Emoji the pictorial representation of Expression – इमोजींच्या दुनियेत

इमोजींच्या दुनियेत

मेसेजिंगच्या भाषेतील भावनांचे पिक्टोरिअल म्हणजेच चित्रमय प्रतिनिधित्व म्हणजे इमोजी. काळानुरूप बदललेल्या इमोजीचा वापर मात्र अधिकाधिक वाढत चालला आहे. पण अनेकदा एखाद्या इमोजीचा अर्थ न समजून घेता व्यक्त होण्याची एक चूकही महागात पडू शकते. तर अनेकदा संभाषणाच हे चित्रमय रूपं गंमत आणतं.

आजच्या स्मार्टफोनच्या युगात एकमेकांच्या सतत संपर्कात राहणं खूपच सोपं झालंय. ‘फोनवरून नुसत्याच गप्पा होतात आणि मग त्यावेळी इतर कामांकडे दुर्लक्ष होत’ अशा तक्रारदारांची अडचण विविध मेसेजिंग ॲप्सनी दूर केली आहे. मेसेजिंगमुळे आपला भिडू, जिवलग, दोस्त, नातेवाईक अशा सर्वांशी एकाचवेळी आणि तेही चोवीस तास संपर्कात राहता येतं. त्यात तर शब्द लिहिण्याचे किंवा उच्चारण्याचे कष्टही विविध प्रकारच्या इमोजी किंवा स्माईलींमुळे दिवसांगणिक संपुष्टात आले आहेत. त्यामुळे तुमची भावना, तुमचा मूड समोरच्याला कळण्यासाठी एखादा स्माईली किंवा इमोजीही पुरेसा ठरतो. ‘शंभर शब्दांच्या गोष्टीपेक्षा एक चित्र बऱ्याच गोष्टी सांगून जात’, असं म्हणतात ना… अगदी तसचं…

सगळ्याचं वयोगटातील लोकांकडून तर चॅटिंग दरम्यान इमोजी, स्माईलीचा वापर अगदी सढळपणे केला जातो. यंगस्टर्सकडून थोडा जास्त प्रमाणात होतो, तेही तितकंच खरं. तुमची फिलिंग व्यक्त करताना शब्द पुरत नसतील तर इमोजी स्मायालीचा वापर केला जातो. अर्थात हा चॅटिंगचा भन्नाट प्रकार स्मार्टफोन्स आल्यानंतरचं खऱ्या अर्थाने रुळला असला तरी एकेकाळी टेक्स्ट मेसेज खूप पाठवले जायचे. त्यातूनच टायपिंग पॅडवरील विविध अक्षरांच्या आणि चिन्हांच्या जुळवाजुळवीने इमोटीकोन तयार केले जायचे. त्यातूनच आनंद, दुख, रडू, सरप्राईज, कीस, कन्फ्युज, राग, अपसेट, हार्ट, एंजल अशा भावना व्यक्त व्हायच्या. पण, आता हा प्रकारही कालबाह्य झाला आहे.

मानवी भावनांबरोबरच सेलिब्रेशन, हार्ट ब्रोकन, बुके, खाण्या-पिण्याचे विविध प्रकार, प्राणी, मासे, वेगवेगळ्या गाड्या, रोडसाइंस असे तब्बल दीड हजारांपेक्षा जास्त इमोजी आपल्या चॅटबॉक्समध्ये उपलब्ध आहेत. पण बऱ्याचदा या इमोजीमधील अनेक चेहरे आपल्याला सारखेच वाटतात त्यामुळे कोणत्यावेळी कोणता इमोजी वापरणं योग्य याची मात्र गोची होते. कॉलेजांच्या चॅटग्रुपमध्ये किंवा ऑफिसच्या ग्रुपमध्ये एखाद्या मेसेजवरील चुकीची इमोजी रीॲक्शन खूप भारी पडते. एवढी की तो इमोजी वापरणाऱ्या तो ग्रुप सोडण्याखेरीज पर्याय उरत नाही. तर अनेकदा यातूनच भन्नाट किस्सेही घडतात.

बऱ्याचदा सोशल मिडीयावर कोणा व्यक्तीच्या निधनाची बातमी येते. त्यावर कोणताही विचार न करता ‘थम्स अप’चा वापर केला जातो. आता अशा प्रकारच्या पोस्टवर हा इमोजी कितपत योग्य तो ज्याचा त्याने ठरवावा. किंबहुना प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या सोईनुसार तो अर्थ लावावा. म्हणजे दुःखाची बातमी आमच्यापर्यत पोहचली म्हणून ‘थम्सअप’ ओके या अर्थाने वापरलाय की ‘व्वा ! छान’ असा अर्थ लावावा हे खरतरं न सुटणार कोडं आहे. खरं पाहता, तो थम्सअप म्हणजे ‘लाईक’ या अर्थाने इमोजीमध्ये समाविष्ट केल्याचं अनेकजण विसरतात.

‘अगर ये गाना पेहचानोगे, तो WhatsApp के राजा केहलाओगे’, असं म्हणत मेसेज वर आलेला इमोजीचा वापर करून एखादं गाणं किंवा चित्रपटाचं नावं ओळखण्याचा खेळ चॅटिंगमध्ये रंगत आणतो. तर अनेकदा भरपूर इमोजी वापरून तयार केलेली मेसेजची एक ओळ समजून घेण्यात नाकी नऊ येतात हेही तितकंच खरं.

तुम्हाला हे माहित आहे का?

असा तयार झाला इमोजी…

पहिला इमोजी अमेरिकेतील ग्राफिक आर्टिस्ट हार्वे रोसबॉल याने तयार केल्याचं बोललं जात. पिवळ्या रंगाच्या गोलात दोन काळे टीपके असलेले डोळे व हसऱ्या चेहऱ्याची आठवणं करून देणारी एक वक्ररेषा असे त्याचे स्वरूप. १९६२ साली तयार झालेली ही स्मायली खूप लोकप्रिय झाली आणि स्मार्टफोनच्या युगात ती विविध रूपातही आली.

अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)

http://www.planetmarathimagazine.com

http://www.planetmarathi.com

http://www.planetmarathi.org

Share your valuable opinion

%d bloggers like this: