‘जून’ चित्रपटाची घोषणा
प्लॅनेट मराठी ओटीटी’चा पहिलावहिला सिनेमा – जून
जूनचा टीझर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली. फिल्म फेस्टिव्हलच्या वर्तुळात स्वतःचा ठसा उमटवून जूनने वेगळेपण सिद्ध केलं. मराठी विश्वातील मुख्य प्रवाहातील सिनेमासोबत वेगळी पायवाट शोधणाऱ्या सिनेमाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा पवित्रा घेत आगामी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या माध्यमातून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर तुम्हा प्रेक्षकांना ओटीटीच्या वेबसाईटवर पाहता येईल.
गेल्या अनेक महिन्यांपासून चित्रपटगृह बंद असल्यामुळे प्रेक्षक आता नवीन चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. मनोरंजनाची नवी परिभाषा मांडणारं आगामी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ येत्या काही दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ‘जून’ हा नवाकोरा चित्रपट या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन आणि निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी केलं आहे. सुहृद आणि वैभव यांचे दिग्दर्शनातील पदार्पण आहे, विशेष म्हणजे त्यांच्या या कामाचं कौतुक होतंय. ‘पुणे ५२’ हा चित्रपट आणि ‘बेताल’ या वेबसिरीजचे दिग्दर्शक निखिल महाजनने या चित्रपटाचं लेखन केलं आहे. गायिका शाल्मली खोलगडे प्रथमच या चित्रपटाच्या निमित्ताने संगीतकार म्हणून समोर येतेय. तर, अभिनेता जितेंद्र जोशी याने चित्रपटातील गीतलेखन केलं आहे.
५१ व्या इफ्फी (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इंडिया)मधल्या इंडियन पॅनोरोमा या विभागात ‘जून’ चित्रपटाची निवड झाली होती. यासोबतच पुणे फ़िल्म फ़ेस्टिवल, चेन्नई फिल्म फेस्टिवल आणि आता न्यूय़ॉर्क फ़िल्म फेस्टिवलमध्ये जूनची निवड झाली आहे. यामधील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सर्वोत्तम अभिनयाच्या पुरस्कार नामांकनामध्ये नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन यांची निवड झाली आहे.
लॉकडाऊनमुळे चित्रपटगृह बंद असल्यामुळे, येत्या दिवसांत काहीतरी नवीन पाहण्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या प्रत्येकासाठी ‘जून’ चित्रपट पर्वणी ठरेल. आजपासून प्लॅनेट मराठी ओटीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जूनचा ट्रेलर प्रेक्षकांना पाहता येईल. ओटीटीच्या लॉन्चनंतर हा चित्रपट ओटीटी वेबसाईट आणि अॅपवर प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल. सुप्री मीडियाचे शार्दुल सिंग बायस, नेहा पेंडसे-बायस आणि ब्लू-ड्रॉप प्रा. लि. चे निखिल महाजन आणि पवन मालू यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. आता हा चित्रपट ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘जून’ चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण औरंगाबाद मध्ये पार पडलं आहे. चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याची भावना अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. ‘नील आणि नेहा’ या पात्रांमधील संवेदनशील नात्याची ही गोष्ट प्रेक्षकांनाही नक्की आवडेल, असा विश्वास चित्रपटाची टिम आणि प्लॅनेट मराठी ओटीटीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर यांनी व्यक्त केली आहे.
ओटीटीचा पहिला चित्रपट
निखिल महाजन सारख्या तरुण दिग्दर्शकाने लेखन केलेली, वैभव आणि सुहृद यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आमच्या आगामी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांसमोर घेऊन येतं आहोत याचा आनंद आहे. शिवाय माझा जन्मही औरंगाबादचा असल्यामुळे आणि हा ओटीटीचा हा पहिला चित्रपट असल्याचं कौतुक आहे.
-अक्षय बर्दापूरकर (निर्माता, सर्वेसर्वा प्लॅनेट मराठी)
अनुभवांची सुंदर मांडणी…
ज्या भागात लहानाचा मोठा झालो, त्या औरंगाबादच्या चेतना नगरमध्ये आपली गोष्ट घडली, याचे खूप कौतुक आहे. लेखक आणि निर्माता अशा दुहेरी भूमिकेत मी ‘जून’ चित्रपटासाठी काम केलं असल्यामुळे माझ्यासाठी हा चित्रपट फारच महत्त्वाचा आहे. तर, निर्माता म्हणून हा माझा पहिलाच चित्रपट आहे. लहानपणापासून पाहिलेल्या अनेक गोष्टींचं मिश्रण म्हणजे हा चित्रपट आहे. प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडेल असा मला विश्वास वाटतो.
-निखिल महाजन (लेखक,निर्माता)
पहिल्यांदा दिग्दर्शन..
प्लॅनेट मराठी ओटीटीवर आमचा चित्रपट प्रदर्शित होणारं याचा मला विशेष आनंद आहे. आम्हा दोघांची ही दिग्दर्शनाची पहिलीच वेळ असल्यामुळे दिग्दर्शनाचा अनुभव फारच आनंददायी होता. तरुणाईच्या मानसिकतेचं प्रतिबिंब या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळेल. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
-सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती (दिग्दर्शक)
‘जून’ चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा