‘मन कस्तुरी रे’मधील ‘नाद’ या नवीन गाण्याचा पिल्लई महाविद्यालयात रंगला रॅाक कॉन्सर्ट

आयडीयल कपल ही संकल्पना काय ते तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डेकडे पाहून लक्षात येत आहे. बिनधास्त, चंचल तेजस्वी जेव्हा शांत, संयमी अभिनय बेर्डेच्या प्रेमात पडते तेव्हा व्हायोलिन, गिटारसह सुरांची बरसात होते. अशीच प्रेमाची बरसात आणि गाण्याची जबरदस्त मैफल ‘मन कस्तुरी रे’च्या कलाकारांसह पनवेलच्या पिल्लई महाविद्यालयात रंगली होती. निमित्त होते ‘मन कस्तुरी रे’चित्रपटातील ‘नाद’ या रॅाक साँग लाँचचे.

खरंतर हा रॅाक कन्सर्ट होण्याआधीच या गाण्यांविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. सोशल मीडियाद्वारे ही उत्सुकता किती ट्रेण्डींगमध्ये आहे, हे दिसूनही आले आणि आता जोश, उल्हासदायी वातावरणात, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्रचंड प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा रॅाक कॉन्सर्ट पार पडला. तेजस्वी प्रकाश हिने ‘मला तुझा नाद लागला’ हे रॉक सॉंग अगदी भन्नाट अशा रॅाक स्टाईलने सादर केले . शोर यांनी हे गाणे संगीत आणि शब्दबद्ध केलेले आहे. तर या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन राहुल- संजीव यांनी केले आहे. प्रेक्षकांच्या टाळ्या,शिट्ट्यांच्या नादात भरभरून मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून कलाकार भारावून गेले होते. ‘बाप्पा माझा एक नंबर’ हे गणेशोत्सवात श्रोत्यांच्या भेटीला आले होते आणि त्याला संगीतप्रेमींकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. हे गाणे विद्यार्थ्यांनी स्टेजवर सादर करून अभिनय बेर्डेला अनोखी भेट दिली. शोर यांच्या जबरदस्त संगीताने आणि शब्दरचनेने सजलेल्या या गाण्यांना देव नेगी, मुग्धा कऱ्हाडे, अभय जोधपूरकर, जसराज जोशी अशा ताकदीच्या गायकांचा आवाज लाभला आहे. जबरदस्त प्रेमकथा आणि गाणी असलेल्या या चित्रपटाची आता सर्वच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक संकेत माने म्हणतात, “तेजस्वी आणि अभिनय या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. आज इथली तुफान गर्दी पाहून आणि गाण्यांना मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहून मन आनंदाने भरून आले आहे.”

चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक शोर म्हणतात,” तरुणांना भुरळ घालणारी गाणी देण्याचा आमचा प्रयत्न प्रेक्षकांना आवडतोय, हे पाहाणे मन सुखावणारे आहे. या चित्रपटात वेगवेगळ्या धाटणीची गाणी आहेत. सर्व प्रेक्षकांना हा चित्रपटही नक्की आवडेल, अशी आशा आहे.”

संकेत माने दिग्दर्शित ‘मन कस्तुरी रे’ येत्या ४ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नितीन केणी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, व्यंकट अत्तिली, मृत्यूंजय किचंबरे यांच्या आयएनइएनएस डायमेंशन एन्टरटेनमेंट ॲण्ड आर्ट्स निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते ड्रॅगन वॅाटर फिल्म्सचे निशीता केणी आणि करण कोंडे आहेत. वितरणाचे काम युएफओ सिने मीडिया नेटवर्क करणार असून संगीत प्रदर्शनाची धुरा टिप्सने सांभाळली आहे.

Share your valuable opinion

%d bloggers like this: