‘बॉईज ३’ मधील ‘ती’ मुलगी कोण? 

‘बॉईज’ व ‘बॉईज २’ या दोन्ही चित्रपटांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आता तीच धमाल, मजामस्ती घेऊन हे तिन्ही बॉईज पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. येत्या १६ सप्टेंबरपासून धैऱ्या, ढुंग्या व कबीर ‘बॉईज ३’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या वेळीही त्यांच्या आयुष्यात एका मुलीची एंट्री होणार असून ‘ती’ नक्की कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. त्यातच आता ही उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी या चित्रपटाचे एक मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. यात तिचा अर्धाच चेहरा समोर आला असून आता ‘ती’ नक्की कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

यापूर्वीही ‘बॉईज’ व ‘बॉईज २’ मध्ये धैऱ्या, ढुंग्या व कबीरच्या आयुष्यात मुली आल्या. मात्र प्रत्येक वेळी कबीरचा नंबर लागला आणि धैऱ्या, ढुंग्याने त्याला मदत केली. आता यावेळी ‘ती’ मुलगी नक्की कोणाच्या आयुष्यात येणार, ‘ती’च्या येण्याने या तिघांच्या आयुष्यात काय गडबड घडणार, कोणाचे प्रेम यशस्वी होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतानाच धैऱ्या, ढुंग्या व कबीरची धमाल ‘बॉईज ३’मध्ये तिप्पट पटीने वाढणार आहे, हे नक्की! 

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या सहयोगाने अवधूत गुप्ते प्रस्तुत चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे व संजय छाब्रिया ‘बॉईज ३’चे निर्माते आहेत. या चित्रपटातही पुन्हा प्रतीक लाड, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे हेच त्रिकुट झळकणार असून पुन्हा एकदा ते दंगा घालायला तयार झाले आहेत.

Share your valuable opinion

%d bloggers like this: