‘थकाबाई’ या आगामी मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. प्रेक्षकांची पसंती ओळखून एक दर्जेदार रहस्यपटाचा नजराणा घेऊन दिग्दर्शक युवीन कापसे मराठी चित्रसृष्टीत पदार्पण करत आहेत. चित्रपटातील कलाकार शुभंकर तावडे, हेमल इंगळे, मीर सरवर, सना प्रभू तसेच दिग्दर्शक आणि निर्माते यांच्या उपस्थितीत चित्रपटाच्या घोषणेचे पहिले पोस्टर याप्रसंगी लाँच करण्यात आले. ‘थकाबाई’च्या पोस्टरला अल्पावधीतच प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभला आणि विशेष म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, मॉडेल उर्फी जावेदनेही हे पोस्टर शेअर करत टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘थकाबाई’चे गूढ आणि भयावह वाटणारे पोस्टर बघून साक्षात उर्फी जावेदचीसुद्धा उत्सुकता वाढली आहे. तिने सोशल मीडियावर याबाबत स्टोरी शेअर करत चित्रपटाच्या निर्मात्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. उर्फी ही आजच्या काळातली आघाडीची इन्फ्लुएन्सर असून तिने शेअर केलेल्या स्टोरीमुळे तिच्या चाहत्यांचीही उत्सुकता वाढली आहे.
सुनील जैन प्रस्तुत आणि दीवा सिंह, युवीन कापसे निर्मित ‘थकाबाई’ चित्रपट कधी प्रदर्शित होईल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.