महाराष्ट्र शाहीर चित्रपटाची घोषणा महाराष्ट्र दिनी

कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे हे एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात होते तसेच मुक्त नाट्याचे ते आद्य प्रवर्तक देखील समजले जातात. शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते-दिग्दर्शक होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीला समाजात ओळख मिळवून दिली. त्यांचे ’गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले.

केदार शिंदे दिग्दर्शित, केदार शिंदे प्रॉडक्शन्स प्रस्तुत व बेला केदार शिंदे निर्मित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात शाहिरांच्या मुख्य भूमिकेत अंकुश चौधरी झळकणार आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद प्रतिमा कुलकर्णी यांनी केले आहे. या चित्रपटातील संगीत महाराष्ट्राचे लाडके गायक अजय- अतुल यांच्या कडे सोपवली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला २८ एप्रिल २०२३ मध्ये येत आहे. या चित्रपटाची घोषणा महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, ” ज्या प्रसिद्ध कलाकाराने संपूर्ण महाराष्ट्रभरात ‘महाराष्ट्राची लोकधारा’ द्वारे लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली, अशा कलाकाराच्या चित्रपटाची घोषणा मी महाराष्ट्र दिनी करीत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना शाहीर साबळेंच्या जीवनावर प्रकाशझोत टाकत आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय अतुल यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे नक्कीच हा चित्रपट करताना आम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही.”

Share your valuable opinion

%d bloggers like this: