‘अनन्या’चं रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!’ असे म्हणणाऱ्या ‘अनन्या’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. आता ‘अनन्या’ चित्रपटातील एक रोमँटिक गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. हृता दुर्गुळे व चेतन चिटणीस यांच्यात खुलत जाणारे हळूवार नाते यात दिसत आहे. ‘न कळता’   असे या गाण्याचे बोल असून बेला शेंडेचा सुमधूर आवाज या गाण्याला लाभला आहे. तर अभिषेक खणकर यांनी हे गाणे शब्दबद्ध केले असून समीर साप्तीसकर यांनी गाण्याला संगीत दिले आहे.

प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ चित्रपट येत्या २२ जुलैपासून चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गाण्यात एकमेकांविषयी असलेल्या तरल भावना व्यक्त करत एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन देत आहेत. प्रेमीयुगुलांच्या मनाला स्पर्श करणारे हे गाणे अतिशय श्रवणीय आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रताप फड गाण्याविषयी म्हणतात, ” हृता आणि चेतनवर हे गाणे चित्रित करण्यात आले असून अभिषेकने हे गाणे अगदी साध्या व सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गाणे मनाला मोहून टाकणारे आहे. आपल्या साथीदाराची प्रत्येकवेळी साथ मिळणे किती महत्त्वाचे आहे हे या गाण्यामधून स्पष्ट होत आहे.”

निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “एव्हरेस्ट एंटरटेनमेंट नेहमीच चित्रपटासोबत संगीतालाही दर्जेदार बनवण्याच्या प्रयत्नात असते. मला खात्री आहे, या गाण्याला आजची तरुणपिढी चांगला प्रतिसाद देईल.”

एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट, ड्रीमव्हीव्हर एंटरटेनमेंट  व रवी जाधव निर्मित चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे. तर चित्रपटाचे निर्माते ध्रुव दास, रवी जाधव व संजय छाब्रिया आहेत.

Share your valuable opinion

%d bloggers like this: