आता मार्गदर्शक परीक्षकांच्या भूमिकेत…
‘सा रे ग म प’च्या या प्रवासात अनेक पर्व गाजली आणि त्यात विशेष उल्लेख करावा लागेल तो १२ वर्षांपूर्वी झालेल्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा. अनेक टॅलेंटेड लिटिल चॅम्प्सच्या अफलातून परफॉर्मन्सेसमुळे हे पर्व तुफान गाजलं. या पर्वातील महाअंतिम फेरीत पोहोचलेली पंचरत्न म्हणजेच रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर यांनी प्रेक्षकांची मन तर जिंकलीच पण या कार्यक्रमाने या पंचरत्नांना संगीत क्षेत्रात उतरण्यासाठी तयार केलं आणि त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली. या पंचरत्नांनी मनोरंजन सृष्टीत नावलौकिकता मिळवली. आता नवीन पिढीतून काही उमदा गायक गायकांना घडवण्याचा वारसा जपत जवळपास १२ वर्षांनी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे, ‘सारेगमप लिटील चॅम्प’. सारेगमपच्या छोट्या गायक मित्र-मैत्रिणींच्या पहिल्या पर्वाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या गायन पर्वानंतर तब्बल बारा वर्षाचा काळ उलटला. पण, बारा वर्षानंतरही यातील पंचरत्न म्हणजेच मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, रोहित राऊत आणि प्रथमेश लघाटे ही मंडळी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. प्रेक्षकांचा हा लाडका कार्यक्रम पुन्हा एकदा त्यांच्या भेटीला येतं आहे. विशेष म्हणजे, या पर्वात ही पंचरत्नही प्रेक्षकांच्या भेटीला येणारं आहेत.
‘सारेगमप लिटील चॅम्प’च्या नव्या पर्वात महाराष्ट्राचे लाडके ‘पंचरत्न’ ज्युरींच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणारं आहेत. बारा वर्षापूर्वीची लिटील मॉनिटर मुग्धा वैशंपायन, लिटील रेकॉर्ड मेकर कार्तिकी गायकवाड, प्रिटी यंग गर्ल आर्या आंबेकर, फ्युचर कॉम्बो म्युझिक डायरेक्टर रोहित राऊत, उकडीचा मोदक प्रथमेश लघाटे आता मान्यवर ज्युरींच्या भूमिकेत या पर्वात झळकणार आहेत.
प्रेक्षकांसाठी संगीत पर्वणी ठरणाऱ्या ‘सारेगम…’च्या या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सांभाळणार आहे. ह्या पर्वाचे नावीन्य म्हणजे ह्या पर्वात कोणतही एलिमिनेशन होणार नाही, छोट्या स्पर्धकांवर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं कोणतंही दडपण नसेल. हो पण एलिमिनेशन नसलं तरी या गायक मित्र मैत्रिणींना आपलं गाणं रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार आहे. कार्यक्रमातील ‘पंचरत्न ज्युरी’ यावेळी छोट्या स्पर्धकांचे मोठं स्वप्न साकारण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. या पर्वातील नव्या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्याचं आणि त्यांच्याकडून उत्तमोत्तम सादरीकरण करून घेण्यासाठी ‘पंचरत्नां’मध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे, १४ छोट्या स्पर्धकांचा महाअंतिम सोहोळ्यापर्यंतचा प्रवास अनोखा असणार हे नक्की…
स्वप्नपूर्ती…
मी अकरावीपर्यंत शास्त्रिय संगीत शिकतं होते. माझी आई आणि बहिण गौतमी दोघीही उत्तम गातात. त्यामुळे आमच्या घरीच संगीताचा वारसा आहे असं म्हणणं चुकीचं ठरणारं नाही. मी ‘सारेगमप..’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करावं असं माझ्या आईचं स्वप्न होतं आणि त्याचमुळे या पर्वाच्या सूत्रसंचालनासाठी मला विचारलं असता मी लगेचच होकार दिला. गाणं हा माझ्या अगदीच जवळचा विषय असल्यामुळे तुम्हा प्रेक्षकांएवढीचं मलाही उत्सुकता आहे. सूत्रसंचालकानेउत्स्फूर्त असण्याबरोबरच कार्यक्रमाची धुरा त्या व्यक्तीवर असते. त्या या पर्वात लहान स्पर्धकांना सांभाळण आणि त्यांचा आत्मविश्वास काय ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर असणार आहे. त्यासाठी मी तयार आहे.
-मृण्मयी देशपांडे (अभिनेत्री)
अभिमानाची गोष्ट…
‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वातील मी सगळ्यात लहान स्पर्धक होते. आता तब्बल बारा वर्षानंतर या कार्यक्रमात मी परीक्षकाच्या भूमिकेत असणं ही माझ्यासाठी अभिनाची गोष्ट आहे. एवढ्या वर्षांच्या माझ्या प्रवासात प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. तसचं प्रेम या भूमिकेसाठीही मिळेल असा मला विश्वास आहे. नव्या पर्वातील सगळ्या चिमुकल्या गायक मित्र-मैत्रिणींसोबत या पर्वात आम्हीही भरपूर मजा करणारं आहोत. शिवाय, वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करतं हा प्रवास सुरु राहणार आहे. प्रेक्षकांनाही हे पर्व नक्की आवडेल याची खात्री वाटते.
–मुग्धा वैशंपायन (गायिका)
स्पर्धकांसाठी आम्ही ताई-दादा
बारा वर्षापूर्वी ‘सा रे ग म प…’ या स्पर्धेत स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या संपूर्ण प्रवासात आणि त्यानंतर आम्हा सगळ्यांचीच सांगीतिक कारकीर्द सुरु राहिली. आमच्यावरील आणि आमच्या गाण्यावरील प्रेक्षकांचं प्रेमही अविरतपणे वाढतं गेलं. बारा वर्षाआधी मी ज्या कार्यक्रमाची महाविजेती झाले, आज त्याचं कार्यक्रमात मी माझ्या गायक मित्र-मैत्रिणींबरोबर परीक्षक असणार आहे याहून सुखावणारी बाब आणखी असूच शकतं नाही. या पर्वातील सगळे चिमुकले गायक मित्र-मैत्रिणीही प्रचंड मेहनत घेतं आहेत आणि आम्ही ‘पंचरत्न’ही त्याच्या मार्गदर्शनासाठी तत्पर असणारं आहोत.
–कार्तिकी गायकवाड (गायिका)
आनंद आणि जबाबदारी…
एखाद्या कार्यक्रमातील काही वर्षांपूर्वी स्पर्धक म्हणून सहभागी झालेलं कोणी, त्याच कार्यक्रमात परीक्षक म्हणून सहभागी होणं हे फार क्वचित घडत. या कार्यक्रमात परीक्षकांची भूमिका निभावण ही माझ्यासाठी आनंदाची पण, तेवढीच जबाबदारीची गोष्ट आहे असं मला वाटतं. बारा वर्षांपूर्वी स्पर्धक म्हणून गातात जे दडपणं होतं, तेचं दडपणं परीक्षकाच्या खुर्चीत बसल्यानंतरही होतं. बारा वर्षांचा हा जो प्रवास आहे, तो फार मजेशीर आहे. बारा वर्षात मिळालेल्या अनुभवांमधून मी अनेक गोष्टी शिकलो, अजूनही शिकतोय. माझ्या छोट्या स्पर्धक दोस्तांनाही यातून अनेक गोष्टींच मार्गदर्शन करता येईल.
–प्रथमेश लघाटे (गायक)
-अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)