मराठी चित्रपटसृष्टीतील ‘मामा’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेता अशोक सराफ सर्वांनाचं आपलेसे वाटतात. अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांना विनोदाचा बादशहा म्हणून ओळखलं जातं. अशोक सराफ यांनी नेहमीचं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली असून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत.
वयाचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाही त्यांच्यात असलेली ऊर्जा, दिलखुलासपणा, अचूक विनोदाचं टायमिंग, कामात असलेली स्थिरता, अभिनयाविषयी असलेलं प्रेम अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अशोक मामांचा हा यशस्वी प्रवास मोठ्या थाटामाटात एका सोहळ्याच्या रूपात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात अशोक मामांचा दिग्गजांकडून झालेला कौतुक सोहळा आणि त्याच सोबत काही रंजक सादरीकरण देखील प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. जितेंद्रजी, एकता कपूर, सुनील गावस्कर हे देखील यावेळी उपस्थित होते.