‘एकदा काय झालं!!’चा सेट ‘प्लास्टिक फ्री’!

भावनाप्रधान कथानक आणि उत्तम कलाकार मंडळींना घेऊन चित्रपट दिग्दर्शित करणारे डॉ. सलील कुलकर्णी यांनी आपल्या आगामी चित्रपटाचे – ‘एकदा काय झालं!!’चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच रिलीज केले होते. या मोशन पोस्टरमध्ये दिसणाऱ्या गोष्टींच्या पुस्तकांमुळे आणि चित्रपटातील दिग्गज कलकारांमुळे या चित्रपटाची चर्चा आतापासूनच रंगली आहे… अशातच आणखी एका गोष्टीमुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे. डॉ. सलील यांनी चित्रपटाबाबत आज आणखी एक पोस्ट शेअर केली, या पोस्टची सोशल मीडियामध्ये चांगलीच चर्चा होत आहे.

‘एकदा काय झालं!!’ या चित्रपटाचे चित्रीकरण कोरोनापूर्वीच झाले होते. या चित्रीकरणादरम्यान सेट वरील एकाही माणासाने प्लास्टिकची बाटली वापरली नाही. त्यामुळे या चित्रपटाचा सेट हा ‘प्लास्टिक फ्री’ राहिला. डॉ. सलील यांनी याच संदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर केली. ‘‘चित्रपटाच्या शुटींग दरम्यान एकही प्लास्टिकची बाटली वापरण्यात आली नाही. मला चित्रपटाचा आणि आपल्या टीमचा अभिमान आहे.’’ असे त्यांनी या पोस्ट मध्ये म्हणले आहे. या सोबतच त्यांनी चित्रपटाच्या टीमचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात सर्व कलाकार आणि सेटवरील इतर मंडळी हातात मेटलच्या पाण्याच्या बाटल्या घेऊन उभे आहेत. या एका उत्तम पुढाकारामुळे मराठी चित्रपटाचा सेट इको-फ्रेंडली झाला, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. या चित्रपटात सुमित राघवन आणि बालकलाकार अर्जुन पूर्णपात्रे यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय मोहन आगाशे, सुहास जोशी, उर्मिला कोठारे, पुष्कर श्रोत्री यांसारखे दिग्गज कलाकार देखील आहेत.

डॉ. सलील कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार अशी तिहेरी कामगिरी केलेली आहे. विशेष बाब म्हणजे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचे मार्गदर्शन या चित्रपटाला लाभले आहे. पुणे टॉकीज प्रा. लि आणि हेमंत गुजराथी यांची प्रस्तुती, तर गजवदन प्रॉडक्शन्स आणि शोबॉक्स एन्टरटेंन्मेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ५ ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. 

Share your valuable opinion

%d bloggers like this: