A voice painted life in lockdown – RJ Special Story

आवाज की दुनिया करते काय सध्या??? 

WFH सध्याच्या काळात ही टर्म खूप जास्त महत्त्वाची ठरतेय. सध्या कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतासह अनेक देशात सध्या लॉकडाऊन मोठ्या प्रमाणावर पाळला जातो आहे. ह्यात अजून WFH म्हणजे काय हा जर प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आहे वर्क फ्रॉम होम. ह्याचा अगदीच साधा सोपा अर्थ आहे. सक्तीच्या काळात बाहेर न पडता घरातून काम करणे. पण सगळ्यांनाच ते शक्य असतं का? कॉर्पोरेट जगतात काम करणाऱ्यांना ते कदाचित शक्य असू शकतं पण वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पोस्ट वर कार्यरत लोकांसाठी ते कितपत शक्य असतं हे आज आपण प्लॅनेट मराठी मॅगझीन मधून जाणून घेणार आहोत.


      आवाजाच्या दुनियेत जादूगार म्हणून ओळख असलेलं क्षेत्र म्हणजे गायन. गाण्याची जादू ही सगळ्यात मोठी मोहिनी आहे असं म्हणतात, म्हणून गाणी ऐकत अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते. आणि गाणं ऐकण्याची खरी मजा येते ती रेडिओ वरच. पण सध्या ह्या लॉकडाऊनमध्ये कुठे सुरू असतील ना रेडिओस्टेशन्स असा प्रश्न डोक्यात येणं स्वाभाविक आहे. रेडिओवर जशी आवडती गाणी वाजतात तसा अजून एक भाग असतो जो खूप महत्त्वाचा असतो. तो एक आवाज जो दोन गाण्यांच्या मधल्या वेळात आपल्याला सतत ऐकू येत असतो. जो वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्याच्या फ्रेश आवाजातून आपल्याला मंत्रमुग्ध करत असतो. जो न थकता बॅक टू बॅक शो करत असतो. आवाज की दुनिया का किमयागार. तो असतो रेडिओ जॉकी सोप्या भाषेत आर.जे (RJ) 
आर.जे सध्या काय करतात? घरातून काम करणं त्यांच्यासाठी सोपं आहे की नाही? ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा ह्यात घेतलेला आहे.


आर.जे सध्या काम कसं करतात?


     सध्याच्या परिस्थितीत आर.जें ना ऑफिसमधून  “ऑन एअर” जाणं शक्य नाहीये पण अश्याही परिस्थितीत आर.जे वेगवेगळ्या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून प्रेक्षकांशी जोडले राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना सध्या मदत होते आहे ती म्हणजे व्हॉइस रेकॉर्डर अँप्स, लॅपटॉप आणि एडिटिंग सॉफ्टवेअरची. त्यांच्या कामाच्या गोष्टींची व्हॉइस नोट रेकॉर्ड करून, एडिट करून, त्याच्या मध्ये हवे ते बदल करून मग प्रेक्षकांना ऐकवणं हे फार कष्टाचं काम ते सध्या करत आहेत.


आत्ताच्या परिस्थितीत कोणकोणत्या संकटांचा सामना करावा लागतो?


     प्रत्येकच काम करणाऱ्या व्यक्तीसाठी त्याचं ऑफिस किंवा काम करायची जागा ही फार जवळची असते. पण आत्ता कोणीच घराबाहेर पडून काम करू शकत नाही. अश्यात वर्क फ्रॉम होम करताना प्रत्येकालाच थोडंस अवघड जात आहे.     आणि आर.जे साठी तर सतत बोलत राहणं, चोवीस तास विचारचक्र चालू ठेवणं, फ्रेश राहणं गरजेचं असतं. अश्यात ते कोणकोणत्या संकटांना तोंड देतात ह्याबद्दल त्यांच्याशी चर्चा केल्यावर आर.जे बंड्या असं सांगतो “स्टुडिओमधले माईक, कंसोल ह्यांची सवय झालेली असताना अचानक घरून काम करताना त्या गोष्टींचा अभाव जाणवतो. तसंच टीमसोबत चर्चा करून कल्पना सुचवणं, येणाऱ्या पाहुण्यांसोबत गप्पा मारणं ह्याची ही फार सवय झालेली आहे. तर ह्या गोष्टींची फार आठवण येते. पटकन घरी आहोत हे लक्षात राहत नाही.”


रेड एफएमचा आर.जे सौरभ असं म्हणतो की “सध्या घरातून काम करणं म्हणजे एक वेगळा टास्क असतो. काम करतात तो स्टुडिओ बंद असतो. तिथे आजूबाजूच्या गोष्टींचे आवाज येत नाहीत. पण घरी काम करताना मध्येच कोणीतरी येऊन व्यत्यय आणतं, बाहेरून येणारे गाड्यांचे आवाज, पशुपक्ष्यांचे आवाज ह्याने कामात अडथळा येतो.”


घरात राहून काम करतानाही त्यात नावीन्य कसं टिकवून ठेवता?     

सध्या जर आपण इन्स्टाग्रामवर पाहिलं तर वेगवेगळे कलाकार वेगवेगळ्या प्रकारे लाईव्ह येऊन लोकांशी गप्पा मारत आहेत. त्यांच्याशी संवाद साधायचं काम आर.जे करत आहेत. रोजच्या कामाच्या यादीत सध्या हे नेहमीच काम नवीन माध्यमातून आर.जे करताना दिसत आहेत. पण त्यातही नावीन्य कसं आणता येतं ह्याबद्दल रेडिओसिटी ९१.१ ची आपल्या लाडक्या शो शो शो शोनाली शी संवाद साधल्यावर तिने सांगितलं “सध्या कलाकारांशी लाईव्ह गप्पा मारणं ह्याचं प्रमाण खूप वाढायला लागलं आहे. त्यात अजून नावीन्य आणण्यासाठी कायमच खूप विचार करायला लागतो. माझ्या लाईव्ह सेशन मध्ये कायमच मी फॅन्सच्या प्रश्नांना अधिक प्राधान्य देते. आर.जे किंवा पत्रकार हे कधीही कलाकारांशी बोलू शकतात त्यांना भेटू शकतात पण सामान्य माणसाला हे करणं शक्य नसतं आणि अश्या लॉकडाऊनच्या काळात कलाकारांना जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असतात. मग त्यांच्याच प्रश्नांची उत्तरं त्यांना देण्यासाठी मी प्रयत्नशील राहते. 

ह्याशिवाय एक वेगळी गोष्ट म्हणजे रेडिओसिटीने सुरू केलेला नवीन सेगमेंट तो म्हणजे ‘कॉन्सर्ट फ्रॉम होम’. ह्यात आपल्याला आवडणाऱ्या वेगवेगळ्या प्रसिद्ध गायकांकडून आपल्या आवडीची गाणी आपल्याला त्यांच्या आवाजात ऐकता येतात. प्रत्येक कलाकार सध्या वेगवेगळ्या माध्यमातून रसिकांचा मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असताना हा एक वेगळा उपक्रम सध्या सुरू करणं म्हणजे सोने पे सुहागा म्हणता येईल. ह्याहून आनंददायी बाब म्हणजे ह्या “कॉन्सर्ट फ्रॉम होम” मध्ये सध्या आपण एक आवाज ऐकला तो म्हणजे आपल्यासाठी झटणाऱ्या पोलिस संघटनेतील सागर घोरपडे ह्यांचा. 


सध्याच्या परिस्थितीत आपल्यासाठी खंबीरपणे उभ्या असलेल्या फळीत पोलिसांचं योगदान खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांच्या आणि आपल्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या अश्या अनेक रिअल हिरोंतील कलेला एक संधी उपलब्ध करून देण्याचं काम रेडिओसिटी करत आहे.

इतरांप्रमाणे तुम्हीसुद्धा काही नवीन कला जोपासत आहात का?

काही नवीन करायचा प्रयत्न करत आहात का?    आर.जे ज्या पद्धतीने काम करत आहेत त्यामुळे एखादी नवीन कला जोपसणं, काहीतरी नवीन करणं ह्यासाठी त्यांना वेळ मिळत असेल का तर ह्यासंदर्भात मिरचीऑटोरानी यशश्री शी संवाद साधल्यावर तिने सांगितलं की “खरंतर सध्याच्या काळात वेगळ्या पद्धतीने काम करायला लागत असल्याने कामाचा व्याप थोडा अधिक आहे. एक एक कामं लागून असल्या कारणाने नवीन काहीतरी करायला वेळ काढणं कधीतरी अवघड जातं. तरीही मी सध्या इंस्टाग्रामवर मराठीतील प्रसिद्ध कवींच्या वेगवेगळ्या कविता घेऊन त्यांचं वाचन करते. त्या लोकांसोबत शेअर करते.


      एकंदरीतच काय तर सगळेच आर.जे सध्या कामावर ‘डटे रहे’ म्हणत आपल्याला ‘बने रहिये हमारे साथ’ असा विश्वास देत आपलं काम चोख बजावताना दिसत आहेत. सध्याच्या काळात जिथे सगळ्याच गोष्टी ठप्प आहेत तिथे आपल्यासाठी, आपल्या संरक्षणासाठी पोलीस, प्रशासन, पत्रकार, शेतकरी, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवा अधिकारी अशी कित्येक लोकं कामावर रुजू आहेत. त्यात मनोरंजन विभागात आर.जे सुद्धा आपापली कामं चोख बजावत आपल्या रोजच्या सेवांमध्ये व्यत्यय येणार नाही म्हणून काम करत आहेत. त्यांच्यासाठी त्यांच्याच भाषेत एक म्हणावसं वाटतं, तो अगला गाना उन सभी आर.जे के लिए जो हमारे चेहरे की मुस्कान बनाएं रखने के लिए डटकर काम कर रहे हैं….. 

जाने क्यूँ दिल जानता है तू है तो आय विल बी ऑलराईट..!!!!


मुलाखत : रसिका नानल (प्लॅनेट मराठी) 

Share your valuable opinion

%d bloggers like this: