महाराष्ट्रातील कलाकारांमध्ये रंगणार क्रिकेटची मॅच

एमबीसीसीएलच्या लोगोचे अनावरण

क्रिकेट म्हणजे आपल्या सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय. मग त्यापासून आपले कलाकारही कसे दूर राहणार? अनेक जण क्रिकेटचे शौकीन आहेत. मात्र चित्रीकरणाअभावी, वेळेअभावी त्यांना आपली ही आवड जोपासता येत नाही. हेच कारण लक्षात घेऊन अभिनेता सुशांत शेलार यांनी मराठी बॉक्स सेलिब्रिटी क्रिकेट लीगची (एमबीसीसीएल) स्थापना केली आहे. ‘शेलार मामा फाऊंडेशन’ आणि ‘प्लॅनेट मराठी’ प्रस्तुत एमबीसीसीएलच्या लोगोचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. या जबरदस्त लोगोमध्ये महाराष्ट्राची शान दर्शवणाऱ्या पिळदार मिश्या, फेटा, बॅट, बॉल आणि स्टंप दिसत आहेत. मराठीबाणा जपणारा हा लोगो समोर आल्यानंतर आता क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागून राहिली आहे ती एमबीसीसीएलची. त्यामुळे आता एमबीसीसीएलही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एमबीसीसीएलबद्दल सुशांत शेलार म्हणतात, ” प्लॅनेट मराठीसोबत हा उपक्रम राबवताना खूप आनंद होत आहे. प्लॅनेट मराठीने नेहमीच अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे. आता लोगोचे अनावरण झाले असून लवकरच एमबीसीसीएलमध्ये महाराष्ट्रातील आपल्या लाडक्या कलाकारांचा खेळ पाहायला मिळणार आहे. ही एक खरीखुरी क्रिकेटची मॅच असून यात काही संघ असतील. फक्त पुरुषच नाही तर स्त्रियाही या खेळात सहभागी होणार आहेत. लवकरच हे संघ जाहीर होणार असून महाराष्ट्रातील विविध शहरातल्या प्रसिद्ध ठिकाणाचे नाव प्रत्येक संघाला दिले जाणार आहे. यानिमित्ताने खेळ आणि महाराष्ट्रातील वास्तुंना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

प्लॅनेट मराठी“चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”एमबीसीसीएलचा भाग असणे ही आमच्यासाठीही तितकीच मोठी गोष्ट आहे. एमबीसीसीएलच्या निमित्ताने सगळे कलाकार एकत्र येऊन खेळणार आहेत. प्लॅनेट मराठी अशा वेगवेगळ्या उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देते. मुळात क्रिकेट हा प्रत्येकाचाच आवडीचा विषय आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रीय कलाकारांना एकत्र घेऊन या क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेटच्या खेळाडूंना आपण नेहमीच खेळताना बघतो. अभिनय करणाऱ्या कलाकारांचा खेळ पाहण्याची संधी प्रेक्षकांना या निमित्ताने मिळणार आहे. प्रत्येक संघात कलाकार, दिग्दर्शक, चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ अशा सगळ्यांचाच समावेश असेल. हळूहळू एमबीसीसीएलविषयीच्या अनेक गोष्टी समोर येणार आहेत.”

Share your valuable opinion

%d bloggers like this: