Happy Birthday Anvita Phaltankar

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खूप अविस्मरणीय दिवस असतो. ह्या स्पेशल दिवशी आपल्याला मिळणाऱ्या शुभेच्छा लाखमोलाच्या असतात. सध्या लॉकडाऊनमुळे कोणालाच कोणाकडे जाता येत नाहीये, भेटता येत नाहीये, सरप्राईज देऊन शुभेच्छा देता येत नाहीयेत. अश्या सगळ्या काळात आपल्याकडून त्या व्यक्तीसाठी आपल्याला जे करता येईल ते सगळं आपण करतो. आमच्याकडुनसुद्धा अशीच एक छोटीशी भेट.

       आज आपण अश्या एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जी फक्त अभिनय नाही तर नृत्य, चित्रकला अश्या अनेक कलांमध्ये पारंगत आहे, जिचा बिनधास्तपणा आपण तिच्या गर्ल्स ह्या चित्रपटातून पाहिला आहे अशी खऱ्या आयुष्यातदेखील बिनधास्तपणे जगणारी, स्वच्छंदी मनाची, गो विथ द फ्लो जगणारी आणि तमाम मुलींसारखीच विकी कौशलवर प्रेम करणारी अत्यंत गोड अशी अन्विता फलटणकर

       लाडाने अन्व्या, अन्वू म्हणून ओळखली जाणारी अन्विता ठाण्याची आहे. तिने बी.ए इन थिएटर केलेलं आहे. अन्विताचा एक खऱ्या अर्थाने चांगला असलेला वेडेपणा तिला खूप आवडतो तर तिची अतिविचार करायची सवय तिला जरा खटकते. युरोपला सफर करायची तिची इच्छा आहे. संगीत, नृत्य तिचं कुटुंब आणि मित्रमैत्रिणी ह्यांच्याशी तिचं घट्ट नातं आहे. ह्या गोष्टींशिवाय तिला जगता येत नाही. तर स्कुबा डायविंग करणं, एखादं वाद्य शिकणं आणि वल्ड टूर करणं ह्या गोष्टी तिला करायच्या आहेत.

       असं अपल्यासोबतही अनेकदा होतं की आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी करायची एखादी सुपरपॉवर आपल्याला मिळावी असं आपल्याला वाटतं. तशी सुपरपॉवर तिला मिळाली तर तिला कधीही न तुटणारं हृदय हवंय असं तिचं म्हणणं आहे. एखाद्या जगात नसणाऱ्या व्यक्तीला परत आणायचं असेल तर तुमच्या अमच्यासारखंच तिलाही पु.ल देशपांडे ह्यांना परत धरतीवर बोलवायला आवडेल. कामाच्या ठिकाणी पल्लवी पाटील, पार्थ भालेराव आणि मनमित पेम हे तिचे आवडते को-स्टार आहेत. झोया अख्तर आणि इम्तियाज अली तिचे आवडते दिग्दर्शक आहेत.

       अत्यंत गोड, मोहक आणि प्रभावी अशी प्रशंसा मिळालेल्या अन्विताला काही वेगळे पण महत्वाचे प्रश्न विचारले त्यावर तिने फार प्रभावीपणे त्यांना उत्तरं दिली. एकंदरच समजात चालू असलेल्या बॉडी शेमिंगवर तिला प्रश्न विचारला तेव्हा तिने एक खास किस्सा शेअर केला. एका चित्रीकरणाच्या वेळी तिला एका व्यक्तीने वजनावरून सहज टिपणी केली. जास्त वजनामुळे लग्नाला नकार देतील असं तिला म्हणण्यात आलं. ते जरी तेवढ्यापुरतं मजेत म्हणलं गेलं असेल तरी असं कोणाच्याही वजनावरून एखाद्याला बोलणं हे अयोग्य आहे असं ती सांगते. मनाने मोठा आणि विचारांची कक्षा उंच असलेला माणूस आपल्याला आहे तसं स्वीकारू शकतो असं ती म्हणते. समाज हा जगण्यातल्या एक मोठा प्रभाव पाडणारा घटक असला तरी आपल्याला एकच आयुष्य जगायला मिळतं ते आपण आपल्या पद्धतीने आनंदाने जगावं, कोणाचं बोलणं ऐकून विचार करायचा ह्याबाबतीत थोडं सजग असण्याची गरज आहे असं तिला वाटतं. आधी कधीतरी काहीसा स्वतःच्या शरीराबद्दल आत्मविश्वास कमी असलेली अन्विता आज तिच्या कुटुंबियांमुळे आणि स्वतःवरील विश्वासमुळे स्वतःला आहे तसं स्वीकारू शकते. तिच्या कुटुंबाने तिला कायमच प्रत्येक वेळी साथ दिली असं ती सांगते. तिच्या अभिनय क्षेत्रात काम करण्याच्या निर्णयाला घरून पूर्ण सहमती आहे. तिच्या कुटुंबाने तिला कायम सगळ्या परिस्थितीत भक्कम आधार दिला. छोट्या छोट्या अपयशाच्या काळातही खूप साथ दिली. त्यामुळे ती स्वतःला भाग्यवान समजते.

     मित्रमंडळी आणि धमाल ह्याबद्दल तिला विचारलं तर तिने खूप सुंदर किस्सा शेअर केला. ती असं म्हणते की,”सातवीत असताना आम्ही नागावला काही मैत्रिणी मिळून राहायला गेलो होतो. त्यावेळी मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही मिळून आम्ही इतरांसोबत प्रँक करायचं ठरवलं. झोपलेल्या मैत्रिणींच्या चेहऱ्यावर टूथपेस्ट लावायचं असं आम्ही ठरवलं होतं. आमच्याकडे टूथपेस्ट नव्हती म्हणून प्लॅनिंगच्या हिशोबाने आम्ही पहाटे उठून झोपलेल्या एका मैत्रिणीच्या बॅगेतून टूथपेस्ट काढली. अपार कष्टाने मधे मधे पाळत ठेवत, कोणी थोडं जरी हललं तरी झोपायचा अभिनय करत आम्ही झोपलेल्या मैत्रिणींच्या तोंडाला एकीच्या हाताला टूथपेस्ट लावली आणि झोपून गेलो. आमच्यावर आमचा प्लॅन उलटू नये म्हणून सोबत झोपलो. सकाळी जाग आली तेव्हा त्या मैत्रिणींच्या हाताला, कपड्यांना, चेहऱ्याला सगळीकडे टूथपेस्ट लागली होती. सगळ्याजणी आम्हा दोघींवर चिडल्या आणि आम्हाला अशी फजिती करून खूप छान वाटत होतं. “तिच्या मित्रमैत्रिणींचा गोतावळा मोठा आहे. तिच्या जुन्या वाढदिवसाबद्दल ती असं सांगते की,”माझा एक वाढदिवस फार खास साजरा केला होता. माझे जवळपास वीस मित्रमंडळी माझ्या घरी आले होते आणि आम्ही रात्रभर जागून धमाल केली होती. तसं माझा चार मैत्रिणींचा एक ग्रुप आहे. आमचे वाढदिवस रांगेत असल्याने आम्ही एक/दोन वर्षांपूर्वी बाहेर पार्टी करायला जायचं ठरवलं होतं. तो ही वाढदिवस खूप छान साजरा झाला होता.”

प्रिय अन्विता,

आठवणीत राहणारा दिवस म्हणजे वाढदिवस. तुझ्या आधीच्या आठवणींतील वाढदिवसासारखाच ह्या वर्षीचा वाढदिवस सुद्धा आनंददायी असुदे. तुझ्यासारखी बिनधास्त आणि खरी तूच.

प्लॅनेट मराठी कडून अन्विता फलटणकर ह्या सुपर गर्ल ला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!!

मुलाखत : रसिका नानल (प्लॅनेट मराठी)

Share your valuable opinion

%d bloggers like this: