Author: PlanetMarathi

आपण अभिनय क्षेत्रासाठी बनलोच नाही. कारण तिथे काम करणारी लोकं फारचं वेगळी असतात. त्यामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्य मुलीला हे जमणारच नाही असा तिचा समज होता. फाईन आर्टिस्टमधून शिक्षण घेत असताना तिने एक नाटक पाहिलं आणि व्यक्त होण्याच्या माध्यमाचा कॅनव्हास तिनं बदलला. 


आजवर विविध एकांकिका, नाटकं, मालिका आणि चित्रपटात तिने काम केलं आहे. तर ‘फु बाई फु’ म्हणतं कॉमेडीचं उत्तम टायमिंग साधत तिने प्रेक्षकांना मनमुराद हसवलंय. पुढे ‘एका पेक्षा एक’ या डान्स शो मधून आपल्या अदांनी अवघ्या रसीकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘प्लॅनेट मराठी मॅगझीन’मधील ‘स्टार ऑफ द विक’च्या निमित्तानं जाणून घेऊया या दिलखुलास व्यक्तिमत्वाविषयी…संपूर्ण नाव : हेमांगी चंद्रकांत कवी
जन्म तारीख आणि ठिकाण : २६ ऑगस्ट, ठाणे
लग्नाचा वाढदिवस : २५ डिसेंबर
शिक्षण : फाईन आर्ट्स (सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट)मिमिक्री माझा स्ट्रॉंग पॉईंट

माझं बालपण खूप मस्त मजेत गेलं. आम्ही कळव्यात राहायला होतो. आत्ताच्या मानाने कळवा हे त्यावेळी निमगाव होतं. त्यामुळे गावातील मज्जा अनेक गंमती-जंमतीचा मनमुराद आनंद घेतं मी बालपण जगले. लहानपणी घरी येणाऱ्या पाहुण्यांची नक्कल करणं मला प्रचंड आवडतं असे. त्यामुळे पाहुणे गेल्यावर त्यांची मिमिक्री करण्याचा माझा तास सुरु व्हायचा. बरं, माझ्या या सवयीकरता मला माझ्या आई-वडिलांनी कधीच रोखलं नाही. त्यामुळे खेळकर आणि मजेशीर वातावरणात मी वाढले. परंतु, आपण लोकांच्या नकला करतोय, यालाच अभिनय म्हणतात हेही मला न कळणार होत. असं सगळं सुरु असताना, शालेय शिक्षण संपवून ‘जे. जे.’मध्ये प्रवेश मिळवला. त्यावेळी कॉलेजच्या ‘युथ फेस्टिव्हल’ला गेले असता, माझा नाटकाशी पहिल्यांदा संमंध आला. त्यापूर्वी मी एकही नाटक पाहिलं नव्हतं. शाळेत स्नेहसंम्मेलनासाठी स्टेजवर डान्स करण्यापुरता माझा काय तो या कला क्षेत्राशी संमंध. त्यामुळे युथ मधील नाटक पाहून, चित्रकलेव्यतिरिक कला साकारण्याचा हा हि वेगळा ‘कॅनव्हास’ आहे माझ्या लक्षात आलं. तोपर्यंत चित्रपट बघणं, परंतु आपल्यासारखे सर्वसामान्यही त्यात कामं करू शकतात, हा विचारही माझ्या मनात आला नव्हता. पण युथ मधील त्या एकांकिका बघून, आपणही कलाकार म्हणून व्यक्त होण्याचं माध्यम अभिनय असावं असं ठरवून मी पेंटिंग सोबतच अभिनयाकडे वळले. मग विविध एकांकिका आणि नाटकांमधून कामं करायला लागले. त्यावेळी विजू माने, मंदार देवस्थळी यांनी मला अभिनयाच्या बाराखडीपासून शिकण्यास खूप मदत केली अनेक बारकावे समजावून सांगितले आणि यातून मी शिकत गेले. त्यामुळे यांच्याकडून  मिळालेल्या मार्गदर्शनाचा आणि लहानपणीच्या मिमिक्रीचा माझ्या पुढील कामांमध्ये खूप उपयोग झाला. सुरुवातीला अभिनय क्षेत्र आपल्यासाठी नाहीच . तिथे काम करणारी लोकं फार वेगळी असतात. त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलीला हे जमणारंचं नाही असा माझा समाज होता. पण नंतर स्वतः इथे काम करायला लागल्यावर हा गैरसमज दूर झाला.रंगावरून अनेकांनी नाकारलं…
स्ट्रगल हा जरी सगळ्यांच्याच वाट्याला आला तरी प्रत्येकासाठी तो वेगळा असतो. त्यामुळे, ‘अभिनयासाठी घर सोडलं, स्टेशनवर राहिलीये.’ असा स्ट्रगल देवकृपेने माझ्या वाट्याला आला नाही. मात्र, माझ्या रंगावरून मला अनेकदा डावललं गेलं. ही काळीचं आहे, हि सावळ्या वर्णाची आहे त्यामुळे हि ‘हिरोईन’ नाही होऊ शकतं असं म्हणतं काम मिळवण्यासाठी अनेक नकार मी पचवले. पण त्यावेळीही, कदाचित मी त्यांच्या कास्टिंगमध्ये बसतं नसेल असं म्हणतं सकारात्मक ऊर्जा घेऊन नेहमी पुढे चालतं राहिले. विशेष म्हणजे सहा विविध चॅनेलकरता पायलट शूट केल्यानंतर आमची लीड काळी नको या एका कारणावरून मला ती कामं सोडावी लागली होती. त्यामुळे रंगामुळे मिळालेल्या नाकारांमुळे कधीच हार मानली नाही. तुमच्याकडे टॅलेंट असेल तर, तुम्ही कसे दिसताय याकडे कोणी लक्ष देतं नाही या मताची मी आहे आणि हे लक्षात ठेऊनच काम करतेय. त्यामुळे ज्यांनी मला नाकारलं हे त्यांचं नुकसान आहे माझं नाही हे समीकरण मी कायम लक्षात ठेवते.अभिनयाची धुडगूस… 

‘क्रौर्य’ नावाच्या एकांकिकेत मी काम केलं होतं. यात मला फक्त एका विंगेतून दुसऱ्या विंगेत जायचं होतं. पण ते करतानाही माझा थरकाप उडाला होता. मग ‘सेल्फ पोट्रेट’ नावाची दुसरी एकांकिका मिळाली. त्यावेळी फाईन आर्टिस्ट आहे पण हे छान अभिनय करतात. शिवाय, त्यात माझा थोडा डान्सही (त्यावेळी मला डान्स येतं नव्हता) होता, त्यामुळे माझ्या या कामाची वाहवाही झाली. मग विजू मानेंनी मला त्यांच्या नाटकात काम करण्याची संधी दिली. माझं ते काम बघून ‘वादळवाट’ मालिकेसाठी कास्टिंग करण्यात आलं आणि पुढे असंच कामातून काम मिळतं गेलं. मग ‘अनधिकृत’ नावाचं नाटक केलं ज्यात अशोकमामांसोबत (अशोक सराफ) यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. मग त्याचं कौतुक झालं. अखेर ‘धुडगूस’च्या निमित्ताने मोठा ब्रेक मिळाला.धुडगूस हा माझा पहिला चित्रपट. धुडगूसमधील माझ्या कामाचं प्रचंड कौतुक झालं, मला अनेक पुरस्कारही मिळाले.        


अनं मी डान्स करायला लागले…
‘फू बाई फू’चं पर्व संपलं आणि ‘एका पेक्षा एक’चं नवं पर्व सुरू होणारं होतं. मी स्किटमध्ये नाचते(गणपती डान्स), ते बघून मला ‘एका पेक्षा एक’मध्ये सहभागी होण्याकरता विचारण्यात आलं. मला डान्स येतं नाही, मी तो कधीच शिकले नाही. त्यामुळे काही एपिसोड्स झाल्यानंतर मला काढून टाका किंवा मी आपोआपचं स्पर्धेतून बाद होईन असं मी त्यावेळी बोलले होते. शिवाय, प्राजक्ता माळी, प्रार्थना बेहरे यांसारखे डान्सर्स त्या स्पर्धेत होते, त्यामुळे त्यांच्यासमोर आपला काही टिकावं लागणार नाही हे मी मनात पक्क केलं होत. पण स्पर्धा सुरु झाली, मी नाचू लागले आणि त्याकरता लोकांनी भरभरून प्रेम दिलं. अखेर या स्पर्धेच्या अंतिम पाच स्पर्धकांमध्ये मीही होते याचा आनंद आहे. ओमकार शिंदे आणि अजिंक्य शिंदे यांनी मला एका पेक्षा एक च्या मंचावर डान्स शिकवला आणि मी तिथून नाचायला शिकले.

     

म्हणून घेतला ब्रेक…
मध्यंतरीच्या काळात म्हणजे ‘फुलपाखरू’ मालिका करण्याआधी मी बराच काळ मालिका केली नाही. कारण, मला मालिकेसाठी कोणी विचारलंच नाही. पण त्याचवेळी ‘ती फुलराणी’, ‘ओवी’, ‘थष्ठ’ अशी माझी नाटकं अगदी छान चालू होती. त्यामुळे नाटकं सुरु असताना त्या कलाकाराला मालिकेसाठी विचारायचं नाही असं त्यावेळी ठरलेलं असायचं म्हणून त्या दरम्यान मला मालिकांपासून ब्रेक घ्यावा लागला. पण या ब्रेकमध्ये नाटकांबरोबरीने भरपूर वाचन केलं. नवनवीन टेक्नॉलॉजीसोबत स्वतःला अपडेट करत राहिले. पण आता मात्र एक हिंदी मालिकेमध्ये काम करत आहे. शिवाय हिंदी वेबसिरीजसाठीची बोलणी सुरु आहेत. परंतु तूर्तास मालिकेचा जम बसेपर्यंत वेबकडे वळणार नाही. टिकटॉक पाहून ऑडिशन्सला बोलावलं…
टिकटॉकवर व्हिडीओ बनवणं मला खूप आवडतं. खरंतर त्या व्हिडीओ बनवणं खूप आव्हानात्मक असतं असं मला वाटतं. त्यामुळे लोक त्याकडे फक्त टाईमपास किंवा वेगळ्या नजरेने पाहत असले तरी, त्या व्हिडीओ बनवणं खूप कठीण असतं. लोकं कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत फार लवकर व्यक्त होतात. ‘फू बाई फू’च्या वेळी लोकांनी त्या शोला त्यातील विनोदाला नावं ठेवली पण आज त्याचं शोचं एक वेगळं व्हर्जन असणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’वर लोक भरभरून प्रेम करत आहेत. टिकटॉकच्या बाबतीतही तसंच काहीसं झालं आहे. खरं सांगायचं तर, माझ्या वेबच्या तीन ऑडिशन्ससाठी माझ्या टिकटॉक वरील व्हिडीओ बघून मला विचारण्यात आलं आहे. त्यातील एक ‘बंगाली’ भूमिकेसाठीही ऑडिशन्ससाठी मला बोलावण्यात आलं आहे. पण लागोपाठ तीन लोकांनी मला ऑडिशन्ससाठी विचारलं हि त्या माध्यमाची ताकद आहे. त्यामुळे, कदाचित येत्या काळात आगळ्यावेगळ्या भूमिकेच्या निमित्तानं वेबवर झळकेनही. तूर्तास साल्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत.     त्या कविता नव्हे…
मला लिहायला आवडतं. पण माझं मलाच माहित नाही. पावसाळा आला कि मला सुचतं आणि त्या ओळी मी माझ्या सोशल अकाऊंट्स वरून पोस्ट करते. अनेकांना त्या कनेक्ट होतात. त्यामुळे खूप लोक त्याचं कौतुकं करतात. मुळात मला पाऊस, श्रावण प्रचंड आवडतो. त्यातून उत्स्फूर्त मला सुचतं जात आणि ते मी लिहिते. परंतु मी जे खरडते त्याला कविता म्हणू नका. त्या कविता नाहीत.
लवकरचं ब्रश हातात घेईन…

