‘जून’ चित्रपट ‘प्लॅनेट मराठी सिनेमावर’
३० जूनला ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर’
गेल्या अनेक दिवसांपासून ‘जून’ चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची गाणी प्रदर्शित करण्यात आली. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला. आता चित्रपटाविषयाची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली असून, चित्रपटाशी संबंधित कलाकार मंडळीनी हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार असं विचारत सोशल मीडियावर प्रश्नांची सरबत्ती उडवली होती. अखेर ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे हेड आणि फाउंडर अक्षय बर्दापूरकर यांनी ३० जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच जाहीर केलं.
नेहमी नजरेआड राहणारं बाप मुलाचं नातं आणि आयुष्याच्या एका वळणावर अनपेक्षितपणे समोर येणारं मैत्रीपलीकडच नातं, यांची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘जून’. औरंगाबादमध्ये चित्रित करण्यात आलेल्या या चित्रपटाच लेखन निखिल महाजन यांनी केल आहे. सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, अभिनेत्री नेहा पेंडसे आणि अभिनेता सिद्धार्थ मेनन यांची कमाल केमिस्ट्री या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘जून’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हा चित्रपट अनेक नामांकित फिल्म फेस्टिवलमध्ये गाजला असून, सिद्धार्थ मेनन याला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला आहे. शिवाय, जितेंद्र जोशी, निखिल महाजन यांनी शब्दबद्ध केलेल्या या चित्रपटातील गाण्यांना शाल्मलीने संगीत दिलं आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून नव्या चित्रपटाच्या प्रतिक्षेत असलेया प्रेक्षकांना ‘जून’च्या निमित्ताने घरबसल्या ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’चा आनंद सुखावणारा असेल हे मात्र नक्की. ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘अ विस्टास मीडिया कॅपिटल कंपनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्लॅनेट मराठी’ या जगातील पहिल्या-वहिल्या मराठमोळ्या ओटीटीची सुरुवात होतेय. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या डिजिटल थिएटरवर ‘जून’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘हिलिंग इज ब्युटीफुल’ अशी टॅगलाइन घेऊन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या ‘प्लॅनेट मराठी सिनेमा’वर ३० जूनपासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, लवकरच प्लॅनेट मराठीचं अधिकृत ओटीटी ॲप अँड्रोइड आणि आयओएस धारक प्रेक्षकांना डाऊनलोडसाठी उपलब्ध होणारं आहे.
-अजय उभारे (प्लॅनेट मराठी)