अभिनेता देवेंद्र गायकवाड याचे दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, धर्मवीर आणि सरसेनापती हंबीरराव यांसारख्या १८ पेक्षा जास्त चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते देवेंद्र अरुण गायकवाड उर्फ दया यांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे. देवेंद्र यांनी सुरुवातीच्या काळात सुमारे ५ वर्षे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत आपला ठसा उमटविला, याच स्पर्धेत २००४ साली त्यांच्या एकांकिकेने पुरुषोत्तम करंडक तर पटकाविलाच पण त्याबरोबरच त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे “केशवराव दाते पारितोषिक” सुद्धा मिळाले होते. पुढे त्यांनी अनेक नामवंत संस्थांबरोबर प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांमधून आपल्या अभिनयाने रंगभूमी गाजविली आणि हे करत असताना टीव्हीवर मालिका सुद्धा केल्या. देवेंद्र गायकवाड यांचे लेखन, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या अनुराधा प्रॉडक्शन्स निर्मित मराठी चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. या चित्रपटाचे निर्माते दिलीपतात्या पाटील असून प्रमुख भूमिकेत मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.

चित्रपटाचे नाव अजून जाहीर केले नसले तरी आजच्या तरुणाईवर हा चित्रपट बेतला असल्याचे दिसते. चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड म्हणाले “वरिष्ठ कलाकार आणि मित्रांना माझ्या चित्रपटाची कथा आवडल्यामुळे त्यांनी मला या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी खूप प्रोत्साहन दिले. लेखक, दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट असल्याने सुरुवातीला थोडं दडपण आलं होतं पण कथा ऐकल्यानंतर निर्मात्यांनी विश्वास दाखवून लगेच काम सुरु केले आणि तोच विश्वास दाखवून मित्रांनी दिलेली साथ तसेच सर्व कलाकार व तंत्रज्ञ यांनी केलेल्या सहकार्यामुळे सर्वकाही सुरळीत पार पडले. चित्रपटाचे नाव आणि बाकीचा तपशील आम्ही योग्यवेळी जाहीर करणार आहोत आणि पुढील वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.”

Share your valuable opinion

%d bloggers like this: