‘Lockdown helps them to come up with new business ideas’ – तरी मोडला नाही कणा….

लॉकडाउन काळातही त्यांची उमेद कायम, नव्या उद्यागांचा केला श्री गणेशा.

तरी मोडला नाही कणा….

संपूर्ण जग सध्या करोनाच्या सावटाखाली जगत आहे. या संकटामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं. खबरदारीचा उपाय म्हणून देशभर कडक लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. शाळा-कॉलेज बंद झाली, वाहतूक थांबली आणि सगळे व्यवसाय ठप्प झाले. परिणामी प्रत्येकालाच या न त्या अडचणींचा सामना करावा लागला. याचा जबरदस्त फटका सर्वच उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रांना सहन करावा लागला. देशात लॉकडाऊन जाहीर झाला, आर्थिक चणचणमुळे अनेकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या. नुकत्याच आलेल्या एका सर्वेक्षणानुसार तब्बल २.१ कोटी भारतीय लोकांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्याचं यात नमुद करण्यात आल आहे. अगदी कॉर्पोरेट क्षेत्रापासून ते इंडस्ट्रीयल क्षेत्रातील लोकांच्या नोकरीवर यामुळे गदा आली आहे. अनेक ठिकाणी ‘वर्क फ्रॉम होम’ चा पर्याय निवडत तर काही ठिकाणी अनलॉक प्रक्रियेनंतर हळूहळू लोकं त्यांच्या ऑफिसला जाऊ लागलेत. अशा परिस्थितीताही आपल्या कौशल्याचा जोरावर काहींनी स्वतःचे उद्योगधंदे सुरू केले. भाज्या विकण्यापासून ते थेट घरपोच फूड डिलिव्हरी देण्यापर्यंत अश्या अनेक छोट्या-मोठया उद्योगांचा या काळात श्रीगणेशा करण्यात आला आहे. या संकटाशी दोन हात करत उद्योग क्षत्रात हिमतीने उभे राहू पाहणाऱ्या काही खास लोकांकडून त्यांच्या या नव्या उद्योगांबद्दल जाणून घेऊ या….

लॉकडाउन काळात सर्वत्र बंदी असली तरी लोकांच्या जिभेचे चोचले मात्र कायम होते, आणि यातूनच नव्याने सुरुवात झाली ती ‘होम किचन्स’ची सुरुवात झाली. घरचा स्वाद असलेली अस्सल चवीची बिर्याणी बनवणारा तरुण ‘गुंडभाई बिर्यानीवाले’ यांच्या खास बिर्यानी मागची गोष्ट सांगतोय ‘प्रसाद गुंड’.

२०१८ मध्ये पदवी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर २०१९ मध्ये एक सेल्सजॉब करायला घेतला आणि माझ्या या प्रवासाला सुरुवात झाली. मला स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे. चमचमीत पदार्थ बनवणं, स्वतः खाऊन अनेकांनी तृप्त करायला मला आवडतं. त्यामुळे या क्षेत्रात काहीतरी नक्कीच करायचं असं माझ्या कायम डोक्यात होतं. डिसेंबरमध्ये नोकरी सोडून फूड-इंडस्ट्रीत काहीतरी करू या विचाराने मी मार्चमध्ये एक छोटा ‘मोमो-स्टॉल’ सुरू केला. सगळं सुरळीत सूरू असताना, करोनाच्या सावटाखाली इतरांप्रमाणे माझंही नुकसान झालं. लॉकडाउनध्ये फक्त घरी बसून करायचं काय, म्हणून मी स्वयंपाकात विविध प्रयोग करायला सुरुवात केली. नवनवीन पदार्थ बनवायला लागलो. सोशल मीडियावर कोणीतरी ‘होम किचन’ सुरू केल्याची पोस्ट पहिली आणि माझं ठरलं. लॉकडाउनमध्ये हॉटेल बंद होती तर लोकांना घरच्याघरी पण चटकदार आणि स्वच्छ जेवण हवं होतं. इथून माझं प्लॅनिंग सुरू झालं. आपणही घरच्याघरी जेवण बनवून ते घरोघरी डिलिव्हरी करण्याचं ठरवलं. या सगळ्यात घरच्या जवाबदाऱ्या ही होत्या आणि म्हणूनच जूनपासून मी पुन्हा सेल्समध्ये कामाला सुरुवात केली. पण, त्यात माझं मान रमत नव्हतं. अखेर ही नोकरी पुन्हा सोडून माझा मोर्चा स्वयंपाकाकडे वळवला. काहीवेळा माझे मित्र-मैत्रिणी घरी जेवायला याचे त्यांनी मी बनवलेल्या पदार्थांचं केलेलं कौतुकं लक्षात घेऊन मी बिर्याणी बनवणं याकडे व्यवसाय म्हणून पाहू लागलो. फूड पेजवर काम, पोस्टर, मेन्यू कार्ड अशी कामांची लगबग वाढू लागली आणि अखेर बिर्याणीचा ऑनलाइन व्यवसाय सुरू झाला. सोशल मीडियावरून जाहिरात करत सुरु केलेल्या या व्यवसायाला छान प्रतिसाद मिळतोय, लोकांना जेवण आवडतंय. आपल्या जेवणातून लोकांना पारंपरिक चव द्यावी हाच उद्देश होता आणि तो पूर्ण होतोय याचा आनंद आहे.

लॉकडाउनमुळे सगळंच ठप्प झालं. जग कुठेतरी थांबलं पण या सगळ्यात शिक्षण हे कुठेच न थांबता अनेक शाळा, कॉलेजांनी ऑनलाइन शिक्षणाचा स्मार्ट पर्याय निवडला. टेक्नॉलॉजीचा वापर करून शिक्षणाचा डिजिटल प्रवास भारतात अनेक ठिकाणी सुरु झाला, रुळला. याचं डिजिटल शिकवणी मागची एक स्मार्टस्टोरी सांगतात सहाय्यक प्राध्यापक ‘राहूल सावंत’

लॉकडाउन दरमान्य माझ्या परदेशातील भावाने त्यांचा मुलीला शिकण्यासाठी ‘ऑनलाइन इंडियन टुटोरियल’ हवा आहे अशी पोस्ट केली. आपण आपल्या पुतणीला का शिकवू नये? या विचारातून मी या शिकवणीला सुरुवात केली. तिकडच्या अभ्यासक्रमात आणि भारतीय शिक्षणात मोठा फरक आहे मी जाणून होतो. पण तिच्या या शिकवणीमुळे त्याचा प्रत्यक्षात अनुभव आला. ऑनलाइन लेक्चर असल्यामुळे आधी विषयांची शोधाशोध, त्यात अभ्यासक्रम अगदीच वेगळा. अमेरिकेत ओपन लर्निंग हा प्रकार असल्याने त्यांचा अभ्यासक्रम देखील तितकाच मजेशीर आहे. अमेरिकेत मुलांना ज्या विषयात रस आहे तो विषय शिकण्याची मुभा आहे मग यात वेगवेगळ्या विषयांच्या सोबतीने लाईफस्पेस सारखे विषय त्यांच्या अभ्यासाचा भाग आहेत. ८ वर्षाच्या “जल” ला शिकवता-शिकवता मी तिच्या मैत्रिणीचीही (सोफिया) शिकवणी घेऊ लागलो. सध्या सोफिया आणि जल या दोघींची मी ऑनलाईन शिकवणी घेतोय. सोफियाला शिकवणं थोडं आव्हानाच होत कदाचित भाषा बोलण्याच्या पद्धतीमुळे ते असावं. नंतर मात्र हळूहळू माझं बोलणं तिला समजू लागलं. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होऊ लागल्या. ऑनलाईन शिक्षणाची अनोखी ओळख मला या निमित्ताने झाली आहे.

गाडी चालवण्याची कला अवगत असलेल्या मुंबईच्या महिला टॅक्सी ड्राईव्हर ‘स्मिता झगडे’. लॉकडाउनमुळे जॉब गेला आणि पुन्हा हिंमतीने उभं राहून त्यांनी आपल्या जीवावर टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेतला. महिला टॅक्सी ड्राईव्हर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्मिता यांचा हा प्रेरणादायी प्रवास..

कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, माझीदेखील नोकरी गेली आणि जवळपास तीन महिने मी घरात बसून होते. कंपनीने पगार दिला नाही, पण मग आता असचं बसून चालणार नाही म्हणून आपल्याला घराबाहेर पडून आपल्यात असलेलं कौशल्य वापरून आपण टॅक्सी चालवायचं ठरवलं. मी तीन महिन्यांनंतर मुंबईत महिला टॅक्सी ड्राईव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली. गेली सात वर्ष मी एका ड्रायव्हिंग स्कुलमध्ये चारचाकी वाहनांसाठी प्रशिक्षक म्हणून काम केलं. त्यानंतर माझ्या ड्रायव्हिंग कौशल्याचा जोरावर टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईत महिला टॅक्सी ड्रायव्हर म्हणून रुजू झाले. ‘हे बायकांचं काम नाही. तुला हे जमणार नाही.’ असं अनेकांनी सांगितलं. पण हिंमतीने स्वतःच्या पायावर उभं राहून घरासाठी आपण काहीतरी करण्याचा माझा निर्धार होता. मुंबईत टॅक्सी चालवणं सोपं काम नाही. पण, आता मोठ्या उत्साहात मी हे काम करायला घेतलंय. या परिस्थितीत संधीच सोनं करत आज मी हिंमतीने टॅक्सी चालवते.

नेटवर्किंग प्रोफेशनल, टूर-मॅनेजर आणि लॉकडाउनमुळे व्यवसायावर झालेल्या परिणामांमुळे डगमगून न जाता हा तरुण चक्क घरोघरी मासे विकतोय. लोकांची गरज ओळखून योग्य वेळी योग्य निर्णय घेत घरपोच ताजे मासे पोहचवणारा तरुण व्यावसायिक ‘समीर भोस्तेकर’ सांगतोय त्याचा मजेशीर प्रवास…

माझं बीएससी आयटी पर्यंतच शिक्षण पूर्ण झाल्यावर नेटवर्किंगमध्ये स्पेशलायझेशन केलं. त्यानंतर अनेक नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी केल्यानंतर मी स्वतःचा बिझनेस सुरु करण्याचा विचार केला. २०१६ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन मी माझी टुर्स अँन्ड ट्राव्हल्स कंपनी सुरु केली. २०१६ ते २०२० या काळात अनेकांना त्यांच्या परदेशवारीच प्लॅनिंग करून देण्यात आणि त्यांचा प्रवास सुखकर करण्यात आम्ही त्यांना मदत करतं असू. परंतु करोनाचा फटका सगळ्या व्यवसायांप्रमाणे आम्हालाही सहन करावा लागला. परदेशात करोनाची सुरुवात झाली आणि त्यामुळे विमानसेवाही कमी झाल्या कालांतराने बंद करण्यात आल्या. साधारणतः फेब्रुवारी महिन्यापासूनच या क्षेत्राला आर्थिक गणितांच्या बाबतीत उतरती कळा लागली. आता विमानसेवा सुरु झाली असली असली तरी परदेशात फिरायला जाणाऱ्यांच्या संख्या नाही एवढीच आहे. अर्थात खबरदारीचा उपाय म्हणून हे नियम असणं गरजेचं आहे. पण व्यवसाय थांबला म्हणून तरी आपलं जगण मात्र सुरूच असतात. अखेर लोकांची गरज ओळखत मी जून महिन्यापासून ‘फ्रेश फिश सेलिंग ॲप डोअर-स्टेप’ या माझ्या नव्या व्यवसायाला सुरुवात केली. म्हणजेच साधारणतः सहा-आठ तास अगोदर पकडलेले ताजे मासे लोकांना घरपोच देण्याची सेवा मी सुरु केली. साठवलेले मासे (फ्रोझन फिश) खायला कंटाळलेल्या ग्राहकांनी माझ्या या व्यवसायाला उत्तम प्रतिसाद दिला. सध्या मुंबई आणि उपनगराच्या विविध भागात पुरवली जाणारी आमची ही सेवा महाराष्ट्राच्या विविध भागांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवाय, गेल्या काही दिवसांपासून अख्खा गरम मसाला विकण्यासही आम्ही सुरुवात केली आहे.

मुलाखत – नेहा कदम (प्लॅनेट मराठी)

संकलन – अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)

Share your valuable opinion

%d bloggers like this: