Master Blaster “Sachin Tendulkar’s Creative Fan

क्रिकेटचा देव अशी ज्यांची ओळख अश्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चे देशातच नाही तर जगभरात चाहते आहेत. 


सचिन कर्तृत्वाने खूप मोठा आहे पण तरी तो आपल्यातलाचं असल्याने आपण त्याला हक्काने “सचिन” म्हणतो. 


आपल्या सचिनचा एक भन्नाट चाहता आहे जो आपल्यातील कला सादर करून, त्याच सचिन वरच प्रेम दाखवत आलाय. “अभिषेक नंदकिशोर नीलम साटम” हा दरवर्षी सचिनच्या वाढदिवसाला काहीतरी वेगळं करत असतो, यंदा सुद्धा त्याने काहीतरी भन्नाट कलाकृती करून सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहे. प्लॅनेट मराठी मॅगझीन मधून आपण जाणून घेऊ या काय आहे यंदा खास..


“सचिन आणि आर्ट वर्क” 

लहानपणापासूनच कलेची आवड होती. वडील कलाकार असल्यामुळे ती आवड उपजतच होती आणि लालबाग सारख्या भागात लहानाचा मोठा झाल्यामुळे ती आवड वाढत गेली आणि बहरत ही गेली.

   मी “सचिन रमेश तेंडुलकर” यांचा खूप मोठा चाहता आहे. लोक मला “सचिन फॅन”  म्हणूनच ओळखतात. गेली १८ वर्षे मी सचिन सरांबद्दल छापून आलेली वर्तमानपत्रातील कात्रणे, मासिक, पुस्तक, गोळा केली आहेत. सचिन सरांबद्दल जे काही मिळेल त्याचा संग्रह करण्याचा छंद मला लहानपणीच लागला. सचिन सर हे माझ्या साठी आदर्श आहेत. त्यांनी क्रिकेट मध्ये मेहनत घेतली तीच आपण आपल्या करीयर मध्ये घेतली तर आपण आपल्या क्षेत्रातील सचिन तेंडूलकर बनू असं मला वाटतं. कला ही लहानपणापासूनच उपजत होती. चित्रकला, रांगोळी, फोटोग्राफी हे माझ्या आवडीचे विषय.


२०१७ साली २४ एप्रिल ला सचिन सरांच्या ४४ व्या वाढदिवसाला आपण आपल्या कलेतून काहीतरी भेट द्यावी म्हणून ४४ X २४ फुटांची रांगोळी काढली. त्याची नोंद “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” आणि “गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड USA” इथे झाली तसेच २०१८ च्या  इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड च्या टॉप १०० मध्ये माझ्या रेकॉर्ड ची नोंद झाली. ह्या कलाकृतीची दखल खुद्द सचिन तेंडुलकर सरांनी घेतली आणि ह्याचा व्हिडिओ आणि फोटोज् सरांनी 100MBह्या त्यांच्या ॲप वर अपलोड केलेत. ही गोष्ट माझ्यासाठी फार खास आणि अभिमानास्पद आहे.


२०१८ साली २४ एप्रिल ला सचिन सरांचा ४५ व्या वाढदिवसानिमित्त काहीतरी करायचं होतं. मग मी आणि माझा “रंगरेषा रांगोळी ग्रुप”  ने “पेपर पोट्रेट” करायचं  ठरवलं. त्याप्रमाणे ५० X ३० फुटांचे पेपर पोट्रेट तयार केले. त्या साठी सुमारे ४५० डझन पतंगाचा पेपर वापरला. सुमारे २६ तास लागले हे पोट्रेट तयार करायला. या साठी मला संदीप बोबडे, कल्पेशराज कुबल, मिलिंद भुरवणे, किरण सावंत आणि रुपेश कालबाटे प्रतीक घुसळे यांची साथ लाभली. ह्या कलाकृतीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आणि सलग दुसऱ्यांदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड च्या टॉप १०० रेकॉड मध्ये त्याची निवड झाली.


२०१९ ला सचिन तेंडुलकर सरांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त नेरूळ चा सी वूड्स ग्रँड सेंट्रल मॉल मध्ये ४६ x २४ फुटांच शिवण कामाच्या वस्तू वापरून पोट्रेट बनवलं. यासाठी उमंग मेहता जे सचिन सरांचे डिझायनर आहेत त्यांनी आणि साईश कांबळी दादा यांनी मोलाचं सहकार्य केलं.  ही कलाकृती सचिन सरांना खूप आवडली. ह्या कलाकृती ची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होण ही माझ्या साठी खूप मोठी गोष्ट आहे आणि टॉप १०० मध्ये येणं ही त्याहून मोठी आनंदाची गोष्ट. २०१८ आणि २०१९ ह्या दोन्ही वर्षातील माझे रेकॉर्ड टॉप १०० मध्ये आले त्यामुळे खूप जास्त आनंद झाला तशी जबादारी पण वाढलीय. आणि ह्या वर्षी सुद्धा सचिन तेंडूलकर सरांच्या वाढदिवसाला काहीतरी वेगळं गिफ्ट देऊन त्याचाही रेकॉर्ड करण्याचा माझा मानस आहे. हे सन्मान अजून खूप मोठं आणि उत्तम कार्य करण्याची उर्जा आणि बळ देतात.


“लवकरचं सचिन सरांना भेटेन” 


सचिन सरांना अस भेटता नाही आलं पण बऱ्याच वेळा त्यांच्या इव्हेंट ला जाण्याची संधी मिळाली. मी फोटोग्राफी पण करतो त्यामुळे त्यांचे छान छान फोटो मी काढले. एकदा तर लालबाग राजाचं दर्शन सचिन सरांसोबत घेता आलं. त्यांच्या चित्रपटाचे जे इव्हेंट झाले त्याला जाता आलं. पण लवकरचं त्यांची भेट होईल अशी आशा आहे.

“म्हणून सचिन आवडतो” 

सचिन हा सचिन आहे हे जगाला माहीत आहे. त्याने जे क्रिकेट करीयर मध्ये केलंय तेच जर आपण आपल्या करीयर मध्ये केलं तर आपण आपल्या करीयर मधले सचिन तेंडुलकर होऊ. मला सचिन आवडतो कारण त्याची चिकाटी, मेहनत, क्रिकेट वरचं प्रेम ह्या गोष्टी खूप भावतात. 

“सचिनचं अनोखं कलेक्शन” 

गेली १९-२० वर्ष झाली मी सचिन सरांचे फोटो जमा करायला सुरुवात  केली. हळू हळू त्याची जागा पुस्तक, मॅगझिन यांनी घेतली. खाऊ साठी जे पैसे मिळायचे ते साठवून पुस्तक विकत घ्यायला लागलो. नंतर एकाचवेळी घरी ५-६ पेपर यायला लागले त्याची रद्दी विकून त्या पैशाने पुस्तकं वैगेरे विकत घेऊ लागलो. आता पर्यंत ६०पुस्तक, २५०मॅगझिन जमा झाले आहेत. काही खूप वेगळी पुस्तक आहेत जी बाजारात विकण्यासाठी नाहीत. रेनॉल्ड्स पेन चा कलेक्शन आहे ज्यावर सचिन चे फोटो आणि सही तसंच त्याच्या शतकांची माहिती दिलेली आहे. मुंबई मधले बरेच रद्दी वाले आणि बुक शॉप वाले माझ्या ओळखीचे आहेत ते सचिन चा काहीही पुस्तक आला की मला फोन करतात. तसेच कॅनन ब्रँड कडून गोल्ड प्लेटेड बॅट मिळाली आहे ज्यावर सचिन ची सही आहे. साईश कांबळी दादा ने सचिन सराना ह्या कलेक्शन बद्दल सांगितलं तेव्हा सचिन सरांनी माझ्या नावाने बॅट वर सही करून पाठवली. ह्या वर्षी दिवाळी मध्ये सचिन चा ट्रू ब्ल्यू ब्रँड कडून सचिन तेंडुलकर सरांची स्वाक्षरी असलेलं पत्र आणि दिवाळी भेट असलेला गिफ्ट बॉक्स मला मिळाला. ही खूप आनंदाची गोष्ट होती.


“आर्ट वर्क चं अनोखं आव्हान” 


आर्ट वर्क कसं असावं इथून सुरुवात होते. ते कश्या पासून करायचं, ती गोळा कशी करायची. त्या गोष्टी वापरून आर्ट कस होईल ह्याचा अभ्यास केला जातो. त्याचं आधी कॉम्प्युटर चित्र तयार केलं जातं आणि त्या नुसार सगळं वेळेचं नियोजन करून काम सुरू केलं जातं. त्या साठी कोणती जागा योग्य आहे हे पण तेवढचं महत्त्वाच असतं. कारण एवढी मोठी कलाकृती बघण्यासाठी तेवढी उंच जागा असायला हवी. या  सगळ्या गोष्टी विचारात घेऊन वेळेचं बंधन लक्षात घेऊन कामाला सुरवात केली जाते आणि एवढी मोठी कला कृती करणं हे खूप मोठं आव्हान असतं.


“अश्या सुचतात कल्पना” 


मुळात कल्पना या अचानक सुचतात त्याला वेगळा विचार करायची गरज लागत नाही. जेव्हा २०१७ रोजी विशाल सवणे ह्या पत्रकाराने मला फोन केला आणि विचारलं ह्या वेळी सचिन चा बर्थ डे ला काय करतोय ? याने माझा पहिला टीव्ही इंटरव्ह्यू केलेला. तो म्हणाला की तू रांगोळी काढतोस तर “मोठी रांगोळी कर” त्याने एक कल्पना दिली. रांगोळी केवढी मोठी करायची हे नक्की नव्हतं. २-३ दिवस विचार करण्यात गेला. मग शाळेत जाऊन जागे साठी विचारलं शाळेने परवानगी दिली तेव्हा शाळेच्या जागेचं मोजमाप केले आणि तेव्हा अचानक डोक्यात आल की आपण त्याच्या वाढदिवसाच्या आकराच आर्ट वर्क करू शकतो असं लक्षात आलं. मग ही कल्पना माझा मित्र संदीप बोबडे ला सांगितली आणि १ दिवसा मध्ये तयारी करून काम सुरू केलं आणि २२ एप्रिल २०१७ ला रात्री १२ वाजता काम सुरू केलं आणि २३ एप्रिल ला रात्री ८ वाजता काम पूर्ण झालं. भर उनात दिवस रात्र न झोपता १८ तासात दोघांनी ही रांगोळी पूर्ण केली. २०१८ ला जे कलाकृती केली ती पण अशीच सुचली तेव्हा पतंगाच्या पेपर चा वापर केला आणि २२ तासात ही कलाकृती पूर्ण केली. आणि ५०x ३० ची कलाकृती होती. ती करताना पण वेगळीच मज्जा आलेली वेळच नियोजन कसा कराव हे ह्यातून शिकलो. २०१९ ला साईश दादा मुळे उमंग मेहता यांची ओळख झाली. ते सचिन चे डिझायनर आहेत. त्यांची विचारलं की शिवण कामाचं सामान मिळालं तर त्याने पोट्रेट बनवता येईल का? त्यानुसार काम सुरू झालं काय काय गोष्टी वापरू शकतो ह्याचा विचार केला आणि एक डिझाईन तयार केलं त्यात बटण, सुई, दोरे, कातर, रिळ, बॉबीन, मेजरिंग टेप,  चैन, ह्यांगर, तयार पँट, सूट , लोकर हे सगळं वापरून ४६x२४ फुटांच पोट्रेट तयार केलं त्या वर्षी सचिन चा ४६ वा वाढदिवस होता आणि २४ ही सचिन ची जन्म तारीख. असा मेळ घालण्यात आला. या सगळया कलाकृतींची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. आणि २०१८, २०१९  वर्षाच्या टॉप १०० मध्ये सुद्धा ह्यांची नोंद झाली आहे आणि २०२३ ला सचिन चा ५० वा वाढदिवस  आहे तेव्हा मला माझ्या कलेक्शनचं जगातलं सगळ्यात मोठा प्रदर्शन करायचं आहे. हे जगातील सगळ्यात मोठं प्रदर्शन असेल.

“फाईट अग्नेस्ट कोरोना” 


ह्या वर्षी संपूर्ण जगावर कोरोना चं सावट आहे त्यामुळे सचिन सरांच्या वाढदिवसाला मला दरवर्षी प्रमाणे मोठं आर्ट वर्क करता येणार नव्हतं. याची खंत होतीच. त्यानंतर थोडा विचार केला की आपण घरातच काही तरी करू शकतो. यासाठी माझे मित्र आबासाहेब शेवाळे आणि प्रतीक घुसळे यांच्याशी संवाद साधला. काय करता येईल यासंबंधी विचार सुरू केला आणि एक कल्पना सुचली की घरात ज्या वस्तू आहेत त्या वापरून कलाकृती सादर करायची. कलेची आवड असल्याने घरात वेगवेगळ्या रंगाचे कागद होतेच. मग ठरवलं की अशी कलाकृती करूया ज्या मधून कोरोना बद्दल संदेश देता येईल. 
सगळा विचार करून एक फोटो निवडला जो सध्याच्या परिस्थितीशी मिळता जुळता वाटला, जसा सचिन क्रिकेट मध्ये शॉट मारतो आणि बॉलला झोडपून काढतोय, तसंच आता सगळ्यांनीच कोरोना ला झोडपून काढण्याची गरज आहे. ह्याच आशयाचं लढूया करोना विरुद्ध असा संदेश देणारं ५.५ x ३ फुटांच एक चित्र बनवलं. ज्यात अर्ध्या इंचाच्या आकाराचे चौकोन वापरण्यात आले आहेत. त्या साठी काळा, निळा, पिवळा, पांढरा, हिरवा, लाल, पोपटी, ह्या रंगाच्या चौकोनाचा वापर केला गेला आहे. एकूण ९६३७ चौकोनांचा वापर करून ३ बाय ५.६ फुटांची कलाकृती १५ तासात साकारण्यात आली आहे.

      सचिन च्या या जबरदस्त फॅन कडून आणि प्लॅनेट मराठी कडून “मास्टर ब्लास्टर सचिन “ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 


मुलाखत : नेहा कदम (प्लॅनेट मराठी)  

Share your valuable opinion

%d bloggers like this: