‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सध्या अव्दैत-नेत्राच्या लग्नासंबंधीच्या रहस्यमय वळणावर आली असून अव्दैत आणि नेत्राच्या लग्नाचं रहस्य काय असणार आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान असल्यामुळे नेत्राने अव्दैतबरोबर लग्नाचा निर्णय घेतल्यापासून त्रिनयना देवी तिच्या निर्धाराची परीक्षा पाहत आहे. राजाध्यक्ष कुटुंब मात्र कितीही अडथळे आले तरी अव्दैत-नेत्राचं लग्न होणारच, अशी इच्छा मनात बाळगून आहे. लग्नात येणाऱ्या अडथळ्यांमुळे शेखर हतबल होतो, अव्दैत-नेत्राचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी तो साधूंना भेटतो. तेव्हा साधू शेखरला काही अटी सांगतात.
पहिली अट ‘हे लग्न त्रिनयना देवीच्या मंदिरात व्हायला हवं’. दुसरी अट ‘भर माथ्यावर सूर्य असताना व्हायला हवं, गावातील कोणीही हे लग्न पाहू नये’. तिसरी अट फक्त पाच व्यक्ती लग्नाच्या वेळी मंदिरात असाव्यात. चौथी अट लग्नाच्या दिवशी वावोशी गावात कुणाचा जन्म आणि मृत्यू होता कामा नये’. या अटी ऐकून शेखर आश्चर्यचकीत होतो. तो घरी येऊन सर्व कुटुंबाला हे सांगतो, घरातील सगळे या अटी पूर्ण करण्याच्या निमित्ताने एकत्र येतात. सगळे मिळून योजना आखतात. अटींचं पालन करत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करत मंदिरापर्यंत पोहोचतात.
नेत्राच्या घरातील मंगला आणि भालबा आणि दुसऱ्या बाजुला राजाध्यक्ष कुटुंब असे सगळे एकत्र येऊन फक्त पाचजण लग्नाच्या दिवशी मंदिरात जायचं ठरवतात. आता या पाच व्यक्ती कोण, अव्दैत-नेत्राच्या लग्नाचं रहस्य काय, अव्दैत-नेत्राचं लग्न सर्व अटी पाळून नीट पार पडेल का, नेत्रा त्रिनयना देवीने घेतलेल्या परीक्षेला खरी उतरेल का, अव्दैत नेत्राला या कठीण प्रसंगात कशी साथ देणार, या सर्व रहस्यमय घडामोडी एक आठवडाभर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. टेलिव्हिजन विश्वातील हे रहस्यमय लग्न त्रिनयना देवीच्या मंदिरात कसं पार पडणार यासाठी पाहत रहा, ‘विवाह विशेष सप्ताह’ ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ३ ते ८ जुलै रात्री १०.३० वा.