Pu.La.Deshpande – Dear Bhai

प्रिय भाई, खूप दिलंत आजपर्यंत. तुमच्या जवळ आलेल्या मुलाला घासून पुसून लक्ख करून जगात पाठवून देण्याचं काम असंच चालू ठेवा. तुम्ही कायम जिवंत आहात आणि राहाल.

आपल्या आयुष्यात अशी काही व्यक्तिमत्त्व असतात जी आपण विसरण्याचा प्रयत्न केला तरी मनातून पुसली जात नाही. पु.ल देशपांडे त्यांच्याच पैकी एक. १२ जून रोजी असणारा त्यांचा स्मृतिदिन ही आजची पिढी सुद्धा साजरा करत त्यांच्या मनातले पु.ल अजूनही जपून ठेवत आहे. जुन्या घरातला ठणाणा करणारा रेडिओ हा फक्त त्यांच्या आवाजाने तृप्त होत असावा असं वाटतं. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्त्व अशी ओळख निर्माण करणारी ही व्यक्ती अजूनही तिचं स्थान राखून आहे. पु.ल हे कायम पहिल्या पावसासारखे वाटतात.

एकवेळ पावसाळा आवडत नाही हे म्हणणारे खूप असतील पण पहिला पाऊस न आवडणारी व्यक्ती जगाच्या पाठीवर मिळणं अवघड आहे. तसंच पु.ल न आवडणारा व्यक्ती जर कुठे सापडला तर???…. असा व्यक्ती मिळणंच मुळात इतकं अवघड आहे की तो जर कुठे सापडलाच तर पु.लं वर निस्सीम प्रेम करणारी व्यक्ती काय करू शकेल ह्याचा अंदाज आत्ता बांधता येणार नाही.

पु.लं चे बहुरूपी खेळ

पु.लं च्या एकूणच बहुजिनसी व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांचा साहित्यिक मागोवा घेण्यात आपल्याला दिवस कमी पडेल पण त्यांच्या एकूण कारकिर्दीत अधिक प्रमाणात गाजले ते त्यांचे बहुरूपी खेळ. वन मॅन शो ह्या पद्धतीच्या कार्यक्रमाला खरी ओळख दिली ती भाईंनी. १९६१ साली बटाट्याची चाळ चा पहिला जाहीर प्रयोग मुंबईत झाला आणि पु.ल नावाच्या एका चमत्काराने लोकांच्या मनावर मोहिनी घालायला सुरवात केली. पु.ल संगीत, लेखन, वाचन अश्या सगळ्याच बाबतीत इतके प्रगल्भ होते की त्यांचं लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण असलेला कार्यक्रम बघणं म्हणजे एक प्रकारची पर्वणीच.

पु.ल आणि स्टँड अप

पु.ल आजही ओळखले जातात ते त्यांच्या अस्सल खुसखुशीत भाषेतल्या विनोदांनी. त्यांची सहज सोपी आणि छोट्यात छोटी बारकावे असलेली वर्णनं ही कायम लक्षात राहतात. “सर हे पेढे” म्हणणारा गटणे, चपला विसरणारे चितळे मास्तर, साला भाऊसाहेब म्हणणारे पेस्तन काका, बाबा रे तुझं जग वेगळं माझं जग वेगळं म्हणणारा नाथा कामत, जालीम शत्रूंची ठोस वैशिष्ट्य, पोष्टात चिकटलेला माणूस, कडमड्याच्या जोशींचा असामी होण्याचा प्रवास, बालजीवनात नेणारं बिगारी ते मॅट्रिक, लग्नसराई सांभाळणारा नारायण, वरण भाताचं तोंडाला पाणी आणणारं वर्णन, इंग्लंडच्या प्रवासापर्यंतची गाथा हा सगळा एक अनुभवण्याचा प्रवास आहे. पु.लं च सगळं अजरामर साहित्य हे एका बंद वहीतल्या फुलासाखं आहे. कितीही जुनं झालं तरी ते कायम आपल्यासोबत राहतं आणि त्याची झळाळी कमी होत नाही. पु.लं ची ही सगळी पात्रं, त्यातले बारकावे एवढंच काय तर सादरीकरणातली ओळ न ओळ अनेकांच्या लक्षात आहे ह्याचं कारण काय? कारण एकच त्या पात्रातला खरेपणा त्यांनी कायम जपला आणि सगळ्यांना आपलीशी वाटेल अश्या भाषेत ती सगळ्यांसमोर आणली. पु.लं नी खऱ्या अर्थाने वन मॅन शो ची मुहूर्तमेढ रोवली असं म्हणायला हरकत नाही. एकट्याने सादर करायचा कार्यक्रम म्हणजे त्यातलं प्रत्येक पात्रं, त्याचं अचूक टायमिंग, त्यातही त्यातला प्रमाणिकपणा जपणं सगळं सगळं अगदी थक्क करणारं तंत्र भाईंनी अचूक ओळखलं.

अपरिचित पु.ल

विनोदांसोबतच पु.लं नी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी लिहिल्या आहेत. “एक शून्य मी” ह्या पुस्तकातले अनेक उतारे ह्याची खात्री करून देतात की अगदी परखड मत मांडण्यात पु.ल तितकेच पुढे होते. धर्म, अंधश्रद्धा ह्यावरचा त्यांनी लिहिलेला लेख म्हणजे डोळे उघडायला भाग पाडणारा आहे. पु.लं च दैवत म्हणजे चार्ली चॅप्लिन. स्वतःच्या दैवताला बघून गहिवरून आलेले भाव त्यांनी चॅप्लिनसाठीच्या खास लेखात मांडले आहेत. उभ्या महाराष्ट्राला हसवणाऱ्या व्यक्तीमत्त्वाला अश्या नाजूक क्षणी गहिवरून येतं आणि तो आपले भाव ज्या पद्धतीने त्या लेखात मांडतो ते म्हणजे आपल्याला थक्क करून सोडतं.

देशपांडे आणि ‘उप-देश’पांडे

ह्या खास शब्दात भाई सुनीताबाईंचं वर्णन करतात. भाई हे प्रत्येकाच्या मनात घर करून राहण्यामागे खूप मोठा वाटा आहे तो म्हणजे सुनीताबाईंचा. बाई खूप खमक्या, खंबीर, स्पष्ट शब्दांच्या तर भाई कायम वाहणारा आनंदाचा झरा. भाईंचा पु.ल देशपांडे होण्याच्या प्रवासात बाईंचा हात जास्त आहे. भाईंचे चेक योग्य जागी ठेवण्यापासून ते बटाट्याची चाळचं सगळं नियोजन करण्यापर्यंत बाईंनी सगळ्यात साथ दिली. भाईंसारख्या अल्लड, अवळख मुलाला योग्य वाट दाखवणारी स्त्री म्हणजे सुनीताबाई. भाई १२ जून ला गेले आणि त्याच दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. म्हणजे त्यांच्या जाण्यात सुद्धा नकळत उल्लेख आहे तो बाईंचा. सोबतीची अनेक वर्षे एकत्र घालवत त्याच दिवशी जगाचा निरोप घेणं ह्यात दिसतं ते शेवटपर्यंत न चुकलेलं भाईंचं टायमिंग.

पु.लं च्या सुप्रसिद्ध नाटकात स्वतः काम करणं हा अनुभव घेतलेली अभिनेत्री हेमांगी कवी असं म्हणते की, “एकतर पु.लं ची पहिली ओळख झाली ती पुस्तकाद्वारे आणि रेडिओवरच्या भाषणातून. पुढे त्यांच्या इतक्या लोकप्रिय नाटकात काम करण्याची संधी मिळेल असं वाटलं नव्हतं आणि आपल्याकडे स्त्रीप्रधान नाटकांचे मोनोलॉग खूप कमी आहेत. ती फुलराणी मधल्या त्या अतिशय लोकप्रिय उताऱ्यात मंजूला आलेला तो राग इतक्या अप्रतिम पद्धतीने मांडला आहे की तो आपल्या आपोआप लक्षात राहतो. अफाट बुद्धिमत्ता आणि अचूक टायमिंग साधणारे असे ते एक सामन्यातले असामान्य व्यक्तिमत्त्व होते. जगाच्या पाठीवर पु.ल माहीत नाहीत अशी व्यक्ती बहुधा नाहीच आहे आणि असेल तर ते आयुष्यात खूप काही गमावत आहेत हे मात्र खरं.”

आताच्या काळात ज्याला आपण त्याच्या खुसखुशीत विनोदासाठी आणि दिग्दर्शनासाठी ओळखतो असा प्रसाद ओक पु.लं बद्दल असं म्हणतो की “पु.ल हे माझ्यासाठी विनोदाचं आराध्य दैवत आहेत. त्यांनी ज्या दर्जेदार पद्धतीचा विनोद साहित्याला दिला तो फार मोठा आहे. सहज सोपं लेखन, पात्रांची इतकी सुंदर रचना आणि मांडणी की आपल्याला त्याची अगदी बारीक वर्णनं लक्षात राहावी एवढं सगळं जमवून सगळच्या सगळं साहित्य दर्जेदार पद्धतीचं आहे. त्यात कुठंच उन्निस बीस चा फरक वाटत नाही हे अधिक महत्त्वाचं आहे. पु.ल माहीत नसलेला व्यक्ती जर अस्तिवात असेल तर तो अत्यंत दुर्दैवी आहे असं वाटतं.”

हे लिहिलंय ते फार थोडं आहे. पु.ल इतके विलक्षण होते की कितीही लिहिलं तरी कमीच पडेल. पुढच्या पिढीवर इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वतःचा ठसा उमटवणं पु.लं ना अचूक जमलं. पु.ल ही एक न संपणारी साठवण आहे. हा असा प्रवास आहे ज्याला अंत असू नये असं वाटतं.

रसिका नानल (प्लॅनेट मराठी)

Share your valuable opinion

%d bloggers like this: