कोविडच्या ह्या भल्या मोठ्या pause नंतर आता नव्या उत्साहात सगळे सण साजरे करण्यासाठी उत्सुक आहेत. गुढीपाडव्यापासून हिंदू नव वर्षाची सुरुवात करायला सगळे सज्ज आहेत. पण काय एवढं खास आहे या वर्षी गुढीपाडव्यात?
कोविडच्या रुग्णांचे आकडे जसजसे कमी होऊ लागले तशी हळूहळू गुढीपाडवा आणि लागून येणाऱ्या स्वागत समारंभ शोभायात्रा, चित्ररथ ह्याबद्दल वेगळी उत्सुकता तयार होत आहे. तब्ब्ल दोन वर्षांनी तरी हे जल्लोषपूर्ण वातावरण यावर्षी अनुभवायला मिळणार का? यावर सध्या अनेक शंका कुशंका आहेत. पण ते सगळं वगळता सुद्धा नव्या कामांची, नव्या कल्पनांची नांदी म्हणून या सणाकडे पाहिलं जात आहे.
नव्या विचारांची गुढी
मागचं वर्ष बऱ्याचश्या बाबतीत दुःखाचे काळे ढग घेऊन आलं असेल तरी त्याला लागून आलेली सोनेरी झालर म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात झालेले यशस्वी प्रयोग. नुसतं मनोरंजन सृष्टीबद्दल उल्लेख करायचा झाला तर चित्रपट आणि नाट्यगृहांना बसलेलं कुलूप ही मोठी आर्थिक समस्या समोर आली. पण परिस्थिती हळूहळू निवळते आहे. २०२१ ची सांगता आणि २०२२ ची खणखणीत सुरुवात झिम्मा ह्या चित्रपटाने झाली. २०२१ मध्ये राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत बार्डो, त्रिज्या, आनंदी गोपाळ अश्या चित्रपटांनी मराठी चित्रपटाचं नाव दिल्लीच्या तख्तावर नेऊन ठेवलं. गोदावरी, मिडियम स्पायसी अश्या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटाचं नाव उंच केलं. ह्याही वर्षात हे सत्र चालत राहावं आणि मराठी चित्रपट, नाटकाला असेच सुगीचे आणि आनंदाचे दिवस दिसत राहावे ही सदिच्छा आहे. गुढीपाडवा ही नव्या गोष्टींची सुरवात म्हणून ओळखली जाते. गुढीला समृद्धी आणि विजयाचं प्रतिक म्हणून समजलं जातं. ह्या वर्षात येणारे प्रोजेक्ट्स हे मराठी चित्रपटसृष्टीची खऱ्या अर्थाने नवी सुरवात म्हणता येईल.
ह्याच विषयी चित्रपटसृष्टीतल्या काही कलाकारांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी असं सांगते की, “हा गुढीपाडवा खऱ्या अर्थाने खूप खास आहे. माझं संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन खूप दिवसांनी एवढ्या उत्साहाने सण साजरा करणार आहोत. ह्यावर्षी कामासोबतच माझा स्वतःला वेळ देण्याकडेसुद्धा कल असणार आहे. माझं कुटुंब, वर्क आउट, विश्रांती ह्याला सुद्धा मी तेवढंच महत्त्व देणार आहे. मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की आपल्यावर जे आळस आणि भीतीचं सावट होतं ते झटकून नवीन जोमाने कामाला सुरवात केली पाहिजे. ह्यावर्षी माझ्या ४ वेबसिरीज आणि २ हिंदी चित्रपट तर २ मराठी चित्रपट असे अनेक सुंदर प्रोजेक्ट्स भेटीला येणार आहेत.”
