Foodiee by the Bea / खाण्यासाठी काहीपण – World Food Day

गंडलेल्या रेसिपी आणि फुडी स्वभाव 

वडापाव की समोसा पाव? हॉटेल की स्ट्रीट फूड? टपरी वरचा चहा की कॅफे मधली कॉफी? हे प्रश्न आज आम्ही तुम्हाला का विचारतोय असं तुम्हाला वाटत असेल ना…! अहो आजचा दिवस आहे खाण्यावर बोलण्याचा म्हणजे आज आहे ‘वर्ल्ड फूड डे’ अर्थात ‘जागतिक अन्न दिवस’ आपल्यापैकी अनेकजण टिपिकल खवय्ये असतात. एवढं की वेगवेगळ्या पदार्थांची लज्जतदार चव चाखण्यासाठी लोक खास खाण्यासाठी प्रवास करतात. आपल्या प्रत्येकात तो एक ‘फुडी आत्मा’ लपलेला असतो. अमुक एका ठिकाणी हे छान मिळत आणि अरे तू तिकडे चायनीज खाल्लं का? हे सगळे डायलॉग आपल्याला आपल्या ग्रुप मध्ये ऐकायला मिळतात. कॉलेजबाहेरचा सँडविचवाला असो किंवा ऑफिस बाहेरचा टपरीवरचा चहा आणि वडापाव हे सगळंच आपल्याला खूप आवडतं. अनेकदा आपल्या डाएटमुळे अश्या स्ट्रीटफूड वर पाणी सोडावं लागत पण हल्ली डाएट फूडचेही अनेक चविष्ट पर्याय उपलब्ध असतात. ‘खाण्यासाठी जन्म आपूला’ असे बरेच जण म्हणतात आणि त्यांच आयुष्यातलं ध्येय एकच असत जिभेचे चोचले आणि पोटाचे लाड पुरवण्यासाठी नवीन जागा शोधण.

आजच्या ‘फूड-डे’ निमित्त आम्ही काही कलाकारांना त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच केलेल्या खास पदार्थांविषयी विचारलं, त्यांचे आवडते फूड स्पॉट आणि बरंच काही या निमित्ताने आम्ही जाणून घेतलं आहे. चला तर मग आपल्या कलाकारांच्या काही गंमतीजमती जाणून घेऊयात…

आटलेलं कलाकंद आणि बरंच काही….

मी प्रचंड फुडी आहे आणि माझा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे मोमोज. मी स्वतः मोमोज बनवले नाही पण आयुष्यात पहिल्यांदा मी ‘कलाकंद’ बनवलं होत. आईकडून मी हा पदार्थ शिकले तिने याची एक अगदी छोटीशी रेसिपी सांगितली होती ती म्हणजे दूध नासलं की ते वाया जाऊ नये म्हणून काही लोक पनीर करतात तसं आपण कलाकंद बनवू म्हणून मग नासलेल्या दुधात साखर, ड्रायफ्रुट्स घालून ते छान आटवायचं. जेव्हा मी कलाकंद पाहिल्यांदा बनवलं होत तेव्हा मी ते इतकं आटवल होत की ते जळाल होत. पण, मग त्याच्यावरचा वरचा भाग खूप चविष्ट लागत होता. या फसलेल्या ‘कलाकंद’ नंतर मी अनेकदा न चुकता उत्तम कलाकंद बनवला. मला जेवण बनवण्यात फार रस नसला तरी मी पक्की खव्वय्यी आहे. मला नॉनव्हेज खूप आवडतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नवनवीन पदार्थ खायला आवडतात. – -शिवानी सोनार (अभिनेत्री – राजा राणीची ग जोडी)

गुलाबजाम साठी काहीपण… 

‘गुलाबजाम’ म्हणजे माझा जीव कि प्राण असं म्हणणं वावग ठरणारं नाही. त्यामुळे मी प्रयत्न केलेला पहिला पदार्थ ही तोच होता. आयुष्यात पहिल्यांदा मी खव्याचे गुलाबजाम ट्राय केले होते. गुलाबजाम करण्यामागची गंमत अशी की माझ्या मावशीचा खव्याचा व्यवसाय आहे “फक्त खाण्याची काम करशील का!” हे वाक्य मी अनेकदा ऐकतो म्हणून म्हंटल आपण आपल्या आवडीचा पदार्थ बनवून बघू आणि म्हणून मी आयुष्यात पहिल्यांदा छान साजूक तुपातले साखरेच्या गोड पाकातले ‘खव्याचे गुलाबजाम’ बनवले होते. लग्नात किंवा कुठेही गुलाबजाम खाण्याची मज्जा काही औरच असते त्यामुळे मी जिथे कुठे जातो आणि तिकडे जर गुलाबजाम असतील तर मी त्यांचा मनसोक्त आस्वाद घेतो. मुंबईत खाण्याची आवडीची जागा म्हणजे दादरच ‘आस्वाद’ इथे थालीपीठ पासून सगळंच खूप भारी चविष्ट मिळतं. अमरावती मध्ये रघुवीर, रोशनी तर खाण्यासाठी आपले असे असंख्य अड्डे आहेत जिथे एकदम वऱ्हाडी कडक आणि घरगुती जेवण मिळतं. -शिव ठाकरे (अभिनेता)

तारेवरची कसरत आणि जमलेला पिझ्झा 

आयुष्यात पहिल्यांदा मी काय पदार्थ केला तर अगदी तुम्हाला वाचून थोडं आश्चर्य वाटेल पण मी केलेला पहिला पदार्थ ‘तवा पिझ्झा’. लहानपणी मला डॉमीनोज किंवा पिझ्झा हटचा पिझ्झा कधीच आवडला नाही. आपल्या सगळ्यांचीच आई सुगरण आणि तितक्याच कल्पक असतात. त्या काही न काही जुगाड करून आपल्याला देसी स्टाईल तितकंच पौष्टिक खायला करून देत असतात. तसंच माझी आई ‘देसी पॅन पिझ्झा’ करून द्यायची आणि मला तो खूप आवडायचा. लहानपणी आई-बाबा कामाला जायचे. एकदा शाळेतून घरी आल्यावर प्रचंड भूक लागलेली. घरी एकटी असल्याने काही स्वयंपाक करता येत नव्हता. पण स्वतःसाठी काहीतरी बनवून खाऊ या म्हणून फ्रिज उघडला त्यात भाज्या होत्या पण ऐन वेळी घरी पिझ्झा बेस नव्हता मग चपात्या घेऊन मस्त खरपूस भाजल्या, त्यावर भाज्यांचे टॉपिंगस आणि अश्यातच गेलेली लाईट म्हणून एकंदरीत तारेवरची कसरत करून मी “तवा पिझ्झा” तयार केला आणि तो ही तितकाच रुचकर आणि स्वादिष्ट झाला होता. -मिताली मयेकर (अभिनेत्री)

मुलाखत – नेहा कदम (प्लॅनेट मराठी)

Share your valuable opinion

%d bloggers like this: