चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र तृतीयेला “चैत्रगौरी” ची स्थापना केली जाते आणि या दिवसापासून चैत्र नवरात्रींना सुरुवात होते. चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौरीची पारंपरिक रीतसर पूजा करून वैशाख शुक्ल तृतीया (अक्षय्य तृतीये) पर्यंत “चैत्रगौरी पूजनाचा” सोहळा साजरा केला जातो.
चैत्रगौरीच्या स्थापनेनंतर अनेक ठिकाणी हळदी कुंकू करून स्त्रियांना चैत्रगौरीचा खास प्रसाद दिला जातो. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी “चैत्र नवरात्र” साजरी केली जाते आणि या खास चैत्रगौरी साठी तितकाच पारंपरिक प्रसाद सुद्धा केला जातो. “चैत्रगौरी” मध्ये गौरी आपल्या माहेरी येते आणि आपल्या आईकडून आपले सगळे लाड करून घेते अशी एक समजूत आहे.
चैत्रगौरीला एक खास पारंपरिक बेत केला जातो तो म्हणजे कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ, कैरीचे पन्हे, बत्तासे, टरबूज, कलिंगड यासारखी फळे, भिजवलेले हरभरे असा नैवेद्य देवीला चैत्र नवरात्रीत अर्पण केला जातो. महाराष्ट्रात “चैत्रगौरी” पूजन केलं जातं पण याच सोबतीने कर्नाटक मध्ये चैत्रगौरीची पूजा केली जाते. भिजवलेल्या हरभऱ्यांनी चैत्रगौरीची ओटी भरतात.
राजस्थानमध्ये होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी चैत्र महिना सुरू होतो. या दिवशी गणगौर बसवितात आणि गौरी पूजनाचा सोहळा साजरा करतात. या गौरीला चुरमा आणि लिंबाच्या डहाळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. भारतातील आदिवासी जमातींमधेही महिला चैत्रगौरीचे पूजन मोठ्या उत्साहात करतात. तर अश्या प्रकारे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर “चैत्रगौरी” पूजनाचा खास सोहळा साजरा केला जातो.
लेखन- नेहा कदम