आनंदी गोपाळ चित्रपटातून मराठी चित्रपटाचं नाव राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचवणाऱ्या दिग्दर्शक समीर विद्वांस यांचं म्हणणं आहे की, “ह्या वर्षीचा पाडवा अर्थात नवीन वर्षाचा पहिला दिवस कोरोनाशिवाय धुमधडाक्यात साजरा करता येईल असं चित्र आत्ता दिसत आहे. ह्या वर्षातही जास्तीत जास्त प्रामाणिक आणि चांगलं काम करायचा, चांगलं लिखाण करायचा माझा मानस असणार आहे. ह्याआधी न केलेल्या गोष्टी करून बघायचा माझा विचार नक्कीच असेल. माझ्या पहिल्या हिंदी चित्रपटाचं काम ह्या वर्षात सुरु होईल. दिग्ग्जांची फळी असलेल्या ह्या चित्रपटाने ह्या वर्षाची मुहूर्तमेढ रोवली जाईल.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ ह्या मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे असं सांगते की, “माझ्या येणाऱ्या नवीन वर्षात मी पूर्णपणे टेलिव्हिजनवर लक्ष केंद्रित करणार आहे. ‘तुझी माझी रेशीमगाठ’ ला लोकांचा भरभरून मिळणारा प्रतिसाद आणि प्रेम माझ्यासाठी आनंददायी आहे. ह्या मालिकेमुळे घराघरात माझी एक वेगळी ओळख तयार झाली आहे आणि ह्याही वर्षात ती वाढत जावी हीच अपेक्षा आहे. कोरोनामुळे आपल्याला निरोगी राहण्याबद्दलचा खूप मोठा धडा मिळाला आहे. ह्या वर्षात मी स्वतःवर आणि स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणार आहे.”
हिंग पुस्तक तलवार वेबसिरीजचे सहलेखक आणि अनुरूप विवाहसंस्थेचे डिरेक्टर तन्मय कानिटकर असं सांगतात की, “मी सहलेखक असलेली आमची ‘हिंग पुस्तक तलवार’ ही सिरीज प्रदर्शित झाली, लोकांना ती आवडली आणि अनेक पुरस्कार सोहळ्यात लेखनाच्या नामांकनासह बाकीही बरीच नामांकनं मिळाली. पहिल्याच वेबसिरीजला मिळालेल्या या प्रतिसादामुळे यंदाचा गुढीपाडवा माझ्यासाठी खूप खास आहे. लेखनाच्या दृष्टीने बऱ्याच नवीन गोष्टी येत्या वर्षात कारायच्या आहेत. ‘हिंग पुस्तक तलवार’चा पुढचा सिझन यावा अशी इच्छा आहे. माझी एक कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर आहे. शिवाय एक वेबसिरीज आणि चित्रपटांच्या कल्पनांवर काम करायचं आहे.”
ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी त्यांच्या नवीन वर्षाबद्दल बोलताना असं म्हणाल्या, “एवढ्या मोठ्या वयाच्या टप्प्यावर येऊन कोणताही नवीन विचार अंगी बाणवण्याऐवजी आतापर्यंत असलेल्या आणि केलेल्या गोष्टी जपणं ह्याकडे मी जास्त लक्ष देणार आहे. माझे अनेक सुंदर प्रोजेक्ट्स ह्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यात एक हिंदी चित्रपट, एक वेबसिरीज ह्यांचा समावेश आहे तर मराठीमध्ये सुद्धा काही प्रोजेक्ट्स असणार आहेत.”
अभिनेते आणि दिग्दर्शक आणि प्लॅनेट मराठी ओटीटीचे सीईओ पुष्कर श्रोत्री त्यांच्या नवीन वर्षातल्या संकल्पांबद्दल असं सांगतात की, “तब्ब्ल दोन वर्षांनी सगळे एकत्र येऊन गुढीपाडवा साजरा करणार आहेत त्यामुळे नक्कीच हा सण खास आहे. ह्या वर्षात एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून मला दर्जेदार काम प्रेक्षकांसमोर आणायचं आहे. मी दिग्दर्शक म्हणून केलेला एक मराठी चित्रपट ह्या वर्षात सगळ्यांच्या भेटीला येईल. तर दुसरा मराठी चित्रपटसुद्धा ह्याच वर्षात भेटीला येण्याची शक्यता आहे. तसंच एखाद्या वेबसिरीजचं दिग्दर्शन करण्याच्या दृष्टीने सुद्धा हालचाली चालू आहेत. अभिनय आणि दिग्दर्शन ह्या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ ह्या वर्षात मला साधायचा आहे. आणि तो साधण्यासाठीच स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकडे मी लक्ष देणार आहे.”
लेखन-रसिका नानल