मी फाईन आर्ट्सची विद्यार्थीनी असल्यामुळे रंग आणि ब्रश आणि कॅनव्हास हे माझं व्यक्त होण्याचं एक माध्यम. परंतु आवड जपत मी अभिनयाकडे वळले. त्यामुळे अनेकदा हातात ब्रश घेणं होत नाही. दररोज मेकअप करताना हातात ब्रश घेते. परंतु आता मला चित्र रेखाटण्यासाठी ब्रश पुढं हातात घ्यायचाय. खूप धावपळं होती, अनेक गोष्टी करायच्या होत्या. नाटकं त्याचे दौरे, मालिका, चित्रपट या सगळ्यात खूप वेळ जातो. परंतु लवकरचं पेंटिंग सुरु करेन. माझ्या हातात ब्रश नसला तरी, तासनतास मनात एक ब्रश कायम विविध भूमिका रंगवत असतं आणि त्याची मदत मला अभिनयात होते.खोटेपणा नकोच…
आपल्याकडे लोक कोणत्याही चांगल्या वाईट गोष्टींविषयी बोलत नाही, व्यक्त होतं नाहीत. इंडस्ट्रीमधील मला हि खटकणारी गोष्ट आहे. कदाचित बोलल्यानंतर होणारे दुष्परिणाम भोगण्याची तयारी नसल्यामुळे हे होत असले. किंवा इतर अनेक कारणांमुळे लोक बोलणं टाळतात. एखादी गोष्ट नाही आवडली तर त्याबद्दल कोणी बोलत नाही. उलट एखाद्याच्या ‘गुडबुक्स’मध्ये राहण्यासाठी त्याच व्यक्तीची खोटी तारीफ केली जाते. त्यामुळे अशा खोट्यांच्या दुनियेत जगणारे मला नाही आवडतं. आणि हि एकमेव गोष्ट मला खटकते.फिटनेस फंडा
प्रेरणा बावडेकर या माझ्या डायटिशिअन आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी डाएट फॉलो करते. त्याचे खूप छान परिणाम मला दिसत आहेत. शिवाय जेव्हा शक्य होईल तेव्हा जिमला जाते. पण, सकाळ-संध्याकाळ मी न चुकता साधारणपणे ४५ मिनिट चालतेच. चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही आणि ते खरं आहे. कोणत्याही महागड्या साधनांशिवाय होणारा हा एक उत्तम व्यायाम आहे. या सगळ्या बरोबरचं गोडं आणि तेलकट पदार्थांवर ताबा मिळवला आहे. रॅपिड फायर

हेमांगी अभिनेत्री नसती तर?
चित्रकार

हेमांगीचा आवडता अभिनेता?
(अनेक आहेत) अरुण सरनाईक, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सतीश दुभाषी, दिलीप प्रभावळकर, अमिताभ बच्चन, नसरुद्दीन शहा, शाहरुख खान, इरफान खान, आयुषमान खुराना……

हेमांगीचा फर्स्ट क्रश
शाहरुख खान

हेमांगीचा आवडता चित्रपट
(खूप आहेत) दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे, तारे जमीन पर, दिल चाहता है आणि स्मिता पाटील यांचे सगळेच चित्रपट 

स्वतःमधील न आवडणारी गोष्ट
पटकन रिऍक्ट होणं (ते कधी चांगलं तर कधी वाईटही असतं)

स्वतःमधील खूप  आवडणारी गोष्ट
मी फार चिंता करत नाही, टेन्शन घेत नाही

हेमांगीचं आवडतं ठिकाणं
माझं गावं (म्हसवड,सातारा), युएस, लंडन, रोम, इटली हे सगळं आवडतं

हेमांगीचा लाईफ फंडा
भरपूर हसा आणि एकचं लाईफ आहे त्याचा आनंद घ्या. लोक काय म्हणतील (लोक काहीचं म्हणतं नसतात किंवा खूपकाही म्हणतं असतात) पण तुम्हाला काय योग्य वाटतं ते करा.

डान्स कि कॉमेडी
डान्सिकल कॉमेडी आणि कॉमिकल डान्स

सगळ्यात जास्त वापरलं जाणारं सोशल मिडिया अँप
इन्स्टाग्राम


मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)

www.planetmarathimagazine.com

www.planetmarathi.org

Advertisements

 “महाराष्ट्राचा सुपरस्टार” मधून घराघरात पोहचलेला “माझिया प्रियाला” मधला प्रेमळ अभि ते माझ्या नवऱ्याची बायको” मधला गुरुनाथ सुभेदार अश्या विविध भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य करणारा अभिजीत खांडकेकर. 


नाटक, चित्रपट, मालिका आणि एक बहुपैलु निवेदक. स्टाईल चा अनोखा अंदाज जपून त्याने आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्लॅनेट मराठी मॅगझीन “स्टार ऑफ द वीक” मधून आम्ही काही खास गप्पा मारल्या आहेत….


 अभिजीत खांडकेकर 
वाढदिवस : ७ जुलै १९८६ 
जन्मठिकाण : पुणे 
शिक्षण : मास कम्युन्यूकेशन (mass communation) 

“मालिका मुळे करिअरला नवीन वळण” 

अभिनेता म्हणून माझ्या आयुष्यातला पहिला शो म्हणजे ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ इथून आम्ही सगळेच कलाकार म्हणून लोकांसमोर आलो. एक कलाकार म्हणून करियरची सुरुवात इकडून झाली. मग झी सारखं मोठं चॅनेल आणि मग अभिनयासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी इथून शिकत गेलो. महाराष्ट्राचा सुपरस्टार या शो मुळे मी प्रकाशझोतात आलो. सगळे एक अभिनेता म्हणून ओळखायला लागले. या कार्यक्रमामुळे अभिनय क्षेत्रातील स्ट्रगल कमी झाला. अनेक ठिकाणी ऑडिशन देणं सुरू झालं. दिग्दर्शक आणि काही प्रोडक्शन ला भेटी देणं चालू असताना एकीकडे चित्रपट आणि मालिकांसाठी ऑडिशन देत असताना मला “माझिया प्रियाला” ही मालिका मिळाली. पहिली मालिका मिळणं हा आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता, कारण तेव्हा सासू सुनांच्या मालिका येत असताना त्यात एखादी रोमॅंटिक मालिका येणं आणि लोकांना ही प्रेम कहाणी आवडणं त्यात लोकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळणं. मग माझा खऱ्या अर्थाने इथून प्रवास सुरु झाला. माझिया प्रियाला नंतर जवळपास ६ वर्ष मी दुसरी मालिका केली नाही. मग या मधल्या काळात इव्हेंट्स, चित्रपट यांच्यासाठी मी निवेदक म्हणून काम केलं. ६ वर्षांनी “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेसारखी संधी मला मिळाली आता सव्वा तीन वर्षे ही मालिका करतो आहे. लोकांना सुद्धा ही मालिका आवडत आहे आणि लोकप्रिय ठरते आहे. 


“कलाकार आहे नशीबवान” 


    एक अभिनेता म्हणून नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारता येतात, एक वेगळं आयुष्य जगून बघता येतं. आपल्याला रोजच्या आयुष्यात एकाच रोल मध्ये जगावं लागतं तर कलाकारांचं असं नसतं. कलाकार हा फार नशीबवान असतो कारण त्याला विविध भूमिका जगता येतात आणि साकारता येतात. माझ्या पहिल्या मालिकेत मी अगदी एक आदर्श नवरा, मुलगा, प्रियकर होतो अशी एक रामासारखी भूमिका बजावत असताना आताच्या मालिकेत एकदम विरुद्ध भूमिका साकारतो आहे. नकारात्मक भूमिका साकारायला मिळते आहे. माझ्यासाठी प्रत्येक रोल किंवा भूमिका साकारणं हे आव्हानात्मक आहे. मला असं नेहमी वाटतं की एक अभिनेता म्हणून मी प्रत्येक भूमिकेत दिसलो पाहिजे, नव्या भूमिका साकारल्या पाहिजे.

“मालिकेनंतर रंगभूमी कडे वळेन” / “लवकरचं नाटकात काम करेन”


रंगभूमीवर काम करण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो डेलीसोप मुळे देता येत नाही म्हणून काही काळ नाटकापासून मी लांब आहे. मध्यंतरी मालिका चालू असताना मी एक व्यावसायिक नाटक केलं ज्याचे २५ प्रयोग सुद्धा झाले. आता मालिका संपल्या नंतर मी एखादं नाटक करेन. 

 “बायको माझी डिझायनर” 


फॅशन आयकॉन असं नाही सांगता येणार. जर कोणी काही वेगळं आणि चांगलं ट्राय केलं असेल आणि त्यात काही वेगळं प्रयोग असेल तर मला ते ट्राय करून बघायला आवडतं. अगदी रणबीर पासून आयुषमान किंवा मराठीत असे अनेक कलाकार आहेत जे उत्तम स्टाईल ट्राय करतात. फॅशन बद्दल एक उत्तम नजर असली पाहिजे, फॅशन सेन्स असला पाहिजे. माझ्या फॅशन च्या  बाबतीत माझी बायको सुखदा ही मला नेहमी मदत करते तिच्याकडे एक बेस्ट डिजाईनर वृत्ती आहे. आमच्या या निमित्ताने काही आवडी निवडी जुळतात, मला काही तरी ट्राय करून बघायचं असतं मग ती त्यासाठी सल्ले देते. तीच कधीतरी माझ्यासाठी काहीतरी डिजाईन करते. सतत काहीतरी नवीन आणि वेगळं करण्याचा माझा प्रयत्न असतो. 

“निवेदक ते अभिनेता” 


निवेदक आणि सूत्रसंचालक हे काम आज सुद्धा चालू आहे. सध्या मी अभिनय आणि निवेदक म्हणून काम करतो आहे. मी माझं करियर निवेदनापासून सुरू केलंय. वयाच्या १६ वर्षी एका लोकल वृत्त वाहिनी साठी वृत्त निवेदक म्हणून मी काम केलं त्यानंतर रेडिओ मध्ये मी पाच ते सहा वर्षे मी काम केलं. अभिनेता होण्याआधी मी विविध माध्यमातून निवेदन करत होतो. आता टेलिव्हिजन वर आल्यावर अभिनेता आणि निवेदक हे कॉम्बिनेशन तयार होतं तर तेव्हा सारेगमप चे दोन सिजन केले. झी च्या अनेक कार्यक्रमांसाठी निवेदन केलं. देशात परदेशात अनेक निवेदनाची काम केली. तर माझ्यात असलेल्या दोन्ही कलांमुळे मी अभिनय आणि निवेदक अशी दुहेरी भूमिका बजावतो आहे. 

“भविष्यात सुखदा सोबत काम करायचं” 


सुखदा आणि मला नक्कीच सोबत काम करायला आवडेल. आम्ही अजून सोबत काम नाही केलंय पण भविष्यात नक्कीच सोबत काम करू. या पूर्वी आम्ही दोघांनी सोबत थोडंफार काम केलंय. काही जाहिराती, एक नाटक आणि स्टार प्रहाव वर आम्ही एक एपिसोडिक काम केलंय. ती सुद्धा तिच्या हिंदी आणि मराठी नाटकात व्यस्त आहे. मला फार हेवा वाटतो ती पृथ्वी थिएटर सारख्या संस्थेसाठी एवढं उत्तम काम करते तर नक्कीच मला तिच्यासोबत काहीतरी वेगळं काम करायला आवडेल. 

“क्षेत्र ग्लॅमरस असलं तरी मी ग्लॅमरस नाही” 


माझं क्षेत्र ग्लॅमरस आहे पण मी ग्लॅमरस नाही आहे असं मला नेहमी वाटतं. अभिनयाला एक वलय आहे ग्लॅमर आहे पण या व्यतिरिक्त मी एक माणूस म्हणून जगतो. आपल्याकडे अभिनयाला एक एवढं मोठं वलंय प्राप्त झालंय की लोकं त्याला वेगळ्या दृष्टीकोनातून बघतात. इथे लोकांकडून मिळणारं प्रेम खूप आहे. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की मला एवढं प्रेम आणि कामामुळे प्रसिद्धी मिळते. पण यांची दुसरी बाजू अशी की तुम्हाला पब्लिक फिगर म्हणून फार गोष्टी जपून कराव्या लागतात. राजकारण्या नंतर अभिनेत्यांवर सुद्धा बारकाईने नजर ठेवली जाते. खऱ्या आयुष्यात मला फार साधं जगायला आवडतं. कारण प्रसिद्धी ही एका बुडबुडया सारखी आहे. आज आहे तर उद्या नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्यात किती वाहवत जायचं हे आपल्यावर आहे. मला माझी माणसं जपून ठेवायला आवडतात, आजूबाजूला सतत कोणीतरी हवं असतं, साध्या साध्या गोष्टी मध्ये आनंद मी शोधत असतो. त्यामूळे क्षेत्राला जरी वलंय असलं तरी मी खऱ्या आयुष्यात मी ग्लॅमरस नाही. 

स्लॅमबुक ….


आवडता चित्रपट : जिंदगी ना मिलेगी दोबारा
आवडती जागा : फिरण्यासाठी चांगली सोबत असेल तर कुठेही फिरायला आवडतं.
आवडता अभिनेता : रणवीर सिंग, अमिर खान, शाहरुख खान. 
आवडती अभिनेत्री : जुलिया रॉबर्ट्स. 
आवडती डिश : आजकाल घरगुती जेवणं आवडायला लागलंय. (अगदी साधा वरण भात, नॉनव्हेज) 
आवडत सोशल मीडिया : इन्स्टाग्राम 
आवडते गायक , गायिका : अवधूत गुप्ते, महेश काळे, अजय-अतुल, श्रेया घोषाल, बेला शेंडे. 
आवडत नाटक : प्रशांत दामलेंची सगळी नाटकं
आवडत पुस्तक :  पुलं च कुठलंही पुस्तक 
आवडता लेखक : पुलं देशपांडे 
आवडती वेबसिरीज : सेक्रेड गेम्स, फ्रेंड्स 


मुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी) 

www.planetmarathi.org

www.planetmarathimagazine.com

आपल्याला आवडतं म्हणून अभिनय करायचं असं अनेकांना वाटतं. पण यात काम मिळेल कि नाही हि भीतीही असतेच. त्यामुळे आवड असली तरी आपण नोकरीच करायची असं मनाशी पक्क करत तिने एमबीए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल. पण अखेर आवड ती अभिनयाकडे वळली. इथे स्थिरावली. 

‘जुळून येती रेशीम गाठी’, ‘मन उधाण वाऱ्याचे’ अशा मालिका तर ‘चि. व चि. सौ. का.’ या चित्रपटातून तिने प्रेक्षकांची मन जिंकली. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातील ती अंतिम स्पर्धकांमधील एक ठरली. 

येत्या काळात नवीन नाटक, चित्रपट, मालिका आणि वेबसोबत तिला निर्मिती क्षेत्राकडे वळायचं. प्लॅनेट मराठी मॅगझीनच्या स्टार ऑफ द वीक मधून जाणून घेऊया अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत बद्दल…  

संपूर्ण नाव : शर्मिष्ठा भरत राऊत 

जन्म तारीख आणि ठिकाण : २२ एप्रिल, मुंबई  

शिक्षण : एमबीए, फायनान्स 

अभिनयावर शिक्का मोर्तब… 

ठाण्यात एकत्रित कुटुंबात माझं बालपण अगदी आनंदात गेलं. लगोरी, लपंडाव, चोर पोलीस हे आमचे आवडीचे खेळ. लहानपणी मी खूप खोडकर होते. अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा माझा अजिबातच विचार नव्हता. सर्वसामान्यासारखी मलाही ९ ते ६ नोकरी करायची आहे असं माझं सोप्प गणित होत. त्यासाठी मी एमबीए फायनान्सचं शिक्षणही घेतलं. छंद म्हणून मी बालनाट्यांमधून काम केलं करायचे, सोबतचं सातवीत असल्यापासून अनेक प्रायोगिक नाटकांमध्येही मी काम करत होते.भरतनाट्यमचं ही प्रशिक्षण घेतलं आहे. शाळेत पथनाट्यामध्ये काम करण्यापासून माझी अभिनयाची सुरुवात झाली. पथनाट्यातील मूळ सूत्रधाराच्या भूमिकेत असणारी मी अर्ध्याहून अधिक संवाद विसरले होते. तरी अभिनयाचं उत्तेजनार्थ पारितोषिक मला मिळालं होतं. कॉलेजमध्ये  असताना विविध स्पर्धांमधून आमचा ग्रुप सहभाग घ्यायचा त्यांच्यासोबत मीही काम करायचे. एवढं सगळं मी करत असले तरीही अभिनय क्षेत्राचा मी करिअर म्हणून अजिबातच विचार केला नव्हता. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मला नोकरीही मिळाली होती. त्याच्या सोबतीने केवळ आवड जपता यावी म्हणून मी सुरुवातीचा काही काळ ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केलं. त्यानंतर काही वर्षांनी मला मी मराठी वाहिनीवर मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. इथे स्थिरावता आलं नाही तर एमबीएचा पर्याय माझ्या सामोरं होताच. त्यामुळे स्वतःला दोन वर्षांचा अवधी देत मी ही संधी स्विकारली. या दोन वर्षात स्ट्रगल सुरु होता. ही दोन वर्ष संपत आली  आणि त्याचं दरम्यान ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेत मला काम मिळालं. प्रमुख खलनायिका असलेली हि माझी पहिली भूमिका ठरली. मग माझा प्रवास सुस्साट सुरु झाला. ‘उंच माझा झोका’, ‘जुळून येती रेशीम गाठी’ अशा मालिकांसोबत ‘चि. व चि.सौ.का’ या चित्रपटातही काम केलं. पुढे जाऊन निर्माती म्हणून या क्षेत्रात काम करायचं माझं स्वप्न आहे आणि म्हणून त्यातील अनेक बारकावे शिकण्यासाठी दोन चित्रपटांसाठी कार्यकारी निर्मिती म्हणून काम पाहिलं. त्यामुळे अभिनयाचं किंवा या क्षेत्रातील कोणतंही रीतसर प्रशिक्षण मी घेतलं नसलं तरी मिळणाऱ्या कामांमधून आणि सहकालाकरांकडून नेहमी शिकत राहून आज पर्यंत हा प्रवास सुरु आहे.

छंद व्यवसाय बनतो तेव्हा… 

अभिनय क्षेत्रात जम बसला नाही तर हे क्षेत्र सोडून परत नोकरीकडे वळण्याचा माझा विचार अभिनयातील माझं काम सुरु झाल्यामुळे खुंटला गेला. सुदैवानं कामातून काम मिळतं गेली. तुमचा छंद ज्यावेळी तुमचा व्यवसाय बनतो त्यावेळी आपोआपच त्यातून काहीतरी चांगलं घडतं हे माझ्या बाबतीतही घडलं. शिवाय, मॅनेजमेंट माझ्या रक्तात असल्यामुळे तिथल्या शिक्षणाचा, तिथल्या सवयीचा मला इथे चांगला उपयोग होतो. आताही एक्झी-प्रोड्युसर म्हणून काम करताना मॅनेजमेंटमधील सगळ्या स्किल्स वापरून काम करते. त्यामुळे शिक्षणाचा सगळीकडेच छान उपयोगही होत आहे. सोबतच या क्षेत्रात अभिनय सोडल्यास मला येत्या काळात निर्माती म्हणून नाव मिळवायचं आहे. आताच्या काळातील या क्षेत्रातील स्पर्धा बघता एक जोडधंदा असणं अत्यंत गरजेचं असतं असं मला वाटतं. त्यामुळे फूड इंडस्ट्रीमध्ये मला माझा बिझनेस सुरु करायचा आहे. त्यामुळे माझं एखादं रेस्टोरंट किंवा फूडजॉईन असावं असं माझं स्वप्नं आहे.  पण कामाच्या बाबतीत हे क्षेत्र शाश्वत नसल्यामुळे जोडधंदा असणं गरजेचंच आहे असं मला वाटतं .

पहिलं प्रोत्साहन महत्त्वाचं… 

शाळेत असताना ‘लोकसंख्या’ नावाचं पथनाट्य केलं होत. स्क्रिप्टमधील अर्ध्याहून अधिक पान आपण गाळली आहेत. मग आपल्याला काही बक्षीस मिळणार नाही हे गृहीत धरूनच मी मैत्रिणीसोबत मागे मस्ती करत बसले होते. अचानक मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाल्याचं जाहीर झालं. त्यावेळी माझ्या शिक्षकांनी फार कौतुकाने माझ्याकडे पाहिलं होतं.. त्यातून मला प्रोत्साहन मिळालं आणि मी हळूहळू अभिनय करायला लागले. त्यामुळे माझ्या शाळेतील अष्टपुत्रे बाई आणि चोपडे बाई यांचा मला अभिनय क्षेत्राकडे वळवण्यासाठी मोलाचा वाटा आहे. मला बक्षीस देताना त्यांनी मला दिलेली शाब्बासकी आणि त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. 

फटकळ स्वभावाची मी… 

मी फटकळ स्वभावाची आहे. माझ्या जे मनात आहे तेच माझ्या तोंडावर येतं. माझ्या या स्वभावाचा मला इंडस्ट्रीमध्ये खूप फायदा झाला. कामाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, नशिबाने मला फसवणार कोणी मिळालं नाही. त्यामुळे काम मिळवण्यासाठी कोणत्याही गैरप्रकाराला सामोरं जाण्याची वेळ माझ्यावर आली नाही. कामातून अनेक काम मिळतं गेली. माझ्या स्वभाव पाहता अनेक खलभूमिका मिळाल्या. स्पष्टवक्ती असल्यामुळे मी या सगळ्यात फारशी अडकली नाही.  नायिकेपेक्षाही मला खलनायिका साकारणं सर्वाधिक आवडतं. प्रत्येक व्यक्तीत कमी-अधिक प्रमाणात राग, ईर्षा असतेच. आपण जे नाही आहोत ते साकारण्यात खरी मजा आहे. त्यामुळे माझ्यातील थोड्या फार राग आणि ईर्षेला प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी शंभर टक्के प्रयत्नशील असते.चित्रपट आणि नाटकात वेळेची मर्यादा असल्यामुळे खलभूमिकेतील अनेक घटना थोडक्यात मांडल्या जातात. मात्र मालिकांमध्ये याच घटना अधिक वेगळ्यापद्धतीनेही मांडल्या जातात. त्यामुळे स्वतःला पटेल अश्या पद्धतीने केलेलं काम आपोआपचं प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं.

नाटक माझ्यासाठी रिफ्रेशमेंट 

मला सगळ्या माध्यमांपैकी नाटकं आणि टेलेव्हीजन हि दोन माध्यमं सर्वाधिक आवडतं. मी अनेक वर्ष मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या. त्यातील अनेक मालिका खूप मोठा काळ चालल्या. परंतु मालिका करताना सोबतीने विविध नाटकांतील कामही सुरु असतात. त्यामुळे मालिकेतील भूमिकेचा कंटाळा आला तरी तो कंटाळा सुरू करण्याचं काम नाटकं करतं. शिवाय, नाटकाच्या निमित्तानं अनेक प्रेक्षकांना भेटता येतं, त्यांचे अभिप्राय जाणून घेता येतात. त्यामुळे मालिकेच्या सेटवर गेल्यावर मी फ्रेश असते. त्यामुळे मालिका कितीही काळ चालली तरी मला कंटाळा येत नाही. मुळात माझं माझ्या कामावर प्रचंड प्रेम असल्यामुळे मला त्याचा कधीच कंटाळा येत नाही येणार नाही. त्यामुळे सततच्या कामांतून मी नेहमी आनंदी आणि उत्साही असते. कदाचित त्याचंमुळे सोशल मिडीयावर मला ‘लेडी रणवीर सिंग’ वैगरेंच्या कमेंट येतात. जसं टेलिव्हिजनमुळे घराघरात पोहचता येतं तसं वेबसिरीज हे युथपर्यंत पोहचण्याचं प्रभावी माध्यम आहे.  आता येत्या काळात वेबकडे वळण्याचा विचार आहे. वेळ आणि कामाची संधी मिळाली तर वेबसिरीज करायलाही आवडेल.  शिवाय सध्या एका नवीन नाटकाच्या शोधात आहे.

ड्रीम रोल… 

माझ्या ड्रीम रोल बद्दल सांगायचं झाल्यास मला ऐतिहासिक भूमिका साकारायची आहे. त्यातही आनंदीबाईं जोशी पडद्यावर साकारण्याची संधी मिळाली तर मी ती नक्की स्वीकारेन. शिवाय,सध्या सुरु असलेल्या ‘स्वामिनी’ मालिकेतही मला काम करण्याची संधी काही कारणांमुळे हुकली. शिवाय एक प्रेमकथेवर आधारित  काम करण्याची प्रचंड इच्छा आहे. शिवाय, हिंदीमध्ये रोहीत शेट्टी, संजय लीला भन्साली, नसरुद्दीन शहा, अमिताभ बच्चन, इरफान खान, नवाजुद्दीन सिद्धीकी यांच्या सोबत काम करण्याचं माझं स्वप्नं आहे.    

कधीकधी प्रेक्षकही चुकतात… 

आम्हा कलाकारांवर प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम असतं. आमच्या प्रत्येक कामावर ते भरभरून प्रेम करतात. परंतु अनेकदा त्यांचं वागणं चुकीचं असतं. आपण कुठे आहोत, परिस्थिती काय आहे याचं काही भान न ठेवता फोटो किंवा सेल्फी काढायला येतात. त्यांचं हे वागणं खरंच चुकीचं असतं. शिवाय, अनेकदा कलाकार खात असताना वैगरे चाहते  लपून फोटो काढतात हे प्रचंड खटकतं. मला स्वतःला हि गोष्ट अजिबातच आवडतं नाही. जेवतानाच वेळ प्रत्येक व्यक्तीचा त्याने स्वतःला दिलेला वेळ असतो. त्यामुळे त्यावेळी कोणीही कोणालाही त्रास देऊ नये असं मला वाटतं.  सोबतच, अनेकदा मालिका लांबली कि, ‘मालिका केव्हा बंद करणार.’ ‘खूप बोरिंग दाखवता बुवा तुम्ही, ते बंद करा’ असं प्रेक्षक सांगतात.पण एका मालिकेवर अनेक लोकांची पोट अवलंबून असतात. आमच्यासाठी हे काम आहे. हे प्रेक्षक विसरतात. यावर माझं असं सांगणं असतं, ‘प्रेक्षकांच्या हाती रिमोट असतो, त्यांनी चॅनल बदलावं.’ प्रत्येक प्रोजेक्टचं एक ठराविक वय असतं. प्रेक्षकांवर अनेक गणित अवलंबून असतात. हे त्यांनी लक्षात घेऊन व्यक्त व्हायला हवं.  तुम्ही पाहता म्हणून त्या मालिकांना टीआरपी मिळतो. मालिका पाहणं तुम्ही थांबवलं कि आपोआपच मालिका बंद होईल. त्यामुळे प्रेक्षकांचं असं म्हणणं मन दुखावणार असतं.  

