Category Archive : entertainment

‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेतून तिने मालिका विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर अभिनय क्षेत्रातील ‘पुढंच पाऊल…’ टाकत, तिने साकारलेली खलनायिका ‘रुपाली’ सगळ्यांच्याच कायम लक्षात राहिली. पुढे तिने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
 ‘जेनी’ म्हणून ती आपल्याला मितभाषी, शांत आणि समंजस म्हणून माहिती असली तरी, खऱ्या आयुष्यात मात्र ती अत्यंत बोलकी, खंबीर आणि परखड स्वभावाची आहे. या आठवड्यातील ‘प्लॅनेट मराठी मॅगझीन’ च्या ‘स्टार ऑफ द विक’च्या माध्यमातून जाणून घेऊयात दिलखुलास व्यक्तिमत्व असणारी अभिनेत्री ‘शर्मिला शिंदे’ विषयी….

 •  संपूर्ण नाव : शर्मिला राजाराम शिंदे
 • जन्म तारीख आणि ठिकाण : ५ एप्रिल, पुणे 
 • शिक्षण : बीएफए (अप्लाइड आर्ट)  चायनीज मँडरिंग , इव्हेंट मॅनेजमेंट , ब्युटी कोर्सेस 

लहानपणीचं ठरवलं… 
शाळेत असताना अभिनय, नृत्य, वक्तृत्व या आणि अशा अनेक अभ्यासेतर उपक्रमात आवडीने भाग घ्यायचे. केवळ शाळेतच नव्हे तर गणपती किंवा कोणत्या सणवारी सोसायटीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात माझा नियमित सहभाग ठरलेला असायचा. माझी आवड आणि आवडीपोटी घेतल्या जाणाऱ्या मेहनतीला तेव्हाही अनेक बक्षिसे मिळवली आहेत. लहान असतानाचं मला अभिनय करायचायं आणि मोठी होऊन मला अभिनेत्री बनायचंय हे स्वतःशी ठरवलं होतं. त्यामुळे शाळेतील तोंडी परीक्षेच्या वेळी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरं माझं ठरलेलं असायचं. ज्या क्षेत्राबद्दल आपल्याला नीटस माहीतही नसतं, शिवाय त्याकाळी अभिनयात करिअर घडू शकतं हा विचारही क्वचित केला जायचा. मात्र अशातही ‘मला मोठी होऊन अभिनेत्री बनायचंय.’ या माझ्या उत्तराने शिक्षकही प्रभावित व्हायचे. अनेकांच्या भुवयाही उंचावल्या होत्या. त्यातही मला कॉमिक रोल करायला किंवा निवेदन करायला आवडेल असं आत्मविश्वासाने सांगितलं होत. शिवाय, मी सुवर्णपदक विजेती धावपटू (Sprinter Gold Medalist) असल्यामुळे, सुरुवातीला कला आणि क्रीडा या दोन क्षेत्रांबाबतीत थोडी गोंधळले होते. परंतु अभिनयाकडे माझा अधिक कल असल्यामुळे आपणं अभिनेत्रीचं व्हायचे या मताशी ठाम झाले. मुळात माझं बालपण फार कमाल गेलं. खरं पाहता माझ्या पूर्वजांपैकी कोणी कला क्षेत्राशी निगडीत असं काहीचं काम केलं नव्हतं. त्यामुळे घरच्यांनाही या क्षेत्राविषयी फारशी माहिती नव्हती. परंतु माझ्या आईचा पाठींबा मिळाल्यामुळे अनेक गोष्टी सोप्या होत गेल्या. मला विविध स्पर्धांना घेऊन जा, अभिनयच्या वर्कशॉपसाठी घेऊन जा, अगदी वर्तमानपत्रातील जाहिराती बघून ती मला अनेक ठिकाणी ऑडिशन्ससाठी घेऊन जायची. माझ्यासाठीचा हा तिचा खटाटोप सतत सुरु असायचा. अनेकदा वर्तमानपत्रातील फसव्या जाहिरातींनाही आम्ही बळी पडलोय. त्यानंतर कॉलेज झाल्यानंतर मुंबईत आले आणि अनेक गोष्टी नव्याने शिकू लागले.

 ‘स्ट्रगल’मधून शिकावं…

सुरुवातीचे काही दिवस कलिनाच्या झोपडपट्टीमध्ये राहिले. 
माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबईत आले. बरेचं दिवस कामाच्या शोधात होते. यावेळी माझी संयमीवृत्ती मला फार कामास आली. आर्ट्स स्कूलची विद्यार्थिनी असल्यामुळे हा संयम आणि जीवनावश्यक अनेक गोष्टी तिकडूनच शिकले. माझ्यातील खेळाकडून मला अधिक सक्षमपणे परिस्थितीला सामोरं जाण्याचं बळ दिलं. ‘स्ट्रगल’ला स्ट्रगल म्हणणं चुकीचं आहे असं माझं ठाम मतं आहे. कोणत्याही क्षेत्रातील यशस्वी वाटचालीसाठी लागणारी ‘स्ट्रगल’ ही तयारी असते. माझ्या घरातील माझी आई वगळता इतर कोणाचा मला फारसा पाठींबा नव्हता. शिवाय, इंडस्ट्रीमध्ये मी नवखी म्हणून पाऊल टाकणार असल्यामुळे कोणाशीही फारशी ओळख असण्याची पुसटशीही आशा नव्हती. कोणाकडून मार्गदर्शन मिळेल किंवा कोणी काम देईल असा कोणताच मार्ग माझ्यापुढे नव्हता. त्यामुळे आपल्या कामाची सुरुवात कुठून करावी याबद्दलही काही कल्पना नव्हती. बीएफएचं शिक्षण सुरु असताना सतत चार वर्ष वोल्वो गाडीमधून प्रवास करून मुंबई-पुणे प्रवास केला. ऑडिशनसाठी दर एका दिवसा आड मुंबईत येण्याचा आणि दिवसभर ऑडिशन देऊन सकाळी कॉलेजला पोचायचा माझा कार्यक्रम सुरूच असायचा. कॉलेजला सुट्ट्या वाढू लागल्या शिक्षकांचा ओरडा खावा लागायचा. अखेर कॉलेज संपल्यानंतर घरच्यांना ‘पटवून’ मुंबई गाठली. काम करायचं असेल तर मुंबईत रहावं लागेल म्हणून अखेर मुंबईत रहायला लागले. सुरुवातीचे काही दिवस कलिनाच्या झोपडपट्टीमध्ये राहिले. खरतरं हि गोष्ट माझ्या घरच्यांना अजूनही माहित नाहीये. त्यानंतर काही मुलांशी ओळख झाली आणि बोरीवलीमध्ये त्यांच्यासोबत काही दिवस राहिले. ‘मुंबई चोरांची नगरी आहे’ असं म्हणतात, पण इथे स्वतः राहायला लागल्यावर हे अगदी खोटं असल्याचं लक्षात आलं. एक ध्येय डोळ्यांसमोर ठेऊन काही घाबरत याच्याकडे रहा, काही दिवस इकडे आसरा घ्या असं करत प्रयत्न करतं राहिले. शेवटी काम मिळतंचं नाही, हे लक्षात आल्यावर काही दिवसांचा अवधी घरच्यांकडून मिळाला. शिवाय, मुंबईत राहण्यासाठी घरच्यांनी दिलेले पैसेही संपत होते. अखेर निराशा मानून एका मित्रासोबत पुण्याला जायला निघाले. मुंबईहून गाडी पुण्याच्या दिशेने निघाली आणि दहा-पंधरा मिनिटांतचं माझं सिलेक्शन झाल्याचा फोन आला आणि तत्क्षणी मी गाडी सोडून दिली. अखेर मिळालेल्या पहिल्या संधीचं सोनं करायचं ठरवलं आणि सचोटीने काम करत राहिले.  

पहिली भूमिका मिळाली...
‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेमधून मी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि जिद्दीने काम केलं.  ‘स्वप्नांच्या पलीकडले’ मला ‘सोनिया’ हि व्यक्तिरेखा साकारायची संधी मिळाली. खरतरं मला मिळालेली भूमिका हि फक्त सात दिवसांची होती. पण त्या व्यक्तिरेखेला मिळालेलं प्रेम आणि माझं काम पाहून त्या व्यक्तिरेखेचा ट्रॅक वाढवण्यात आला.  मराठीत काम करणं अधिक आवडतं…
मी हिंदी आणि मराठी अशा दोन्हीकडे काम करत असले, तरी हिंदी पेक्षा मराठीमध्ये काम करणं मला अधिक आवडतं. मराठीत काम करताना एक वेगळीच आपुलकीची भावना असते. मराठी आणि हिंदी मध्ये दृष्टीकोनात (attitude)मध्ये ही मोठा फरक जाणवतो. कदाचित मी मराठी असल्यामुळे हा माझा समज म्हणता येईल. पण खरचं मराठीमध्ये मला कौटुंबिकतेची भावना जाणवते. हिंदीच्या सेटवर ही कौटुंबिक वातवरण असलं तरी फ्रोफेनलिझला तिकडे अधिक महत्त्व दिलं जात. त्यामुळे तिकडे खूप सांभाळून वागावं लागतं, खूप विचार करून बोलावं लागतं, अनेक नियम पाळावे लागतात, त्यामुळे तिकडचा दिलखुलासपणा हरवतो असं मला वाटतं. याउलट मराठीच्या सेटवर फार बिनधास्त वावरता येत आणि तिथला दिलखुलासपणा मला अधिक आवडतो. बऱ्याच ठिकाणी भाषे पलिकडे जाऊन कलाकारांसोबत कौटुंबिक नातं जुळत.   कास्टिंग काऊचं?
‘कास्टिंग काऊचं’ या विषयावर अनेकदा अनेकांशी चर्चा होतात. सुदैवाने माझं एकूण व्यक्तिमत्व आणि राहणीमान पाहून मला या गोष्टीचा कधीच सामना करावा लागला नाही. पण अनेक लोकांना असे अनुभव का बरं येत असतील असा प्रश्न मला नेहमी पडतो. कदाचित ते लोक एखाद्या चुकीच्या व्यक्तिला भेटतं असावेत म्हणून असं घडतं किंवा एकाद्याला भेटायला जाताना त्या कलाकरांचा त्या समोरच्या व्यक्तिविषयीचा दृष्टीकोन चुकीचा असतो म्हणून असे प्रकार घडतं असावेत. इंडस्ट्रीत काम करताना अनेकदा माझ्या हितचिंतकांकडून मला एखाद्या ठराविक व्यक्तीपासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो किंवा एकद्याशी फार बोलू नकोसं असंही सांगितलं जात. परंतु, ती व्यक्ती माझ्याशी चांगलीच वागतं गेली. ज्या एकाद्या व्यक्तीचा अनेकांना वाईट अनुभव आला आहे. त्या व्यक्तीचा मला मात्र नेहमी चांगलाच अनुभव आला आहे. त्यामुळे एखाद्याला पहिल्यांदा भेटायला जाताना तुम्ही पाटी कोरी ठेऊन त्या व्यक्तीसमोर जा. म्हणजेच कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःला आलेल्या अनुभवांतून शिका आणि मी हेच नियमित लक्षात ठेवते आणि फॉलो करते.    

अन् मी ‘शनाया’ नाकारली… 
‘पुढचं पाऊल…’ मालिकेतील मी साकारलेली ‘रुपाली’ हि व्यक्तिरेखा मला आवडलेल्या कामांपैकी एक महत्त्वाची भूमिका. रुपाली खलनायिकेच्या भूमिकेत असली तरी तिचा कॉमिकसेन्स अप्रतिम होता. त्यामुळे ती भूमिका करताना मला खूप मजा आली. तब्बल पाच वर्ष मी या मालिकेत काम केलं. त्यानंतर आता खलभुमिकेपेक्षा काहीतरी वेगळं करावं म्हणून सध्याच्या ‘माझ्या नवऱ्याची….’या मालिकेतील ‘जेनी’ची भूमिका निवडली. मालिकेचं कास्टिंग सुरु असताना मला ‘शनाया’च्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. पण ते नाकारून मी स्वतः जेनी साकारण्याचा निर्णय घेतला. सलग पाच वर्ष खलभूमिका साकारल्यानंतर लोकांच्या मनातील आपलं भूमिका बदलवणं हे सर्वस्वी माझ्या हातात होतं. ‘पुढचं पाऊल…’मधील रुपाली हे पात्र प्रमुख खलनायिकेच होतं. त्यामुळे आता जेनीची भूमिका छोटी आहे असं मला सांगण्यात आलं. पण काम करताना छोट-मोठं हा फरक मी कधीचं लक्षात घेत नाही. जेनी मला आवडली होती आणि हट्टाने मी जेनी साकारायचा निर्णय घेतला. माझ्या मते प्रत्येक भूमिका हि त्या गोष्टीसाठी तेवढीच महत्त्वाची असते. त्यामुळे मी कोणतीही भूमिका लहान अथवा मोठी असं अंतर करत नाही.  

अनुभावंतून शिकते…
आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात काही न काही घडतं असतं. त्यामुळे अभिनयासाठी कुठे काही वेगळं वाचायची किंवा शिकण्याची गरज नसते. आपलं आयुष्य हे एका पुस्तकासारखं आहे. आपण शांतपणे विचार केला तर प्रत्येक क्षणातून काहीतर शिकण्यासारख असतं हे आपल्या लक्षात येईल. मी हे तंतोतंत पाळते. त्यामुळे स्वतःची स्टोरी आपण लक्षात ठेवली आणि आठवली तर आपोआप डोळ्यांसमोर भावना येतात आणि त्यातून अभिनय खुलवण्यास मदत होते. त्यामुळे अनेकदा एकटी बसून राहून स्वतःचा विचार करून शिकत असते. तो एकटेपणा नसून स्वतःसाठी दिलेला वेळ असतो असं मी समजते.  

राऊडी भूमिका करायचीय...
‘आतंकवाद’ आणि ‘अंडरवर्ल्ड’शी निगडती गोष्टी वाचण्या आणि बघण्यापुरत्या खूप आवडतात. या गोष्टींना मी अजिबातच प्रोत्साहन देत नाहीये. परंतु अंडरवर्ल्डमधील एखादी भूमिका मला पडद्यावर साकारायला आवडेल. अत्यंत डार्क व्यक्तिरेखा असलेलं कोणतही पात्र मला साकारायची इच्छा आहे. या व्यक्तिरेखा साकारण खूप अवघड काम असतं असं मला वाटत. त्यांना समजून घेऊन त्यांचं विक्षिप्त पण कमाल पात्र पडद्यावर साकारायला मला नक्की आवडेल.

