भर उन्हात तुम्हाला काहीतरी एकदम पारंपरिक आणि घरचं जेवण जेवण्याची इच्छा झाली तर दादरचं “आस्वाद हॉटेल” एक खास मेजवानी आपल्यासाठी घेऊन आलं आहे. आस्वाद हे नेहमीच त्यांच्या खवय्यांना काहीतरी वेगळं आणि पारंपरिक पदार्थांची चव चाखायला लावतात आणि म्हणून यावर्षी ते खास “चैत्र थाळी” घेऊन आले आहेत. चैत्र महिन्यात आंबे, कैरी, फणस अश्या अनेक गोष्टींचा खास सिझन असतो आणि म्हणून आस्वाद हॉटेल खास चैत्र स्पेशल थाळी आपल्या खवय्यांसाठी घेऊन आले आहेत. हा चैत्र थाळी महोत्सव येत्या ३ मे पर्यंतचं आहे तर इकडे आवर्जून भेट द्या!
काय आहे चैत्र थाळी?
चैत्र थाळी आहे तर नक्कीच विविध खास पदार्थ आणि एकदम पारंपरिकरित्या केलेले मस्त पदार्थ असणार आहेत. या चैत्र थाळीत तुम्हाला एकाहून एक असे चविष्ट पदार्थ खायला मिळतात. पुरी, फणसाची भाजी, काजूची उसळ, बटाटा भाजी, चैत्र स्पेशल आंबे डाळ, आमरस, मसाले भात, कढी, कोबीची पचडी, विड्याच्या पानांची भजी, साल पापडी आणि हो लास्ट बट नॉट द लिस्ट थंडगार कैरी पन्हं! वाचून अगदीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असणार आहे म्हणून “आस्वाद” ला जाऊन एकदा तरी या बेस्ट चैत्र थाळी चा आस्वाद घ्यायला विसरू नका!
अशी सुचली कल्पना…
“या वर्षापासून आम्हाला “चैत्र थाळी ची संकल्पना सुचली. चैत्र महिन्यात अनेक पदार्थांना खास महत्त्व असत आणि म्हणून आजच्या तरुणाईला फणसाची भाजी, काजूची उसळ या मराठमोळ्या पारंपरिक पदार्थांची ओळख व्हावी त्यांनी हे पदार्थ इथे येऊन खावे आणि काहीतरी वेगळा अनुभव घ्यावा या साठी आम्ही “चैत्र थाळी” ची सुरुवात केली. आंबा, फणस, काजू , कैरी पन्हं हे सगळेच पदार्थ फार सिझनल असतात आणि म्हणून हे सगळे पदार्थ एका थाळीत लोकांना खायला देऊ या या संकल्पनेतून आम्हाला “चैत्र थाळी” ची कल्पना सुचली.” -सूर्यकांत सरजोशी (मालक- आस्वाद हॉटेल, दादर)
आस्वाद मध्ये गेल्यावर तुम्हाला अनेक मराठमोळ्या पदार्थाची चव घेता येते पण नक्कीच इथल्या स्वादिष्ट आणि तितक्याच पारंपरिक घरची चव असलेले पदार्थ खाऊन तुमचं मन आणि पोट नक्कीच तृप्त होणार यात शंका नाही. उन्हाळा आहे म्हणून मस्त चैत्र थाळीचा आस्वाद तर नक्कीच घ्या सोबतीने “आमरस पुरीचा” आस्वाद घ्या!
खाण्यासाठी तुम्ही सुद्धा भटकत असणार आणि म्हणून आम्हाला कॉमेंट्स मधून अश्या हटके आणि भन्नाट फुडी गोष्टी सांगायला विसरू नका! तुमच्या फुडी मित्र मंडळींसोबत आस्वादला भेट द्या…..
लेखन- नेहा कदम