ट्रोलर्स त्रासदायक… 

आयुष्यात मी कधीही ट्रोल झाली नाहीये. बिग बॉसच्या पहिल्या पर्वात मी स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात गेले होते त्याही वेळीही मी ट्रोल झाले नाही. पण बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात एका टास्कसाठी आत गेली असता प्रचंड वाईट पद्धतीने मला ट्रोल केलं गेलं. त्याचा खूप त्रासही होतो. पण या सगळ्याची सवय झाली आहे आणि म्हणूनच ट्रोल आणि ट्रोलर्सना दुर्लक्षित करायला मी शिकले आहे. पण उगाच कुटुंबाला होणारा त्रास संताप आणणारा असतो. पण,माझ्यात खूप सहनशक्ती आहे हे मला ‘बिग बॉस’मुळे लक्षात आलं. एखाद्या वाईट गोष्टीकडे सहजपणे दुर्लक्ष करता येऊ शकतं हे कळलं. आयुष्यात महत्त्वाच्या अशा अनेक गोष्टी मी यातून शिकले.

आमचं नातं स्पेशल..

‘जुळून येती रेशीम गाठी’ या मालिकेच्या निमित्ताने ललित प्रभाकर सोबत ओळख झाली. त्या मालिकेत आम्ही भाऊ-बहीण साकारत होतो. मालिका संपल्यानंतर मात्र आम्ही हे नातं कायम जपलं आहे. आजही प्रत्येक रक्षाबंधन, भाऊबीजला आम्ही भेटतो. त्यामुळे ऑफ स्क्रीनही आमचं नातं तेवढंच घट्ट आहे.

 झटपट बोल… 

 शर्मिष्ठाचं टोपणनाव (निक नेम)

-शमा 

शर्मिष्ठा अभिनेत्री नसती तर… 

-बिझनेस वुमन 

अभिनयाव्यतिरिक्त काय आवडतं?

-कुकिंग, 

शर्मिष्ठाचं फर्स्ट क्रश?

– खूप आहेत… पण त्यातही श्रेयस तळपदे, सुमित राघवन, आमिर खान, अमिताभ बच्चन 

स्वतःमधील न आवडणारी गोष्ट

-प्रेमापोटी कोणावरही पटकन विश्वास ठेवते 

स्वतःमधील आवडणारी गोष्ट 

-सध्या एकही नाहीये (अजून शोधतेय, कारण अनेक गोष्टी शिकतं आहे)

शर्मिष्ठाचा वीक पॉइंट 

-लोकांवर पटकन विश्वास ठेवते पण त्याचा नंतर त्रास होतो. 

शर्मिष्ठाची स्ट्रेंथ

-माझे बाबा 

शर्मिष्ठाचा लाईफ फंडा 

-वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करा, काही मनात ठेऊ नका आणि आनंदाने जीवन जगा 

शर्मिष्ठाची आवडती अभिनेत्री 

-स्मिता पाटील, शबाना आझमी 

आयुष्यात न विसरता येणारा क्षण 

-बिग बॉस पहिल्या पर्वाची फायनलिस्ट झाले तो क्षण 

इंडस्ट्रीमधील चांगल्या मैत्रिणी 

-मधुगंधा कुलकर्णी, सुकन्या मोने, वंदना गुप्ते 

सर्वाधिक वापरलं जाणार सोशल मिडिया अप

-इंस्टाग्राम  

मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)

www.planetmarathi.org

www.planetmarathimagazine.com

सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे ती बहुचर्चित  “पानिपत ” या चित्रपटाची. चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर सगळ्यांच्या भेटीला आला असून एवढा भव्यदिव्य ट्रेलर बघून सगळ्यांना चित्रपटांची उत्सुकता आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित “पानिपत” या चित्रपटात अनेक मराठी चेहरे सुद्धा झकळणार आहेत. या चित्रपटाची चर्चा फारच रंगली असून या चित्रपटात संजय दत्त्त, क्रिती सॅनन, अर्जुन कपूर, आणि पद्मिनी कोल्हापूरे यांच्या मुख्य भूमिका असून यांत नेमके कोणते मराठी कलाकार असणार आहेत यावर एक नजर टाकू या.

     कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुस्कर यांनी या चित्रपटातील कलाकारांचं कास्टिंग केलंय. योग्य भूमिकांना वाव देण्यासाठी कास्टिंग ही मुख्य भूमिका त्यांनी अगदी लिलया पार पाडली असून या ऐतिहासिक चित्रपटात अनेक  मराठी कलाकार आपल्याला बघायला मिळणार आहेत. जवळपास ३२ मराठी कलाकार आपल्याला “पानिपत” या चित्रपटांत बघायला मिळणार असून यात कृतिका देव (राधिका बाई) , अर्चना निपणकर (आनंदी बाई) , गश्मीर महाजनी (जनकोजी शिंदे) , प्रदीप पटवर्धन, सागर तळाशीकर यांच्या सोबतीने भली मोठी मराठी कलाकारांची टीम या चित्रपटात झळकणार आहे. 


   चित्रपटात दिसणारा भव्यदिव्य  सेट, त्यांचे डिजाईन आणि त्यांची अनोखी योजना ही नितीन देसाई यांनी साकारली आहे. नितीन देसाई यांच्या आर्ट डिरेक्टर  आणि डिझायनर म्हणून सगळ्यांना माहीत आहेत मराठी पासून बॉलिवूड पर्यंत त्यांचा हा  प्रवास  अनोखा आणि लक्षणीय आहे. पानिपत या चित्रपटात मराठ्यांच्या इतिहास भव्य दिव्य पडद्यावर उलगडणार आहे. सोबतीने अजय -अतुल यांचं संगीत आपल्याला पानिपत मध्ये अनुभवायला मिळणार आहे.

   भव्यदिव्य अश्या लक्षणीय “पानिपत” या चित्रपटातील मराठी कलाकार तारकांना प्लॅनेट मराठी कडून खूप खूप शुभेच्छा!

नेहा कदम – प्लॅनेट मराठी

www.planetmarathimagazine.com

www.planetmarathi.og

स्पेशल इंटरव्ह्यू (जुई बेंडखळे)

एक छोटी मुलगी टिव्ही समोर उभी राहून टिव्हीमधील विविध पात्रांचा डान्स आणि अभिनय कॉपी करायची. तिच्या लहानपणापासून, ‘मला हिरोईन बनायचंय.’ हे तिचं ठामपणे सांगणं, सत्यात उतरलंय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या समीर आठल्ये दिग्दर्शित ‘बकाल’ या पहिल्या ऍक्शनपटात ती प्रमुख अभिनेत्री म्हणून सगळ्यांसमोर आली. लहानपणापासून विविध डान्स रिआलिटी शो मधून आपणं तिच्या धम्माल आणि ठसकेदार डान्स पहिला आहे. तसेच विविध सौंदर्य स्पर्धांमधून हा चेहरा अनेकांच्या ओळखीचा बनला आहे. ‘बकाल’ हा तिचा पहिला चित्रपट असला तरी, स्क्रीनवरील तिचा वावर आणि आत्मविश्वास पाहून प्रेक्षक तिच्या अभिनयाचं भरभरून कौतुक करतं आहेत. ‘बकाल’च्या निमित्तानं सिनेक्षेत्रात पदार्पण केलेल्या अभिनेत्री ‘जुई बेंडखळे’ने ‘प्लॅनेट मराठी मॅगझीन’ सोबत दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.        


पालकांनी ओळखलं टॅलेंट….  
साधारणपणे तीन-साडेतीन वर्षांची असेन. टिव्ही लाऊन डान्स करण्याची माझी सवय लक्षात घेऊन, माझ्या पालकांनी मला डान्स क्लासमध्ये घातलं. माझ्या या आवडीमधील सातत्याची जोडं मिळाली आणि मला मी सहा वर्षांची असताना टिव्हीवरील ‘बुगी-वुगी’ या लोकप्रिय डान्स शोमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. या शोच्या अंतिम स्पर्धकांमध्ये मी ही होते. त्यानंतर याचं शोच्या विविध सिझन्समध्ये तब्बल आठ वेळा मी सहभागी झाले. त्यानंतर ‘एका पेक्षा एक – सिझन ४’ या ‘छोटे चॅम्पिअन’स्पेशल डान्स रिअलिटी शोमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी होते. या स्पर्धेचीही रनरअप ठरले. त्यानंतर हळूहळू मॉडेलिंग, विविध ब्रांडसाठी फोटोशुट अशी काम करायला सुरुवात केली. पुढे जाऊन ‘मिस नवी मुंबई’ आणि सौंदर्य विश्वातील मानाची समजल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स – श्रावणक्वीन- २०१७’ या स्पर्धेची उपविजेती बनण्याचा मान मिळवला. त्यानंतर अनेक ठिकाणी ऑडिशन्स देण्याचे माझे प्रयत्न सुरु होते. पण विविध अडचणी येतं होत्या. अखेर समीर आठल्ये दिग्दर्शित ‘बकाल’ या पहिल्यावहिल्या ऍक्शनपटात प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.


 
 
पाठींबा महत्त्वाचा….
माझ्या लहानपणापासूनचं, मला अभिनय क्षेत्रातच काम करायचं हे मी मनाशी पक्क केलं होत आणि त्या दृष्टीने वाटचालही तेव्हापासूनच सुरु झाली होती. मराठी कुटुंबातील अनेक मुलींना मॉडेलिंग, अभिनय यांसारख्या क्षेत्रात काम करायचं झाल्यास कुटुंबाकडून फारसा पाठींबा मिळत नाही. माझ्या बाबतीत मात्र हे चित्र अगदी उलट होत. माझ्या पालकांबरोबर, आमच्या कुटुंबातील प्रत्येकाने मला माझ्या प्रत्येक निर्णयासाठी खूप मोठा पाठींबा दिला.
शिक्षणालाही प्राधान्य…
लहानपणापासून अभिनेत्री बनण्याचं माझं स्वप्न असलं तरी, माझ्या अभ्यासाकडे मी कधीही दुर्लक्ष होऊ दिलं नाही. ‘खूप अभ्यास केला तरचं आपण यशस्वी होऊ शकतो.’ हा विचार मुळात माझ्या बाबांना न पटणारा होता आणि त्यामुळेच त्यांनी वेळोवेळी माझी आवडं ओळखून मला पाठींबा दिला. पण निदान पदवी पर्यंतच शिक्षण पूर्ण कर असं ते नेहमी सांगायचे. दहावीनंतर आपणं ‘लॉ’ करावं आणि सोबतचं सीएस (कंपनी सेक्रेटरी) करण्याचा माझा विचार होता. पण नंतर मी मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये ‘मास-मिडिया’ करता प्रवेश घेतला. पहिल्या वर्षी ‘मिस नवी मुंबई’मध्ये भाग घेतला होता. मग सुरुवातीचे अनेक महिने कॉलेजला जाता आलं नाही. त्यामुळे मला परीक्षेला न बसता सहा विषयांमध्ये केटी लागली. त्याचं वर्षीच्या अंतिम परीक्षेत मी तब्बल बारा विषयांचा अभ्यास करून पास झाले. हा प्रकार सातत्त्याने तीनही वर्षी घडला. त्यातही मास-मिडियाची विद्यार्थिनी असल्यामुळे भरमसाठ असाईनमेंट असायच्या. माझ्या सततच्या गैरहजेरीमुळे मला कोणीही त्यांच्या ग्रुप असाईनमेंटमध्ये सहभागी करून घेत नसल्याने मला त्या गोष्टीही एकटीने पूर्ण कराव्या लागतं होत्या. आपण स्वतः हा निर्णय घेतल्यामुळे माझी आवड आणि अभ्यास या दोघांनाही अंतर पडू न देता. दोन्हीकडे मन लाऊन मेहनत करत राहिले. आता पुढील शिक्षणाचा विचार सुरु आहे.


 
 
पहिला चित्रपट मिळाला…
श्रावणक्वीन नंतर बकालच्या ऑडिशनसाठी फोन आला होता. तब्बल दोनशे मुलींमधून माझी प्रमुख अभिनेत्री म्हणून निवड करण्यात आली याचा आनंद आहे. सुरुवातीला दोन वेगवेगळ्या पध्दतीचे डायलॉग झाल्यानंतर मला दिग्दर्शकांनी परत वेगळे डायलॉग्ज दिले. त्यानंतर, ‘मी डान्सर आहे. मला तुम्हाला डान्स करून दाखवायचाय.’हे सांगितलं. माझा हा आत्मविश्वास त्यांना खूप आवडल्याचं त्यांनी सांगितलं. ऑडिशन झालं आणि एक महिन्याने मला फोन आला. ‘तुला ड्रायव्हिंग येतं का?’ हे विचारण्यासाठी आलेल्या या फोनवर खरंतर मी मोठ्या आत्मविश्वासाने पण ‘हो, येते’ (ड्रायविंग नीटस जमत नसल्यामुळे) असं खोटं सांगितलं होत. मग मला फिल्म साइन करण्यासाठी बोलावण्यात आलं.
निरीक्षण आलं कामी…
मराठी चित्रपट म्हटलं की, मराठी चोखं येणं अत्यंत गरजेचं असतं. पण लहानपणापासून सतत इंग्रजी भाषेशी सबंध येत असल्यामुळे, माझं मराठी फारस चांगलं नव्हतं. त्यामुळे चित्रपट मिळाल्यानंतर मी मराठीवर काम केलं. माझ्या भूमिकेसाठी आवश्यक अनेक गोष्टी मी ट्रेनमधून प्रवास करताना, कॉलेजमध्ये असताना माझ्या निरीक्षणातून शिकले होते. दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून नवीन शिकत आणि त्यांचे स्वभाव, वागणूक मी आधीपासून टिपत होते. त्याचा उपयोग मला ‘बकाल’मधील भूमिकेसाठी झाला.  

मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)

अभिनेता व्हायचं असं ठरवलं नसतानाही तो योगायोगाने या क्षेत्रात आला आणि ‘दुर्वा’ मालिकेतून पदार्पण करत तो प्रेक्षकांचा लाडका ‘केशव’ बनला.


 ‘अंजली’ आणि ‘सारे तुझ्याचसाठी’ यांसारख्या मालिकांमध्येही त्याने उत्तम काम केलं. लवकरच वेबच्या माध्यमातून एका नव्या रुपात तो प्रेक्षकांच्या भेटीला येणारं आहे. ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘प्लॅनेट मराठी मॅगझीन’मधील ‘स्टार ऑफ द विक’च्या माध्यमातून जाणून घेऊयात अभिनेता “हर्षद अतकरी“ बद्दल…. 

संपूर्ण नाव : हर्षद वसंत अतकरी  

जन्म तारीख आणि ठिकाण : १७ ऑक्टोबर, मुंबई   

शिक्षण : बीएमएस, 

एमबीए (पोस्ट ग्रॅज्युएट इन बिझनेस मॅनेजमेंट)

हा तर केवळ योगायोग…

प्रभादेवी, परळ यांसारख्या भागात माझं बालपणं अगदी आनंदात गेलं. अभिनयची आवडं मला लहानपणी नव्हतीचं. अपघाताने किंवा अगदी योगायोगाने मी अभिनय क्षेत्रात आलो असं म्हणणं चुकीचं ठरणारं नाही. शाळा-कॉलेजमध्ये असताना नाटकं करणं, डान्स करणं अश्या उपक्रमात मी आवर्जून सहभागी होत असे. पण भविष्यात या क्षेत्राची करिअर म्हणून निवड करेन असा विचार त्यावेळी केलाही नव्हता. त्यामुळे मी खूप उशिरा, म्हणजेच माझं पदवीपर्यंतच शिक्षण (वय वर्ष एकवीस-बावीस) झाल्यानंतर अभिनयाकडे वळण्याचा विचार केला. मग त्यानंतर एकांकिका करण्यासाठी ग्रुप शोधणं, त्यांच्या सोबत काम करणं, पथनाट्यात करणं असं करत मी अभिनयाला सुरुवात केली. पण साधारणपणे, मी पाच वर्षांचा असताना त्यानंतर दोन-तीन वेळा मला बालकलाकार म्हणून काम करण्याच्या संधी आल्या होत्या. पण अभ्यास-शाळा आणि इतर अनेक अडचणींमुळे त्यावेळी शक्य झालं नाही. शिवाय, लहान असल्यामुळे त्यावेळी, ‘तुला शुटींगसाठी कोण घेऊन जाणारं?’ हा मोठ्ठा प्रश्न घरच्यांना असायचा. त्यामुळे लहानपणी ती संधी हुकली होती. पण पुढे जाऊन ते स्वप्न सत्यात उतरलं, याचा आनंद आहे.

आवड जपणं महत्त्वाचं…

अभिनय क्षेत्र हे कामाच्या बाबतीत शाश्वत नसतं हे जरी खरं असलं तरी, काम मिळेल अथवा न मिळेल यापेक्षा मी करतं असलेल्या कामातून मला आनंद मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. एकांकिका आणि पथनाट्यापासून या प्रवासाला सुरुवात झाली. विविध स्पर्धांमध्ये अभिनयासाठी बक्षीस मिळू लागली आणि यातून प्रोत्साहित होत संपूर्ण वेळ या क्षेत्राकडे वळण्याचा निर्धार पक्का केला. पदवीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर एमबीए करायचं हे माझं ठरलं होतं. सुरुवातीला अनेकांनी मला मॉडलिंग करण्याबाबत सुचवलं होतं. पण नाटकाची आवडं आणि त्यापोटी जड झालेल्या नाटकं आणि अभिनयाकडे झुकतं माप पाहता मी अभिनेता बनलो. 

नकारांशिवाय पर्याय नाही…

अभिनय क्षेत्रात यायचं तर नकार पचवण्याची क्षमता असणं अत्यंत आवश्यक आहे आणि यातून काम करण्याची नवी ऊर्जाही मिळते या मताचा मी आहे. माझ्या स्ट्रगलच्या काळात मी अनेक नकार पचवले. सुरुवातीला एकांकिका, शॉर्टफिल्म्समध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि जवळपास चार वर्ष जणू नकारघंटा सोबत होती. त्यानंतर ‘दुर्वा’ मालिकेसाठी ऑडिशन दिलं. सुरुवातीला तेही काम मिळेल की नाही याबद्दल शंका होती. पण अखेर अनेक ऑडिशन आणि लुक टेस्ट नंतर यामालिकेतील ‘केशव’ हि व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे ‘नकार नसते, तर माझ्यातल्या जिद्दीला पाठींबा मिळाला नसता’. इंडस्ट्रीत येण्याआधी माझ्यासाठी काम मिळवणं खूप कठीण होतं. काम मिळतं ते नशिबाने आपल्या मेहनतीने या विचारांचा मी आहे. त्यामुळे मिळालेल्या कामाला मेहनतीची जोडं देतं कामातील सातत्य जपता येणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सुदैवाने मी ‘दुर्वा’, ‘अंजली’ आणि त्यानंतर ‘सारे तुझ्याचसाठी’ या तिन्ही मालिका लागोपाठ मिळाल्या आणि मी काम केलं. 

नवीन शिकण्याची वेळ…

गेली सात वर्ष सलग मी मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यानंतरचे काही महिने मी स्वतःला वेळ द्यायचं ठरवलं आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. कामाच्या गडबडीत अनेक गोष्टी राहून जातात अनेक नव्या गोष्टी शिकायच्या असतात. अशा विविध कारणांमुळे मी हा छोटा ब्रेक घेतला आहे. या ब्रेकमध्ये मी उर्दू भाषा शिकण्यावर अधिक भर दिला आहे. शिवाय, विविध सिनेमे, सिरीज पाहतोय. नवनवीन गोष्टी वाचतोय. यातून अनेक गोष्टी शिकतोय. लवकरच मी डिजिटलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारं आहे. मालिका करताना नाटक कुठेतरी बाजूला राहिलंय आणि आता मला नाटक करायचंय. शिवाय, नुकताच ‘जोकर’ सिनेमा पाहिलाय, तर त्या पद्धतीचं काही वेगळं काम करण्याची संधी मिळाली तर नक्की करेन. 

मालिकेमुळे नाटकं हुकलं…

मालिका सुरु असेल तर तारखांमुळे कलाकाराला दुसरं काम करणं जवळजवळ कठीण होतं. माझ्या बाबतीतही हे घडलं आहे. शिवाय, मालिका करत असाल तर, ‘अरे, याला चित्रपट किंवा नाटकं करायला वेळचं नसेल’ असं गृहीत धरलं जात. त्यामुळे कुठेतरी कलाकारांचं नुकसान होतं. तारखा आणि इतर काम यांचा मेळ साधला जाऊ शकतो. इच्छा असेल तर सगळं सुरळीत मार्गीही लागू शकतं. पण ती संधी मिळणं गरजेचं असतं. मी तीन मालिका केल्या पण दरम्यानच्या काळात अनेक ऑफर्स मला नाकाराव्या लागल्या. ‘सारे तुझ्याचसाठी’च्या शुटींग वेळी एक चांगलं नाटकं माझ्या हातून गेलं. ‘अंजली’च्या वेळी तर ‘हॅम्लेट’मधील एका भूमिकेसाठी मला विचारण्यात आलं होत. पण ती मालिकेची सुरुवात असल्यामुळे नाटकाला पुरेसा वेळ देता येणारं नव्हता. त्यामुळे किती ठरवलं तरी मालिकेमुळे कलाकाराचं नुकसान होतचं. 

वायफळ चर्चा नकोच…

अर्ध्याहून अधिक गोष्टी आपल्याला माहित नसतात, पण त्यावर अधिकाधिक आपण बोलतो. त्या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि मग सातत्याने त्या गोष्टी अधिक वाढवून त्याबद्दल चर्चा केली जाते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीमागील सातत्य पडताळल्या शिवाय त्याबद्दल बोलणं चुकीचं आहे असं मला वाटतं. परंतु असे प्रकार इंडस्ट्रीत खूप प्रमाणात घडतात आणि ते मला खटकतात. त्यामुळे अशा गोष्टींमध्ये अडकून राहण्यापेक्षा कामावर जास्तीत-जास्त लक्ष केंद्रींत व्हावं असं मला वाटतं. त्यातून अधिकाधिक उत्तम काम आपण सादर करू शकतो.

लहानपणापासून ‘सिक्रेट क्रश’…

पहिल्या पासूनच अभिनेत्री माधुरी दीक्षित माझं सिक्रेट क्रश आहे. मला ती प्रचंड आवडते आणि म्हणूनच माझ्या लहान बहिणीचं नावही मी माधुरी हे ठेवलं आहे. लहानपणी मला तिचं नावं काय ठेवावं हे विचारलं होत आणि अर्थात मी ‘माधुरी’ असंचं नावं सुचवलं. त्यावेळी मी पाच वर्षांचा होतो. आता अनेकदा मला ती यावरून ओरडते. पण माधुरीवरचं माझं प्रेम निस्सीम आहे.   

सोपा फिटनेस मंत्र

जास्तीत जास्त घरचं अन्न खाण्याकडे माझा अधिक भर असतो. कामच्या व्यापामुळे जिमिंग जमतंच असं नाही. त्यामुळे योग्य डाएटकडे माझं अधिक लक्ष असतं. त्यामुळे, ‘घरचं जेवढं अधिक खाऊ, तेवढे आपण अधिक फिट राहू.’ असा माझा सोपा फिटनेस मंत्र आहे. 

० हर्षदचं टोपणनाव 

-हर्षद (वेगळ टोपणनाव नाही)

० सिक्रेट आणि फर्स्ट क्रश 

-माधुरी दीक्षित 

० स्वतःमधील न आवडणारी एक गोष्ट 

-रागावरील नियंत्रण (चुकीचं होत असेल तरचं)

० स्वतःमधील आवडणारी एक गोष्ट

-शिस्त 

० हर्षदचा विक पॉइंट 

-गोड पदार्थ 

० हर्षद ची स्ट्रेन्थ

-जिद्द 

० हर्षदचा ‘लाइफचा फंडा’

-जे मिळतंय त्यावर मनोमन प्रेम करत कामात १०० टक्के देणं.

० आवडता मित्र

-माझे अनेक मित्र आहेत (शाळेपासून आमचा एक ग्रुप आहे) 

० हर्षदने साकारलेली आवडती भूमिका

-केशव (मालिका ‘दुर्वा’)

० हर्षदचं आवडतं पुस्तक

-डॉ. नेमाडेचं ‘कोसला’ 

० आयुष्यातला अविस्मरणीय क्षण 

-जेव्हा माझं दुर्वा साठी सिलेक्शन झालं. कारणं खूप वर्षांच्या नाकारांती मला माझी पहिली मालिका मिळाली होती.       

मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)

www.planetmarathi.org

www.planetmarathimagazine.com

आता अभिनेत्री म्हणून आपणं तिला ओळखत असलो तरी तिचा प्रवास गायिका म्हणून सुरु झाला होता. आजी प्रसिद्ध गायिका, संगीतमय वातावण त्यामुळे हिने शास्त्रीय संगीताचं रीतसर प्रशिक्षण घेतलं.

नाट्य संगीताचा डिप्लोमा आणि मग स्वतःचा गायन क्लास तिने सुरु केला. त्यानंतरच्या काळात तिने एका शाळेत संगीत शिक्षिका म्हणून नोकरी केली.

‘का रे दुरावा’ या मालिकेच्या माध्यमातून ‘जुई’ म्हणून तिने या क्षेत्रात पदार्पण केलं. पुढे अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम करून. आता ‘पानिपत’ या हिंदी चित्रपटामध्ये तिने काम केलं आहे. ‘प्लॅनेट मराठी मॅगझीन’च्या ‘स्टार ऑफ द विक’च्या माध्यमातून जाणून घेऊया अभिनेत्री अर्चना निपाणकर बद्दल…

संपूर्ण नाव : अर्चना श्रीकांत निपाणकर
जन्म तारीख आणि ठिकाण : २६ एप्रिल १९९३, नाशिक
शिक्षण : कॉमर्स पदवीधर,
शास्त्रीय संगीत विशारद
मराठी नाट्यसंगीत (डिप्लोमा)

लहानपणापासून कलेकडे कल…
माझी आजी मालती निपाणकर शास्त्रीय गायिका होती. त्यामुळे घरात कायम संगीतमय वातवरण होतं. तिचे क्लासेस, विविध मैफिली, रियाज या सगळ्या गोष्टी मी माझ्या लहानपणापासून पाहत होते. सतत कानावर गाणं, तबला, ताल, ठेका या गोष्टी पडत होत्या. त्यामुळे कलाक्षेत्राची गोडी अगदी तेव्हापासूनच लागली होती. पण सोबतीने शिक्षणालाही तेवढंच महत्त्व देतं कॉमर्समधील शिक्षण पूर्ण करून सीए किंवा सीएस करण्याचं ठरवलं होतं. गाण्याचं प्रशिक्षण सुरु होतचं. पण अभिनयाच्या बाबतीत फारसा विचार त्यावेळी नक्कीच केला नव्हता. शाळेत आणि कॉलनीत नाटकात काम करायचं, एवढाचं माझा अभिनय क्षेत्राशी संबंध असायचा. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर मात्र ‘नाटकं’ सिरिअसली घ्यायचं ठरवलं आणि त्या दृष्टीने पावलं उचलली. त्याआधी सुगमसंगीत, नाट्यसंगीत असे नानाविविध प्रकारचे कार्यक्रम करणं माझं सुरु असायचं. शिवाय, सुरुवातीचे काही दिवस गाण्याचे क्लासेसही मी घेतले. त्यामुळे गाण्याचे क्लासेस, माझा रीआज, अभ्यास हा सगळा डोलारा सांभाळत मी एकांकिका स्पर्धा आणि राज्यनाट्य स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागले. अखेर अभ्यासाव्यतिरिक मी अभिनयामध्ये छान रमते हे लक्षात आल्यावर पूर्णवेळ या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला.

मिळाली पहिली संधी….
बीकॉम झाल्यानंतर मी एमए (संगीत) साठी प्रवेश मिळवला. यावेळी माझे गायनाचे क्लासेस सुरु होतेच, त्याच्या सोबतीने मी एका शाळेमध्ये संगीत शिक्षिका म्हणून नोकरी करायला सुरुवात केली. घरच्यांसोबत बोलून, ‘शनिवार-रविवार मी ऑडिशन्स करताना मुंबईला जाईन’, या एका अटीवर मी ही नोकरी स्वीकारली होती. त्यानंतर माझ्या ‘कारे दुरावा…’ या मालिकेसाठी अंगद म्हसकर यांनी ऑडिशन सुरु असल्याचं सांगितलं. मी ऑडिशन दिली आणि काही दिवसांतचं माझं सिलेक्शन झाल्याचं कळलं. त्यामुळे मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. मी काम करतं असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकांनी मला पाठींबा दर्शवत नोकरी सोडण्याची परवानगी दिली आणि मी मुंबईला आले.

‘मुंबई’ने शिकवलं…
आधीपासून अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. कालांतराने माझी ती इच्छा पूर्ण झाली. पण काम मिळवण्यासाठीच्या धडपडीपेक्षा मुंबईत स्वतःला ॲडजस्ट (सामाऊन घेण्यात) करण्यात खरा स्ट्रगल करावा लागला. लहानपणापासून नाशिकमध्ये वाढलेल्या मला अशा गर्दीची आणि धावपळीची अजिबात सवय नव्हती. त्यामुळे धावत्या मुंबईबरोबर स्वतःचा वेग सावरायला थोडा वेळ लागला. मुंबईत माझ्या ओळखीचं कोणी नसल्यामुळे जागा शोधण्यासाठीही एक वेगळी कसरत जाणवत होती. त्यात सुरुवातीला जेमतेम चार दिवसांचं शुटींग असायचं, शिवाय मला मिळणाऱ्या पैशांवर स्वतः घर घेऊन राहणं माझ्या खिशाला न परवडणारही होत. सुदैवानं, अंगद म्हसकर आणि त्याच्या बायकोने शुटींगच्या वेळी मुंबईत आल्यावर त्यांच्याकडेच राहण्याचं सांगितलं. मग मी ठाण्यात अंगदकडे राहायला लागले. शुटींग आरे कॉलनीजवळ असायचं. पहिल्या दिवशी ठाणे ते आरे रिक्षाने आले. पण रिक्षाचे दररोजचे पैसे अवाढव्य होते. त्यामुळे ठाण्याहून घाटकोपर मग तिकडून मेट्रो आणि पुढे रिक्षा अशी तारेवरची कसरत करायचा निर्णय घेतला. त्यात कधी मुंबईच्या लोकलमधील गर्दी पाहून दोन-तीन लोकल सोडाव्या लागायच्या. त्यामुळे कॉलटाईमच्या दोन-अडीच तास अगोदर घर सोडावं लागयचं. अखेर हळूहळू या सगळ्याची सवय झाली. अनेकदा शुटींग लांबलं आणि घरी येणं शक्य झालं नाही तर… या प्रश्नापोटी आवश्यक ते टॉवेल, ब्रश, अधिकचे कपडे अशी एक वेगळी मोठी बॅग कायम सोबत ठेवायचे. त्यामुळे मुंबई शहरात स्वतःला ॲडजस्ट करायाल खरा स्ट्रगल जाणवला.

आनंदी आनंद…
प्रवासा दरम्यान बसवर वैगरे आमच्या ‘का रे दुरावा…’मालिकेचं पोस्टर पाहून खूप भारी वाटायचं. आपणही याचा एक भाग आहोत याचा आनंद असायचा. मालिकेत माझा अगदी साधा लुक असल्यामुळे मला लोकं फारसे ओळखतं नव्हते. त्यानंतर हळूहळू माझी भूमिका लोकांना आवडू लागली. एके दिवशी मी बसने प्रवास करतं होते. माझ्या बाजूच्या सीटवरील एक काकू आणि त्यांची एक मैत्रीण आमच्या मालिकेबद्दल बोलतं होत्या. मग माझं पात्र असलेल्या ‘जुई’बद्दल बोलू लागल्या. नंतर त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला ओळखलं. मग त्यांनी माझ्यासोबत फोटो काढले आणि त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठीही हा खुपचं वेगळा आणि स्पेशल क्षण ठरला.

सकारात्मकता जपते…
‘का रे…’, ‘१०० डेज्’, ‘राधा प्रेम रंगी…’ ही मालिका संपल्यानंतर माझी नाटक करण्याची खूप इच्छा होती. त्यात सुरुवातीपासूनचं विजय केंकरे सरांसोबत काम करावं असं मनोमन वाटतं होतं. अखेर ‘महारथी’च्या निमित्तानं माझी ही दोन्ही स्वप्नं पूर्ण झाली. त्या आधी मी ‘गेला उडतं…’या नाटकात काम केलं होतं. पण नेहमी वेगळी भूमिका मला करता यावी म्हणून मी सतत प्रयंत्न करत असते. महारथीमध्ये मी साकारत असलेली भूमिका एका साध्या मुलीची आहे. ती निरागस आणि चतुर आहे. त्यामुळे हि वेगळी भूमिका मला साकारायला मिळाली. ‘राधा….’मध्ये मी खलनायिका साकारली होती. त्यानंतर हि वेगळी भूमिका मला करायला मिळणं ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, चित्रपटात काम करण्याची माझी प्रचंड इच्छा होती. अखेर आशुतोष गोवारीकरांच्या ‘पानिपत’मध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. माझी भूमिका अगदी लहान असली तरी, दिग्गजांसोबत काम करण्याचं सुख मला मिळालं. शिवाय, यानिमित्तानं अनेक गोष्टी शिकता आल्या. त्यामुळे यापुढेही वेगळ्या माध्यमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारायला नक्की आवडेल. शिवाय, येत्या काळात गायन आणि अभिनय अशी सांगड असणारी भूमिका साकारायची आहे.

भूमिका महत्त्वाची…
प्रत्येक कथेची आणि त्यातील पात्रांची वेगळी गरज असते. मी आतापर्यंत साकारलेल्या सगळ्याचं भूमिका फार वेगळ्या होत्या. प्रत्येक भूमिकेमध्ये मला वेगवेगळे प्रयोग करायला मिळाले. त्यामुळे पुढे जाऊन मला वेगळी किंवा बोल्ड शेड असणारं पात्र साकारायची संधी मिळाली. तर त्या भूमिकेची गरज म्हणून आणि मला वेगळं काम करायला मिळेल म्हणून बोल्ड भूमिका नक्की साकारेन. सध्या मला चांगली भूमिका मिळवण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरु आहेत. त्यात मी माध्यमापेक्षा भूमिकेला आणि त्यातून मला मिळणाऱ्या आव्हानांना अधिकाधिक महत्त्व देईन.

डान्स ही माझी विशेष आवडं..
गायन आणि अभिनयाची आवड यांविषयी सगळ्यांना माहित आहेच. पण मला डान्स करायलाही खूप आवडतं. नृत्याचं मी प्रशिक्षण घेतलं नसलं तरी मला त्याची आवडं आहे. माझा एक स्पीकर नेहमी माझ्या बरोबर असतो. अगदी सेटवर सुद्धा… त्यामुळे तो स्पीकर आणि डान्स असं माझं ठरेलल समीकरण. आता तशी संधी मिळाली आणि वेळ जुळून आली तर मी नृत्याचं प्रशिक्षण घेईन. शिवाय, वेगळ्या ठिकाणी फिरायला मला प्रचंड आवडतं.

खोटं वागणं जमतं नाही…
अनेकदा लोकांविषयी खूप पटकन मतं बनवलं जात. एखादा मुलगा-मुलगी एकत्र असतील तर मग त्यांचं असेलंच…. किंवा असेल तरी त्यात गैर काय या मताची मी आहे. त्यामुळे मला एकूणच नकारात्मकता आवडतं नाही. म्हणून सेटवरही मी गाणी ऐकून सगळ्यांना गाणी ऐकवते आणि प्रसन्न राहते. शिवाय, मला कोणाच्या पुढेमागे करत खोटं वागणं जमतं नाही. आहे हा माझा स्वभाव आहे. त्याला मी ही काही करू शकत नाही.

रॅपिड फायर

० अर्चना अभिनेत्री किंवा गायिका नसती तर?
-कलेशिवाय माझ्या जीवनाची मी कल्पनाही करू शकतं नाही. मग मी कदाचित डान्सर झाली असते.

० गायन की अभिनय?
-दोन्ही

० अर्चनाचं आवडतं शहर नाशिक की मुंबई
-एक जन्मभूमी आणि एक कर्मभूमी

० अर्चनाचा विकपॉइंट
-खाणं (कोणताही पदार्थ, त्यात गोडं दुधाचे पदार्थ सर्वाधिक)

० शर्मिला अधिक वापरत असणार सोशल मिडिया ॲप?
-इंस्टाग्राम

मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)
www.planetmarathi.org
www.planetmarathimagazine.com

कॅफे कल्चर च्या जमान्यात असे काही फूड जॉईन्ट आहेत जे तरुणांना आवडतात. आपल्याकडे पॉकेट फ्रेंडली फूड जॉईन्ट फार कमी आहेत. आज अश्याच एका पॉकेट फ्रेंडली फूड जॉईन्ट बद्दल जाणून घेऊ या! 
काय आहे या फूड जॉईन्ट ची खासियत आणि का तरुणाईला हा फूड जॉईन्ट का आवडतो हे जाणून घेऊ.       

पॉकेट  फ्रेंडली “Yummito’s”


 
  दादरच्या शिवाजी पार्क इथे असलेला हा स्वस्तात मस्त असा फूड जॉईंट आहे. सगळ्यांना मस्त असं काही तरी उपलब्ध व्हावं यासाठी “यश परब” या तरुणाने या पॉकेट  फ्रेंडली असा yummito’s  हा फूड जॉईन्ट सुरू केला आहे. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी याचं नाव काहीतरी अनोखं आणि वेगळं असावं म्हणून yummitos हे नावं या फूड जॉईन्ट ला दिलं गेलंय. नो वेट फॉर हंगर अशी कमालीची टॅगलाईन असलेल्या yummito’s ची चर्चा संपूर्ण दादर शिवाजी पार्क मध्ये आहे. शिवाजी पार्कात Yummito’s च्या मॅगी ची  वेगळीच चर्चा आहे. हा फूड जॉईन्ट या भागात फार खास आणि सगळ्या खवय्यांसाठी स्पेशल आह.  आपल्या रोजच्या घाई गडबडीत काहीतरी खाऊन जायचं राहतं पण अश्या प्रकारचे लिटिल बाईट पदार्थ इथे सहज रित्या उपलब्ध आहेत. 


मॅगी प्रेमी साठी पर्वणी….
     पेरीपेरी मॅगी ही yummito’s ची खासियत असून इथे चक्क ४० प्रकारच्या मॅगी मिळतात. मग यात सगळ्यात खास अशी हॉट अँड स्पायसी मॅगी पासून एक्झॉटिक बटर मॅगी अश्या विविध तऱ्हेच्या चवदार आणि चमचमीत मॅगी चाखायला मिळतात. मॅगी हा अनेकांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. जर तुम्ही मॅगी प्रेमी असाल तर yummito’s तुमच्यासाठी ” मॅगी पर्वणी ” आहे. व्हेज आणि नॉनव्हेज अश्या दोन्ही प्रकारातील मॅगी इथे चाखायला मिळतात. चिकन मॅगी, एग मॅगी, सूपी मॅगी अश्या अनेक प्रकारच्या मॅगी स्वस्तात मस्त तुम्हाला इथे मिळतील. आपल्या मुंबईत पॉकेट फ्रेंडली आणि उत्तम प्रकारची मॅगी फार कमी ठिकाणी मिळते यांचा विचार करून yummito’s मध्ये तुम्हाला विविधता असलेल्या बेस्ट मॅगी इथे खायला मिळतील. 


  “ये चीज बडी है मस्त”  
       व्हेज आणि नॉनव्हेज रोल्स हे अनेकांना आवडतात पण इथे तुम्हाला चीज ने फुलफिल्ल करणारे अनेक रोल्स खायला मिळतील. चीज, मेयोनीज, शेजवान, चिकन, नूडल्स असे अनेक रोल्स इथे तुम्हाला मिळतील.
    “नो वेट फॉर हंगर” ही कमालीची टॅगलाईन घेऊन yummito’s तुमच्या भेटीला आलं आहे. टॅगलाईन प्रमाणेच तुम्हाला इथे खाण्यासाठी कधीच वाट बघावी लागत नाही.  मनसोक्त गप्पा आणि हॉट स्पायसी मॅगी हे बेस्ट कॉम्बिनेशन अनुभवायला तुम्ही yummito’s  ला नक्की भेट द्या. 

नेहा कदम (प्लॅनेट मराठी)

www.planetmarathi.org

www.planetmarathimagazine.com

सुरुवातीला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम आणि मग ‘मायलेक’ या मालिकेपासून त्याने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं.

विविध मालिकांमधून आपल्या अभिनयातील वेगळेपण सिद्ध करत तो प्रेक्षकांचा लाडका ‘मनिष’ बनला. लवकरच तो, साकार राऊत निर्मित ‘आयपीसी ३०७ अ (IPC 307A)’ या नव्या कोऱ्या चित्रपटामधील वेगळ्या आणि हटके भूमिकेसहप्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. तर वाचूया प्लॅनेट मराठी मॅगझीनच्या ‘स्टार ऑफ द वीक’ मधील या आठवड्यातील स्टार ‘सचिन देशपांडे’ बद्दल…

संपूर्ण नाव : सचिन शशांक देशपांडे
जन्म तारीख आणि ठिकाण : ५ जुलै १९८४ , मुंबई
लग्नाचा वाढदिवस : ४ मे
शिक्षण : बीकॉम, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट

अभिनेता व्हायच ठरवलं…

खरं सांगायचं…. तर आमच्या घरचं वातवरण अभिनय क्षेत्राला अजिबातच साजेसं नव्हतं. देशपांडे घराण्यातील अनेकजणआजही इंजिनिअर किंवा तस्यम क्षेत्रांशी निगडीत काम करून परदेशात राहत आहेत. पण, लहानपणापासूनच मीअभ्यासात अजिबातच हुशार नव्हतो. अभ्यासाव्यतिरिक्त गोष्टींमध्ये अधिक रस असल्यामुळे एक औपचारिकता म्हणून मीअभ्यास करायचो असं म्हणणं वावग ठरणारं नाही. क्रिकेट, नृत्य, अभिनय अशा आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या क्षेत्रातकाहीतरी करावं असं डोक्यात होतं. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’, अशी म्हण आहे. माझ्या बाबतीतही अगदी तसचंकाहीसं घडलं. मी साधारणपणे चौथी-पाचवीत असेन. सुट्टीत माझ्या आईच्या काकांकडे (त्यांना मीही काका म्हणतो) गेलो होतो. पूर्वी भाड्याने व्हीसीआर मिळत असतं. त्यांनी त्यांच्या घरी ‘राम-लखन’ आणि अशा अनेक सिनेमाच्या कॅसेट्सआणल्या होत्या. रात्री जेवणावळ झाल्यानंतर सगळे सिनेमा बघण्यासाठी बसलो. हळूहळू सोबतची सगळी मंडळीझोपली. साधारणतः पहाटे चारच्या सुमारास एक ‘टपली’ डोक्यात पडल्याचं अजूनही चांगलचं लक्षात आहे. कारण मीएकटा टिव्ही समोर बसून रात्रभर एका मागे एक असे सिनेमे पाहत बसलो होतो. त्यानंतर खूप ओरडा बसला होता.

एकूणच काय…. तर अभिनय क्षेत्रात करिअर करण्याला माझ्या कुटुंबाचा पाठींबा नव्हता. माझ्या घरातील कोणी या क्षेत्रातनसल्यामुळे आणि या क्षेत्राविषयी फारशी माहिती नसल्यामुळे त्यांचा विरोध असणं साहजिक होतं. त्यामुळे माझंपदवीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली (नोकरी सोबत डिप्लोमाचंशिक्षण सुरु होतं). एक दिवशी अचानकपणे ती नोकरी सोडून मी घरच्यांना मला अभिनय करायचा असल्याचं सांगितलंय. मग अभिनय करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? यात करिअर असू शकता का? या सगळ्या गोष्टी घरच्यांनासमजवण्यापासून माझी कसरत सुरु झाली. कॉलेजमध्ये असताना एकांकिका करायचो. त्यावेळी आमच्या एकांकिकाबसवणारे दिग्दर्शक सचिन गोखले यांनी मला, ‘तू नोकरी वैगरेच्या भानगडीत न पडता अभिनय कर…’ असं सांगितलं होतं. अखेर माझी आवड मला जोपासता यावी यासाठी त्याचा करिअर म्हणून विचार करण्याचा निर्णय घेतला. मग सचिनगोखलेंच्या ओळखीने प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित ‘हाय काय, नाय काय…’ या चित्रपटासाठी सहाय्यकदिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. माझ्या या पहिल्या कामापासून मी अनेक तांत्रिक आणि क्षेत्राशी समंधितअनेक गोष्टी शिकण्यास सुरुवात केली. काम संपल्यानंतर प्रसाद सरांनी मला पाच हजार रुपये दिले. खरतरं मी नवखाअसल्यामुळे मला पैसे नाहीचं मिळणार हे डोक्यात ठेऊनच काम करायला सुरुवात केली होती. पैशापेक्षा मला काममिळालं आणि नवं शिकता येणारं असल्याचं सुख त्यावेळी डोक्यात पक्क बसलं होतं. त्यामुळे सचिन गोखले, प्रसाद ओकआणि पुष्कर श्रोत्री ही माणसं माझ्या करिअरची सुरुवात होण्यासाठी महत्त्वाची ठरली. त्यानंतर याचं शुटींग दरम्यान मंदारदेवस्थळी यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्या एका चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मी काम केलं. त्यानंतर आमचं नातं अधिक घट्ट झालं. मग त्यांच्याच ‘मायलेक’ या मालिकेसाठी शेड्युलर, सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनकाम करतं असताना मला त्यांनी त्याचं मालिकेत अभिनय करण्याचीही संधी दिली. त्यातून माझं टीव्हीवर पदार्पण झालंअसं म्हणता येईल. त्यानंतर हळूहळू काम मिळत गेली. ‘तुम्ही चांगले असला आणि तुमच्या कामाशी प्रामाणिक असाल, तर काम मिळतात. मग तुम्ही कोणत्याही गोष्टीने सुरुवात केलेली असेना.’ या मताचा मी आहे. माझ्या बाबतीतही तसचंघडलं. मग ‘राजा शिव छत्रपती’ मालिकेत ‘बाळाजी पंत’ साकारण्याची संधी मला मिळाली. त्यानंतर आजवर विविधकाम करण्याचा प्रयत्न करतोय.

‘मनिष’ माझी ओळख बनली…

नाटकांमध्ये मी फार कमी काम केलं असलं, मला चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करायला आवडतं. परंतु मीनाटकांमध्ये काम करण्यात अधिक रमतो असं मला वाटतं. नाटकाची प्रोसेस आणि त्याचा भाग व्हायला मला फारआवडतं. ‘मांडला दोन घडींचा डाव’ या मालिकेत मी साकारलेली वकिलाची भूमिका मला खूप आवडली होती. अभिनयाला सुरुवात केल्यानंतर दहा-बारा मालिकांमध्ये काम केलं होतं. परंतु ‘होणारं सून…’हीच माझी पहिली मालिकाआहे, असं अनेकांना वाटतं. पण ‘होणारं सून…’मधील माझ्या मनिष या पात्राने मला खरी ओळख दिली. मला मनिषच्याभूमिकेसाठी विचारण्यात आलं यावेळी या भूमिकेबद्दल मला फारशी शाश्वती नव्हती. हिरोईनच्या मित्राचा रोल म्हणजेथोड्या दिवसात संपणार असं मला वाटलं होतं. पण, सुदैवाने असं झालं नाही. ती मालिका संपे पर्यंत ती भूमिका जिवंतराहिली आणि मी मनिष म्हणून नावारूपास आलो आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलो. त्यानंतर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतही मी काम करतोय. मग मालिका आणि चित्रपटांतून काम करायला सुरुवात झाली. अनेक सहाय्यकव्यक्तिरेखा केल्या पण मनिषच्या रूपातील माझं काम अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ‘तानी’ चित्रपटात महत्त्वपूर्णभूमिका साकारली असली तरी चित्रपटामधून म्हणावं तसं यश मिळतं नव्हतं.

हे इंडस्ट्रीमधील गॉड-फादर

अनेक नवख्या कलाकारांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, त्यांच्या कुटुंबातील मोठी नावं फार काळ इंडस्ट्रीमध्ये कार्यकरअसल्यामुळे त्यांच्या या क्षेत्रात अगदी सहज काम मिळत. पण ते स्वतःला सिद्ध करण्यास असमर्थ ठरतात. या उलट, कोणीही पाठीशी नसताना, एका चित्रपटामुळे एका रात्रीत, एक नवखा मुलगा स्टार होऊ शकतो. त्यामुळे गॉड-फादरअसण्यापेक्षा तुमचा स्वतःवर विश्वास असणं गरजेचं असतं. मेहनत करण्याची तयारी आणि नशीब हे माझ्या यशामागीलआणि मला काम मिळण्यामागचे माझे गॉड-फादर आहेत असं माझ स्पष्ट मत आहे.

