड प्रतिसाद यापलीकडे कलाकार म्हणून दुसर सुख ते काय असणारं….
मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)