मनोरंजनासोबतच गोव्याची इत्यंभूत माहिती उपलब्ध
पहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा बहुमान मिळवल्यानंतर ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ आता आपल्या प्रेक्षकांसाठी काही तरी झक्कास घेऊन येत आहे. नेहमीच प्रेक्षकांना सर्जनशील आशय देत आलेले प्लॅनेट मराठी आता एक नवीन, मनोरंजनात्मक आणि माहितीपूर्ण असा ॲप घेऊन आले आहे. हा ॲप खास गोव्यासाठी बनवण्यात आला आहे. या सुपर ॲपचे नाव ‘प्लॅनेट गोयं’ असून यात मनोरंजनाबरोबरच व गोव्याची इत्यंभूत माहितीही उपलब्ध होणार आहे. नुकतीच या ॲपची घोषणा करण्यात आली असून गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. डॉ. प्रमोदजी सावंत यांच्या हस्ते ‘प्लॅनेट गोयं’ चे अनावरण करण्यात आले. ESG ( एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा ) च्या सहयोगाने प्लॅनेट मराठी ही संकल्पना घेऊन आले आहेत. या संकल्पनेचा विचार अक्षय बर्दापूरकर यांचा असून सौम्या विळेकर व गौतम ठक्कर प्रेरणाशक्ती आहेत. संतोष खेर हे प्रायोजक आहेत. आजच्या या दिनाचे औचित्य साधून ESG ( एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा ) आणि ‘प्लॅनेट गोयं’मध्ये करारही झाला.
‘प्लॅनेट गोयं’ केवळ मनोरंजनापुरताच मर्यादित नसून यामध्ये ट्रॅव्हल, टुरिझम, फूड, इव्हेंट्स या सगळ्याची माहिती उपलब्ध असणार आहे. हा ॲप गोव्यातील स्थानिकांसाठी तसेच पर्यटकांसाठी निश्चितत फायद्याचा ठरेल. ‘प्लॅनेट गोयं’ हा पहिला कोंकणी ॲप असून इंग्रजी, हिंदीतील आशयांबरोबरच कोंकणी भाषेतील मनोरंजनात्मक आशय आणि मराठी भाषेतील डब फिल्म्सही या ॲपवर उपलब्ध असतील.
या ॲपबद्दल गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “प्लॅनेट मराठीतर्फे राबविण्यात आलेला ‘प्लॅनेट गोयं’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. मनोरंजनासोबतच गोव्यातील अनेक अनभिज्ञ पर्यटन स्थळांची, गोव्याचा इतिहास, त्याला लाभलेली वैभवशाली परंपरा, मंदिरे या सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. याव्यतिरिक्त अस्सल पारंपरिक खाद्यसंस्कृती, आधुनिक खाद्यपदार्थांचाही आस्वाद कुठे घेता येईल, या सगळ्याची माहिती ‘प्लॅनेट गोयं’वर मिळणार आहे. त्यामुळे आता गोव्यातील पर्यटन सुखकर होणार आहे. गोव्यात अतिशय गुणी कलाकार आहेत, त्यांना यामुळे उत्तम व्यासपीठ मिळेल. शिवाय यानिमित्ताने गोव्यातील तरूणांना नोकरीच्या संधीही उपलब्ध होतील. प्लॅनेट मराठीच्या अक्षय बर्दापूरकर यांचे मी मनापासून आभार मानतो. आमच्या गोव्यात त्यांनी ही संकल्पना राबवली.’’
प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” प्लॅनेट मराठी आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून वेगळ्या राज्यात पदार्पण करत आहे. गोवा गव्हर्नमेंट व ESG ( एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा ) च्या सह भागीदारीने आम्ही नवीन संकल्पना गोव्यातील स्थानिकांसाठी व पर्यटकांसाठी घेऊन आलो आहोत. गोवा राज्य निवडण्याचे कारण म्हणजे गोव्याला लाभलेली समृद्ध परंपरा, पर्यटन, खाद्यसंस्कृती आणि मुख्य म्हणजे गोव्यात आयोजित होणारा चित्रपट महोत्सव. गोव्यातील लोक हे कलाप्रेमी आहेत. त्यामुळे गोव्यात प्रतिभाशाली कलावंत आहेत. महिन्याला किमान एखादा कोंकणी चित्रपट किंवा वेबसीरिज या ॲपवर आणण्याचा आमचा मानस आहे आणि नव्वद टक्के हे व्यासपीठ गोवेकरांसाठीच असणार आहे. मनोरंजनात्मक आशयबरोबरच गोव्यातील प्रत्येक गोष्टीची इत्यंभूत माहिती ‘प्लॅनेट गोयं’वर मिळणार आहे. गोव्यात जाऊन काही शोधण्यापेक्षा या ॲपवर एकाच ठिकाणी सगळी माहिती उपलब्ध होणार आहे. “