‘सचिन’ने साकारला ‘द सचिन’

मराठी मालिका आणि चित्रपटांत काम करताना म्हणावं तसं यश मिळतं नव्हतं. एके दिवशी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ यावेबसिरीजच्या ऑडिशनसाठी फोन आला. माझं कास्टिंगही झालं. पण काही कारणास्तव एक दिवसाच्या शूटनंतर माझीभूमिका वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आणि माझं ते काम थांबलं. मग काही दिवसांनी मला त्यांच्याकडून ‘झोयाफॅक्टर’ या हिंदी चित्रपटातील रोलच्या ऑडिशनसाठी विचारण्यात आलं. ऑडिशन झालं, पण मला कोणती भूमिकासाकारायची आहे याचा काहीचं अंदाज नव्हता. इंडियन क्रिकेट टीम मधील एका सिनिअर प्लेअरचा रोल तू करणारंएवढचं मला सांगण्यात आलं होतं. लुक टेस्टला गेल्यावर मला केस कर्ल्स (कुरळे) करावे लागणार असल्याचं सांगण्यातआलं. त्यानंतर मला हा लुक सचिन तेंडूलकर यांच्याशी साम्य साधणारा असावा असं लक्षात आलं. आणि क्रिकेट बेस्ड याफिल्म मध्ये मला ‘द सचिन तेंडूलकर’ साकारण्याची संधी मिळाली. मग तयारी करता त्यांच्या विविध व्हिडीओ पाहण्याससुरुवात केली. क्रिकेट टेक्निक्स शिकलो. ते ग्राउंडवर येताना कसे येतात? त्यांचा ग्राउंडवरील वावर कसा असतो? याआणि अशा अनेक बारकाव्यांचा अभ्यास केला. तिकडे काम करण्याचा अनुभव भारी होता. फायनल मॅचच्या सिक्वेन्सचंशुटींग सुरु होत. त्या शुटींगसाठी आलेल्या अनेक कॅमेरामॅननी सचिन(तेंडूलकर) सरांच्या अनेक मॅचचं त्यांच्या कॅमेऱ्यातूनटिपल्या होत्या. शुटींग संपल्यानंतर त्यांच्यातील दोन कॅमेरामॅननी माझ्या कामाचं भरभरून कौतुक केलंचं. शिवाय, मीबऱ्याच अंशी सचिन सरांसारखा दिसतो आणि शूटला मी तसाचं भासलो असं त्यांनी सांगितलं. सोबतच, जेव्हा कधी तेसचिन सरांना भेटतील तेव्हा ‘सचिन’ने खूप चांगला ‘सचिन’ साकारला असं त्यांना आवर्जून सांगणार असल्याचंही बोलूनदाखवलं. त्यामुळे हे चांगलं काम माझ्या नशिबी आलं यात धन्यता आहे.

मालिकेतही लीड रोल करायला आवडेल…

लवकरच साकार राऊत निर्मित आणि स्वप्नील देशमुख दिग्दर्शित ‘आयपीसी ३०७अ’ नावाच्या मराठी चित्रपटात प्रमुखभूमिका साकारतोय. मी आजवर साकारलेल्या अनेक भूमिकांपेक्षा माझी हि भूमिका अत्यंत वेगळी आणि माझ्यासाठीस्पेशल असणारं आहे. कारण ‘आयपीसी ३०७अ’च्या निमित्ताने माझा लीड रोल असणारा पहिला चित्रपट लवकरचप्रेक्षकांच्या भेटीला येणारं आहे. या चित्रपटात मी एक गँगस्टर साकारत आहे. सध्या चित्रपटाचं शुटींग सुरु आहे. याचित्रपटाचे दोन पोस्टरही सोशल मिडियावर पब्लिश करण्यात आले आहे. त्यातून माझा एकूण लुक कसा असेल याबद्दलप्रेक्षकांना अंदाज येईल. शिवाय मालिकेतही प्रमुख भूमिका करण्याची इच्छा आहे. त्यासाठीची धडपड आणि मेहनतकरण्याची तयारी आहे. मला मिळणार कोणतही काम डोक्यात ठेऊन किंवा ठरवून केल्याचं मला अजिबात आठवतं नाही. मुळात मी तसं करत नाही. विशेषतः मला निगेटिव्ह रोल किंवा ग्रे शेड असणारी भूमिका साकारायला आवडतात. ‘आयपीसी ३०७’ हे त्यातील एक उत्तम उदाहरणं म्हणता येईल. मला अनेक गोष्टी, वेगळ्या भूमिका साकारायलाआवडतात. आता योग्य भूमिका मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे.

चाहत्याने दिली ‘सर्वोत्कृष्ट अभिनया’ची ट्रॉफी

‘राजा शिव छत्रपती’ मालिकेमधील माझं काम सुरु असताना मी अक्कलकोटला गेलो होतो. तिकडे एका काकांनी माझं ‘राजा….’मधील काम पाहिलं होतं आणि तेव्हा मी आयुष्यातील पहिला ऑटोग्राफ दिला होता. तेव्हा टेलिव्हिजनची ताकदकळली. माझी एक ख्रिस्ती फॅन आहे. आम्ही अजून भेटलो नाही. पण मागच्या वर्षी लग्न झालं तेव्हा तिने मला ‘स्वामीं’चीफ्रेम भेट म्हणून पाठवली. शिवाय, प्रसाद वापकार नावाचा माझा एक चाहता आहे. मला तो ‘दादा’ म्हणतो. हल्लीचआम्ही भेटलो होतो. त्याने मला गिफ्ट दिलं आणि ते घरी गेल्यावर उघडण्यास सांगितलं. घरी येऊन मी ते गिफ्ट उघडल्यानंतर त्यात ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ असं लिहिलेली ट्रॉफी होती. माझ्या एवढ्या वर्षांच्या कामात मला ‘”माझ्या नवऱ्याची बायको”…’मधील माझ्या भूमिकेसाठी एकदा नामांकन मिळालं होतं. आमच्या भेटीआधी, मला यंदाही नामांकन, न मिळाल्यामुळे त्याला वाईट वाटत असल्याचं, प्रसादने सांगितलं होत. त्यानंतर भेट झाली आणि माझ्या आयुष्यातीलसगळ्यात मोठं अवॉर्ड मिळाल्याचं सुख मिळालं. माझ्या मेहनतीला मिळालेली हि डायरेक्ट पोचपावती आहे.

हे मला खुपतं…

आपल्याकडे इंडस्ट्रीमधील काही गोष्टी नक्की मला खुपतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे कलाकारांना एक्सप्लोरकरण्याची क्षमताच नाही असं वाटतं. एखादा कलाकार असा दिसतो किंवा त्याने अशा भूमिका आधी साकारलेल्याअसल्यामुळे त्याचं त्या पद्धतीच्या भूमिकांव्यतिरिक्त वेगळं काम दिलं जात नाही. एखादा कलाकार वेगळा दिसू शकतो. वेगळ काम करण्याची क्षमता सगळ्यांमध्ये असते हे इंडस्ट्रीने मान्य करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. अनेकदानवीन चेहरे हवेत असं सांगत त्याचं त्या लीड केलेल्या कलाकारांना लीड दिला जातो. त्यामुळे इतर कलाकारांच्यासक्षमतेवर विश्वास ठेऊन त्यांना संधी मिळावी असं माझं मत आहे.

अभिनेता नसतो तर….

मी अभिनेता नसतो तर मी एक उत्तम ‘कुक’ बनलो असतो. आमच्या लहानपणी आई-बाबा ऑफिसला गेले कीकाहीनाकाही करून खाण्याची आमची चंगळ असायची. ती सवय वाढत गेली आणि आता माझा ‘सर्वम फुड्स’ म्हणूनब्रांड आहे. मी, माझी बायको आणि तिची आई आम्ही तिघं मिळून हा व्यवसाय सांभाळतो. त्यामुळे मला चवीनं खायलाआणि चवीचं खाऊ घालायची आवड उत्तम पद्धतीने जपतोय.

रॅपिड फायर

 • सचिनचा फिटनेस फंडा
  – जॉगिंग, शिवाय मनातून फ्रेश राहणं आणि काम करत राहणं मला आवडतं
 • इंडस्ट्रीमधील खूप चांगला मित्र
  – संग्राम समेळ
 • सचिनची आवडती अभिनेत्री
  -मुक्ता बर्वे
 • सचिनचा विक पॉइंट
  – इमोशन्स (भावना)
 • सर्वाधिक वापरातील सोशलमिडिया ॲप
  – फेसबुक, व्हॉटस्ॲप

मुलाखतकार : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)
www.planetmarathi.org
www.planetmarathimagazine.com

दिवाळी निमित्त..!!!


घराघरात आता दिवाळीची सुरुवात झाली आहे. दिवाळी येते ती चांगली पाच दिवस मुक्काम ठोकून असते. हिंदू संस्कृतीमधील हा एक प्रमुख सण असला तरी देशभर सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहात साजरा केले जातो. अर्थात दिव्यांचा सण म्हणून याला ‘दिपावली’ किंवा ‘दिवाळी’ असंही म्हणतात. चौदा वर्षांचा वनवास संपवून राम आयोध्येला परत आलेल्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते, अशी या सणामागील आख्यायिका आहे. असे असले तरी तत्कालीन ‘दिवाळी’ आणि आत्ताचा ‘दिवाळसण’ यात खूप फरक आहे. अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा ‘दीप’मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या दिवसांत मातीचाकिल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. हल्ली हि परंपरा दिवसागणिक मागे पडत चालली आहे. ‘यक्षरात्री’, ‘दीपमाला’, ‘दीपप्रतिपदुत्सव’, ‘दिपालिका’, ‘सुखरात्री’, ‘सुख सुप्तिका’ अशी सर्वांच्या लाडक्या दिवाळीची इतर नावांनी ओळख. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे वाचूया त्या विषयी…

वसुबारस : भारतदेश कृषिप्रधान असल्यामुळे या दिवसाला महत्त्वाचे स्थान आहे. याला ‘गोवस्तद्वादशी’ असंही म्हणतात. पारंपरिकतेने या दिवशी संध्याकाळी ‘गाय आणि वासराची’ पूजा करतात. ज्यांच्याकडे घरी गुरे-वासरे आहेत त्यांच्याघरी गोड पुरणाचा स्वयंपाक केला जातो. घरातील स्त्रिया गाईचे पाय धुवून, तिला फुलांची माळ घातली जाते. निरांजनाने ओवाळून मग केळीच्या पानावर गाईला नैवेद्य म्हणून पुरणपोळी आणि सगळे अन्नपदार्थ दिले जातात.

धनत्रयोदशी : अश्विन कृष्ण त्रयोदशीला ‘धनत्रयोदशी’ साजरी केली जाते. या सणामागे अनेक आणि धर्मनिहाय दंतकथा मानल्या जातात. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्‍नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्‍न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात आणि यम आपल्या यमलोकात परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.

धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून लक्ष्मी देवी प्रगट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. या दिवशी लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. याला तेलुगूमध्ये ‘गुडोदकम्’ म्हणतात. 

या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर,विष्णू -लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करतात.हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो.जैनधर्मीय या दिवसाला ‘धन्य तेरस’ वा ‘ध्यान तेरस’ म्हणतात. 

नरक चतुर्दशी :नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे.  या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले होते. त्यामुळे  कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्थीस ‘नरक चतुर्थी’ साजरी केली जाते. नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे असते. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशीअभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे आणि सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.

लक्ष्मीपूजन : अश्विन अमावास्येला ‘लक्ष्मीपूजन’ साजरा केला जातो. या दिवशी संध्याकाळी  लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी  ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी करतात. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंगस्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात.या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.

बलिप्रतिपदा : कार्तिक शुद्ध प्रतिपदेस ‘बलिप्रतिपदा’ हा सण साजरा केला जातो. हा दिवस ‘दिवाळी पाडवा’  म्हणून ही ओळखतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीला औक्षण करते व पती पत्‍नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच “दिवाळसण” म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात.

गोवर्धन पूजा : मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.

भाऊबीज : कार्तिक शुद्ध द्वितीयेला ‘भाऊबीज’ हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’असे नाव मिळाले असे मानले जाते. भाऊ-बहिणीच्या प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ओवाळणी’ देऊन करतो.

भारतातील विविध समाजांची दिवाळी 


जैन समाज : अश्विन अमावास्येला जैनांचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर मोक्षाला गेले. त्या दिवशी महावीरांना जलाभिषेक करून त्यांची पूजा करतात, दिवे उजळतात आणि त्यांना ‘निर्वाण लाडूं’चा भोग चढवतात. आणि नंतर फटाक्यांची आतशबाजी करतात.

आंध्रातील तेलुगू समाज : ही मंडळी नरक चतुर्दशीलाच दिवाळी म्हणतात. त्या दिवशी कागदाचा किंबा बांबूचा नरकासुराचा पुतळा करून त्याचे दहन करतात, मग दिवे लावतात व लक्ष्मीपूजन करतात.

बंगाली समाज : दिवाळीच्या दिवशी बंगाली लोक कालीबाड्यांत जाऊन कालीची पूजा करतात. रात्री जागरण करून भजने म्हणतात. दीपावलीच्या रात्री घरोघर व मंदिरांत दिवे लावतात. त्यांचे लक्ष्मीपूजन पंधरा दिवस आधी, म्हणजे शरद पैर्णिमेलाच झालेले असते.

बौद्ध समाज गौतम बुद्ध दिवाळीच्या दिवसांतच तप करून परत आले होते. त्याच दिवशी बुद्धांचा प्रिय सहकारी अरहंत मुगलयान हा निर्वाणाला गेला. त्याची आठवण काढून बौद्ध मंडळी गौतम बुद्धाला प्रणाम करून दिवे लावतात.

तमिळनाडूतीत मद्रासी लोक : प्रत्येक घरातून स्त्री-पुरुष एकेक जळती पणती देवळात नेऊन ठेवतात, आणि तेथेच बसून रात्रभर भजन करतात. 

अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)

www.planetmarathi.org

www.planetmarathimagazine.com