मनोरंजन विश्वातील धम्माल गोष्टी, चर्चा आणि अपडेट्स… #PlanetM_Masala मध्ये
प्रयोगशील ‘देजा वू’
लई भारी, तान्हाजी, लक्ष्मी यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केलेला अभिनेता म्हणजे शरद केळकर. शरद लवकरच ‘देजा वू’ या प्रयोगशील सिनेमात झळकणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात शरद एकटाच दिसणार असून, त्याच्याव्यतिरिक्तच्या इतर व्यक्तिरेखा फक्त आवाजांमधून चित्रपटात वावरतील. हा चित्रपट, चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार असल्याची चर्चा आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येईल असं समजतंय. ‘हा सिनेमा माझ्यासाठी खूप खास आहे. भारतीय चित्रपटविश्वातील हा पहिलाच असा चित्रपट असले ज्यात संपूर्ण चित्रपटात फक्त मी एकटाच असणार आहे. त्यामुळे हा प्रयोगशील सिनेमा प्रेक्षकांना कसा वाटतोय हे बघण्यास मी ही उत्सुक आहे’, असं शरद सांगतो. यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट दिग्दर्शक अभिजित वारंगने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
भार्गवी चिरमुले नव्या भूमिकेत…
विविध लोकप्रिय मालिकांच्या माध्यमातून आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री भार्गवी चिरमुले लवकरच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मेरे साई-श्रद्धा और सबुरी’ या मालिकेत ती एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. चंद्रा बोरकर असं तिच्या व्यक्तिरेखेच नावं आहे. साईंच्या बहिणीची ही भूमिका साकारायला मिळाल्याचा मला आनंद आहे, असं भार्गवी सांगते. अभिनेत्रीसह उत्तम नृत्यांगना असलेल्या भार्गवीची ही नवी भूमिका पाहण्यासाठी तिचा चाहतावर्गही उत्सुक आहे.
‘टकाटक २’ मध्ये प्रथमेश?
चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे मिलिंद कवडे दिग्दर्शित ‘टकाटक’ चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. आता या चित्रपटाचा सीक्वेल येणार आहे. नुकतीच ‘टकाटक २’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. ‘टकाटक’ची कथा तरुणाईवर बेतलेली होती. सर्व कलाकारांबरोबरच अभिनेता प्रथमेश परबच्या कामच विशेष कौतुक झालं. त्यामुळे आता सीक्वेलमध्येही प्रथमेश झळकणार असल्याची चर्चा आहे.