पुस्तकप्रेमींचे Lit बुक कॅफे!

Books are a uniquely portable magic. असं स्टिफन किंग म्हणतात, जे तंतोतंत खरं आहे. आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने बुक कॅफेच्या भन्नाट कल्चरसोबत आणखीन बऱ्याच गोष्टी जाणून घेऊया.

पुस्तकं ही माणसाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहेत. लिहिता वाचता यायला लागल्यापासून हातात पडलेली पुस्तकं अगदी शेवटपर्यंत साथ देतात.एखाद्या कुलूपबंद खोलीत मोठमोठ्या कप्प्यात नीट रचून ठेवलेली पुस्तकं, हातात गरमागरम वाफाळता चहा किंवा कॉफी हे समीकरण न चुकणारं आहे. आणि पुस्तकांचे रकाने एवढे मोठे की हव्या त्या रकन्यातून आवडीचं पुस्तक काढायला चक्क शिडीची गरज भासावी.

पुस्तकं खाणं हा प्रकार ज्यांना माहिती आहे त्यांनी ही गोष्ट आयुष्यात अनुभवली असणार ह्याची खात्री आहे. पु.लं च्या विश्वातलं सखाराम गटणे नावाचं पात्र ज्या पद्धतीने पुस्तकांची पानं खात असे तशी पुस्तक वाचनाची भूक अजूनही शिल्लक आहे का? हा एक गंभीर प्रश्न आहे.

पुस्तक हा प्रकार पुढे मागे नाहीसा होईल का अशी शंका येणं हीच दुःखाची गोष्ट आहे. ज्या पुस्तकांनी अनेकांना अगदी जगण्याची नवी उमेद दिली, नियोजनाची सवय लावली असा घटक आयुष्यातून हद्दपार होणं म्हणजे एक खूप मोठी पोकळी निर्माण होण्यासारखं आहे.

अश्या वेळी book exchange सारख्या कल्पनांमुळे पुस्तकांची लोप पावत चाललेली आवड पुन्हा रुजवण्यासाठी मदत होते. तुम्ही अजिबात ओळखत नसलेल्या एका व्यक्तीला तुम्ही तुमच्या आवडत्या लेखकाचं आवडतं पुस्तक पाठवायचं ही कल्पनाच किती सुंदर आहे. ह्यातून नवीन पुस्तकांशी आणि पर्यायाने नव्या लोकांशी आपला संबंध येतो.

ह्याव्यतिरिक्त नव्याने उदयाला येणारी बुक कॅफेची संकल्पना पुस्तक आणि नव्या जमान्याला जोडणारा एक दुवा आहे. जुन्या धाटणीच्या लायब्ररीला नव्या आणि कूल स्टाईल मध्ये बुक कॅफे असं नाव पडलं असं म्हणता येऊ शकतं. शांतपणे कॉफी एन्जॉय करत पुस्तक वाचायचा आनंद इथे बसून लुटता येऊ शकतो. नव्या पिढीचं हे कूल बुक कॅफे कल्चर सर्वांच्या पचनी पडण्यासारखं आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरात बुक कॅफेची चलती आहे.

फूड विथ थॉट (मुंबई)


दीडशे वर्ष जुन्या फोर्ट भागातील किताबखाना नावाच्या बुक स्टोअरमध्ये हे टुमदार कॅफे वसलेलं आहे. तुम्हाला अशक्य सुंदर aesthetic अनुभवायचं असेल तर हे कॅफे तुम्हाला नक्की आवडेल. किताबखानाची vibe खूप vintage आहे. चहूकडे पुस्तकांनी घेरलेल्या प्रदेशात एक शांत कोपरा पकडून निवांत बसून तुम्ही मनसोक्त पुस्तक वाचू शकता.

कॅफे कथा (पुणे)


पुण्यात पुस्तकप्रेमींची काही कमी नाही. पुण्यात खूप सुंदर बुक कॅफेज् आहेत आणि त्यातलाच एक म्हणजे कॅफे कथा. vibrant पण सगळ्या वेळी उठून दिसणारी कमाल रंगसंगती असलेला आणि मुख्यतः भरपूर पुस्तकांनी भरलेला हा कॅफे पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वसलेला आहे. आणखीन एक स्पेशल गोष्ट म्हणजे इथलं अप्रतिम जेवण. Quick bites म्हणून तुम्हाला कॉफी, चहा आणि आणखीन बरंच काही चाखायला मिळू शकतं.

लीपिंग विंडो कॅफे (मुंबई)


मुंबईतल्या अंधेरी भागात वसलेलं लीपिंग विंडो नावाचं कॅफे शहरापासून आणि गजबजाटापासून लांब असलेलं उत्तम बुक कॅफे आहे. खास कॉमिक्स प्रेमींनी ह्या कॅफेला जरूर भेट द्यावी. वेगवेगळ्या पद्धतीचे जुने कॉमिक्स, थ्रिल आणि रहस्याने भरलेली पुस्तकं इथे तुम्हाला बघायला मिळतील.

द मंचिन्ग रूट कॅफे (पुणे)


पुण्यातल्या बुक कॅफेचा विषय चालू असताना ह्या कॅफेला वगळून कसं चालेल? बाणेरमध्ये स्थित हा कॅफे तुम्हाला बेस्ट कॉफी आणि पुस्तकं अशी सांगड घालून देतो. कॅफेच्या आत शिरल्या शिरल्या मोठ्या भिंतीवर वेगवेगळ्या विषयातील पुस्तकांचा खजिना दिसतो. एकूणच तुमचा मूड मस्त करणारा हा कॅफे आहे.

ह्या व्यतिरीक्त मुंबईतल्या जुहू परिसरात असलेला पृथ्वी कॅफे, पुण्यातला वर्ड अँड सिप्स अशी अनेक नावं काढता येतील.

पुस्तकांचं आणि मराठी चित्रपटसृष्टीचं खास नातं आहे. पुस्तकांशी घट्ट संबंध असलेले अनेकजण आज खूप चांगलं नाव कमवत आहेत. त्यांच्या आयुष्यात पुस्तकांचं स्थान काय आहे ह्याबद्दल ते बरंच काही सांगतात.

क्षितिज पटवर्धन

लेखक, गीतकार क्षितिज पटवर्धन असं सांगतो की, ” मी मराठीचं पाठ्यपुस्तक शाळेसाठी घेतलं आणि धडे आणी कविता वाचायला आवडू लागल्या. मी पहिलं पुस्तक कोणतं वाचलं आठवत नाही, पण धड्यामधले काही भाग आठवतात. दादू नावाचा धडा, चिंधी नावाचा धडा असे धडे आठवतात. सगळ्यात गमतीशीर म्हणजे मला त्या धड्यातले पदार्थ आठवतात. म्हणजे दादू मधलं उन उन भात, चिंधी मधली शेव. मला ते वाचून मजा आली होती, आता लक्षात येतं की त्यात लेखनाची फार महत्वाची गोष्ट होती, ती म्हणजे दृष्यात्मकता! मला वाटतं की पुस्तक इतिहास जमा होणार नाहीत, माध्यम नक्की बदलतील, जी आत्ता बदलताना दिसत आहेत. मला स्वतःला बोटाला थुंकी लावून पान उलटून वाचायला आवडतं. तो पुस्तकाचा स्पर्श आवडतो. मला मराठीमध्ये जी.ए, पु.ल, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, गौरी देशपांडे, अण्णाभाऊ साठे हे लेखक आवडतात. पुस्तकांनी मला आधी रमवलं आणि मग घडवलं. पुस्तकांनी आयुष्यातल्या सर्वात सुंदर आठवणी दिल्या, सुंदर माणसं आणि जागा यांच्याशी जोडलं.”

मधुरा वेलणकर-साटम

अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटमचं पुस्तकांशी जवळचं नातं आहे. ती असं म्हणते की, “”मला खरंतर आधी वाचनाची एवढी आवड नव्हती. पण माझी बहीण लेखक प्रभाकर पेंढारकर यांचं रारंग ढांग नावाचं एक पुस्तक वाचत होती त्या पुस्तकामुळे मला वाचनाची गोडी निर्माण झाली. लहानपणी साधारण सगळे जी पुस्तकं वाचतात ती मी कदाचित वाचली नाहीत. पण एखादं वेगळं पुस्तक मी नक्कीच वाचलेलं असू शकतं. हो आजकाल वाचनाची माध्यमं बदलत आहेत. पण त्याच्याकडे तात्पुरती सोय किंवा माध्यम म्हणून पाहिलं पाहिजे. पुस्तकाचं पान उलटून पुन्हा नव्या उत्सुकतेसह त्या पात्रांच्या जगात जाणं ह्यात खरी मजा आहे असं मला वाटतं. मला अजून किंडलवर वाचन करणं जमलं नाहीये. मला हातात पुस्तकाची प्रत लागते. त्या पुस्तकाचा वास, हाताने पान उलटणं हे सगळं मला आवडतं. पुस्तक वाचताना प्रत्येकजण खूप शुद्ध असतो. त्यामुळे ते वाचणारा वाचक अनेक गोष्टी स्वतःमध्ये रुजवू शकतो. आपल्या नकळत आपल्याला पुस्तक कळत जातं. प्रत्येक लेखकाची धाटणी वेगळी आहे. वेगवगेळ्या जगात नेणारे, रममाण करणारे असंख्य लेखक आहेत. पुस्तकांमुळे मला प्रत्येकातलं काहीतरी चांगलं वेचायची सवय लागली. माझ्या मनाला शांतता मिळाली. वेगवेगळ्या पात्रांची आयुष्य बघून हार न मानता जगण्याचं बळ आलं. पुस्तकांमुळे आपला आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. चांगल्या गोष्टी आत्मसात करता येतात आणि वाईट गोष्टी ओळखता येतात.”

नव्या पिढीला आजही पुस्तकं हवीहवीशी आहेत की कालानुरूप पुस्तकं सुद्धा इतिहासजमा होतील ह्याचं उत्तर काळानुसार बदलणारं आहे. पुस्तकांची हरवलेली ओळख पुन्हा मिळवण्यासाठी आणि जतन करण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत. पुस्तक लाखात एक अशी पुंजी आहे. प्रत्येक पुस्तकात थोडासा स्वतःचा भाग सोडून जाणं हीच एक वाचक म्हणून आपली नाळ पुस्तकांशी जोडून ठेवते.

लेखन- रसिका नानल

Share your valuable opinion

%d bloggers like this: