Love comes in every size, every shape, every color, every gender – LGBT PRIDE MONTH SPECIAL

स्त्री आणि पुरुष आणि इतर ह्या सगळ्यांना देवाने बनवलं. स्त्रियांच्या समस्या, त्यांचे हक्क ह्याबद्दल सगळेच बोलतात पण प्रश्न आहे ‘इतर’ ह्या समाजाचा. स्त्री आणि पुरुष सोडता जगात साधारणतः बावीस लैंगिकता आहेत. स्त्री आणि पुरुष ह्यांना आपण स्वीकारलं खरं पण ते सोडता कोणत्याच लिंगाला समाज स्वीकारायला तयारच नाही. समलैंगिक असणं, समलैंगिक व्यक्तींवर प्रेम करणं अश्या गोष्टींना सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली असूनही ह्याला आजही लोकं गैर समजतात.

जून महिना हा प्रामुख्याने ट्रान्सजेंडर आणि एलजीबीटीक्यू ह्यांच्या हक्कांसाठीचा महिना म्हणून ओळखला जातो.

गेल्या अनेक वर्षांपासून आपण एखाद्या सत्याचा स्वीकार न करता फक्त द्विध्रुवीय विचार करायला लागलोय. समलैंगिक जोडीदार असणं हे परदेशी चोचले आहेत किंवा किंबहुना एलजीबीटी असणं हा एक आजार आहे वगैरे शक्यतांना आपण बढावा देत आलोय. निसर्गाने स्त्री आणि पुरुष अशी दोन लिंग बनवली तर त्यात न मोडणाऱ्या एलजीबीटी समाजाला आपण सरळ सरळ माणूस ह्या संकल्पनेतूनच बाहेर ढकलून दिलंय आणि बघायला गेलं तर स्त्री ही कायम लाजाळू, सालस आणि पुरुष कायम बलवान, मर्द समजत आलेल्या मानसिकतेत कदाचित हे समीकरण उलट असू शकतं किंवा कोणत्याच चौकटीत न बसणारं असू शकतं ह्या विचाराला थाराच नाहीये. एक समाज म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की समलैंगिक असणं म्हणजे सरसकट एकाच चौकटीत येत नाही, तर त्यात अनेक प्रकार असतात.

एलजीबीटीक्यू + ही संज्ञा जास्ती प्रभावी आणि सर्वसमावेशक आहे. ह्यात समलिंगी मुली अर्थात लेस्बियन्स, समलिंगी मुलं अर्थात गे, उभयलिंगी मुलं आणि मुली अर्थात बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर अर्थात हिजडा इत्यादी आहेत. ह्याचसोबत ह्या साखळीत जेंडर फ्लुईड म्हणजेच ज्यांची लैंगिकता बदलत राहतात असे तर असेक्शुअल म्हणजे ज्यांना कोणतंही लैंगिक आकर्षण नाही असे व पॅनसेक्शुअल म्हणजे प्रत्येक लैंगिकतेचे आकर्षण असलेल्या लोकांचा ह्यात समावेश आहे. तर + ह्या खुणेत इतर अनेक संकल्पनांचा अंतर्भाव आहे. 

ह्या भिन्न लैंगिक वातावरणाचे संस्कार आपल्यावर झालेले असल्याने समलैंगिक व्यक्तींसाठीची आपली वागणुक सुद्धा बरीचशी भिन्नच आहे. ह्या सगळ्या लैंगिक जाणिवा समजून घेण्याची मानसिक क्षमता कुठल्याच वयात एखाद्या व्यक्तीमध्ये रुजवलेली नसते. पण एखाद्या व्यक्तीला आपण समलैंगिक आहोत ह्याची जाणीव झाल्यावर आपण एखादं दुष्कृत्य केलंय ही भावना पहिले मनात न येऊ देण्याचे संस्कार आपल्याकडून लहान वयापासून होणं गरजेचं आहे.योग्य काळात किंवा अश्या कळत्या काळात ज्या काळात मुलांमध्ये अनेक गोष्टींचं व संस्कारांचं बीज मनात पेरता येतं त्या काळात मुलांना योग्य लैंगिक शिक्षण देणं ही आजच्या काळातील पालकांची जबाबदारी आहे. एखाद्या स्त्रीच्या शरीरात अडकलेलं पुरुषाचं मन किंवा पुरुषाच्या शरीराच्या आत अडकलेली स्त्रीत्वाची भावना कळत्या काळात त्या त्या व्यक्तीने स्वीकारणं जितकं गरजेचं आहे तितकंच गरजेचं आहे एक समाज म्हणून अश्या कृतीसाठी त्या व्यक्तीला पाठिंबा देणं. एक स्त्री असून आपल्याला पुरुषासारखं वागावंस वाटणं योग्य आहे का? एक पुरुष असून माझ्या हालचाली आणि विचार स्त्रीचे आहेत अश्या वागण्याला कॊणी समजून घेईल का? कोणत्याच लिंगाबद्दल आकर्षण न वाटणं किंवा स्त्री आणि पुरुष दोन्ही लिगांबद्दल आकर्षण वाटणं समाजमान्य आहे का? आपल्याला समाज स्वीकारेल का? आपल्याला लोकं काही बोलतील का? आपल्या कुटुंबांची ह्यावर काय प्रतिक्रिया असेल? आपली एकाच लैंगिकतेतील व्यक्तीबद्दल निर्माण झालेली प्रेमभावना चूक आहे की बरोबर? अश्या अनेक प्रश्नांचा कोलाहल सोबत घेऊन समलैंगिक समाज संघर्ष करत असतो. हा संघर्ष जितका बाहेरच्या कोत्या मनोवृत्तीच्या जगाशी असतो तितका किंवा त्याहून जास्त हा स्वतःशी असतो. स्वतःच्या असण्यावर, जगण्यावर लागलेलं मोठं प्रश्नचिन्ह घेऊन जगताना असंख्य समाजाचे पुढे अनेक टोमणे सहन करत आत्महत्येचा सहारा घेऊन ह्यातून मोकळे होतात. हे असं कुठपर्यंत चालत राहणार?

प्राईड मन्थ म्हणजे काय?

आपल्याकडे जसे वेगवेगळ्या नात्यासाठी, व्यक्तीसाठी वेगवेगळे दिवस असतात (मदर्स डे ,व्हॅलेंटाईन डे ) तसे एलजीबीटीक्यू + कम्युनिटी साठीचा हा विशेष महिना आहे. सर्व समलैंगिक व्यक्तींना इतर लैंगिकतेप्रमाणे समानतेने वागवण्यात यावं यासाठी हा महिना साजरा केला जातो. ह्या काळात अनेक प्राईड परेड्स आणि वेगवेगळ्या कल्पनांचा वापर करून कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. सगळ्या रंगाचं एकत्रित असलेलं इंद्रधनुष्य हे ह्या समूहाचं चिन्ह आहे. एलजीबीटीक्यू समूहाला पण इतरांसारखी मानाने कोणत्याही दुजाभावाशिवाय समान वागणूक दिली जावी आणि समाजाने इतर लिंगांसारखं ह्या लैंगिक अवस्थेलासुद्धा स्वीकारावं ह्या सगळ्या संदेशाची ह्याला जोड आहे.

What sexual preference do you hope she has?” “Happiness.” Isnt that cool?
Francesca Lia Block,

प्राईड मन्थ आणि समाज 

    एकीकडे सोशल मिडीयावर प्राईड मन्थबद्दल चाललेली चर्चा आणि खरोखर समाजाने अश्या समूहाला स्वीकारणं ह्यात जमीन आस्मानाचा फरक आहे. आज एलजीबीटीक्यू+ समाजाचं प्रतिनिधित्व करणारे अनेकजण वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. पण तरी तीच गोष्ट आहे शंभर लोकांपैकी चाळीस लोकांपर्यंत माहिती पोहोचते त्यातले अडतीस लोकं त्या माहितीला समजून घेऊन कृती करतात. बाकीच्या बासष्ट लोकांचं काय? म्हणजे खऱ्या अर्थाने बदल घडायला ही संख्या अजून कमीच आहे. काहीवेळा तर हा बदल काहीसा बनावटी वाटतो. म्हणजे समोर सहमती दर्शवणं आणि मागून अश्याच समाजाला नावं ठेवणं, सर्रास खोचक गोष्टी बोलून दाखवणं किंवा मग सामान्य व्यक्ती सोडून वेगळ्याच माणसासारखं वागवणं अशी खोटी वागणूक ह्या समूहातल्या लोकांना मिळत असते.

Race, gender, religion, sexuality, we are all people and that’s it.
We’re all people. We’re all equal.
Connor Franta

    भारतात अजूनही अनेक ठिकाणी ह्या अवस्थेला लोक स्वीकारायला तयार नाहीयेत. अनेक लेस्बियन आणि गे मुलीमुलं स्वतःच्या पालकांसमोर मन मोकळं करत असले तरी समाज काय म्हणेल ह्या भीतीने अनेक आईवडील त्यांच्या मुलामुलींची लग्नं अशीच लावून देतात. कारण इथे कोणीच ह्या भावनेला मनात राहूच देऊ इच्छित नाहीये. ह्या भावनेला खोटं किंवा तात्पुरतं समजून त्वरित लग्न हे त्यावरचं योग्य औषध आहे असं अनेकांना वाटतं. समजा भविष्यात आपल्यापैकी कोणत्या स्ट्रेट म्हणजेच विषमलैंगिक व्यक्तीचं लग्न जर एखाद्या समलैंगिक व्यक्तीशी झालं तर? दोष कोणाचा? त्या समलैंगिक व्यक्तीचा? त्याच्या आईवडिलांनी त्याची ही बाजू माहित असूनही ती न स्वीकारता तसंच लग्न करून दिलं म्हणून त्यांचा? की समाज अश्या बाबतीत अजूनही मागास आहे म्हणून समाजाचा? 

सध्याच्या काळात ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या हक्कासाठी लढणारं एक खूप मोठं नाव म्हणजे “गौरी सावंत” त्या प्राईड मन्थ बद्दल असं सांगतात की “अशी अनेक तृतीयपंथीय समूहातील लोकं आहेत ज्यांची मी आई आहे पण अजूनही खूप लोकं आहेत जी माझ्यासारख्या ट्रान्सजेंडर व्यक्तींना स्वीकारायला तयार नाहीयेत. माझ्या वडिलांनी अजूनही मला स्वीकारलं नाहीये. ह्यात खरंतर विचारसरणीचा फरक पडतो.

Gauri Sawant is a transgender activist

आज जग मला माझ्या मुलीची आई म्हणून ओळखतं पण त्याआधीही मी माझ्या किन्नर बांधवांची आई होते. म्हणजे आम्हाला जे स्वीकारत नाहीयेत ते नॉर्मल आयुष्य जगणारी लोकं आहेत. आम्हालासुद्धा त्याच निसर्गाने तयार केलं ज्याने तुम्हाला तयार केलंय. दोष आमच्यात नाहीये तर तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत आहे. आज अशी अनेक ट्रान्सजेंडर लोकं आहेत जी समाज स्वीकारणार नाही ह्या भीतीने आत्महत्या करतात किंवा निमूटपणे जगत राहतात. त्यांनाही ह्या समाजात मोकळेपणाने जगण्याचं स्वातंत्र्य मिळावं म्हणून मी काम करतेय. माझं सर्व बांधवाना एवढंच सांगणं आहे देवानं आपल्याला जसं बनवलं आहे तसं स्वतःला स्वीकारा आणि आनंदाने जागा.”

Gauri Sawant is the director of Sakshi Char Chowghi that helps transgender people and people with HIV/AIDS.
Actress – Dr. Parineeta Pawaskar

तृतीयपंथीयांना समाजाला आपल्या समाजात बरोबरीचं स्थान मिळावं ह्यासाठी झटणारी अभिनेत्री डॉ.परिणीता पावसकर असं म्हणते की “कोणत्याही व्यक्तीला आपण आयुष्यभर पुरु शकत नाही. म्हणूनच खरंतर मी तृतीयपंथीयांना समाजात बरोबरीचं स्थान मिळावं म्हणून त्यांच्या कामकाजाची व्यवस्था करायचा प्रयत्न करते.त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं म्हणून मी कायम प्रयत्नशील असते. पण त्यांना आपल्याकडून इतका वाईट दर्जा दिला जातो हे बघून मला वाईट वाटतं. मला मनापासून असं काहीतरी चांगलं काम करायचं होतं. आपण सगळ्यांनीच थोडा विचार करून स्वतःच कुठे चुकतंय ह्याचा विचार केला पाहिजे. तृतीयपंथी लोकं चूक नाहीयेत हे आपण स्वीकारायला हवं.”

एकंदरीत ही सगळी परिस्थिती भारत आणि इंडिया सारखीच आहे. भारताचा इंडिया हा भाग खूप पुढारलेला आहे पण इंडियात भारताचासुद्धा असा एक भाग आहे जो अजूनही अनेक बदलांचा स्वीकार करायला तयार नाहीये. ह्यात चूक इंडियाची नाहीये ना भारताची. चूक आहे विचार करण्याच्या पद्धतीची. आपल्याला एलजीबीटीक्यू+ हवेत तितकेच समलैंगिक लोकं सुद्धा हवे आहेत. जेव्हा भारत आणि इंडिया एकमेकांचं म्हणणं ऐकून एकसारखा विचार करेल तेव्हा समलैंगिक समूहाला हवा असलेला खरा प्राईड त्यांना मिळेल.

लेख आणि मुलाखत – रसिका नानल (प्लॅनेट मराठी)

Share your valuable opinion

%d bloggers like this: