हल्लीचं युग हे डिजीटल युग बनलं आहे, आता ब-याच सोयी सुविधा एका क्लिकवर चुटकी सरशी उपलब्ध असतात, हे एका अर्थाने चांगलंच आहे, आपला देश, समाज प्रगती करतोय. पण या डिजीटल युगात पुस्तक हातात घेऊन त्याची पानं हाताळणं, चाळणं ही भावना क्वचित काहीजणंच अनुभवत असतील. आपल्याकडे मराठी साहित्याचं भंडार आहे, प्रत्येक शैलीची अनेक पुस्तकं आहेत पण सध्या मराठी वाचन संस्कृती कुठेतरी हरवतेय असं दिसून येतंय आणि हे न हरवता जपलं गेलं पाहिजे याच उद्देशाने ‘रावण पब्लिशिंग हाऊस’ची निर्मिती झाली. तसेच नवीन लेखकांसाठी ‘रावण पब्लिशिंग हाऊस’ हा मंच तयार करण्यात आला आहे.
प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या ‘रावण पब्लिशिंग हाऊस’च्या वतीने ‘कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर’ यांचे कथा, ललित लेख, कविता, अनुवाद आदी असंग्रहित साहित्य पुस्तकरुपाने प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालेले आहे.
‘क’ आणि ‘ख’ अशा या दोन पुस्तकांचे प्रकाशन ‘मनसे’चे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते ठाणे येथे २४ सप्टेंबर रोजी झाले. यावेळी ‘रावण पब्लिशिंग हाऊस’चे अभिजित पानसे, या पुस्तकांचे संकलन ज्यांनी केले ते डॉ. नागेश कांबळे, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, विलास हिंगलापुरकर, जितेंद्र जोशी, स्पृहा जोशी, अवधूत गुप्ते, कौशल इनामदार, पुष्कर श्रोत्री, आशिष पाटील, अवधुत गुप्ते, क्रांती रेडकर, समीर वानखेडे, उर्मिला कोठारे, अक्षय केळकर, दिग्दर्शक शिवकुमार पार्थसारथी, तेजस्विनी पंडीत, मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, अभय गाडगीळ, श्रीरंग गोडबोले, निलेश दिवेकर, अशोक बागवे, विजू माने आदी मान्यवर मंडळीची प्रमुख उपस्थिती होती.
वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांची २२ काव्यसंग्रह, २२ नाटके, ९ कथासंग्रह, ६ एकांकिका संग्रह, ६ लघुनिबंधसंग्रह, ३ कांदब-या, २ निबंधसंग्रह, १ आठवणी संग्रह अशी एकूण ७१ पुस्तके प्रसिध्द आहेत. तसेच नियतकालिकांत देखील त्यांनी विपुल साहित्य लिहिले होते, परंतु अजूनही ते पुस्तक स्वरुपात येऊ शकले नाही. कुसुमाग्रज आणि त्यांचे लिखाण ज्यांना समजले, उमजले त्या सर्व रसिकांची हिच इच्छा असणार की कुसुमाग्रजांच्या आजवर कधीही वाचनात न आलेल्या साहित्यांचा खजिना त्यांना लवकर वाचण्यास मिळावा आणि या रसिकांमध्ये असे दोन व्यक्ती आहेत ज्यांनी ही इच्छा सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या दोन व्यक्ती म्हणजे शासकीय विभागीय ग्रंथालयाचे निवृत्त ग्रंथपाल डॉ. नागेश कांबळे आणि दिग्दर्शक अभिजित पानसे. डॉ. कांबळे यांनी निवृत्तीनंतर कुसुमाग्रजांच्या साहित्यावर पीएचडी केली आणि त्यासाठी त्यांनी राज्यभर भ्रमंती करुन त्यांचे असंग्रहित साहित्य शोधून काढले, हे साहित्य पुस्तकरुपात येण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण त्याला हवं तसं यश मिळाले नाही. यासंदर्भात त्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून गेल्यावर्षी सलग तीन दिवस बातम्या प्रसिध्द केल्या आणि त्या बातम्या अभिजित पानसेच्या वाचण्यात आल्या आणि त्यांनी डॉ. कांबळेंना शब्द दिला की कुसुमाग्रजांचं हे साहित्य पुस्तकरुपात येणार. अखेर तो दिवस आला आणि अतिशय सुंदर पध्दतीने कुसुमाग्रजांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा थाटामाटात पार पडला.
प्रकाशन सोहळ्याची सुरुवात मा. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने झाली. दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी प्रकाशक या नात्याने ‘रावण पब्लिशिंग हाऊस’ची जाहीर घोषणा केली आणि सविस्तरपणे त्यांची भूमिका मांडली. पुस्तक प्रकाशनानंतर कुसुमाग्रजांच्या साहित्याच्या सादरीकरणाने उपस्थित मान्यवरांचे आणि रसिकांचे लक्ष वेधून घेतले. मा. राजसाहेब ठाकरे यांनी त्यांची आवडती कविता देखील सादर केली. जितेंद्र जोशीने दोन कविता, कौशल इनामदार यांनी स्वरबद्ध केलेले, कुसुमाग्रज यांचे ‘पृथ्वीचे प्रेमगीत’, पुष्कर श्रोत्रीने बालकविता सादर केल्या. स्पृहा जोशीने रविंद्रनाथांच्या, कुसुमाग्रज यांनी अनुवादित केलेल्या कवितेचे वाचन केले. अभिनेत्री समीरा गुजर यांच्या निवेदनामुळे अतिशय सुंदर पद्धतीने रंगला. अशाप्रकारे कुसुमाग्रजांच्या साहित्याचा खजिना उलगडला गेला आणि त्याचा आस्वाद आता सर्वजण नक्कीच घेऊ शकतात.