 सिम्पल ‘फॅशन’ आणि फिटनेस फंडा…
मला काय आवडतंय, आणि मला काय छान वाटतंय याकडे मी अधिक लक्ष देते. अनेकदा मी वेस्टर्न पेहरावात असते. तर पारंपरिक कार्यक्रम किंवा सणावारी साडी नेसणं मला आवडतं. मग साडीतही मला मॉडर्न साडी अजिबात आवडतं नाही. काठपदराची साडी आणि त्यावर पारंपरिक दागिने घालून मिरवणं मला खूप आवडतं. अगदी मुलींसारखं नाजूक-साजूक वावरणं मला पटत नाही. शिवाय माझा पेहराव इतरांना कसा वाटेल यापेक्षा तो मला आवडला की नाही याकडे माझा अधिक भर असतो. सोबतच फिटनेसच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, मी जिमला जात नाही. मी डाएट करतं नाही. मी सगळ्या गोष्टी मनसोक्त खाते. पण खाण्याच्या वेळा मी कटाक्षाने पाळते. कधी खायचं? कधी काय खायचं? या गोष्टींचा मी नेहमी विचार करते. प्रत्येक गोष्ट खाण्यापूर्वी मी माझ्या शरीराला याची खरचं आता गरज आहे का? याचा विचार करते. ‘पोट म्हणजे कचरा पेटी नव्हे’ हे मी कायम लक्षात ठेवते आणि त्यानुसार खाणं-पिणं सांभाळते. महत्त्वाचं म्हणजे खाताना मी नेहमी सकारात्मकतेने खाणं पसंत करते. एखादी गोष्ट मला आवडत असेल तर ती खाल्याने माझ्या किती कॅलरीज वाढतील? फॅट वाढेल का? असे विचार मी मनातही आणत नाही आणि कदाचित म्हणूनच मी फिट आहे.     

 नव्वदीचा काळ अनुभवते..
टिकटॉकवर व्हीडीओ बनवायला मला फार मजा येते. नव्वदीची गाणी आणि डायलॉग्जवर मला टिकटॉक करायला आवडतं. मी नव्वदच्या दशकातील चित्रपट आणि गाण्यांची प्रचंड चाहती आहे. मी अतिशय फिल्मी आहे. माझं आयुष्यही मला फिल्मी वाटतं. फिल्मस मला सकारात्मक उर्जा देतात. त्यामुळे माझं नव्वदीच्या काळावरील प्रेम मी टिकटॉकच्या माध्यमातून जगते, अनुभवते. त्यामुळे मी ते कायम करत राहीन.    

   रॅपिड फायर

 •    शर्मिला अभिनेत्री नसती तर?-शेफ किंवा खेळाडू किंवा गुप्तहेर (डीटेक्टीव) किंवा पोलीस किंवा देशासाठी सिक्रेट मिशनवर काम करणारी कोणतीही व्यक्ती.
 •   शर्मिलाचा आवडता सहकलाकार-अजिंक्य जोशी (‘पुढचं पाऊल’ मालिकेतील चिंत्या मामा)
 • शर्मिलाचा आवडती सहकलाकार-अजूनही शोधत आहे. 
 •   शर्मिलाचं आवडतं शहर मुंबई की पुणे-मुंबई  
 • शर्मिलाची आवडती भूमिका?-रुपाली (पुढचं पाऊल) 
 • शर्मिला अधिक वापरत असणार सोशल मिडिया ॲप?-इंस्टाग्राम 

मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)

Advertisements

गर्ल्स गॅंग मधली “रुमी” 
अन्विता फलटणकर

‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ च्या यशानंतर विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘गर्ल्स’ चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरपासून सगळ्यांच्या भेटीला येतं आहे. ‘मुलींची लहर, केला कहर’ अशी टॅगलाईन असणारं बोल्ड पोस्टर प्रदर्शित झालं.

‘गर्ल्स’ सिनेमाचं पोस्टर लॉन्च झाल्यानंतर पोस्टरमधील तीन अभिनेत्री कोण? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. या चित्रपटातील दोन व्यक्तिरेखा ‘मती (अंकिता लांडे)’ आणि ‘मॅगी (केतकी नारायण)’ अशी नावं प्रकाशात आल्यानंतर ‘रुमी’ नावाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री कोण असेल हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक होते. अखेर या चर्चेला पूर्णविराम लागला असून अभिनेत्री ‘अन्विता फलटणकर’ ने ‘रुमी’ साकारल्याचे स्पष्ट झालं आहे. ‘प्रेमात फिगर नाही, जिगर पाहायचा असतो…’ असं म्हणत तिच्या हटके अंदाजात ‘गर्ल्स’ मधील तिच्या आगळ्यावेगळ्या भूमिकेबद्दल आणि तिच्या एकूण प्रवासाबद्दल अन्विताने ‘प्लॅनेट मराठी मॅगझीन’ सोबत या दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. वाचा त्याविषयी…

झाली अभिनयाची सुरुवात…

चार वर्षांची असताना मी भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती आणि त्यातून चेहऱ्यावरील हावभाव हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग बनला. कालांतराने मी स्टेजवर काम करण्यास सुरुवात केली. मग मला अभिनयाची आवड वाटू लागली. हे काम करताना आपल्याला मज्जा येतेय हे लक्षात आलं आणि अधिकाधिक काम करायला लागले. शिवाय, स्टेजवर गेल्यावर आपल्यासाठी टाळ्या वाजतात हे भारी फिलिंग प्रेरणा देतं गेलं. मग शाळेच्या एकांकिका स्पर्धांमधून भाग घ्यायला सुरुवात केली. अभिनयासाठीची विविध पारितोषिकं मिळत गेली. खरं पाहता, मी पुढे येऊन अभिनयात करिअर करेन वैगरे… विचार त्यावेळी अजिबातच केला नव्हता. एका स्पर्धेत मला मी साकारलेल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा-पुरुष म्हणून बक्षिसं मिळाल्याचं अजूनही लक्षात आहे. त्यानंतर त्याचं स्पर्धेत सलग तीन वर्ष मला अभिनयासाठी बक्षिस मिळालं होतं. पहिलीत असताना एक जाहिरातीत काम केलं होतं पहिल्या जाहिरातीचं अप्रूप वाटतं होतचं पण, त्या कामासाठी मिळालेल्या पाचशे रुपयांतून माझं पाहिलं बँक खातं सुरु केल्याची गोड आठवणं कायम लक्षात राहिलीये. पुढे जाऊन ‘चतुर चौकडी’ नावाच्या मालिकेत काम केलं आणि अशाप्रकारे इंडस्ट्रीत पदार्पण केलं. 

वेगवेगळी काम करत राहिले…

अकरावीत असताना टाईमपास चित्रपटासाठी ऑडिशन दिलं आणि या चित्रपटातील ‘चंदा’ साकारायची संधी मिळाली. त्यानंतर साधारण वर्षभर ‘रुंजी’ मालिकेत काम केलं. बारावी झाल्यानंतर पुढील शिक्षणसाठी ललित कला केंद्र इथून बीए (नाट्य विभाग) चं शिक्षण पूर्ण केलं. ‘जर मी नाटकात बीए केलं नसतं, तर कदाचित माझं पदवीपर्यंत शिक्षण झालं नसतं’ असं मला वाटतं. शिक्षण झाल्यानंतर मुंबईत आल्यावर कामाच्या शोधात होते. त्याचवेळी ‘हास्यजत्रा’ केलं. हास्यजत्रा करण्याआधी छोट्यापडद्यावर कॉमेडी केली नसली तरी घरी नकला करणं हे माझं सुरु असायचं. ‘पु.ल…’ ऐकत लहानाची-मोठी झाली होते. त्यामुळे कॉमेडीचं टायमिंग आपोआप अवगत झालं होतं. 

स्वतःचा गैरसमज स्वतःचं मोडला…

‘वाय सो गंभीर’ या माझ्या नाटकाचे प्रयोग सुरु झाले होते. एके दिवशी अचानक मला फोन आला. ‘गर्ल्स’मधील प्रमुख भूमिकेसाठी ऑडिशन देण्यासाठी मला सांगण्यात आलं. परंतु, माझी शरीरयष्टी पाहता; मला लीड म्हणून का घेतील? आणि मला लीड रोल मिळूच शकणार नाही अशा विचारांची मी. त्यामुळे कदाचित नंतरच्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये एखादं छोटं काम मिळेल या विचाराने ऑडिशन दिलं. आठवड्याभरात मला त्यांचा परत फोन आला. तरीही एखाद्या छोट्या भूमिकेसाठी माझा विचार करत असावेत असं मला वाटलं. पण तीन प्रमुख अभिनेत्रींपैकी आपणही एक असल्याचं कळल्यावर आश्चर्याचा पण सुखद धक्का बसला. कारणं, माझा कधी कोणी प्रमुख भूमिकेसाठी विचारही करेल हे मलाच मान्य नव्हतं. अखेर आमच्या कामाला सुरुवात झाली. ‘गर्ल्स’चा दिग्दर्शक विशाल देवरुखकरच्या मते, त्याच्या डोक्यात असलेल्या ‘रुमी’ची छवी त्याला माझ्यात दिसली आणि मला ‘रुमी’ मिळाली. परंतु, रुमीचा जेवढा प्रेमावर विश्वास आहे तेवढा ‘अन्विता’चा अजिबात नाही हाच फरक मला, माझ्यात आणि ‘रुमी’मध्ये जाणवतो. ‘रुमी’कडून मी प्रामाणिकपणा शिकले. प्रत्येक नात्याबद्दल खूप प्रामाणिक असणारी माझी चित्रपटातील भूमिका खऱ्या आयुष्यात अगदी बेधडक आहे. शिवाय, मी माझं स्वतःच असं लीड म्हणून पोस्टर असेल असा विचारही केला नव्हता. ‘गर्ल्स’च्या निमित्ताने ते स्वप्नं सत्यात उतरल्याचं समाधान आहे. माझ्या एवढ्या वर्षांच्या कामांतील हे सगळ्यात मी करत असलेलं हे मोठ आणि प्रमुख भूमिकेतील पहिलचं काम असल्याने त्या गोष्टीचा खूप आनंद आहे. 

सतत काम करत राहायचंय….

‘गर्ल्स’ मधील ‘रुमी’ हि प्रमुख व्यक्तिरेखा असणारी भूमिका मला मिळाल्यानंतर माझा खऱ्या आयुष्यातही स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला आहे. या भूमिकेने मला एक वेगळा आत्मविश्वास दिला आहे. डान्सर असले तर माझं संपूर्ण आयुष्य मी अशीचं ‘हेल्दी’ आहे आणि त्यामुळे स्वतःमध्ये एक न्यूनगंड बाळगणारी मी ‘रुमी’मुळे खूप बदलले आहे. मला मिळणारी भूमिका कोणती आहे आणि भूमिकेच्या उंचीपेक्षा मला मिळणाऱ्या प्रत्येक कामाचं सोनं करण्याच्या मी प्रयत्नात असते. त्यामुळे मला काम करायला आवडं आणि ते सतत करत राहण्याची इच्छा आहे.

अजय जयश्री उभारे
(प्लॅनेट मराठी)

अनेक गोष्टींचा शेवट पूर्णविरामाने होत असला तरी, याने मात्र ‘पूर्णविराम’ करतं त्याच्या अभिनयातील कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. पुढे विविध मालिकांमधून तो काम करत राहिला. त्यानंतर छोट्या पडद्यावर बसस्टॉपवरील प्रेमकथा उत्तम पद्धतीने रंगवत तो अनेक चाहत्यांचा लाडका ‘श्री’ बनला. 

‘प्लॅनेट मराठी मॅगझीन’च्या ‘स्टार ऑफ द विक’च्या माध्यमातून जाणून घेऊयात या इंजिनिअर असलेल्या अभिनेता शशांक केतकर विषयी….  

 •  संपूर्ण नाव : शशांक शिरीष केतकर  
 • जन्म तारीख आणि ठिकाण : १५ सप्टेंबर १९८५, सातारा   
 • शिक्षण : बीई इंस्ट्रूमेंटेशन,   एमईएम (मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट), सिडनी (ऑस्ट्रेलिया) 

अन् मी अभिनय करायचं ठरवलं….

शाळेत असताना अभ्यासाव्यतिरिक्त मला लिखाणाची आवडं होती. त्यात माझे अनेक मित्र शाळेतील विविध नाटकांमध्ये अभिनय करत असतं. त्यामुळे शाळेत असल्यापासूनचं अभिनयाची आवडं निर्माण झाली होती आणि त्यातुनच आपणही कलाक्षेत्राशी निगडीत काहीतरी करावं असं मनाशी ठरवलं होतं. पण या गोष्टीला मी कधी वाचा फुटू दिली नव्हती. शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यावर मला स्वतःचा विचार करायला वेळ मिळाला. मला नेमकं काय करायचंय… याचा विचार तिथून सुरु झाला. हा सगळा विचार करतं असताना माझं शिक्षणही पूर्ण केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील ‘मराठी मंडळ’, ‘मराठी रेडिओ’, ‘मराठी शाळा’ अशा विविध उपक्रमांत मी भाग घ्यायला सुरुवात केली. या उपक्रमातील माझ्या कामाला तिथल्या अनेकांनी दुजोरा दिला आणि मग आपण अभिनय क्षेत्रचं करिअर म्हणून निवडायचं पक्कं केलं. २०१० मध्ये भारतात परतल्यानंतर २०११ ते २०१९ अशी नऊ वर्ष मी या क्षेत्रात कार्यरत आहे. ‘पूर्णविराम’ या प्रायोगिक नाटकातून माझं पदार्पण झालं. त्यानंतर ऑडिशन देतं आणि नव्या भूमिका करत आजवरचा प्रवास आनंदाने सुरु आहे. 

शाश्वतीपेक्षा समाधान महत्त्वाचं…

अभिनय क्षेत्र हे कामाच्या बाबतीत शाश्वत नसतं हे जरी खरं असलं तरी, काम मिळेल अथवा न मिळेल यापेक्षा मी करतं असलेल्या कामातून मला समाधान मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. शिवाय या क्षेत्रात काम करताना योग्य माणसं आणि मार्गदर्शन मला मिळतं गेलं. ‘पूर्णविराम’नंतर ऑडिशन्सच्या माध्यमातून कामासाठीची धडपड सुरु झाली. माझ्या सुदैवाने ऑडिशन देतं असताना मला फार जास्त नकार मिळाले नाही. मला नेमकं काय करायचंय हे डोक्यात अगदी निश्चित होतं. अगोदर काम केलं नसलं तरी, काय करायचं असतं? आणि आपणं काय करायला हवं… याचा अनुभव नक्कीच होता. शिवाय, इंजिनिअर असल्यामुळे मी बऱ्यापैकी स्मार्ट होतो. खरंतर या इंडस्ट्रीत वावरायचं कसं याचं बेसिक मी तिकडून शिकलो होतो. इंजिनिअरिंग झाल्यानंतर अभिनय क्षेत्र निवडलं, त्यावेळी डिग्री वाया जातं असल्याचं अनेकांनी सांगितलं. पण माझ्यासाठी ‘इंजिनिअरींग हि केवळ एक डिग्री नसून एक वेगळा अॅटीट्युड आहे’असं मला वाटतं. त्यातूनच आयुष्याकडे बघण्याची सकारात्मक उर्जा आणि आत्मविश्वास मिळाला होता. या आत्मविश्वासासह इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यामुळे अनेक गोष्टी बऱ्यापैकी सोप्या झाल्या. काम मिळवताना फसवणूक होणं, ऑडिशनच्या नावाखाली पैशांची लूट होणं असे प्रकार माझ्याबाबतीत घडले नाहीत ते केवळ माझ्यातील आत्मविश्वासामुळे.

 वेगळी भूमिका.. 

‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकामध्ये मी साकारत असलेली भूमिका अत्यंत वेगळी आहे. ज्यांनी अगोदरच हे नाटकं पाहिलं असेल त्यांना मी काम करतं असलेलं नवं नाटकं पाहून या नाटकातील आणि माझ्या भूमिकेतील वेगळेपण नक्कीचं लक्षात येईल. त्यामुळे माझ्या सगळ्या भूमिकांपेक्षा हि एक वेगळी भूमिका मी करतोय. शिवाय येत्या काळात माझे दोन नवीन चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणारं आहेत.  

 प्रेक्षकांसाठी सर्वकाही…

आपल्याकडे चित्रपट फक्त घडतात, ते कितपत पहिले जातात हा एक वेगळाच मुद्दा आहे. शंभर चित्रपट झाले तर त्यातील अगदी काहीच चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. याउलट, आपल्याकडील सर्वाधिक प्रेक्षकवर्ग टिव्ही मालिकांना अधिक पसंती देणारा आहे. त्यामुळे त्यांना जे हवं आहे ते देणं आपलं कर्तव्य आहे या मताचा मी आहे. एकदा सहजच घरी असताना एक गाणं गुणगुणलं आणि ते सोशलसाईट्सवर अपलोड केलं आणि त्यातूनच प्रेक्षकांसाठी ‘सुरेल संडे’ची सुरुवात झाली. मग यासाठी अनेकदा चाहत्यांकडून वेगवेगळ्या गाण्यांची फर्माईश होते. आतापर्यंत ‘सुरेल संडे’चे साधारणपणे चाळीस रविवार झाले आहेत. हल्ली रोजचं प्रेक्षकांची रिक्वेस्ट असते. तर अनेकदा त्यांच्यासाठी एखाद्या ठराविक गाण्याचा हट्टही पुरवणं मला आवडतं. केवळ आवडं म्हणून सुरु केलेल्या या उपक्रमालाही प्रेक्षक दिलखुलासपणे दाद देतात याचा आनंद आहे.      

 दुर्लक्ष करणंचं योग्य…

अनेकदा कलाकारांना विविध कारणांसाठी ट्रोल केलं जातं. परंतु माझ्यासोबत असं ट्रोलिंग झालं तर त्याकडे दुर्लक्ष करणं मी पसंत करतो. तुम्ही प्रसिद्ध असता म्हणूनच तुमचं ट्रोलिंग होतं. त्यामुळे ट्रोलिंगला आणि ट्रोल करणाऱ्यांकडे काणा डोळा करण्यावर माझा भर असतो. पण हे ट्रोलर ज्यावेळी व्यक्तिगत जीवनावर भाष्य अथवा टिका करायला सुरुवात करतात त्यावेळी मात्र त्यांना वेळीच चोखं उत्तरही देतो. 

काही गोष्टी खुपतायतं…

आपली इंडस्ट्री खूप छान आहे. परंतु इथल्या काही गोष्टी मला नक्कीचं खुपतात. आपल्याकडील पैशांच्या बाबतीत आणि वेळेच्या बाबतीत गृहीत धरलं जाणं मला न आवडणारी बाब आहे. शिवाय, प्रेक्षकांना फार गृहीत धरलं जात ही मला न पटणारी गोष्ट आहे. आपल्याकडील प्रेक्षक सुजाण आहे. त्यांनाही वेगळं आणि क्रिएटिव्ह बघायला नक्कीचं आवडतं. नेहमी वेगळं आणि उत्तमोत्तम गोष्टी बघण्याकडे त्यांचा भर असतो. पण दिग्दर्शक चौकटीबाहेर जाऊन करण्यास घाबरतो आणि प्रेक्षकही चांगल्या कलाकृतीला मुकतात याचं दु:ख वाटतं. २००० ते २०१९ हा एकोणीस वर्षांचा प्रवास हा फक्त कॅलेंडरने केला असं वाटतं. कारणं प्रेक्षकांसमोर सादर होणाऱ्या भूमिका या त्याचं-त्याचं पद्धतीच्या असतात. काळ पुढे गेला त्यानुसार समाजही बदलायला हवा आणि त्या दृष्टीने नव्या आशयाचे सिनेमे आणि मालिका त्यांना बघता याव्यात असं मला वाटतं. टेलिव्हिजन हे हा बदल घडवण्याच एक उत्तम माध्यम आहे. त्यामुळे सतत स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि कालांतराने त्यांचं सुपरवुमन होणं, अशा कथा आत्तातरी थांबायला हव्यात. त्यात मीही इंडस्ट्रीचा एक छोटा भाग आहे. हे सगळं बदलणं जरी माझ्या हातात नसलं तरी हे चित्र बदलावं असं मला वाटतं.       

 नव्या बिझनेसची सुरुवात…

शाळेत असल्यापासून आपलंही एक हॉटेल असावं असं एक स्वप्नं पाहिलं होतं. ते स्वप्न पूर्णही झालं. पुण्यात ‘आईच्या गावात’ या नावाने हॉटेलही सुरु केलं. इंजिनिअर त्यानंतर अभिनेता आणि मग स्वतःच हॉटेल असा वेगळा प्रवास होता. परंतु नुकतंच मी हे हॉटेल बंद केलं आहे. लवकरच एका नव्या रुपात आणि नव्या व्यवसायासह सगळ्यांसमोर येणारं आहे. फिरणं माझा आवडता छंद…

माझ्या अभिनय, होस्टिंग अश्या आवडींबरोबरीने मला कुकिंग, ट्रॅव्हलिंग, स्विमिंग करणं आवडतं. शिवाय गाण्याची आवडं आहे. वर्षातून एकदातरी फॉरेन-टूर करण्याचं मी ठरवलं आहे. यावर्षी माझी बायको प्रियांका आणि मी, आम्ही ऑस्ट्रेलियाला जाऊन आलो. शिक्षणासाठी, मग नाटकाच्या दौऱ्यानिम्मित आणि आता फिरण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाऊन आलो. आतापर्यंत जगातील तब्बल वीस देश माझे फिरून झाले आहेत. आता हा एक टप्पा बघून झाला आहे. अजून बरेचं देश फिरायचे आहे. सोपा फिटनेस मंत्रमी शाकाहारी असल्यामुळे हलक-पुलक खाण्याकडे माझा अधिक भर असतो. काम झाल्यानंतर व्यवस्थित आराम करणं. वेळोवेळी जिम करणं मला आवडत.  

       रॅपिड फायर  

 • शशांक अभिनेता नसता तर?-शेफ 
 •  शशांकची आवडती अभिनेत्री-कोंकना सेन शर्मा आणि मुक्ता बर्वे  
 • शशांकचा विक पॉईंट?-पेट्स (कुत्रे) 
 • शशांकने बनवलेली आणि आवडती डिश?-मसाला आंबोळी  
 • सगळ्यात अधिक वापर जाणारं app?-इंस्टाग्राम आणि गुगल

मराठी आणि हिंदीच नव्हे तर तामिळ आणि कन्नड भाषिक चित्रपटांमधूनही तिने प्रसिद्धी मिळवली. 
अभिनय, नृत्य आणि मॉडेलिंग अशा तीनही क्षेत्रांत तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘राधा हि बावरी’ म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला आलेली डॉक्टर राधा, तर ‘मोहन’ अशी हाक मारणारी सगळ्यांची लाडकी परी. 
अभिनय क्षेत्रातील अनुभवांसोबतच अनेक किस्से आणि तिच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगते आहे अभिनेत्री ‘श्रुती मराठे’.  

 •  संपूर्ण नाव : श्रुती परशुराम मराठे
 •  जन्म तारीख आणि ठिकाण : ९ ऑक्टोबर १९८६
 • वडोदरा (गुजरात)
 • लग्नाचा वाढदिवस : ४ डिसेंबर
 • शिक्षण : बीए (इंग्रजी साहित्य) 

अन् ‘मी’ अभिनेत्री झाले…
अनेकजण लहानपणीच आपण भविष्यात काय करावं हे ठरवतात. परंतु अभिनय क्षेत्रात करिअर करावं असं मी अजिबात ठरवलं नव्हतं. शाळेत असताना विविध कार्यक्रमात अभिनय करण्यासाठी सहभागी व्हायचे. पण ते अगदी तेवढ्या पुरतच मर्यादित असायचं. याउलट मला डान्स करण्याची अधिक आवडं असल्यामुळे चार वर्ष ‘कथ्थक’ आणि तीन वर्ष ‘भरतनाट्यम’चं प्रशिक्षण घेतलं आहे. डान्सचीच विशेष आवडं असल्यामुळे मी ती कला जोपासत होते. कालांतराने हळूहळू आपोआपच अभिनय करण्याची आवडं वाटू लागली. सुरुवातीला, अभिनय करायचा म्हणजे नेमकं काय करावं याची अजिबातच माहिती नव्हती. पण अभिनय करायचा आणि त्यात करीअर करायचं हे मात्र स्वतःशी पक्क केलं होत. मी दहावीत असताना स्मिता तळवलकर आणि संजय सूरकर दिग्दर्शित ‘पेशवाई’ नावाच्या मालिकेत सर्वप्रथम काम केलं होत आणि त्यानंतर माझा हा प्रवास सुरु झाला. 
 ‘गॉडफादर’ पेक्षा मेहनत महत्वाची… 
इंडस्ट्रीमध्ये काम मिळवायचं असेल तर आपल्यामागे कोणी ‘गॉडफादर’ असावा हा समाजच मुळात अत्यंत चुकीचा आहे. मराठीतील अनेक कलाकार आजवर त्यांनी केलेल्या मेहनतीच्या जोरावर यशस्वी झाले आहेत. त्यामुळे ‘गॉडफादर’ म्हणून कोणाचाही वरदहस्त असण्यापेक्षा मेहनतीवर अधिक लक्ष असावं या मताची मी आहे. हिंदी मालिका आणि सिनेविश्वामध्ये कदाचित ‘गॉडफादर’ची गरज भासत असेल. परंतु आपल्याकडे मात्र मेहनत अतिशय गरजेची असते.  `

कास्टिंग काऊच’ मराठीत? 
साधारण दोन-तीन वर्षांपूर्वीची घटना आहे. अभिनय क्षेत्रात व्यवस्थित जम बसवल्यानंतर एका मराठी चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मी गेले असताना एक विचित्र अनुभव मला आला. मराठीत हा अनुभव मला आला हे विशेष. कास्टिंग आणि इतर सगळ्या गोष्टी ठरल्या. त्यानंतर चित्रपटच्या फायनान्सरला मला भेटायचं होतं. म्हणून एका रेस्टॉरंटमध्ये भेटायचं ठरलं. माझं मानधन सांगितल्यानंतर त्या माणसाने मला विचारलेले प्रश्न चक्रावणारे होते. त्यानंतर मात्र मी शांत बसले नाही, त्या व्यक्तिला सडेतोड उत्तरं दिलंच, सोबतच त्याला त्या फिल्म मधून बाहेरही काढण्यात आलं. 

भाषेसोबत भूमिकाही महत्वाची….
मराठी इंडस्ट्रीच्या तुलनेत दाक्षिणात्य सिनेविश्व विविध गोष्टींच्या बाबतीत खूप मोठं आहे. खरतरं मी दाक्षिणात्य प्रोजेक्ट्समध्ये काम करण सोडलं नसतं. पण मला ती भाषा येतं नव्हती आणि भाषेच्या अडचणीमुळे कलाकार म्हणून तिथे काम करण्याचा कंटाळा आल्याकारणाने तिथे काम करणं सोडलं. सुरुवातीला कामचलाऊ तमिळ बोलाया शिकलेही. पण एका वळणार संपूर्ण तमिळ शिकून इथेच राहीन नाहीतर हे सोडून देईन असं मनाशी पक्क केलं होत. शिवाय दोन्ही एकाच वेळी संभाळण कठीण जात असल्यामुळे दाक्षिणात्य सिनेमाला रामराम केला. मुळात भाषा येत नसल्यामुळे मला मिळणाऱ्या सगळ्या भूमिका ‘ग्लॅमरस’ होत्या. एखाद्या चित्रपटासाठी छान दिसणं, छान नटण हे मस्त वाटलं. पण सतत त्याचं त्या भूमिका करणं मला आवडतं नसे. मी करत असलेल्या कामातून नाविन्य हरवल्याच माझं मलाच लक्षात आलं आणि अखेर मी तिथे काम करणं सोडलं. परंतु, चांगली आणि वेगळी भूमिका मिळाल्यास संपूर्ण तमिळ भाषा शिकून नक्की काम करेन हे मात्र नक्की.   
अखेर ‘राधा’ मिळाली…
दाक्षिणात्य सिनेविश्व सोडून मराठीत आले. तरी मराठीत आल्यानंतरही सुरुवातीचे एक-दीड वर्ष मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर मला ‘राधा हि बावरी’ या मालिकेत मुख्य अभिनेत्रीची भूमिका मिळाली. ‘राधा…..’ मधील माझी भूमिका अत्यंत शांत आणि लाजऱ्या मुलीची होती. पण माझा मूळ स्वभाव अगदी या भूमिकेच्या विरुद्ध असल्यामुळे सेटवर अनेक किस्से घडायचे. शूट सुरु झाल्यानंतर दिग्दर्शकांना अनेकदा मला अनेक गोष्टी सांगाव्या लागतं. अनेकदा, ‘हावभाव कमी कर..’, ‘अगं, श्रुती कमी बोल… तुला कमी बोलायचं या भूमिकेसाठी’ असं आठवण करून द्यावी लागायची. त्यामुळे राधा सारखं वागणं मला खरचं अवघड गेलं. अत्यंत बडबडी आणि बोलका चेहरा असल्याने मला ‘राधा’ साकारण अवघड जात होत. पण आमचे दिग्दर्शक विरेन प्रधान यांनी माझ्याकडून ते उत्तम पद्धतीने करून घेतलं. 

“कडक” भूमिकेच्या शोधात…
काम करताना माझ्यासाठी भाषा फार जास्त महत्त्वाची नसते. भूमिका खूपच वेगळी आणि छान असेल तर कोणत्याही भाषेपेक्षा मी त्या भूमिकेला आणि कामाला अधिक महत्व देते. मालिका, वेब आणि सिनेमा यांबद्दल बोलायचं झाल्यास, सर्वसामान्य लोकांना मालिकांचं अधिक आकर्षण असतं असं मला वाटतं. त्यांना ती कथा रोज पाहता येते, आणि आम्हा कलाकारांना त्यानिमित्ताने रोज त्यांच्यापर्यंत त्यांच्या घरी पोहचता येतं. एखाद्या मालिकेला पूर्णविराम लागला की, अगदी दुसऱ्याच दिवशी ‘नवी मालिका कधी?’, ‘नवी मालिका कोणती?’ असं विचारणारे मेसेज येतात. मालिका संपल्यानंतरच्या काळातील मधली प्रोसेस त्यांना न कळणारी असते. प्रेक्षकांना नेहमीच कलाकारांना मालिकेत बघायला आवडतं. पण मला चित्रपटामध्ये काम करणं अधिक आवडतं. कारणं एक अभिनेत्री म्हणून मला अनेक नव्या करायला आणि शिकायला मिळतात. त्यातून नवनवी आव्हानं मिळतात त्यातून नवनवीन अनुभव मिळतात म्हणून मला चित्रपटांमध्ये काम करणं सर्वाधिक आवडतं. पण प्रसिद्धीच्या दृष्टीने सांगायचं झाल्यास, मालिकेमुळे अजूनही लोकं ओळखतात ‘राधा….’ आणि ‘जागो मोहन प्यारे’मधील माझं काम लोकांच्या अजूनही लक्षात आहे. त्यामुळे मालिकाही तेवढ्याच जवळच्या आहेत. 

नेहमीच नवं करण्याच्या प्रयत्नांत…
आजवर केलेलं प्रत्येक काम मी वेगळं करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. ‘राधा हि बावरी’ मधील भूमिका माझ्या स्वभावामुळे आव्हानात्मक होती. तर ‘रमा माधव’ सारख्या ऐतिहासिक चित्रपटात ‘पार्वतीबाई’ साकारण हे वेगळी मेहनत होती. शिवाय, ‘जागो मोहन प्यारे’मधील मी साकारलेली मोलकरीण मला कधी साकारता येईल असं वाटलंही नव्हतं. मोलकरणीचा अभिनय मी करू शकेन का? कसं करता येईल? त्यासाठी काय वेगळी तयारी करावी? असे नानाविध प्रश्न काम करताना डोक्यात असायचे. शिवाय भूमिकेसाठी वेगळी गावरान भाषा मला जमेल का? अशा संभ्रमात असणाऱ्या मला तेही व्यवस्थित जमलं. त्यामुळे माझ्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका मी वेगळ्या पद्धतीने साकारण्यासाठी मेहनत घेत राहिले आणि प्रेक्षकांनाही माझं काम आवडतं गेलं. हल्लीच नेटफ्लिक्स वरील ‘बार्ड ऑफ ब्लड’ नामक सिरीजमध्येही मी काम केलं आहे. त्यातीलही माझी भूमिका फार वेगळी आहे. प्रेक्षकांनाही ती नक्की आवडेल असा विश्वास आहे.   

अभिनय आवडतो कारण…
हल्लीच एका फोटोशूट दरम्यानचा किस्सा आहे. मेकअप आणि हेअर्स करता तासनतास बसायला मला खूप कंटाळा येतो. त्यामुळे प्रत्येक वेळी माझ्या मेकअप आर्टीस्ट आणि हेअर ड्रेसर्सना सतत घाई करायला सांगते. खरंतर एक-दीड तास आरशासमोर बसून राहणं, नट्टापट्टा करणं मला अनेकदा ‘वेस्ट ऑफ टाइम’ वाटतं. त्यामुळे मला अभिनय जास्त आवडतो कारण या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त कामावर लक्ष केंद्रित करता येतं. त्यामुळे अभिनय आणि मॉडलिंग या दोघांमधून मी अभिनयाची निवड करेन.

झाली लव्हस्टोरीला सुरुवात…
मी आणि गौवरने ‘तुझी माझी लव्हस्टोरी’ नावाच्या सिनेमात एकत्र काम केलं होत. चित्रीकरण सुरु असताना आम्ही खूप चांगले मित्र-मैत्रीण होतो. काम संपल्यानंतर साधारणपणे सहा-आठ महिन्यानंतर आमची मैत्री वाढली आणि मग हळूहळू आम्ही प्रेमात पडलो. त्यानंतर ४ डिसेंबर २०१६ ला आम्ही लग्न केलं. 

‘टिकटॉक’चा टी-ब्रेक…
‘टिकटॉक’वर मला फॉलो करणारा बराचसा मराठी क्राउड आहे. आधी मला यात अजिबात रस नव्हता. पण ‘जागो मोहन…’च्या सेटवरील टिकटॉकप्रेमी सहकलाकारांमुळे मला त्याची सवय लागली आणि मलाही ते आवडायला आणि जमायला लागलं. आता टिकटॉकवर छोटे-छोटे व्हिडीओ करायला मजा येते. मी ते खूप सिरिअसली घेत नसले तरी एक विरंगुळा म्हणून तो एक छान मार्ग आहे. त्यामुळे रिकाम्या वेळेत किंवा अगदी दोन शॉट्स दरम्यानच्या वेळेतील माझा टी-ब्रेक म्हणजे ‘टिकटॉक ब्रेक’ असतो. 

दुर्लक्ष करणं योग्यचं…
माझ्या अनेक सोशल मिडिया पोस्ट वरून ‘श्रुती’ बोल्ड अभिनेत्री म्हणून लोकांसमोर येते. मुळात सोशल मिडियाच्या माध्यमातून आपणच लोकांना सूट देत असतो. आपले फोटो, व्हिडीओ किंवा कोणत्याही पोस्टवर व्यक्त होण्याचा मार्ग आपण सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांना खुला करून देत असतो. मग त्यामुळे माझ्यावर होणाऱ्या टिकांवर मी किती लक्ष द्यायला हवं हे मी ठरवते. माझ्या वजनावरून, किंवा मी कंटाळलेल्या चेहऱ्यातील एखादा फोटो टाकला तर त्यावरूनही टिका होतं असते. पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत माझ्या कामाला अधिक महत्व देत. काम करत राहते. शिवाय, इंडस्ट्रीत काम हवं असेल तर जाड असणं धोक्याचं असतं हा समज आता मागे पडत चालला आहे. तुमच्या दिसण्यापेक्षा आणि तुम्ही कोण आहात, यापेक्षा कामाला अधिक महत्व दिलं जात याचं समाधान आहे. 

अभिनेत्रीही असतात मैत्रिणी….
नेहा पेंडसे, हेमांगी कवी, संस्कृती बालगुडे या माझ्या अत्यंत जवळच्या इंडस्ट्रीमधील मैत्रिणी आहेत. त्यामुळे दोन अभिनेत्री मैत्रिणी असतात याचं उत्तरं माझ्यासाठी तर ‘होय’ असंच आहे. तुमची मैत्री तुम्ही कशी जपता आणि टिकवता यावर मैत्रीचं नातं अवलंबून असतं. त्यामुळे आमच्या मैत्रीमध्ये आम्हाला मिळणाऱ्या कामांवरून कधीच वाद झाले नाहीत. उलट प्रत्येकवेळी, प्रत्येकाच्या कामाचं कौतुक करत आणि त्यांना पाठींबा देत आम्ही पुढे चालत असतो. त्यामुळे मैत्री खूप चांगली राहू शकते यात शंका नाही. सुदैवाने माझ्या मैत्रिणी फक्त मैत्रिणी नसून ‘खरंचं-मैत्रिणी’ आहेत. त्यामुळे चांगल्या कामाचं कौतुक आणि वाईट काम सुधारण्याची उर्जा माझ्या मैत्रिणींकडूनचं मिळते.       

रॅपीड फायर 
० अभिनय आणि डान्स व्यतिरिक्त काय आवडतं?
-ट्रेकिंग, फिरणं आणि अडव्हेनचर असणाऱ्या सगळ्या गोष्टी 

० अभिनय, डान्स की मॉडलिंग
-अभिनय आणि डान्स 

० जवळचे मित्र-मैत्रिणी  
-इंडस्ट्रीमधील – नेहा पेंडसे, हेमांगी कवी, संस्कृती बालगुडे, अभिजित खांडकेकर.
इंडस्ट्री बाहेरील – ज्ञानदा (कॉलेजमधील मैत्रीण)

० आवडतं सोशल मिडिया अप 
-इंस्टाग्राम
   

सहा जिगरी आणि फंडू दोस्तांची दुनियादारी करत त्यानं अनेकांची मनं जिंकली.

 ‘दिल दोस्ती दुनियादारी’ म्हणत सगळ्यांच्या भेटीला आलेला शिस्तप्रिय आणि शांत सुजय, शिकारीमधील वेगळ्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनला. “प्लॅनेट मराठी मॅगझीन” च्या ‘स्टार ऑफ द विक’ च्या माध्यमातून जाणून घेऊयात या दिलखुलास आणि स्पष्टवक्ता असलेल्या अभिनेता “सुव्रत जोशी” विषयी….  

 • संपूर्ण नाव : सुव्रत शेखर जोशी
 • जन्म तारीख आणि ठिकाण : २२ एप्रिल १९८५, पुणे 
 • लग्नाचा वाढदिवस : ११ एप्रिल
 • शिक्षण : फर्ग्युसन कॉलेज, पुणे
 • नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) दिल्ली

सुव्रत, अभिनय आणि करीअर…

माझ्या घरी नाटक आणि चित्रपट बघण्याचं वातवरण होत. माझे वडील पत्रकार होते. शिवाय, ते चित्रपटांसाठी लिखाणही करायचे. त्यामुळे लहानपणापासूनच मला ते अनेक नाटकं आणि सिनेमा बघायला घेऊन जायचे. म्हणून अगदी माझ्या लहानपणापासूनच या संपूर्ण माध्यमाविषयी खूप आवड आणि कुतूहलही होत. माझ्या या आवडीपोटी शाळेत असल्यापासूनच नाटकांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया अशा विविध कॅम्पस थिएटरची परंपरा असलेल्या स्पर्धांच्या निमित्ताने विविध एकांकिका आणि नाटकांमध्ये मी सातत्याने काम करायला लागलो. अखेर कॉलेजच्या संपूर्ण पाच वर्षाच्या प्रवासात आपण फक्त आणि फक्त ‘नाटकं’चं केल्याचं लक्षात आलं आणि म्हणून मी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. मला जेवढा अभिनय करायला आवडतो तेवढं मला इतर काही आवडत नाही. त्यामुळे माझ्या आवडीपोटी मी अभिनय क्षेत्रात उडी घेतली. सोबतच, डॉ. श्रीराम लागू यांनी नाट्यक्षेत्रात सर्व्वोत्तम काम करणाऱ्यासाठी ‘तन्वीर सन्मान’ पुरस्काराची सुरुवात केली होती. तो पहिला पुरस्कार डॉ. इब्राहिम अल्का जेजे यांना मिळाला आणि त्यांना बघूनच माझा अभिनय क्षेत्रात येण्याच्या निर्णयाला प्रोत्साहन मिळालं. पुण्यातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी दिल्लीत एनएसडीमध्ये प्रवेश मिळवला. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही अनेक वर्ष मी दिल्लीत नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘किंगडम ऑफ ड्रीम्स’ या थिएटरच्या एका नाटकात मला मुख्य भूमिका मिळाली आणि तिचं माझ्या पहिल्या व्यावसाईक कामाची सुरुवात होती.         

वेगळ्या भूमिकांच्या शोधात…

‘दिल दोस्ती….’ नंतर मालिकांमध्ये काम करण्याच्या ज्या कमी ऑफर्स आल्या त्या ‘दिल दोस्ती…’मधील माझ्या भुमिकेसारख्याच होत्या. त्यामुळे त्या मालिका आणि तसेच रोल पुन्हा करण्यात मला रस वाटला नाही. माझ्यामते, आपण एकदा केलेलं काम आणि त्यानंतर पुन्हा तसचं काम करणं हे प्रेक्षकांच्या दृष्टीने मलाही कंटाळवाण वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे, मालिकांमध्ये काम करायचं असेल तर त्या मालिकेचा लेखक अत्यंत चांगला असणं खूप गरजेचं आहे. वेगळी कथा, वेगळे सिन्स आणि वेगळा अभिनय हा फार महत्वाचा आहे असं मला वाटतं. मुळात वास्तवाशी जवळीक साधणारा अभिनय आणि कथा असाव्यात असं मला वाटतं. परंतु दुर्दैवाने फार कमी मालिकांमध्ये असं चित्र पहायला मिळतं. त्यामुळे मला हवी तशी वेगळी मालिका न मिळाल्यामुळे मी ‘दिल दोस्ती…’नंतर कोणतीही मालिका स्वीकारली नाही.

मालिका, वेब, नाटक की चित्रपट

मला नाटक सर्वाधिक आवडतं. नाटकाइतकी सुंदर गोष्ट मनुष्याने आजपर्यंत बनवली नाहीये असं मला मनोमन वाटतं. मला चित्रपट बघायला खूप आवडतात. अर्थात, त्यात काम करणही आवडतं. परंतु त्या माध्यमात मी अजून शिकत आहे आणि अजून बरंच काही शिकण्यासारखं आहे. त्यामुळे चित्रपट आणि वेब (लॉंग फॉर्म सिरीज) मध्ये काम करण्याची दाट इच्छा आहे. वेबमुळे लोकांमध्ये नवनवीन पद्धतीचा वेगळा कॉन्टेंट तयार करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. माझ्या संकल्पनेतून पुढे आलेला ‘भारतीय डिजिटल पार्टी (भाडीपा)’च्या ‘विषय खोल’ या चॅनलसाठी ‘व्ही-मॅन’ नावाचा एक नवा कार्यक्रम केला आहे. विशेष म्हणजे त्या कार्यक्रमासाठी मी सहलेखक म्हणूनही काम केलं आहे. वेब हे एक वेगळ आणि मनोरंजक माध्यम आहे त्यामुळे ते काम करताना खूप मजा आली. मला अनेक वर्षात कोणतीही मालिका बघताना फार मजा आली नाही. ‘दिल दोस्ती…’ करताना आम्हाला खूप मजा आली तशी मजा प्रेक्षकांनाही आली असेल. प्रेक्षकांनीही त्याबद्दल आवर्जून सांगावं.

‘शिकारी’चा सुखद धक्का…

महेश मांजरेकर सर आणि विजू माने यांनी माझं ‘अमर फोटो स्टुडिओ’मधील काम पाहिलं होतं.  त्यानंतर मी ‘आषाढ बार’नावाचं प्रायोगिक नाटकं करत होतो. ते बघण्यासाठी विजूसर आले होते आणि तो प्रयोग झाल्यावर त्यांनी मला ‘शिकारी’साठी विचारलं. खरतर, ‘शिकारी’ माझ्याकडे आला त्यावेळी मलाच आश्चर्याचा पण सुखद धक्का बसला होता. कारण , तोपर्यंत मी साकारलेल्या सगळ्याचं भूमिका अत्यंत सहृदयी आणि चांगला व्यक्तिमत्वाच्या होत्या. त्यामुळे विजूसर ज्यावेळी माझ्याकडे आले त्यावेळी मात्र खूप आनंद झाला होता. माझ्यापेक्षा ‘शिकारी’मधील माझी भूमिका अत्यंत वेगळी होती. एखादी भूमिका साकारताना त्यात खरेपणा यावा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे ‘शिकारी’च्या निमित्ताने वेगळ काम प्रेक्षकांसमोर घेऊन येण्याची संधी मला मिळाली. त्यात कोल्हापूरी ठसका असलेली भाषा मला बोलायची असल्याकारणाने ती भाषा शिकावी लागली. त्यासाठी माझा मित्र रोहित हळदीकर आणि विजूसरांनी मदत केली. मुख्यतः चित्रपटात एखादा बोल्ड सीन करताना तो विभस्त होऊन लोकांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असते. त्याबद्दल थोडी भीती होती परंतु विजूसरांनी सगळं छान जमवून आणलं होतं.      

नव्या भूमिका लवकरच….

अनेक गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित एका चित्रपटात मी काम केलं आहे. लवकरच तो चित्रपट सर्वांच्या भेटीला येईल अशी अपेक्षा आहे. (भाडीपा)’च्या ‘विषय खोल’ या चॅनलसाठी ‘व्ही-मॅन’ नावाचा एका नवा कार्यक्रम.शिवाय, ‘शाही पेहरेदार’ नावाचं हिंदी आणि उर्दू भाषेतील नाटकं करतोय. अप्रतिम संहिता असलेल्या या नाटकाचा प्रयोग नक्की बघा. २८ सप्टेंबरला मुंबईतील एनसीपीएलला सायंकाळी ७ वाजता हा प्रयोग आहे. ‘सत्ता आणि हिंसा’, ‘ड्युटी आणि दोस्ती’ यांच्यावर भाष्य करणार हे नाटकं नक्की बघा. त्याव्यतिरिक्त समीर जोशी यांच्या पुढील चित्रपटात काम करतोय. अत्यंत गोड आणि कौटुंबिक गोष्ट असलेल्या या चित्रपटाविषयी तूर्तास काही सांगत नाही.

तिची माझी लव्हस्टोरी….

सखी आणि माझ कसं जमलं असा प्रश्न अनेकांना पडतो. पण कसं जमलं यापेक्षा कुठल्याही नात्यात आपण प्रामाणिक असणं महत्वाचं असतं असं मला वाटतं. कोणतीही घाई न करता एकमेकांना समजून घेऊन निर्णय घेणं फार आवश्यक असतं. सखी आणि मी लग्न करण्याआधीही बराच वेळ घेतला. ‘दिल दोस्तीच्या…’सेटवर आमची पहिली भेट झाली. आमच्यात एकमेकांविषयी आकर्षण होतं. त्यामुळे सुरुवातीचे काही महिने आम्ही या नात्याबद्दल फारसे गंभीर नव्हतो. ज्याप्रकारे आम्ही दोघही स्वतंत्र आणि मुक्त विचारांचे आहोत. आमचं स्वातंत्र्य अबाधित राहावं याची आम्हा दोघांनाही काळजी आणि इच्छा असते. त्यामुळे सिरिअस कमिटमेंटमध्ये वैगरे नव्हतो. त्यानंतर मात्र आम्ही हळूहळू प्रेमात पडलो. मालिकेचा पहिला एपिसोड टेलिकास्ट होण्याआधीचं आम्ही एकमेकांसोबत होतो. लव्हस्टोरीपेक्षाही आम्हाला समानता हा गुण फार महत्वाचा वाटतो त्यामुळे आमच्या नात्यामध्येही सगळ्याचं गोष्टी समानतेने व्हाव्या यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आयुष्यातील प्रत्येक निर्णयात एकमेकांना खंबीरपाने पाठींबा देण्याची आमची कमिटमेंट आहे आणि तेच आमच्यासाठी खरं प्रेम आहे. शिवाय, ‘माणूस आणि कलाकार म्हणून आम्ही संपूर्ण आयुष्य एकत्र समृद्ध करणं’, हि आमची प्रेमाची व्याख्या आहे.       

सखी-सुव्रत जोडी पुन्हा एकत्र काम करणार…?

सखी आणि मला एकत्र काम करायला आवडेल. पण तेही संहितेवर अवलंबून आहे. आम्हाला दोघांनाही ती संहिता आवडायला पाहिजे. शिवाय एखाद्या नटाचं वैयक्तिक आयुष्य कुठल्याही ठिकाणी यावं असं वाटतं नाही. मला आणि सखीला आमचं वैयक्तिक आयुष्य जपायला खूप आवडतं. त्यामुळे सखी बरोबर प्रियकर किंवा मित्र अशा भूमिकांपलीकडे काही भूमिका असतील तर आम्हाला एकत्र काम करायला नक्की आवडेल.  

ड्रीम रोलची व्याख्या वेगळी…

माझ्या डोक्यात ड्रीम रोल वैगरे अजून नाही. पण मला नसरुद्दिन शहा, श्रीराम लागू, डॅनिअल डे-लुईस यांच्या सारखं काम करायला नक्की आवडेल. हे नट ज्या ताकतीने आणि पद्धतीने काम करतात त्या पद्धतीच काम मलाही करता यावं हे माझ ड्रीम आहे. कुठलाही रोल मिळाला तरी ते त्याचं ताकतीने कराव असं माझ नेहमी ड्रीम आहे.

बरंच काही खुपतंय…

इंडस्ट्रीमधील काही गोष्टी नक्कीचं खुपतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे कार्यनीती (Work Ethics) फार चांगले नाहीत. भारतीय मनोवृतीत असणारा बेशिस्त व्यवहार, मग तो वेळ पाळण्याच्या बाबतीत असो किंवा आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत. या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच प्रमाणात विषमताही आहे. नटांना आता सुदैवाने बरे पैसे मिळू लागले आहेत. परंतु, नटांव्यतिरिक्तच्या कलाकारांना (स्पॉटदादा, लाईटमन, बॅकस्टेज) अजूनही न्याय्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे आपला व्यवहार अधिक शिस्तशीर व्हायला हवा आणि या सगळ्यांना योग्य मोबदला मिळायला हवा. दुसरी गोष्ट म्हणजे, पत्रकारिता, विशेषतः ‘एंटटेनमेंट मिडिया’ ज्या पद्धतीने इंडस्ट्रीला विविध माध्यमातून सादर करत ते सादर करण्याची पद्धत मला खटकते. मालिकांमधील आयुष्य, आणि सेटवर केलेली मजा याचं गोष्टी दाखवल्यामुळे, फक्त मजा करायला जातात लोक असा एक भ्रम तयार केला जातो. खरंतर, मालिकांच आयुष्य अत्यंत स्ट्रेसफुल असतं, त्यामुळे फक्त गोड-गुलाबी बाजू दाखवण्यापेक्षा त्याची गंभीर बाजुही दाखवणं गरजेच आहे असं मला नक्की वाटतं.         

अभिनेता नसतो तर…

अभिनेता नसतो तर, मला शास्त्रीय गायक व्हायला नक्की आवडलं असतं. शिवाय शास्त्रज्ञ होणं, चित्रकलेची ओढ असल्यामुळे मला पेंटर होणंही आवडलं असतं. खर पाहता मला बरंच काही-काही करून बघायला आवडलं असतं. ट्रेकिंगची प्रचंड आवड असल्यामुळे कदाचित मी ट्रेकरही बनलो असतो.   

छंद माझे अनेक…

मला स्वयंपाक बनवायला प्रचंड आवडतं. सोबतच, वाचन करणं, चित्र काढणं या गोष्टी खूप आवडतात. वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं आणि तिथल्या वेगवेगळ्या लोकांशी गप्पा मारायला मला खूप आवडतं. तिथल्या सांस्कृतिक गोष्टी, तिथला इतिहास, तिथले प्रश्न, तिथल्या लोकांच्या जगण्याच्या आणि भविष्याविषयीच्या संकल्पना, तत्वज्ञान मला समजून घ्यायला आवडतं.  

सगळ्यात सोपा फिटनेस फंडा…..

‘सातत्य’ हा माझ्या फिटनेसचा मूलमंत्र म्हणता येईल. मला डायटिंग करणं खूप आवडतं. मी विविध पद्धतीचे डाएट ट्राय करत असतो. सध्या ‘लो-कार्ब-हाय-प्रोटीन’ आणि ‘इंटरमिडट फास्टिंग’ करण्याचा प्रयत्न केला, त्याचा फार उत्तम रिझल्टही मिळाला. गेली बरीच वर्ष मी पांढरी साखर खाणं बंद केलं आहे. ‘इट लोकल’ हा नियम मी प्रकर्षाने पाळतो. परदेशातून आणलेल्या महागड्या भाज्या खाण्यात काही पॉइंट नसतो. ज्या भाज्या बाजारात स्वस्त मिळतात त्या खाव्यात. निसर्गाने एखाद्या काळात एखादी भाजी मुबलक प्रमाणात तयार केली आहे, याचा अर्थ आरोग्याच्या दृष्टीने आपण त्या भाज्या खाणं अपेक्षेत आहे. असा ‘निसर्ग सुलभ’ आणि साध्या नियमांना फॉलो करणारा माझा डाएट आणि फिटनेस फंडा आहे.         

रॅपिड फायर 

 •  सखी कोणत्या भूमिकेत तुला जास्त आवडते? बायको की मैत्रीण? सखी मला सगळ्याच भूमिकांमध्ये आवडते आणि सगळ्याचं भूमिकांमध्ये तिच्याबद्दल मला काहीनाही तक्रारी असतात. त्यामुळे एक पर्याय निवडणं कठीण आहे.
 •  पुणे की मुंबई? दोन्ही शहरांनी मला भरभरून दिलंय. शिवाय मी मुंबईपेक्षा जास्त दिल्लीत राहिलो आहे. आता मी लंडनला राहतोय तर हे शहरही मला खूप आवडलंय. त्यामुळे कोणत्याही एका शहराची निवड नाही होऊ शकत.  
 •  होस्टिंग की अभिनय ?अभिनय
 •  सुव्रत चा विक पॉईंट? सखी 

भरनाट्यम विशारद, निरागस तसेच देखणी अभिनेत्री “मधुरा देशपांडे” 
नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणारी मनमोहक अभिनेत्री “मधुरा देशपांडे” सोबत च्या काही खास गप्पा वाचायला विसरू नका प्लॅनेट मराठी मॅगझीन च्या “स्टार ऑफ द वीक” मध्ये… 

 • संपूर्ण नाव : मधुरा पुष्कराज देशपांडे
 • वाढदिवस : २९ मार्च १९९२ 
 • जन्मठिकाण : कराड
 • शिक्षण : बीकॉम 


“रंगभूमी” आहे खास….
     मला सगळ्यात जास्त अभिनय आवडतो. मुळात मी ठरवून या क्षेत्रात आले नव्हते. मी भरतनाट्यम विशारद आहे तर मला यात मास्टर्स करायचं होतं. कॉलेज मध्ये असताना आंतर महाविद्यालयीन स्पर्धा यातून अचानक अभिनय या क्षेत्राकडे वळले गेले. नाटक करत असताना अभिनयाची गोडी निर्माण झाली आणि अभिनयात पदार्पण झालं. एक डान्सर आणि अभिनेत्री म्हणून मला “रंगभूमी” फार जवळची आहे म्हणून अभिनय हा कोणत्याही माध्यमातून असला तरी तो आवडतो. 

“मालिका खुप काही शिकवून गेली / परफेक्ट गोष्टींची सुंदर मालिका”  
   पहिल्या मालिकेचा अनुभव हा खूप जास्त कमालीचा होता, कारण कुठेतरी आपल्याला आपल्या घरातून एक विशिष्ट योग्य वेळी हे करून दाखव किंवा कामं मिळवून दाखव ही एक मर्यादा होती. माझ्यासाठी हे काम मिळवणं हे आव्हानं होतं आणि त्यात आई ने एक वर्ष दिलं की या वर्षात काहीतरी काम मिळवून दाखव आणि वर्ष संपता संपता मला “कन्यादान” या मालिकेसाठी मुख्य भूमिका मिळाली. वडील आणि मुलीचं सुंदर नातं, त्यात एका डान्सर ची गोष्ट तर माझ्यासाठी ही मालिका एकदम परफेक्ट होती. मनासारखी कथा असणारी ही मालिका होती. प्रोडक्शन हाऊस, सहकलाकार मस्त होते. काम करताना थोडं दडपण होतं कारण सोबत दिग्गज अभिनेते शरद पोंक्षे होते आणि ते म्हणजे अभिनयाचं विद्यापीठचं आहेत. आमच्या दोघांचं नातं हे ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन एकदम कमाल होतं. अजूनही मी त्यांना शरद बाबा म्हणून हाक मारते त्यामुळे आमचं नातं खरंच सुंदर आहे. त्यांच्याकडून अभिनयातील बारकावे आणि छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या सोबत काम करताना माझ्यात खूप बदल झाले. आमचं एवढं अफलातून बॉंडिंग आहे. 


“प्रत्येक कलाकारांला कामाचं दडपण यावं कारण….” 
प्रत्येक कलाकारांला काम करताना दडपण हे यायला हवंच असं मला वाटतं. कारण जेंव्हा कुठेतरी कामाचं दडपण असतं तेंव्हा आपण १०० % हुन जास्त उत्तम काम करू शकतो. मी खूप जास्त आनंदी आहे की आजवर जी काही काम केली ती सगळी काम उत्तम होती आणि उत्तम लोकांसोबत करण्याची संधी मला मिळाली. काम करताना कधीच ज्युनिअर आणि सिनियर ची भावना नाही आली. सगळ्या ठिकाणी काम करताना एक कुटूंब आहे आणि त्यात आपण काम करतो ही भावना घेऊन मी आजवर काम केलंय. मी स्वतःला भाग्यवान समजते कारण खूप पाठींबा देणारे सहकलाकार मला भेटले आणि म्हणून मी उत्तम काम करू शकले. 

“गॉसिप पासून राहते दूर…” 
खरं सांगायचं झालं तर इंडस्ट्रीत होणाऱ्या गॉसिप मध्ये मी पडत नाही. मला कधीच कुठली अशी गोष्ट इंडस्ट्रीत खटकली नाही. मला काम करताना कधीच काही समस्या आल्या नाहीत किंवा असं काही खटकलं नाही.  


“अभिनयाने दिला आत्मविश्वास”  

मला अभिनेत्री झाल्यावर माझ्यातला आत्मविश्वास वाढला. आधीची मधुरा फार साधी, सरळ वैगरे होती तर अभिनया मुळे माझ्यात आत्मविश्वास वाढला आहे. आवडीचं काम करियर म्हणून करताना एक अनोखं समाधान आहे. 

“ग्लॅमरचं दडपण येतं” 
प्रत्येक कलाकाराला ग्लॅमर ची वेगळीचं क्रेझ असते. मला सुद्धा ग्लॅमर आवडतं पण कधी कधी ग्लॅमरचं दडपण सुद्धा येतं. हे दडपण सकारात्मक आहे की आपल्याला आपले लुक्स जपून आपण एक अभिनेत्री म्हणून घराबाहेर पडत आहोत हे लक्षात ठेवून बाहेरच्या जगात वावरावं लागतं. या सगळ्या गोष्टी मी एन्जॉय करते आणि ग्लॅमर अनुभवते. 

“डान्स मध्ये काहीतरी करायचंय” 
मी भटनाट्यम कडे करियर च्या दृष्टीकोनातून पाहिलं होतं. मला भटनाट्यम मध्ये मास्टर्स करायचं होतं पण मी अचानक या क्षेत्राकडे वळले आणि हे काम मला आवडायला लागलं. सध्याच्या कामाच्या व्यापामुळे मला याकडे फारसं लक्ष देता येत नाहीये पण नक्कीच मी डान्स मध्ये काहीतरी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

“नवीन काम गुलदस्त्यात” 
नवीन प्रोजेक्ट बद्दल सध्या बोलणी चालू आहेत तर नवीन काम गुलदस्त्यातचं आहे त्याबद्दल मी लवकरचं सांगेन. 

“चित्रपटात मुख्य भूमिका साकारायची ” 
मला काम करताना एक गोष्ट जाणवली की मी आजवर मालिका केली, नाटक तसेच चित्रपट केले पण चित्रपट असे मुख्य भूमिकेतुन नाही केले तर माझी अशी इच्छा आहे की लीड रोल असलेला एखादा सुंदर चित्रपट मला करायचा आहे. मी आजवर जे चित्रपट केले तर उत्तम होते पण आता मुख्य भूमिकेत दिसायचं आहे. 

“तरुणाईला जोडणारी वेब सिरीज / वेब सिरीज ची वाट बघतेय”  
नक्कीच मला वेब सिरीज करायची आहे. माझ्याकडे अजून कुठली वेब सिरीज आली नाही आहे. पण मी वेब ची वाट बघतेय. हल्लीची तरुणाई चित्रपटा पेक्षा नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हिडिओ या प्लॅटफॉर्म वर वेब सिरीज बघण्याकडे त्यांचा जास्त कल आहे. वेब चे विषय वेगळ्या धाटणीचे असतात तसेचं तरुणांशी कनेक्ट होण्यासाठी मला वेब सिरीज करायची आहे. 


 “फिरणं आणि बरंच काही..” 
अभिनया व्यतिरिक्त मला डान्स आवडतो, प्रचंड फिरायला  आवडतं. फिरण्यासाठी माझी अशी एक सीक्रेट खास बकेट लिस्ट आहे. वाचन करायला मला आवडतं. हल्ली मी वाचायला सुरुवात केली आहे. फावल्या वेळात मला कल्पक गोष्टी करायला आवडतात. मी लवकरचं इन्स्टाग्राम वर एक या संदर्भात पेज चालू करणार आहे. चित्र काढायला, साडी / टी शर्टस् पेंटिंग करायला आवडतात. तर मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी असं काहीतरी करत असते. 


फोन पासून दूर राहते” / इन्स्टाग्राम आवडीचं” 
हल्ली मी फोन कमी वापरण्याचा प्रयत्न करते आहे कारण मधल्या काळात मला फोन वापरण्याचं व्यसन लागलं होतं.  इन्स्टाग्राम हे माझं आवडतं अप्लिकेशन आहे इथे आपण पटापट आपल्या फॅन्स सोबत कनेक्ट होऊ शकतो. 

रॅपिड फायर…हे कि ते…

 • नाटक, चित्रपट की मालिका : चित्रपट 
 • आवडता अभिनेता –  सिद्धार्थ चांदेकर की स्वप्नील जोशी: दोघे सुद्धा 
 • आवडती अभिनेत्री – अमृता खानविलकर की सोनाली कुलकर्णी : दोघी 
 • अभिनय की भरनाट्यम – अभिनय 

निरागस तसेच गुणी अभिनेत्री “मधुरा देशपांडे” हिला प्लॅनेट मराठी मॅगझीन तर्फे भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा! 

“देयर यु आर” हा संवाद आठवला की डोळ्यांसमोर उभे राहणारे “भय्यासाहेब” म्हणजेच किरण गायकवाड. 
“लागींर झालं जी” या मालिकेतून त्याने भय्यासाहेब हे पात्र साकारलं आणि प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय. किरण गायकवाड अभिनयाच्या सोबतीने उत्तम लिहितो आणि भविष्यात त्याला कोणत्या भूमिका साकारायच्या आहेत आणि कोणत्या दिग्दर्शका सोबत काम करायचंय अश्या काही विशेष गप्पा वाचायला विसरू नका प्लॅनेट मराठी मॅगझिनच्या या “स्टार ऑफ द वीक मधून” …

 • संपूर्ण नाव : किरण बाबुराव गायकवाड
 • जन्मठिकाण : पुणे 
 • वाढदिवस : १२ जून १९९०
 • शिक्षण : एमकॉम 

“वेगळ्या धाटणीची भूमिका करतोय”
    भय्यासाहेब हे पात्र खलनायक (नकारात्मक) होतं. या भूमिकेत विविध छटा लपलेल्या होत्या. आता मी असं काही तरी करतो आहे जी नकारात्मक भूमिका नसून वेगळ्या धाटणीची भूमिका आहे. जेवढं प्रेम प्रेक्षकांनी भय्यासाहेब या भूमिकेला दिलंय तेवढंच प्रेम नवीन भूमिकेला सुद्धा देतील अशी आशा आहे. 

“वेबची दुनिया अनुभवायची” 
“खासरे” या युट्युब चॅनेल साठी आम्ही दोघांनी (मी आणि निखिल चव्हाण) याने एक व्हिडिओ केला होता तर हा अनुभव कमालीचा होता. वेब सिरीज हे माध्यम मला अजून जवळीने बघायचं आहे. मी वेब चा खूप मोठा फॅन आहे आपल्याकडे येणारा वेब चा कन्टेन्ट खूप जास्त चांगला आहे. अश्या कामाच्या शोधात मी आहे. आपल्याला मिळालेला “वेब” हा भन्नाट प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं. 

“प्रेक्षकांनी खूप सारं प्रेम दिलं” 
    भय्यासाहेब या भूमिकेने मला प्रेक्षकांच खूप सार प्रेम दिलं. एखाद्या नकारात्मक भूमिकेला लोकं एवढं डोक्यावर घेतील असं वाटलं नाही. त्यांनी ती भूमिका आपलीशी करून घेतली. सकारात्मक भूमिकांना मिळणारी प्रसिद्धी या पेक्षा नकारात्मक भूमिकांना लोकांचं मिळणार तेवढंच प्रेम बघून आनंद मिळतो आणि आपल्या कामाची पोचपावती मिळते. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की भय्यासाहेब सारख्या भूमिकेला लोकांनी एवढं भरभरून प्रेम दिलं.

  “लवकरचं नवीन भूमिका साकारणार” / नवीन भूमिका गुलदस्त्यातच”
    मी लवकरचं काहीतरी वेगळं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे पण योग्य वेळ आली की मी ते प्रेक्षकांना सांगेन त्यामुळे नवीन काय असणार हे थोडं गुलदस्त्यात आहे.

“अनुराग कश्यप सोबत काम करायचंय” 
  मला सगळ्यांसोबत काम करायचंय कारण प्रत्येक कलाकारांकडून नवीन काहीतरी शिकायला मिळत असतं. पण मला अनुराग कश्यप सोबत काम करण्याची इच्छा आहे त्यांच्या सोबतीने एकदा काम करावं हे स्वप्न आहे. त्याचं कारण असं की मी त्यांच्या कामाचे अनेक किस्से माझ्या सह कलाकार मित्रांकडून ऐकले आहेत. तो माणूस म्हणून कमाल आहे तर अश्या व्यक्ती सोबत काम करायला नक्कीच आवडेल. 

“देयर यु आर हे टोपण नाव” 
  “देयर यू आर” या संवादा मागे अनेक किस्से आहेत. कधीकधी गर्दीतुन चालताना लोकं माझ्या खऱ्या नावापेक्षा “देयर यु आर” या नावाने जास्त ओळखतात. माझ्यासाठी हे टोपण नावचं आहे.

“आव्हानात्मक खलनायक” 
  खलनायक साकारणं सोप्प काम नाही आहे. कारण आपलं मन हे सकारात्मक असतं आणि यात तुमच्या मनाला न पटणारं असं काम करायचंय तर खलनायक साकारताना ही मानसिक तयारी करावी लागते. मालिकेतली भय्यासाहेब ची भूमिका फार नकारात्मक होती तो आर्मी ला पाठींबा न देणारा होता, आर्मीच्या विरुद्ध बोलणारा, आई शी नीट न वागणारा असा होता  तर या गोष्टी आधी मनाला पटायच्या नाहीत. खलनायक साकारताना पहिल्यांदा ज्या गोष्टी पटत नाहीत त्या शांतपणे मनाला पटवून द्याव्या लागतात. मग लोकांना ही भूमिका कोणत्या तऱ्हेनं आवडू शकते यांसाठी त्या भूमिकेतील वेगळ्या छटा शोधू लागलो. तेजपाल वाघ यांचा फार पाठींबा होता ही भूमिका करताना. त्याने मला भूमिकेसाठी विविध छटा शोधून काम करायला सांगितलं. प्रेमळ, विक्षिप्त, राजकारणी, एकतर्फी प्रेमात बुडालेला अश्या विविध अंगी भूमिका एका रोल साठी करायच्या होत्या म्हणून त्या पात्रातील छटा शोधून काम करायचो आणि भय्यासाहेब सकारायचो. 

“प्रत्येक भूमिका मोलाची” 
  भूमिकेत कुठलंही उजवं – डाव करायला मला आवडतं नाही. मग ती भूमिका अगदी दोन मिनिटांची असू देत किंवा खूप मोठी असू देत काम हे काम असतं आणि मी प्रत्येक काम उठावदार पणे मी करेन याची मला शाश्वती असते. मी कुठलंही काम फार प्रामाणिक पणे करतो त्यामुळे मी भूमिकेत डाव-उजवं असं कधीच करत नाही.


“कविता आणि बरंच काही….” 
संगीत, लिखाण, कविता, चित्रपट आणि नाटक बघणं या गोष्टींशिवाय मी राहू शकत नाही.

“विरुद्ध भूमिका साकारणारा किरण”  
खऱ्या आयुष्यातला किरण आणि मालिकेतून लोकांच्या भेटीला आलेला किरण या दोन्ही फार विरुद्ध भूमिका आहेत. मी फार हळवा आणि संवेदनशील आहे तसा भय्यासाहेब नव्हता तो एकदम तापट आणि सतत काही न काही कुरघोड्या करणारा होता. 
“महेश मांजरेकरासोबत काम करायचंय” / अभिनया व्यतिरिक्त लिखाण” 
लोकांच्या दृष्टीकोनातून मी बरा लिहितो असं लोकांचं म्हणणं आहे. मी आजवर काही स्क्रिप्ट आणि शॉर्ट फिल्म लिहून त्या दिग्दर्शित केल्या आहेत तर अभिनया व्यतिरिक्त मी लिखाण करू शकतो आणि दिग्दर्शन करू शकतो. मला इथे एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो की मी आणि माझा एक मित्र महेश मांजरेकरांकडे एक स्क्रिप्ट घेऊन गेलो जी फिल्म आम्हाला दिग्दर्शित करायची होती. तेव्हा ते नटसम्राटचं दिग्दर्शन करत होते. आम्ही दबकत पाऊल टाकत सरांकडे गेलो सरांना स्क्रिप्ट ऐकवायला सुरुवात केली त्यांना माझा उडालेला गोंधळ समजला आणि त्यांनी स्वतः स्क्रिप्ट वाचली ती वाचून झाल्यावर त्यांनी मला एक प्रश्न विचारला तर तेव्हा मला त्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं त्या दिवशी रात्री तीन वाजता मी त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि ते फिल्म करायला तयार झाले पण काही कारणामुळे ती फिल्म काही झाली नाही म्हणून मला महेश मांजरेकर सरांसोबत काम करण्याचं स्वप्न आहे. 

रॅपिड फायर…हे कि ते..

 • शिवानी बावकर की मुक्ता बर्वे – शिवानी बावकर 
 • नितेश चव्हाण की निखिल चव्हाण – निखिल चव्हाण 
 • आवडतं पुस्तक : दुनियादारी 
 • अभिनय की दिग्दर्शक – अभिनय 

किरण गायकवाड ह्या हरहुन्नरी कलाकाराला प्लॅनेट मराठी मॅगझीन तर्फे पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा! 

“लागींर झालं जी” या मालिकेतून शितली ने सगळ्यांची मनं जिंकून घेऊन “अलटी पलटी” या नवीन मालिकेतून आपल्या भेटीला आलेली “गरिबांची रॉबिनहूड”  शिवानी बावकर हिच्या अभिनयाच्या हटके प्रवासाबद्दल जाणून घेऊ या प्लॅनेट मराठी मॅगझिनच्या “स्टार ऑफ द वीक” मधून…..
शिवानी बावकर हिला अभिनयाच्या सोबतीने जर्मन शिकण्याची आवड असून लवकरचं जर्मन थिएटर करण्याची इच्छा तिने व्यक्ती केली आहे.

 • संपूर्ण नाव : शिवानी नितीन बावकर 
 • जन्मठिकाण : मुंबई 
 • वाढदिवस : ११ मार्च 
 • शिक्षण :  बीकॉम, एमकॉम

भूमिकेसाठी सोडली नोकरी” 
     अभिनयाची गोडी आधीपासूनचं होती. घरातून मला अभिनयासाठी नेहमीच पाठींबा होता पण अभिनयासोबत कुठेही शिक्षण मागे सोडू नकोस असं घरच्यांनी सांगितलं आणि प्लॅन बी नेहमी सोबत असावा म्हणून कॉलेज पूर्ण केलं. रुपारेल मध्ये असताना कॉलेज मधल्या एका एकांकिकेत मला छोटासा रोल मिळाला अगदी एकचं वाक्य होतं पण ते मिळाल्याचा आनंद खूप जास्त होता. प्रत्येक प्रयोगाला मी जायचे. नंतर शिक्षणासाठी थोडा ब्रेक घेतला. मास्टर्स करत असताना ऑडिशन देत होते. हिंदी जाहिरातींसाठी ऑडिशन दिल्या. मग यातून ऑडिशन कशी असते यांची एक कल्पना आली. स्वतःचा पोर्टफोलिओ सुद्धा बनवला मग फक्त ऑडिशन च्या भरवश्यावर न राहता सोबतीने जॉब करू या असं ठरवलं. मास्टर्स आणि जर्मन शिकत असताना सहजपणे मुलाखत दिली आणि मला नोकरी मिळाली. नोकरी करतानाचं मी ‘उंडगा’ हा चित्रपट केला. नोकरी सांभाळुन अभिनय चालू होता. माझ्या एका मित्राने माझे फोटो कुठेतरी पाठवले आणि त्यातून मला “लागींर झालं जी” साठी फोन आला. नोकरी मुळे साताऱ्याला ऑडिशन द्यायला जायला जमलं नाही मग फोन वरून ऑडिशन दिली आणि मग मालिकेचे लेखक तेजपाल वाघ यांनी सांगितलं की त्यांना माझं काम आवडलंय. मला त्यांनी सांगितलं की तुला आताच्या आता नोकरी सोडावी लागेल आणि इकडे यावं लागेल. त्या घाईत नोकरी सोडली खूप समस्या आल्या पण घरच्यांनी पाठींबा दिला. नवीन भूमिका स्विकारण्यासाठी घरच्यांचा भक्कम पाठींबा होता ते सोबत होते म्हणून इथवर पोहोचले. इथून नवीन प्रवास सुरु झाला. साताऱ्याला गेल्यावर समजलं की आपल्याला एक महिना इथेच राहायचंय. शीतल च्या भूमिकेसाठी साताऱ्याची मूळ भाषा शिकण्याची सुरुवात झाली. जसं जर्मन शिकताना तयारी केली तेवढ्याच तयारीने नवीन भाषा शिकायला सुरुवात झाली. मूळ भाषेवर जम बसवण्यासाठी ती शिकण्याची अनोखी पद्धत वापरत गेले. वही पेन घेऊन तासभर मार्केट मध्ये जाऊन तिथल्या लोकांची भाषा ऐकायचे. असं करता करता ती भाषा अवगत होत गेली. सुरुवातीला तिथली लोकं काय बोलायचे हे समजायचं नाही, मग थोडं टेन्शन यायचं की ही भाषा आपल्याला समजतं नाही आणि त्या भाषेतच आपल्याला भूमिका साकारायची आहे हे दडपण होतं. ही भूमिका साकारणं हे एक आव्हान होतं आणि हे जमत गेलं आणि पुढे मी फार एन्जॉय केलं. मालिका सुरू झाल्यावर हे वेगळंच जग माझ्यासमोर उभं राहिलं. 

आपल्या गुणांना योग्य वाव देणारी भाषा” 
    एक गोष्ट असते की आपल्याला भूमिका सोडून भाषा बोलायची नसते हे पक्कं करून ती भूमिका करायची असते. मी आता पल्लवी साकारतेय आणि आधी शीतल ची भूमिका करायचे तर या दोघी फार डॅशिंग आहेत. मी एवढी डॅशिंग नाही पण आपल्यात कुठेतरी ते गुण असतात, त्या गुणांना योग्य तऱ्हेनं वाव दिला तर आपण उत्तम पध्दतीने ते साकारू शकतो आणि आपल्याला ते जमतचं. 

“लोकांच्या प्रेमामुळे दुसरी मालिका मिळाली” 
     खरं सांगायचं झालं तर लागींर झालं संपून एक महिना नाही झाला आणि मला नवीन मालिका मिळाली. घरी येऊन कुठेतरी घरी सेट होत असताना मी शूटिंग आणि बाकी गोष्टी मिस करायचे. इन्स्टाग्राम वर मी एक शेवटची पोस्ट टाकली होती माझा आणि नितीश चा फोटो होता आणि त्यावर लोकांच्या एवढ्या कंमेंट्स होत्या की त्या वाचताना मला खूप भरून आलं होतं. लोकांच्या प्रेमामुळे मला ही नवीन मालिका मिळाली असं मी म्हणेन. दुसरी मालिका आणि ती सुद्धा झी मराठीवरचं!!

“बायोपिक करायचा आहे” 
       मला बायोपिक करायला खूप आवडेल. कारण मला एखाद्या भूमिकेचा अभ्यास करून ती साकारायला आवडते. मला नवीन गोष्टी शिकायला आवडतात. मी आधी फुटबॉल खेळायचे, भाषा शिकण्याची अनोखी आवड आहे, देश फिरायला आवडतात त्यामुळे सगळ्यांमधलं सगळं शिकण्याची ओढ आहे. मला बायोपिक्स साठी कुठल्याही स्पोर्ट्स पर्सन (खेळाडू व्यक्तिमत्त्व) साकारायला आवडेल किंवा अशी एखादी महिला जिने आपल्या देशाचं नाव मोठ्ठ् केलंय अशी भूमिका साकारायला नक्कीचं आवडेल. 

“शाहरुख सोबत काम करायचंय”
    मला लहान असल्यापासून शाहरुख खान फार आवडतो. तो माझं प्रेम आहे, क्रश आहे तर भविष्यात शाहरुख खान सोबत काम करण्याचं स्वप्न आहे.

“नाटक करण्याची इच्छा” 
    मला नाटक करण्याची फार इच्छा आहे. लागींर नंतर नाटक करावं असा माझा विचार सुद्धा होता पण लगेच मालिका मिळाल्या मुळे नाटक जमलं नाही. पण मला माझ्या आधीच्या ड्रामा ग्रुप सोबत किंवा नवीन लोकांसोबत काहीतरी हटके आणि वेगळ्या विषयावर नाटक करायचंय. 

“गरिबांची रॉबिनहूड” 
    मला लोकं असं कुठेच सांगत नाहीत की शितली सारखी भूमिका आहे. मला प्रेक्षकांनी नवीन भूमिकेत देखील तितक्याच आपुलकीने स्वीकारलं आहे. पल्लवी  सुद्धा त्यांना आवडते आहे. लुक्स वर एखादी भूमिका अवलंबून असते तर लोकांना माझा नवीन लुक देखील आवडला. हल्ली  ड्रेसिंग, स्टायलिंग यावर लोकं कंमेंट्स करतात. गरिबांची रॉबिनहूड अशी प्रतिक्रिया मला प्रेक्षकांकडून मिळते.

“भाषेचं अनोखं आव्हानं” 
     लागींर च्या वेळी भाषा शिकताना मला खूप मेहनत घ्यावी लागली. भाषा अवगत होण्यासाठी आपल्याला थोडेफार कष्ट करावे लागतात. भाषेच्या विविध पायऱ्या शिकत ती बोलली जाते. 
“जर्मन थिएटर करायचंय” 
    मी ज्या इन्स्टिट्युशन मधून जर्मन शिकले आहे तिथे परफोर्मिंग आर्टस् आणि थिएटर आहे तर तिकडे अनेक इव्हेंट्स होत असतात म्हणून मला एकदा जर्मन थिएटर करायचंयं.

“हिंदीत काम करायला आवडेल / उत्तम स्क्रिप्ट असल्यास हिंदीत काम करेन” 

    मला हिंदीत सुद्धा काम करण्याची संधी आली तर नक्कीच मी हिंदी इंडस्ट्रीत काम करेन. जेवढं मला मराठी उत्तम जमतं तेवढ्याच सहजतेने मी हिंदी बोलू शकते. मी कॉन्व्हेंट शाळेत होते तर आजूबाजूला सगळी कॉस्मो लोकं होती. तिकडे फार मराठी बोललं जायचं नाही. मी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत अगदी सहजतेनं काम करू शकते. मला भाषा शिकण्याची आवड असल्याने ती पटकन अवगत होते. म्हणून उत्तम स्क्रिप्ट आलं तर कुठल्याही भाषेत मी काम करू शकते. 

“बोल्ड भूमिकेसाठी मनाची तयारी” / सध्या बोल्डनेस भूमिका नको” 
    मला नाही वाटत मी बोल्डनेस भूमिका साकारेन. कारण जरी भूमिका बोल्ड असली तर ती आपण एक भूमिका म्हणून त्याकडे बघून ती साकारतो. मला असं वाटतं नाही की मी सध्या बोल्ड भूमिकेसाठी तयार आहे. यासाठी मला मानसिक तयारी करावी लागेल.


     रॅपिड फायर….हे की ते….
चित्रपट, वेब की मालिका : चित्रपट आणि मालिका दोन्ही. कारण काम काम असतं. 
अलटी पलटी की लागींर झालं जी – लागींर झालं जी. 
शीतली की पल्लवी – पल्लवी 
आवडता अभिनेता : निखिल चव्हाण, राहुल मगदूम, नितीश चव्हाण – निखिल चव्हाण आणि नितीश सोबत केमिस्ट्री सीन करायला आवडतात. 
आवडती अभिनेत्री : लक्ष्मी विभुते, अनिता दाते, किरण धाने – लक्ष्मी विभुते 
जर्मन की मराठी : मराठी! कारण गोडवा आहे या भाषेत.
सगळ्यात जास्त कोणतं सोशल मीडिया फॉलो करतेस? : इन्स्टाग्राम

आवडता लुक / आऊट फिट : वेस्टर्न की पारंपरिक – वेस्टर्न 

स्टाईल आयकॉन – आलिया भट 

शिवानी बावकर ह्या गुणी अभिनेत्री ला तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी प्लॅनेट मराठी कडून खूप शुभेच्छा!! 

अभिनय तसेच दिग्दर्शन अशी दुहेरी भूमिका बजावून अनेक आव्हानात्मक भूमिका पार पाडणारा नवखा अभिनेता “ऋषी मनोहर” बद्दल त्याच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया ह्या आठवड्याच्या प्लॅनेट मराठी मॅगझीन च्या “स्टार ऑफ द वीक” मधून.. 

 • ऋषी राजेंद्र मनोहर 
 • वाढदिवस : २०  जानेवारी १९९८ 
 • जन्मठिकाण : पुणे 
 • शिक्षण : BMCC बीएमसीसी (पुणे)

“पुरुषोत्तम करंडक ते दादा एक गुड न्यूज” / “इंडस्ट्रीत  स्वतःची ओळख निर्माण करायची होती” 
      मला खरंच वाटलं नव्हतं मी या इंडस्ट्रीत येईन. माझे वडील क्रिकेटर होते त्यामुळे मला क्रिकेट खेळण्याची आवड आहे. मी अांतर शालेय आणि कॉलेज दोन्हीकडे क्रिकेट खेळलो. कॉलेज मध्ये गेल्यावर मग सांस्कृतिक गोष्टींकडे कल वाढत गेला. मग नाटकं आणि बाकी गोष्टींमधली आवड निर्माण होत गेली. नंतर BMCC मध्ये ऍडमिशन घेतलं आणि पुरुषोत्तम आणि फिरोजी करंडक यांची सुरुवात झाली. कॉलेज मध्ये अनेक कार्यशाळांना जाणं यामुळे नाटकातली आवड जोपासत गेलो. अकरावीत असताना मी फिरोजी करंडक केलं. पुरुषोत्तम करंडक साठी सॉरी परांजपे हे नाटक केलं होतं आणि फिरोजी साठी इतिहास गवाह है? हे नाटक बसवलं होतं. या सगळ्या कॉलेज मधल्या स्पर्धांमुळे नाटकांची गोडी निर्माण होत गेली. मी आजवर ९ ते १० नाटक बसवली आहेत. प्रत्येक नाटकांच्या वेळी मी पहिले आई (पौर्णिमा मनोहर) सोबत बोलतो की तिला या बद्दल काय वाटतं. मी अनेकदा तिची याबद्दल मतं जाणून घेत असतो आणि या क्षेत्रात प्रत्येकाची कल्पक मतं असतात तर ते जाणून घेण्यासाठी तिची फार मदत होते. आजवर मी जेवढी कामं केली आहेत त्यात तिचा खंबीरपणे पाठींबा आहे. एका अभिनेत्रीचा मुलगा या पेक्षा स्वतःची ओळख निर्माण करून मला या इंडस्ट्रीत यायचं होतं. मी जी नाटक केली त्या दोन्ही नाटकांना करंडक आहेत. या गोष्टीमुळे मला “दादा एक गुड न्यूज” साठी अद्वैत दादा ने कास्ट केलं होतं. असा हा कॉलेज पासून सुरू झालेला प्रवास आज सुद्धा चालू आहे. 

“भूमिकेमुळे अभिनय शिकलो”/ “महत्वपूर्ण भूमिका” 
     “दादा एक गुड न्यूज” हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे. या नाटकाच्या निमित्ताने मला नाटकांची एक अनोखी आणि वेगळी प्रक्रिया शिकायला मिळाली. मी पुण्यात “आजकाल” नावाच्या संस्थेअंतर्गत या आधी प्रायोगिक नाटकं केली, तेव्हा नाटकं बसवली पण या नाटकांची प्रक्रिया ही पूर्णतः वेगळी आहे तर ती मला या नाटकामुळे शिकायला मिळाली. उमेश दादा, आरती, हृता या सगळ्याचं सिनियर मंडळी कडून ऑन स्टेज आणि ऑफ स्टेज नेहमीच शिकायला मिळालं. या नाटकातली “बॉबी” ची भूमिका फार वेगळी आहे. तो फार साधा – भोळा आणि प्रंचड खरा आहे तो खूप कमी व्यक्त होतो. हे पात्र जेव्हा मी वाचलं तेव्हा मला फार आवडलं आणि काहीतरी वेगळ्याचं पध्दतीने साकारायला मिळालं. हे पात्र साकारायला थोडं कठीण वाटलं होतं पण जसे प्रयोग होतं गेले तशी यातली भूमिका गवसत गेली.  अद्वैत दादा अनेक गोष्टी सांगत गेला. कल्याणी पाठारे यांनी खूप कमालीने हे पात्र लिहिलंय. या सगळ्या गोष्टींमुळे एक अभिनेता म्हणून अनेक गोष्टी या पात्रा कडून शिकता आल्या. अभिनयातील अनेक पैलू या भूमिकेमुळे उलगडत गेले. उमेश दादा प्रत्येक वेळी अगदी छोट्या गोष्टी सांगत राहायचा त्यामुळे अभिनेता म्हणून काम करताना बॉबी ही भूमिका खूप महत्वपूर्ण आहे आणि खूप काही शिकवून जाणारी आहे. 

“इतिहास गवाह है? आहे खास” / नाटकं आहे खास ….” 
     मला सगळीचं नाटकं आवडतात पण आम्ही फिरोजी करंडक साठी “इतिहास गवाह है?  “हे नाटकं केलं होतं. फिरोजी असल्यामुळे यात डान्स आणि संगीत हे लाइव्ह आहे आणि मी कलाकार म्हणून यात काम सुद्धा करतो. कारण नाटकांत काम करून ते नाटकं बसवणं या सगळ्यांचा आनंद या एका नाटकामध्ये   काम करताना मिळतो. त्यामुळे हे नाटकं मला करायला आवडतं आणि हे तेवढचं खास सुद्धा आहे. 

“लवकरचं प्रायोगिक नाटक” 
   नाटकांसाठी विषय काय निवडेन हे माहीत नाही पण पुढच्या दोन – तीन महिन्यात मी “आजकाल” या संस्थेच्या अंतर्गत एक २ अंकी प्रायोगिक नाटक बसवतो आहे आणि हे लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येईल.    
“नाटकं करणं आव्हानात्मक” 
       मला नाटकं करणं हे काम प्रचंड अवघड आहे असं वाटतं. नाटकं बसवून त्यात अभिनय करणं हा माझ्यासाठी टास्क होता. मग इतिहास गवाह है?  मध्ये मी मुख्य भूमिकेत असायचो तर ती ४० ते ४५ मिनिटं मी रंगमंचावर राहून मला अभिनय आणि दिग्दर्शन सुद्धा योग्य पार पडतंय ना याकडे लक्ष द्यावं लागायचं. या गोष्टी सतत डोक्यात ठेवून ते नाटकं उत्तम रित्या पार पडलं पाहिजे हे आव्हानं होतं. दादा एक गूड न्युज आहे मध्ये स्वतःहा मधल्या दिग्दर्शकाला पूर्णतः बाजूला ठेवून फक्त अभिनय करायचा होता तर हे ही माझ्यासाठी आव्हानात्मक होतं आणि ही गोष्ट मला हळू हळू जमतं गेली असं मला वाटतं. 

“आई सोबत काम करायचंय” 
   आजपर्यंत आई सोबत काम करण्याचा काही योग जुळून नाही आला पण मला तिव्रतेने आई सोबत काम करण्याची इच्छा आहे. आई कोणत्या पध्दतीने काम करते आणि मी काय काम करतो हे जाणून घेण्यासाठी आई सोबत काम करायचंय. 


“वेबची लाट” 
     मला मागच्या वर्षी वेब साठी ऑफर आली होती पण नाटकांच्या गडबडीमूळे ते राहून गेलं. आपल्याकडे सध्या वेबची लाट आली आहे. प्रत्येक जण युट्युब किंवा वेब वर काम करतांना बघायला मिळतो त्यामुळे टीव्ही सोबत वेब वरच्या विषयांत होणारी वाढ बघता आता मला चांगली स्क्रिप्ट आणि रोल आला तर १००% मी वेब वर काम करेन. 

“कौतुकाची थाप” 
  नुकतंच आमच्या “दादा एक गुड न्यूज” चा शंभरावा प्रयोग पार पडला आणि त्याला जितू दादा (जितेंद्र जोशी) आला होता त्याला नाटक आवडलं, माझं काम आवडलं आम्ही तासभर यावर चर्चा केली. नाटकांविषयी त्याने एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली तर हे मला खूप जास्त भावलं. माझ्यासाठी कामाची प्रेरणा आणि ऊर्जा देऊन जाणारं हे होत. माझ्या कामाची कुठेतरी दखल घेतली जाते आहे हा एक वेगळा अनुभव आनंद देऊन जाणारा होता. मला जितेंद्र जोशी हा अभिनेता फार आवडतो तर या नटाकडून माझ्या कामाला मिळणारी दाद, पोचपावती आणि कौतुकाची थाप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. 
“ड्रीम वर्क” 
    मला सुमित राघवन प्रचंड आवडतो म्हणून  सुमित राघवन आणि जितेंद्र जोशी या दोन अभिनेत्यांसोबत काम करायला नक्की आवडेल.

“नाटक आणि बरंच काही…”
      चहा, नाटक, माझी डायरी या गोष्टींशिवाय मी राहू शकत नाही. 

 “मोबाईल आवडीचा” 
 
    मी जास्त मोबाईल वापरतो त्यामुळे मोबाईल हेच आवडतं गॅजेट आहे. 

रॅपिड फायर…हे कि ते….

 • आवडती अभिनेत्री : पौर्णिमा मनोहर, हृता दुर्गुळे, आरती मोरे, प्रिया बापट – पौर्णिमा मनोहर 
 • आवडता अभिनेता : उमेश कामत, जितेंद्र जोशी, संजय मोने – उमेश कामत आणि जितेंद्र जोशी 
 • अभिनय, दिग्दर्शन की निर्मिती – दिग्दर्शन 
 • नाटक की वेबसेरीज – नाटक

दादा एक गुड न्यूज मधला बॉबी ते “इतिहास गवाह है? या नाटकांची पर्वणी प्रेक्षकांना देणाऱ्या या हँडसम अभिनेत्याला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्लॅनेट मराठी कडून खूप खूप शुभेच्छा! 

“अस्मिता ते स्वराज्य रक्षक संभाजी” अश्या अनोख्या मालिकांचा पल्ला गाठून रसिक प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे.
अभिनयाच्या सोबतीने सामाजिक कामाची जाणीव जपून ‘रयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचन’ ची स्थापना करणाऱ्या या अभिनेत्रीचा अभिनय ते समाजकारण हा प्रवास उलगडून घेऊ या प्लॅनेट मराठीच्या स्टार ऑफ द वीक मधून…..


संपूर्ण नाव : अश्विनी प्रदिपकुमार महांगडे 
जन्मठिकाण : वाई
वाढदिवस : २७ ऑक्टोबर १९९०
शिक्षण : बीकॉम, हॉटेल मॅनेजमेंट  

“पसरणी ते मुंबई वारी / आव्हानात्मक राणूअक्का”  
     पसरणी हे माझं मूळ गाव जिथून माझं शिक्षण झालं. या खेडेगावातून अभिनयाचा प्रवास फार अवघड असतो. गावात काही अभिनयाचे धडे देणारे काही क्लास नव्हते. माझे वडील अभिनय आणि दिग्दर्शन करून वाईत राज्यनाट्य स्पर्धेसाठी काम करायचे. त्यांच्या कडूनचं अभिनयाचे धडे गिरवत गेले. वडिलांच्या मनात कुठेतरी होतं की मी अभिनेत्री व्हावं, आपण काही करू शकलो नाही. आपल्या मुलीने या क्षेत्रात पाऊल टाकावं म्हणून पसरणी मधून नाटक, एकांकिका करत करत इंडस्ट्रीत पोहचले. एका खेडेगावातून सुरू झालेला प्रवास मुंबईत अभिनयासाठी घेऊन आला. मुंबईत आल्यावर मी ऑडिशन देत होते. अस्मिताच्या आधी मला चंद्रकांत कुलकर्णी यांच्याकडे नाटक करण्याची संधी मिळाली. अस्मिता मालिकेतून निवड झाल्याचा फोन आला आणि तेव्हा आनंद ही झाला, पण आपल्याला आता अजून जवाबदारी ने काम करायचं आहे याची जाणीव झाली. अस्मिता पासून सुरु झालेला प्रवास आणि झी सोबत एक अनोखं नातं इथून घडत गेलं. अस्मिता नंतर मला “स्वराज्य रक्षक संभाजी” मधून ऑडिशनसाठी फोन आला पण तो राणूअक्का या व्यक्तीरेखेसाठी नव्हता तर गुप्तहेर लाडी या भूमिकेसाठी विचारणा आली. मग ऑडिशन देऊन दोन दिवसांनी मला समजलं की आपलं या मालिकेत कास्टिंग नाही झालंय. जेव्हा यासाठी कास्टिंग नाही झालं तेव्हा खरंच रडले होते. कारण एवढ्या सुंदर मालिकेसाठी आपल्याला काम करायला मिळणार नव्हतं. पण मला पुन्हा आठ दिवसांनी सेटवरून लुक टेस्ट साठी फोन आला होता आणि क्षणात मी हो म्हणून सांगितलं आणि सेटवर गेल्यावर माझ्या हाती “राणूअक्का” च स्क्रिप्ट आलं. मला या भूमिके विषयी माहीत नव्हतं. मग इथून या भूमिकेसाठीचा अभ्यास सुरू झाला. राणूअक्का या संभाजीच्या मागे उभं राहणार एवढं मोठं पात्र होतं. हे आजवर कुणाला माहीत देखील नव्हतं. कास्टिंग झाल्याचा आनंद खूप होता पण सगळ्याचं गोष्टी नवीन होत्या अगदी कलाकारांपासून ते साडी मध्ये वावरण इथं पर्यंत गोष्टी शिकायला लागल्या. साडीत कसं चालावं किंवा सवय कशी करावी हे मला पल्लवी ताईने शिकवलं. लेखक प्रताप गंगावणे यांनी मला या भूमिकेसाठी फार मदत केली प्रत्येक सहकलाकार हा शिकवतं असतो त्यांच्याकडून गोष्टी शिकत गेले. माझे खूप सीन हे अमोल कोल्हें सोबत होते यामुळे हे फार चॅलेंजिंग होतं. सुरुवातीला मी त्यांच्या सोबत काम करायला घाबरायचे. अमोल दादांचे अनेक सीन हे वन टेक असायचे, त्यामुळे आपल्यावर काम करताना एक वेगळीच जवाबदारी असायची की आपलं पाठांतर चोख असायला हवं. पण हळूहळू त्यांच्या कडून गोष्टी शिकत गेले आणि त्यांनी मला समजून घेऊन काम केलं. प्रत्येक सहकलाकारासोबत त्यांचं वागणं हे कमाल आहे. आता यात रुळत जाऊन काम करते आहे. आता कुठे बाहेर फिरताना लोक सांगतात की तुम्ही आमच्या सुद्धा अक्कासाहेब आहात तर ही कामाची पोचपावती मिळणं फार मोलाची आहे आणि ती या मालिकेमुळे मिळाली यांचा जास्त आनंद आहे.

“बहुपैलू तयारी ने साकारली भूमिका / तलवार बाजी शिकले” 
   ऐतिहासिक भूमिका करताना अनेक गोष्टीचं भान ठेवून काम करावं लागतं. व्यक्तिरेखेचा आदब जपून ती योग्यरित्या लोकांपर्यंत पोहचवावी लागते. राणूअक्का आजवर कोणी साकारली नसल्यामुळे ती योग्यरित्या सांभाळून घेऊन भूमिका निभावणं फार आव्हानात्मक होतं. मला सेटवर तलवारबाजी शिकवण्यात आली. जेव्हा माझे सीन नसायचे तेव्हा मी कार्तिक सर आणि जोत्याजी ची भूमिका बजावणाऱ्या गणेश दादा यांच्या कडून तलवार बाजीचे धडे घेतले. दिलेरखानाच्या छावणी मधला सीन शूट करत होतो तेव्हा पाच तास तो एक सीन शूट करत असताना तलवारबाजी केली आणि दुसऱ्या दिवशी एवढा हात सुजला की तो बरा व्हायला अनेक दिवस गेले. माझ्या दृष्टीने ही सुद्धा एक प्रकारची तयारी आहे. व्यक्तिरेखा समजून घेऊन साकारणं हे फार महत्वपूर्ण आहे. मला मनाली साकारताना फक्त अभिनय करायचा होता पण राणूअक्का करताना मला अभिनया सोबत तलवारबाजी करायची होती. मला घोडेबाजी शिकण्याची इच्छा आहे आणि नक्कीच आयुष्यात हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. ऐतिहासिक पात्र साकारताना नऊवारी सांभाळून ते अनेक गोष्टी सांभाळून अभिनय करण्याची जवाबदारी असते. स्क्रिप्ट मधली वाक्य आणि त्यातले शब्द समजून उमजून घेऊन बोलणं हे देखील एक टास्क आहे. अशी अनेक अंगांनी तयारी करून एखाद पात्र साकारणं हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.

“नाटकाच्या शोधात…”       मी नुकताच एक चित्रपट केला, ज्यात माझा रोल खूप मोठा आहे. खूप वेगळी आणि छान स्टारकास्ट आहे. मला नाटकं, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमातून काम करायला आवडेल आणि त्याचं सोबतीने खास करून वेब सिरीज करायला आवडेल . पण आता मला नाटक करायचंय ते फार जवळचं असं वाटणार माध्यम आहे. मी सध्या नाटकाच्या शोधात आहे.

“वेबसरीज करताना…” 
  माझी मैत्रीण (भाग्यशाली राऊत) आणि मी आम्हा दोघींना काहीतरी वेगळ अनुभवायचं आणि करायचं होतं. ती लेखिका आहे आणि कॉलेज पासून एक ठरलेलं होतं आपण काही तरी सोबत येऊन करू या. तर हे करण्यासाठी आम्हाला १२ वर्ष गेली. वेब चा बोलबाला होता म्हणून वेबसेरीज करू या हे पटकन डोक्यात आलं. या सगळ्यात शिकायला खूप काही मिळालं. मुलींसाठी काहीतरी करू या मग विषय निवडता निवडता मासिक पाळी हा विषय घेऊन आम्ही “महावारी” या सिरीज मधून तो लोकांसमोर घेऊन आलो. तेव्हा मी सिरीज निर्मिती करून दिग्दर्शन करत होते. हा अनुभव माझ्यासाठी नक्कीच अनोखा आणि शिकवून जाणारा होता. ज्या मुलींनी आजवर अभिनय नाही केला अश्या काही मुलींनी या निमित्ताने अभिनय केला. खेडेगावात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी टिपण्यासाठी म्हणून ही सिरीज केली. लवकरचं नवा विषय घेऊन आम्ही पुन्हा लोकांसमोर येणार आहोत.

“गावाकडच्या गोष्टी मांडायला आवडतील ” / लवकरचं नवीन वेबसरीज….
     असे अनेक विषय आहेत जे लोकांसमोर मांडता येऊ शकतात. आताचं उदाहरण घेऊ शकतो की आपल्याकडे जो महापूर आला. मी साताऱ्याची आहे, ही भीषण परिस्थिती मी पाहिली आहे. अशी परिस्थिती येताना त्यांच्या आधी काहीतरी होतं असेल ना म्हणून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी या विषयाला अनुसरून वेबसेरीज करू शकतो. मला खेडेगावातल्या गोष्टी मांडायला आवडतात आणि माझ्या नव्या वेब सिरीजचा विषय लवकरचं सगळ्यांसमोर येणार आहे.

 “लोकांची भूक भागवणारं रयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचन”
   रयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचन सुरू करण्याचा कारण स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आहे. मालिका करताना आपण एक माणूस म्हणून घडत असतो आणि आपल्यात आतून बाहेरून अनेक बदल होत असतात म्हणून मालिका करताना माझ्या विचार सारणीत बदल झाला आणि समाजाचं आपण काही तरी देणं असतो ही भावना जागृत झाली. आम्ही सगळ्यांनी सोबत येऊन “रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान” ची स्थापना केली. प्रतापगडावर जाऊन आम्ही शपथ घेतली की या मार्फत होणारी कामं ही समाजासाठी असतील म्हणून यांची निर्मिती झाली. या प्रतिष्ठाना अंतर्गत पहिला उपक्रम म्हणून या लोकांच्या काही रोजच्या गरजा भागवू म्हणून लोकांना जिथे पोटभर जेवायला मिळेल या संकल्पनेतून रयतेचे स्वराज परिपूर्ण किचन सुरू झालं यांची पहिली शाखा आम्ही मीरा रोड ला सुरू केली. बेघर लोकांना या मार्फत मोफत जेवण पुरवलं जात आणि अगदी ४० रुपयांत लोकांची भूक भागेल म्हणून हा छोटासा प्रयत्न केला होता आणि याला लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. माणसाच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी हा उपक्रम आहे. हे करण्यात एक वेगळंचं सुख आहे. 

“या गोष्टींशिवाय राहू शकत नाही” 
   मोबाईल, अभिनय, आणि माझं घर या गोष्टींशिवाय मी नाही राहू शकत. 

“मानधनाची मोठी तफावत”  
   मानधना बद्दल जेव्हा निर्माती म्हणून याकडे बघते तेव्हा मराठी आणि हिंदी चॅनेल मध्ये फार तफावत जाणवते. मराठी आणि हिंदीत दोन्ही कडे मानधन वेगळ्या तऱ्हेचे दिलं जातं. एक अभिनेत्री म्हणून मला जिथे योग्य मानधन दिलं जात आणि चांगलं काम माझ्याकडे येतं तिथेच मी काम करते आणि यात मी खुश आहे. 

“खूप बोल्ड भूमिका नाही जमणार” 
   मी स्क्रिप्ट वाचून ठरवेन की ते कितपत मला जमणारं काम आहे. मी स्वतः फार बोल्ड भूमिका नाही करू शकतं हे मला माहित आहे. त्यामुळे खूप बोल्ड भूमिका असेल तर मी ती नाही करणार. 

“इंडस्ट्रीत होणारा Groupism, गॉसिप कशाला हवं” 
खूप लोकं ग्रुप करून राहतात. अजून एक गोष्ट आणि माझा वैयक्तिक अनुभव आहे की लोक तोंडावर छान बोलतात आणि आपल्या मागे फार वाईट बोलतात, मला या गोष्टी फार खटकतात. खोटं वागून लोक इंडस्ट्रीत वावरतात म्हणून हे खटकतं.

“कास्टिंग काऊच भयंकर”     मी जेवढं काम केलं तेवढ्यात मला काही असा अनुभव नाही आला. कास्टिंग काऊच हा भयंकर विषय आहे.

“राजकारणात करणार प्रवेश” 
    विधानसभा तोंडावर असल्या कारणामुळे मला अनेक ठिकाणी हा प्रश्न विचारला जातो. वडिलांकडून मी अभिनयाचे धडे घेतले तसेच राजकारणाचे धडे सुद्धा त्यांच्याकडून मिळाले. ते चांगले कार्यकर्ते आणि नेते आहेत असं म्हणायला हरकत नाही. आज राजकारणी माणूस निवडून येऊन पुढे आपल्यासाठी निर्णय घेतात, प्रत्येक व्यक्ती ही या राजकारणाचा भाग असते. आपण मतदान करून यांचा एक भाग होतो म्हणून मी स्वतःला राजकारणाचा भाग मानते. प्लॅनेट मराठीच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छिते की मी भविष्यात नक्कीच राजकारणात प्रवेश करणार आहे. 
“काम नसताना अनेक गोष्टी शिका” 
इंडस्ट्रीत भेदभाव असा होत नाही पण जेव्हा मी राणूअक्का हे पात्र साकारलं त्यानंतर मला लगेच दुसरी भूमिका मिळणं थोडं आव्हानात्मक असतं. जेव्हा आपल्याकडे काम नसतं तेव्हा आपण अनेक चांगल्या गोष्टी शिकू शकतो. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून अनेक नव्या गोष्टी शिकल्या पाहिजे असं मला वाटतं.

“थँक्स आई आणि मावशी”
     अनेकदा कामाच्या गडबडीत आपण आपल्या जवळच्या लोकांना थँक्स बोलत नाही. आज मला एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे मला माझ्या आई आणि मावशीला थँक्स बोलायचंय. या दोघींच्या मूळे आज मी इथे आहे. त्यामुळे थँक्स आई आणि मावशी. 

रॅपिड फायर..हे कि ते....

 •  आवडता अभिनेता : अमोल कोल्हे, योगेश सोहोनी, शंतनू मोघे – अमोल कोल्हे 
 • आवडती अभिनेत्री : मयुरी वाघ , प्राजक्ता गायकवाड , पल्लवी वैद्य , स्नेहलता तावडे – पल्लवी वैद्य 
 • वाचन, फिरणं की कुकिंग – वाच
 • आवडती ड्रेसिंग स्टाईल?
 • वेस्टर्न की पारंपारिक – पारंपारिक


सामाजिक भान जपणारी अभिनेत्री “अश्विनी महांगडे” ला प्लॅनेट मराठी मॅगझीन तर्फे भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा!