Let’s do all best things required to make the environment a better place to live.

निसर्गाकडून माणसाला मिळालेलं एकमेव मोठं वरदान आहे सद्सद्विवेक बुद्धी वापरणं आणि विचार करणं. त्याच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपण थोडा विचार करू शकतो का? मग आपल्याला मिळालेल्या वरदानाचा उपायोग काय?

आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे “तहान लागल्यावर विहीर खणणे”. आपल्यावर येणारं प्रत्येक संकट हे चाहूल न देता येत नाही. तरीही अगदी हातातोंडाशी घास येईपर्यंत आपण कोणतीच उपाययोजना करत नाही. जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी ५ जून ला साजरा केला जातो. फक्त तेवढ्या एकाच दिवशी आपलं निसर्गाबद्दलचं आणि पर्यावरणाबद्दलचं प्रेम उफाळून येत असतं. त्याला तुम्ही आम्ही कोणीच अपवाद नाही. त्यानिमित्ताने आपण एकतर मोठे संदेश लिहिणं आणि प्रेम दर्शवणं ह्या करता आपण जागे होतो किंवा मग थेट संकट आल्यावरच. त्याच्या अधिपर्यंत प्रदूषण, कचरा, वृक्षतोड, पर्यावरण अश्या शब्दांना फार किंमत दिली जात नाही. मात्र आता खरी वेळ आली आहे, वास्तवतेचे भान ठेवून कृती करण्याची. प्रत्येक वेळी संकटांचा उल्लेख करण्याऐवजी उपाययोजनांची माहिती मिळाली तर पर्यावरण दिन सार्थकी लागेल.

      ह्या कोरोना आणि लॉकडाऊनचा एक फायदा असा की निसर्ग स्वतः माणसाने केलेली हानी भरून काढतोय. ओझोनची पातळी वाढण्यापासून ते अगदी गंगा नदी स्वच्छ होण्यापर्यंत अनेक बाबींमध्ये निसर्ग स्वतःचा बिघडलेला समतोल सुधारतो आहे. पण हे इथेच थांबतं का? लॉकडाऊन उघडल्यावर माणूस पुन्हा एकदा आधीसारख्याच चुका करणार की केलेल्या चुकांतून शिकून निसर्गाची काळजी घेणार? खरंतर जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन आणि खायला लागणारं अन्न हे आपल्याला निसर्गाकडून मिळतं. जर त्याच पर्यावरणाचा समतोल आपण नाही सांभाळला तर आपल्यावर मरण्याची पाळी येऊ शकते. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने माणसाने उपाय म्हणून करायच्या ह्या गोष्टी जरी लक्षात ठेवून पाळल्या तरी एक सजग माणूस म्हणून आपल्याला जगता येऊ शकतं.

1. लहान वयापासूनच मुलांना पर्यावरण, निसर्ग ह्याबद्दल जागरूकता आणि कुतूहल निर्माण करणं.

माणूस लहानपणी शिकवलेल्या गोष्टी विसरत नाही असं म्हणतात. जर लहान वयातच आपण मुलांना शाळेत किंवा घरी ही पर्यावरणाचं महत्व पटवून दिलं आणि पुस्तकी ज्ञान न देता खऱ्या अर्थाने नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरण संवर्धन ह्याबद्दलची शिकवण दिली तर मोठेपणी येणाऱ्या अनेक अडचणींना नष्ट करता येईल.

2. प्रदूषण विषयक नियमांचं काटेकोर पालन करणं.

सरकारने प्रदूषण रोखण्यासाठी अनेक नियम घालून दिलेले असतात. पण ते सगळे नियम अगदी सहज धाब्यावर बसवून माणूस स्वतःच्या मनाला वाटेल ते आणि तसं निसर्गाशी वागत असतो. त्याऐवजी प्रदूषण विषयक नियम अधिक कडक करून ते मोडण्यात येणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

3. निसर्गप्रेमींनी आपापसातील वाद बाजूला ठेवून मूळ मुद्द्यावर लक्ष देणे.

प्रत्येक ठिकाणी दोन मतांची लोकं कार्यरत असतात.त्यामुळे मतातील फरकामुळे वाद निर्माण होत असतात.पण त्या वादालाही एखादी मर्यादा असावी.निसर्गाच्या संरक्षणाच्या मुद्द्यात इतर मुद्दे न आणता जास्तीत जास्त चर्चा आणि शांत पद्धतीने मतमंडणी करून सर्व गटातील लोकांनी एका उद्दिष्टाने काम करावं.

•विकास आणि निसर्ग

      काही ठिकाणी आपल्याला विकासाच्या कामासाठी पर्यावरणाच्या बाबतीत कठोर निर्णय घ्यावे लागतात. अश्या वेळी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी काय करता येईल? मुळात पडताळणी करावी. खरंच खूप अत्यावश्यक कामासाठी वा कारणासाठी झाडांची कत्तल करणं आवश्यक आहे की ती न करता कमी प्रमाणातील उपाययोजना करून काम भागणार आहे का? ह्या प्रश्नांची उत्तरं मुळाशी जाऊन शोधावी. जर तश्याच काही न टाळता येणाऱ्या कारणासाठी झाडांची संख्या कमी करणं गरजेचं असेल तर कापलेल्या झाडांच्या संख्येपेक्षा अधिक झाडं कोणत्या सुयोग्य ठिकाणी जाऊन लावता येतील ह्याचा एक आराखडा तयार करण्यात यावा आणि त्या ठिकणी जाऊन अधिकाधिक झाडांची लागवड व्हावी.

• पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा

    ह्या वर्षी आलेला हा उत्तम योग विसरून चालणार नाही. ह्या दिवशी वटपौर्णिमा आणि पर्यावरण दिन हे एकाच दिवशी आले आहेत. वटपौर्णिमेला स्त्रियाव्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. आपल्याला जी सत्यवान सावित्रीची कथा ह्या दिवशी सांगितली जाते तर कल्पना करा की सत्यवान आणि सावित्रीची तीच कथा आजच्या काळात घडली असती तर. निसर्गरुपी सत्यवानाला घेऊन जायला आलेल्या यमाला माणूसरुपी सावित्रीने वाचवलं अशी कथा निसर्ग आणि माणूस ह्या पात्रांच्या समवेत आजच्या काळात घडली तर? समतोल बिघडणाऱ्या निसर्गाला यमाच्या तावडीतून सोडवून आणलेल्या माणसाला सारं जग लक्षात ठेवील.

      वटपौर्णिमा साजरी करण्याचं आणखी एक कारण म्हणजे निसर्गाचं जतन. निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावं अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही अशी आपल्याकडे समजूत आहे.सत्यवान सावित्रीच्या कथेसोबतच ह्या वृक्षसंवर्धनाच्या कथाही ह्या माध्यमातून सांगितल्या गेल्या पाहिजेत.

       आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत देखील अशी अनेक मंडळी आहेत जी निसर्ग पर्यावरण ह्याबद्दल खूप जागरूक आहेत. ती वेळोवेळी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना पर्यावरणाबद्दल काळजी घेतली जावी ह्यावर आवाहन करत असतात. स्वतःच्या घरात स्वतः लावलेल्या झाडांची निगा राखण्याचं काम हाती घेतलेला “भूषण प्रधान” ह्यानिमित्ताने असं सांगतो की “आपण सध्या ह्या लॉकडाऊनमुळे अनेक गोष्टी शिकलो आहोत.आपण केलेल्या अनेक चुकांवर निसर्गाने आता उत्तर देण्याचं ठरवलं आहे आणि आता तो स्वतःमध्ये बदल घडवून आणतो आहे. हीच खरी वेळ आहे आपल्या चुका सुधारायची आणि मला खात्री आहे आपण त्या नक्की सुधारू. कारण आपण ह्या निसर्गाची देण आहोत. आपण त्याची निर्मिती केली नाहीये तर निसर्गाने आपल्याला सगळ्यांना बनवलं आहे त्यासाठी आपण त्याचे कायम ऋणी राहिलं पाहिजे.” 

     पर्यावरणाचा समतोल साधला जावा म्हणून जागरूक असलेली अभिनेत्री “प्रार्थना बेहरे” असं म्हणते की  “आपण केलेल्या चुकांतून शिकून काहीतरी चांगलं करून दाखवायची ही खरी वेळ आहे. आपण फक्त समस्या सांगत न बसता समस्यांवर उपाय म्हणून आपण काय केलं पाहिजे ह्याचा विचार करणं आवश्यक आहे. प्रदूषण रोखण्यासाठी, कचरा कमी करण्यासाठी काय करता येईल ह्याचा विचार केला पाहिजे. ह्याचा अर्थ घरातच बसून राहिलं पाहिजे असं नाही. पण बाहेर पडताना, वावरताना कोणती काळजी घ्यावी ह्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे.”

       माणूस हा सगळ्यात जास्त हुशार प्राणी समजला जातो. स्वतःच्या आरोग्यासाठी थोडा अधिक विचार, पर्यावरणाची थोडी अधिक काळजी जर घेण्यात आपण यशस्वी झालो तर आपल्या संपूर्ण जन्माचं सार्थक होईल. पर्यावरणाशी संबंधित विचारांना नुसतं फॉरवर्ड करण्याऐवजी ते स्वतःमध्ये आणणं अधिक उपयोगाचं ठरेल.

रसिका नानल (प्लॅनेट मराठी)

Share your valuable opinion

%d bloggers like this: