शेपूटवाल्या दोस्तांचे खास यार!

जगात अशी माणसं कमी असतील ज्यांना पाळीव प्राण्यांबद्दल प्रेम किंवा आत्मीयता वाटत नसेल. चार पायांच्या ह्या गोड आणि छोट्या पाहुण्यांना सांभाळणं म्हणजे कधीतरी खूप सुंदर तर कधीतरी नाकीनऊ आणणारं काम सुद्धा असू शकतं. पाळीव प्राणी जितके वस्ताद आणि मस्तीखोर असतात त्याहून जास्त ते प्रेमळ आणि विश्वासाचे असतात. पाळीव प्राणी घरात असलेले पेट ओनर्स त्यांच्या हृदयाच्या जवळ असलेल्या प्राण्यांची चोख काळजी घेतातच पण त्या व्यतिरिक्त सुद्धा ज्यांच्याकडे कोणतेही पाळीव प्राणी नसतील अश्या सगळ्यांसाठीच हा नॅशनल पेट डे आणखीन कसा खास आहे हे जाणून घेऊया. 

नॅशनल पेट डे हा समस्त पाळीव प्राण्यांच्या अस्तित्वाला मनुष्यजातीकडून थँक्स म्हणायचा एक दिवस असू शकतो. जर तुम्ही एक पेट ओनर असाल तर तुम्हाला ह्या दिवसाचं महत्त्व नक्कीच माहित असेल. तुमच्या गोंडस छोट्या मित्रांशिवाय, त्यांना घट्ट मिठी मारल्याशिवाय पेट ओनर्सचा एकही दिवस जात नाही. इंस्टाग्राम रीलमध्ये दाखवलेल्या अत्यंत cute आणि adorable छोटुश्या पिल्लांचे विडिओ बघून जो आनंद होतो त्याची तुलना कोणत्याही इतर गोष्टीशी होऊ शकत नाही. पण अजूनही अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या पाळीव प्राणी पाळण्याआधी लक्षात घेणं गरजेचं आहे.


प्राणी पाळायचे आहेत पण ते विकत घ्यावे की पेट ऍडॉप्शनला महत्त्व द्यावं?

मांजर असो वा कुत्रा किंवा इतर कोणतेही प्राणी पाळायचे असतील तर ते पैसे देऊन विकत घ्यावे की दत्तक घेण्याकडे जास्त कल असावा हा तसं पाहायला गेलं तर ऐच्छिक विषय आहे. तुम्हाला वेगळी ब्रीड पाळण्याची इच्छा असेल तर अश्या वेगळ्या breeds दत्तक घेण्यासाठी बरेचदा उपलब्ध नसतात. अश्यावेळी breeder च्या मदतीने तुम्ही हवी ती breed विकत घेऊ शकता.

Pet adoption चे सुद्धा वेगळे फायदे आहेत. कोणीतरी जबाबदारी टाकून सोडून दिलेल्या प्राण्यांना दत्तक घेणं, नवीन घराचा अनुभव देणं हे फार आनंद देणारं असतं. शिवाय काही विशिष्ट जातींच्या प्राण्यांचे नव्या breeds बनवण्याच्या दृष्टीने अतिशय हाल केले जातात. pet adoption सारख्या कल्पनांमुळे कोणीही नकळत प्राण्यांना अश्या परिस्थितीतून जाण्यापासून रोखू शकतो. 


•तुमच्या pets शी कसं वागलं पाहिजे?

पाळीव प्राण्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींपासून त्यांची निगा राखण्यापर्यंत अनेक गोष्टींची काळजी आणि मुळात त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. प्राण्यांना आपण जेवतो तेच जेवण देणं, त्यांच्या खाण्यापिण्याची नीट काळजी न घेणं, त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्यांना चांगली वागणूक देणं, त्यांना असलेली मायेची गरज भागवणं ह्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे.

पाळीव प्राणी सांभाळणं एक जबाबदारी आहे. तुम्ही पूणर्पणे तयार असल्याशिवाय प्राणी दत्तक किंवा विकत घेणं टाळलं पाहिजे. अनेकदा प्राण्यांना दत्तक घेऊन नंतर त्यांना दिली जाणारी वागणूक भीषण असते. त्यांची काळजी घेता येत नाही म्हणून त्यांना रस्त्यावर बेवारस सोडून देण्यापासून ते परस्पर दुसऱ्याला किंवा NGO ला दत्तक देण्यापर्यंत अनेक गोष्टी केल्या जातात. 

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा अनेक pet-moms, pet-dads आहेत ज्यांचे त्यांच्या पाळीव दोस्तांशी घट्ट संबंध आहेत.

सुयश टिळक

सुयश टिळककडे असलेला छोटा दोस्त मर्फी सगळ्यांच्या परिचयाचा आहे. त्याच्याबद्दल सांगताना सुयश सांगतो की, “मर्फी ह्या माझ्याच नव्हे तर माझ्या घरातल्या सगळ्यांचा एकदम खास आहे. माझ्या आयुष्यात त्याचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. तो बीगल जातीचा कुत्रा आहे. अश्या जातीची कुत्री कायम एकाच माणसाचं ऐकतात आणि चांगली गोष्ट अशी की तो माझ्या बऱ्याच गोष्टी ऐकतो. प्राण्यांना भावना असतात आणि ते त्या वेळोवेळी पोहचवून दाखवतात. मला तर असंही वाटतं की त्याला माझा मूड बरोबर समजतो. पाळीव प्राणी आयुष्यात असणं फार खास गोष्ट आहे, त्यांना आपल्याला नीट जपता आलं पाहिजे. त्यांच्याशी असलेली वागणूक उत्तम असली पाहिजे. आपल्याला कायद्याने जे प्राणी पाळायला परवानगी आहे त्यातला कोणताही प्राणी पाळण्याआधी त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती घेणं, त्या क्षेत्रातील लोकांचं मार्गदर्शन घेणं फार आवश्यक आहे.”

नेहा पेंडसे

अभिनेत्री नेहा पेंडसेला पाळीव प्राण्यांचा लळा आहे. तिच्याकडे अनेक पेट्स आहेत. ती ह्याबद्दल असं सांगते की, “माझ्या लहानपणापासून माझ्या अवतीभोवती अनेक पाळीव प्राणी होते. माझ्या घरी सगळ्यांना प्राण्यांची आवड आहेच पण सुदैवाने माझ्या नवऱ्याला सुद्धा पाळीव प्राण्यांविषयी खूप प्रेम आहे. आमच्याकडे अनेक वेगवेगळ्या जातीची कुत्री आहेत. ही सगळी थंड प्रदेशात राहणारी किंवा बाहेरच्या देशातली कुत्री असल्याने त्यांना इथे सांभाळणं सगळ्यांना झेपेल असं नसतं. फक्त त्यांच्या दिसण्यावर जाऊन अनेकदा अशी कुत्री विकत घेतली जातात आणि नंतर त्यांचे हाल होतात. अश्या breeds ना सांभाळणं, तेवढी रक्कम देणं सगळ्यांना शक्य होत नाही. अश्यावेळी Indie breeds ला दत्तक घेण्याबद्दल जी एक चळवळ चालू आहे ती खूप चांगली आणि उपयोगी आहे. कोणताही प्राणी पाळण्याआधी त्याच्याविषयी माहिती घेणं खूप गरजेचं आहेच पण तुम्ही स्वतः तयार आहात का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे.”

अभिनेत्री भाग्येश्री लिमये ह्याविषयी असं सांगते की, “माझ्याकडे असलेल्या मांजरीच्या पिल्लांना मी अगदी बाळांसारखं वाढवलं. अगदी दोन दिवसाचे असल्यापासून ते माझ्यसोबत आहेत. मला स्वतःला Indie adoption हा पर्याय खूप सोयीचा वाटतो. त्यात ही भटक्या प्राण्यांना, गरज असणाऱ्या प्राण्यांना दत्तक घेणं, त्यांना नवीन आयुष्य देणं अधिक योग्य आहे असं वाटतं. अजूनही काहींचा प्राण्यांबद्दलचा दृष्टिकोन खूप वाईट आहे. त्यांना सहज दगड मारण्यापासून ते अगदी वाईट वागणूक देणं ह्यासारख्या गोष्टी अगदी सोप्या वाटतात. पण प्राण्यांची मानसिकता समजून त्यांना सांभाळलं पाहिजे. त्यांना लहान बाळांसारखंच वाढवलं पाहिजे.”

YODA ही एक प्राण्यांसाठी काम करणारी, त्यांच्या संवर्धनात मदत करणारी संस्था आहे. प्राण्यांना rescue करण्यापासून त्यांना rehab आणि rehome अश्या सगळ्या सुविधा YODA कडून पुरवल्या जातात. ह्या संस्थेचे सहकारी रोहित पिल्लई असं सांगतात की, “YODA कडून आम्ही आजपर्यंत अनेक प्राण्यांना वाचवलं आहे, त्यांना नवीन आयुष्य दिलं आहे. अनेक प्राण्यांना नवीन घरं मिळवून दिली आहेत. कोव्हिडच्या काळात अनेकांनी वेळ जावा म्हणून टाईमपाससाठी प्राण्यांना दत्तक घेतलं आणि नंतर वेळेअभावी त्यांना रस्त्यावर सोडून दिलं. प्राण्यांना सांभाळण्यासाठी खूप गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. प्राण्यांना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्या संस्थेकडून आम्ही कायम जनजागृती करायचं काम केलं आहे तेच पुढेही करत राहू.”

लेखन- रसिका नानल

Share your valuable opinion

%d bloggers like this: