Coz It’s just Periods.. Menstrual Hygiene Day

अगला स्टेशन मेंस्ट्रुएशन 


Often referred to as periods , chums , monthly cycle etc, menstruation is a monthly phase which brings lot of pain, insecurities, awkwardness and lot of different aspects that varies from person to person depending on the physiological and psychological condition. Here are some of the common questions, which we all deal with and it’s that time of month to solve these queries.

Coz it’s just Periods. Period! Time to set free from the inhibitions and move ahead for being acceptable.

मासिक पाळी हा विषय आजपर्यंत चारचौघात बोलला जायचा विषय नव्हता. बायकांची समस्या म्हणून बघितल्या जाणाऱ्या ह्या गोष्टीकडे एक नैसर्गिक चक्र म्हणून बघणं हे खूप गरजेचं आहे.मासिक पाळी ह्या संकल्पनेशी स्त्रियांची ओळख ही किशोरावस्थेत होते. निसर्गाने बाईच्या शरीरात शुद्धीकरणासाठी निर्माण केलेलं हे चक्र वयाच्या चाळीशी पर्यंत साधारण साथ देत असतं. आजच्या काळात जिथे मेंस्टुरल कप पासून अनेक सोयी उपलब्ध होत आहेत तिथे अनेक ठिकाणी तर हा विषय चारचौघात काढायची सुद्धा लोकांना लाज वाटतेय. आज वल्ड मेंस्टुरल हायजीन दिवसाच्या निमित्ताने काही ठळक प्रश्नांवर नजर टाकूया.


१. मासिक पाळी ह्याबद्दल लोकं तितके जाणकार आहेत का? हा प्रश्न प्रत्यकाने स्वतःला विचारला पाहिजे. इंटरनेटवर लहानातली लहान गोष्ट शोधून पाहताना कधीतरी अश्या महत्वाच्या माहितीचा शोध घेणं आवश्यक असतं. गावापासून शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणच्या स्त्रीला मासिक पाळी येत असते. मग अजूनही ह्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक स्त्री ला मिळणारी वागणूक वेगळी का आहे? आजच्या काळात अजूनही लोकं मासिक पाळीला अभद्र मानतात. मासिक पाळी आलेल्या स्त्रीची रवानगी वेगळ्या ठिकाणी केली जाते. ज्या वेळी तिला सगळ्यात जास्त आधार आणि आराम ह्याची गरज असते त्याच काळात तिची अक्षरशः अवहेलना केली जाते. युट्यूबवर मासिक पाळीवर उपलब्ध असलेल्या अनेक वॉक्स पॉप मध्ये लोकांनी सरळ ह्या विषयावर चर्चा करणं टाळलं आहे. जे काही थोडेफार जाणकार लोक आहेत त्यांची संख्या अगदीच कमी आहे. पण धिमे कदम बढाना शुरवात न होने से अच्छा है. येत्या काळात आलेल्या अनेक शॉर्टफिल्म, जाहिराती ह्यांमुळे हळूहळू बदल होण्यास सुरुवात झाली आहे. ह्याचबद्दल आपलं मत व्यक्त करताना अश्विनी कासार असं सांगते की “मला स्वतःला आठवीत असताना पाहिल्यांदा मासिक पाळी आली. त्यावेळेपासून मी स्वतःकडे एक इमर्जन्सी किट तयार ठेवते. त्यामुळे अचानक आलेल्या ह्या पाहुण्याला सुद्धा व्यवस्थित सामोरं जाता येतं. सेटवर अनेकदा अश्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. अश्या वेळी सर्व बाजूने तयार असणं कधीही उत्तम. हो अजूनही अनेकदा लोकं ह्याबद्दल बोलताना कचरतात. लोकांचा दृष्टिकोन अजूनही काहीसा तसाच आहे कारण आहे अपुरी माहिती आणि शिक्षण. पण मला ह्याबद्दल अजिबात लाज वाटत नाही. कारण हे काही पाप नाही.”

२. मासिक पाळी हा आजार आहे का? त्याआधी होणाऱ्या शारीरिक समस्या काय आहेत? मासिक पाळी हा कोणताही आजार नाही. हे एक शुद्ध आणि नैसर्गिक चक्र आहे. तर मासिक पाळीच्या आधी काही दिवस मूडमध्ये होणारे लाक्षणिक बदल, हात पाय दुखणं, ग्लानी येणं, थकवा येणं हे अत्यंत सामान्य लक्षण आहे. पीएमस अर्थात प्रीमेंस्टुरल सिंड्रोम हे ह्या स्थितीचं नाव आहे. ह्या काळात डोकं दुखण्यापासून ते अगदी चिडचिड होण्यापर्यंत अनेक स्थिती निर्माण होतात. आता पीएमस वर उपाय म्हणून काय करता येईल तर उत्तर आहे काहीच नाही. हा कोणत्याही प्रकारचा आजार नाही ज्यावर उपचार करता येतील. मासिक पाळीच्या वेळी अनेक वेळा स्त्रियांना खूप त्रास होतो. अश्या काळात त्यांना कामातून रजा मिळावी यासाठी पिरियड लिव्ह ह्या संकल्पनेचा शोध लागला आहे. आजकाल अनेक ऑफिस आणि कामाच्या ठिकाणी ही सुट्टी स्त्रियांना आराम करण्यासाठी मंजूर केली जाते तर अनेक स्त्रियांना आजही ही लिव्ह किंवा सुट्टी मिळत नाही. ही घ्यावी किंवा नाही हे प्रत्येक स्त्री गणिक बदलत जाणारं गणित आहे. पिरियड लिव्ह बद्दल सायली संजीव असं सांगते की “मासिक पाळीच्या संबंधित अनेक बाबींवर मी स्वतः अनेक चर्चासत्र घेते. अनेक वेळा स्त्रियांची ही एक समस्या असते की त्यांना खूप त्रास होतो आणि त्यावर उपाय म्हणून सुट्टी मिळावी अशी अपेक्षा असते. पण माझं ह्यावर असं म्हणणं आहे की जर आपण ह्या सगळ्या चक्राला नैसर्गिक म्हणतो तर त्यासोबत येणाऱ्या अडचणींवर आपण यशस्वीपणे मात केली पाहिजे. आपला आहार व्यवस्थित ठेवणं, व्यायाम करणं इत्यादी मुळे होणारा त्रास ही कमी होतो. त्यामुळे अश्या नैसर्गिक गोष्टीसाठी सुट्टी मिळणं थोडं अयोग्य आहे. ज्यांना पीसीओडी किंवा इतर समस्या आहेत ते वगळता अन्य स्त्रियांनी ह्याकडे अत्यंत सामान्य म्हणून पाहावं आणि जोमाने आपलं काम करत राहावं.”

३. पिरियड्स आणि पुरुषमासिक पाळी पुरुषांना येत नाही पण ह्याचा अर्थ असा नाही की पुरुषांसाठीचा विषय नाही. मासिक पाळीच्या वेळी सगळ्यात जास्त प्रश्न घेऊन येणाऱ्या लोकांमध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे. आजकाल अनेक शाळांमध्ये ह्या विषयावर चर्चा करून मुलींसाठी खास अनेक सत्र आयोजित करण्यात येतात. ह्यात त्यांना मासिक पाळी बद्दल सर्व माहिती दिली जाते. फरक फक्त हाच आहे की त्यावेळी तिथे कोणतेही पुरुष किंवा विद्यार्थी नसतात. हीच आजच्या अनेक शाळांची स्थिती आहे. जोपर्यंत ह्याला आपण बाईची समस्या म्हणून बघू तोपर्यंत बदलाची पुसटशी चिन्ह ही दिसणं अवघड आहेत. ही जरी स्त्रीची नैसर्गिक साखळी असली तरी जेव्हा प्रत्येक घरात भाऊ, वडील, पती बाहेरचे मित्र ह्याबद्दलचं वातावरण सामान्य करून तयार झालेला गैरसमज दूर करतील तेव्हा कोणत्याच स्त्री ला लाजून किंवा अडखळून बोलावं लागणार नाही. ह्याचंबद्दल आपलं मत मांडताना शिवानी बावकर असं सांगते की “सिरिअलच्या शूटच्या वेळी तर अनेकदा आपल्याला जास्त काम करायला लागतं. उभं राहून सीन्स करणं, अधिक शारीरिक मेहनत, सततच काम ह्यामुळे कधी फार त्रास होतो. पण सेटवरचे सगळेच पुरुष अगदी मोकळेपणाने ह्यावर बोलतात. माझी व्यवस्थित काळजी घेतात. अगदी लहान लहान कामात मदत करतात. माझी परिस्थिती काय आहे ह्याची चौकशी करून खात्री करून मगच काम करतात.”

४. मासिक पाळीबद्दल जागरूकता करण्यासाठी काय करावं? ह्याबद्दलची स्थिती खूपशी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारी आहे. शहरातील असो किंवा गावातील आज अनेक स्त्रिया संघटित होऊन ह्या विषयावर चर्चा करायला लागल्या आहेत. घरातील वातावरण सर्वसाधारण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ‘व्हिटॅमिन स्त्री’ सारख्या युट्यूब चॅनलवरून प्रसारीत होणाऱ्या पिरियड सर्व्हे मुळे आजच्या पिढीला पडणारे अनेक प्रश्न विचारले ही जात आहेत आणि त्यांची योग्य उत्तरंही मिळत आहेत. नुकताच काही वर्षांपूर्वी आलेला पॅडमॅन ह्या चित्रपटाने ह्या जागृतीच्या लाटेची नांदी केली. पॅडमॅनच्या वेळी आलेलं खास चॅलेंज हे खूप प्रसिद्ध झालं. ‘पिरियड द एन्ड ऑफ सेंटन्स’ ह्या डॉक्यूमेंट्रीला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ह्या डॉक्यूमेंट्रीमध्ये मासिक पाळीसाठी वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी पॅडस् ची कमी पैशात निर्मिती करणाऱ्या महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. मासिक पाळीला सामान्य स्थिती करू पाहणाऱ्या बदलाची नांदी झालेली आहे. ह्यावर ऋता दुर्गुळे असं म्हणते “चित्रपट हे आपलं म्हणणं मांडायचं खूप मोठं आणि चांगलं माध्यम आहे. आपली मतं पोहोचवण्यापासून ते एखादं मत किंवा दृष्टिकोन बद्दलण्यापर्यंत अनेक कामं चित्रपटाद्वारे करता येतात. मासिक पाळीबद्दल चित्रपट तयार होणं हे एका सकारात्मक बदलाचं चिन्ह आहे. पण तो चित्रपट ज्यांच्यापर्यंत नाही पोहोचणार त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आणखी परिणामकारक योजना आखल्या पाहिजेत.”

५.पॅडस् की मेंस्टुरल कप? डिसपोजेबल सॅनिटरी पॅडस् बनवण्याची सुरवात ही १८८८ मध्ये झाली. तर पहिला मेंस्टुरल कप १९३७ साली बनवण्यात आला.सामान्यतः मुलींना सुरवातीला सॅनिटरी पॅडस् शी ओळख करून दिली जाते. पण अनेक ठिकाणी स्त्रियांना सॅनिटरी पॅडस् घेणं परवडत नाही आणि ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यात अनेक गोष्टींचा नैसर्गिक गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.इतक्या मोठ्या प्रमाणावर वापर करणं निसर्गाच्या दृष्टीने धोक्याचं आहे.सॅनिटरी पॅडस् ह्यांना दुसरा पर्याय म्हणून क्लोथ पॅडस् उपलब्ध आहेत. मेंस्टुरल कप हे वन टाईम इन्व्हेस्टमेंट सारखे असतात. ते निसर्गाला हानी पोहोचवत नाहीत आणि ते अधिक काळ टिकणारे असतात. पण ते वापरणं किंवा त्याच्याशी जुळवून घेणं हे प्रत्येक स्त्री ला जमलेच असं नाही.

माध्यम कोणतंही असुदे प्रत्येकाने आपला दृष्टिकोन बदलणं अधिक गरजेचं आहे. प्रत्येक चित्रपटाआधी येणाऱ्या मासिक पाळीच्या जाहिरातीचा आपल्यावर होणारा परिणाम हा आपल्या रोजच्या आयुष्यात दिसणं हेच खरं बदलाचं पहिलं पाऊल ठरेल.

रसिक नानल (प्लॅनेट मराठी)

1 thought on “Coz It’s just Periods.. Menstrual Hygiene Day

  1. खूप महत्त्वाचा तरी जाहिररित्या बोलणे टाळलेला विषय आहे.
    छान लिहिलंय. 👍🏼

Share your valuable opinion

%d bloggers like this: