महेश टिळेकर दिग्दर्शित “हवाहवाई” चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच

“द ग्रेट इंडियन किचन” यासारख्या बहुचर्चित तसेच अनेक मल्याळम सिनेमातून आपल्या सशक्त

अभिनयाचं दर्शन घडवलेली अभिनेत्री निमिषा सजयन आता “हवाहवाई” या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. “हवाहवाई” हा चित्रपट ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून, चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले असून अभिनेत्री निमिषा सजयन आणि अभिनेता विजय आंदळकर ही फ्रेश जोडी याचित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 

मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईनटिन नाईन प्रॉडक्शन्सचे विजय शिंदे “हवाहवाई” चित्रपटाची निर्मिती केली आहे.  तर महेश टिळेकर यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केलं आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी या चित्रपटातलं उडत्या चालीचं एक गाणं गायलं आहे. निमिषा सजयन पदार्पण, आशा भोसले यांचं गाणं या मुळे “हवाहवाई” हा चित्रपट चर्चेत आहे. अक्षयकुमार, जयाप्रदा, हेलन या हिंदी कलाकारांनी महेश टिळेकर यांच्याच चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यात आता निमिषा सजयन या नावाचीही भर पडत आहे. 

स्वयंपाकघरात टिफिन हातात घेऊन उभं असलेलं जोडपं या मोशन पोस्टरमध्ये दिसत आहे.  महेश टिळेकर यांच्या आधीच्या “वन रूम किचन” या मराठी सिनेमा सारखा “हवाहवाई” हा सुद्धा  कौटुंबिक चित्रपट असणार असा अंदाज बांधता येतो. चित्रपटातील बाकी कलाकार कोण? कथा काय? अशा प्रश्नांची उत्तरंही लवकरच मिळणार आहेत. मात्र मोशन पोस्टरमुळे आता ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे.

Share your valuable opinion

%d bloggers like this: