म्युझिक व्हिडीओज, म्युझिक कॉन्सर्ट्स, ओव्या, कॅराओके अशी मोठी संगीत मेजवानी
संगीत हे एखाद्या योग साधनेप्रमाणे आहे. संगीतामुळे आपले मन आनंदी होते. असे हे जादुई किमया असलेले संगीत लवकरच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ सुरु झाल्यापासून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अनेक नवनवीन आणि वेगवेगळ्या विषयांवरील वेबसीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले असून ते पाहाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता ‘प्लॅनेट मराठी संगीत’ हा नवीन विभाग ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या विभागात संगीतप्रेमींना पारंपरिक तसेच आधुनिक, चित्रपटातील आणि चित्रपटांव्यतिरिक्त, एक्सक्लुझिव्ह, नॉन-एक्सक्लुझिव्ह अशा विविध प्रकारांची गाणी ऐकायला मिळणार आहेत. प्लॅनेट मराठीची निर्मिती असलेल्या गाण्यांचाही आनंद संगीतरसिक घेऊ शकणार आहेत. या विभागाअंतर्गत ‘रिमझिम रिमझिम’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून गाण्याचे बोल आणि संगीत आशिष विळेकर यांचे आहे तर प्रीती जोशी यांनी हे गायले आहे. ‘प्लॅनेट मराठी संगीत’ या विभागात कॅराओके, फोक स्टुडिओ, म्युझिक कॉन्सर्ट्स, सांगितिक मैफिलींचा श्रोत्यांना आनंद घेता येणार आहे. वैशिष्ट्य म्हणजे आधुनिकतेकडे वाटचाल करतानाच आपली परंपरा जपून ती सातासमुद्रापार नेण्याचा प्रयत्न ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटी सुरुवातीपासूनच करत आहे. त्यामुळेच या संगीत विभागात प्रामुख्याने ओव्यांचाही सहभाग करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात तब्बल २५ गाणी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर उपलब्ध होणार असल्याने संगीतप्रेमींचे आता भरभरून मनोरंजन होणार हे नक्की.
दिवाळीनिमित्त प्रेक्षकांसाठी खास भेट…
दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांची रोषणाई, रांगोळी, फराळ आणि एकमेकांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू. या दिवाळीत अशीच एक अमूल्य भेटवस्तू ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. दिवाळी हा जसा आपल्या संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे, तशीच एक अमूल्य आणि आपल्या मराठी संस्कृतीचा ठेवा असणारी एक गोष्ट आपण विसरत चाललो आहोत. ती म्हणजे शेकडो वर्षांपासून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला अगदी वारसा हक्काने मिळणाऱ्या आणि आपला इतिहास चालीत गुंफणाऱ्या आपल्या ओव्या. या ओव्यांचा गोडवा आजच्या तरुणपिढीसोबतच सगळ्या मराठी प्रेक्षकांना कळावा, यासाठी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ आपल्या प्रेक्षकांसाठी ‘ओव्यांचा खजिना’ घेऊन येत आहे. या ‘ओव्यांचा खजिन्या’त प्रेक्षकांना तब्बल २३ प्रकारच्या विविध ओव्या ऐकायला तसेच पाहायला मिळणार आहेत. या सर्व ओव्यांचे दिग्दर्शन ज्योती शिंदे यांनी केले असून समीरा गुजर- जोशी हिने आपल्या गोड आवाजात या ओव्यांचे वाचन तसेच विश्लेषण केले आहे. अनेक वर्षांपासून अजरामर ठरलेल्या परंतु आता कालबाहय होऊ पाहणाऱ्या या ओव्यांमधून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या ओव्यांमध्ये आपल्या इतिहासातील अनेक संदर्भ लपलेले आहेत. या दिपावलीत ओव्यांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीची आपल्याला नव्याने ओळख होईल. ‘ओव्यांचा खजिना’ या पारंपरिक कार्यक्रमातून मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींचा सुंदर अभिनय प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. त्यामुळे एकंदरच यंदाची दिवाळी अधिकच समृद्ध आणि चैतन्यमय होणार.
संस्कृतीचे जतन हे ध्येय…
प्रेक्षकांचे मनसोक्त मनोरंजन करणे हेच ‘प्लॅनेट मराठी’चे ध्येय आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन कसे करता येईल? त्यांना काय नवीन देता येईल? याचाच विचार आम्ही करत असतो. हा विचार करतानाच कुठे आपली संस्कृती, परंपरा मागे पडणार नाही, हे आम्ही नेहमीच लक्षात ठेवतो आणि म्हणूनच संगीत खजिना प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतानाच त्यात आपली परंपरा असणाऱ्या ओव्यांचा आम्ही आवर्जून समावेश केला आहे. आपल्या परंपरेचा आणि संस्कृतीक गोष्टींचा आपल्याला हळूहळू विसर पडत चालला आहे. दिवाळीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे आणि याच अवचीत्य साधून ‘ओव्यांचा खजिना’ हा अस्सल मातीमधील कार्यक्रम आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. यात अनेक प्रकारच्या ओव्या आहेत ज्या आपल्या इतिहासाशी आपली नाळ जोडतील. आपली मराठी संस्कृती जपण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.
-अक्षय बर्दापूरकर (संस्थापक आणि प्रमुख, प्लॅनेट मराठी)
संकलन : अजय जयश्री (प्लॅनेट मराठी)