‘बॉईज ३’मधून धैर्या, ढुंग्या, कबीर घालणार पुन्हा एकदा राडा!!

काही वर्षांपूर्वी धैर्या, ढुंग्या आणि कबीर या ‘बॉईज’नी अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. हा धुमाकूळ कमी म्हणून पुन्हा ‘बॉईज-२’ मधून ते डबल धमाका घेऊन आपल्या भेटीला आले आणि अजूनही प्रेक्षकांचे मन भरत नसल्याने परत तसाच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त राडा घालायला ‘हे’ तीन अतरंगी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. नुकताच ‘बॉईज-३’ चा टिझर सोशल मीडियावर झळकला असून १६ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात हा धमाका उडणार आहे.

'बॉईज' आणि 'बॉईज-२' ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः दंगा घातला होता. 'बॉईज ३'ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट कधी एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अखेर ह्या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असून ह्यात हे तिघेही दाक्षिणात्य पेहेरावात दिसत असून तिघांचा एक वेगळाच ‘स्वॅग‘ आपल्याला अनुभवयाला मिळणार आहे हे नक्की. त्यांच्या आयुष्यात पुन्हा एक नवीन मुलगी आल्याचे दिसतेय. आता तिच्या येण्याने हे काय रंग उधळणार, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. 
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या सहयोगाने अवधूत गुप्ते प्रस्तुत ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल सखाराम देवरुखकर असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया निर्माते आहेत. 'बॉईज-३'मध्ये प्रतीक लाड, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे हे त्रिकुटच पुन्हा झळकणार असल्याने आता हे नक्की काय धमाल करणार आहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Share your valuable opinion

%d bloggers like this: