STAR OF THE WEEK 34-Shivani Baokar

“लागींर झालं जी” या मालिकेतून शितली ने सगळ्यांची मनं जिंकून घेऊन “अलटी पलटी” या नवीन मालिकेतून आपल्या भेटीला आलेली “गरिबांची रॉबिनहूड”  शिवानी बावकर हिच्या अभिनयाच्या हटके प्रवासाबद्दल जाणून घेऊ या प्लॅनेट मराठी मॅगझिनच्या “स्टार ऑफ द वीक” मधून…..
शिवानी बावकर हिला अभिनयाच्या सोबतीने जर्मन शिकण्याची आवड असून लवकरचं जर्मन थिएटर करण्याची इच्छा तिने व्यक्ती केली आहे.

  • संपूर्ण नाव : शिवानी नितीन बावकर 
  • जन्मठिकाण : मुंबई 
  • वाढदिवस : ११ मार्च 
  • शिक्षण :  बीकॉम, एमकॉम

भूमिकेसाठी सोडली नोकरी” 
     अभिनयाची गोडी आधीपासूनचं होती. घरातून मला अभिनयासाठी नेहमीच पाठींबा होता पण अभिनयासोबत कुठेही शिक्षण मागे सोडू नकोस असं घरच्यांनी सांगितलं आणि प्लॅन बी नेहमी सोबत असावा म्हणून कॉलेज पूर्ण केलं. रुपारेल मध्ये असताना कॉलेज मधल्या एका एकांकिकेत मला छोटासा रोल मिळाला अगदी एकचं वाक्य होतं पण ते मिळाल्याचा आनंद खूप जास्त होता. प्रत्येक प्रयोगाला मी जायचे. नंतर शिक्षणासाठी थोडा ब्रेक घेतला. मास्टर्स करत असताना ऑडिशन देत होते. हिंदी जाहिरातींसाठी ऑडिशन दिल्या. मग यातून ऑडिशन कशी असते यांची एक कल्पना आली. स्वतःचा पोर्टफोलिओ सुद्धा बनवला मग फक्त ऑडिशन च्या भरवश्यावर न राहता सोबतीने जॉब करू या असं ठरवलं. मास्टर्स आणि जर्मन शिकत असताना सहजपणे मुलाखत दिली आणि मला नोकरी मिळाली. नोकरी करतानाचं मी ‘उंडगा’ हा चित्रपट केला. नोकरी सांभाळुन अभिनय चालू होता. माझ्या एका मित्राने माझे फोटो कुठेतरी पाठवले आणि त्यातून मला “लागींर झालं जी” साठी फोन आला. नोकरी मुळे साताऱ्याला ऑडिशन द्यायला जायला जमलं नाही मग फोन वरून ऑडिशन दिली आणि मग मालिकेचे लेखक तेजपाल वाघ यांनी सांगितलं की त्यांना माझं काम आवडलंय. मला त्यांनी सांगितलं की तुला आताच्या आता नोकरी सोडावी लागेल आणि इकडे यावं लागेल. त्या घाईत नोकरी सोडली खूप समस्या आल्या पण घरच्यांनी पाठींबा दिला. नवीन भूमिका स्विकारण्यासाठी घरच्यांचा भक्कम पाठींबा होता ते सोबत होते म्हणून इथवर पोहोचले. इथून नवीन प्रवास सुरु झाला. साताऱ्याला गेल्यावर समजलं की आपल्याला एक महिना इथेच राहायचंय. शीतल च्या भूमिकेसाठी साताऱ्याची मूळ भाषा शिकण्याची सुरुवात झाली. जसं जर्मन शिकताना तयारी केली तेवढ्याच तयारीने नवीन भाषा शिकायला सुरुवात झाली. मूळ भाषेवर जम बसवण्यासाठी ती शिकण्याची अनोखी पद्धत वापरत गेले. वही पेन घेऊन तासभर मार्केट मध्ये जाऊन तिथल्या लोकांची भाषा ऐकायचे. असं करता करता ती भाषा अवगत होत गेली. सुरुवातीला तिथली लोकं काय बोलायचे हे समजायचं नाही, मग थोडं टेन्शन यायचं की ही भाषा आपल्याला समजतं नाही आणि त्या भाषेतच आपल्याला भूमिका साकारायची आहे हे दडपण होतं. ही भूमिका साकारणं हे एक आव्हान होतं आणि हे जमत गेलं आणि पुढे मी फार एन्जॉय केलं. मालिका सुरू झाल्यावर हे वेगळंच जग माझ्यासमोर उभं राहिलं. 

आपल्या गुणांना योग्य वाव देणारी भाषा” 
    एक गोष्ट असते की आपल्याला भूमिका सोडून भाषा बोलायची नसते हे पक्कं करून ती भूमिका करायची असते. मी आता पल्लवी साकारतेय आणि आधी शीतल ची भूमिका करायचे तर या दोघी फार डॅशिंग आहेत. मी एवढी डॅशिंग नाही पण आपल्यात कुठेतरी ते गुण असतात, त्या गुणांना योग्य तऱ्हेनं वाव दिला तर आपण उत्तम पध्दतीने ते साकारू शकतो आणि आपल्याला ते जमतचं. 

“लोकांच्या प्रेमामुळे दुसरी मालिका मिळाली” 
     खरं सांगायचं झालं तर लागींर झालं संपून एक महिना नाही झाला आणि मला नवीन मालिका मिळाली. घरी येऊन कुठेतरी घरी सेट होत असताना मी शूटिंग आणि बाकी गोष्टी मिस करायचे. इन्स्टाग्राम वर मी एक शेवटची पोस्ट टाकली होती माझा आणि नितीश चा फोटो होता आणि त्यावर लोकांच्या एवढ्या कंमेंट्स होत्या की त्या वाचताना मला खूप भरून आलं होतं. लोकांच्या प्रेमामुळे मला ही नवीन मालिका मिळाली असं मी म्हणेन. दुसरी मालिका आणि ती सुद्धा झी मराठीवरचं!!

“बायोपिक करायचा आहे” 
       मला बायोपिक करायला खूप आवडेल. कारण मला एखाद्या भूमिकेचा अभ्यास करून ती साकारायला आवडते. मला नवीन गोष्टी शिकायला आवडतात. मी आधी फुटबॉल खेळायचे, भाषा शिकण्याची अनोखी आवड आहे, देश फिरायला आवडतात त्यामुळे सगळ्यांमधलं सगळं शिकण्याची ओढ आहे. मला बायोपिक्स साठी कुठल्याही स्पोर्ट्स पर्सन (खेळाडू व्यक्तिमत्त्व) साकारायला आवडेल किंवा अशी एखादी महिला जिने आपल्या देशाचं नाव मोठ्ठ् केलंय अशी भूमिका साकारायला नक्कीचं आवडेल. 

“शाहरुख सोबत काम करायचंय”
    मला लहान असल्यापासून शाहरुख खान फार आवडतो. तो माझं प्रेम आहे, क्रश आहे तर भविष्यात शाहरुख खान सोबत काम करण्याचं स्वप्न आहे.

“नाटक करण्याची इच्छा” 
    मला नाटक करण्याची फार इच्छा आहे. लागींर नंतर नाटक करावं असा माझा विचार सुद्धा होता पण लगेच मालिका मिळाल्या मुळे नाटक जमलं नाही. पण मला माझ्या आधीच्या ड्रामा ग्रुप सोबत किंवा नवीन लोकांसोबत काहीतरी हटके आणि वेगळ्या विषयावर नाटक करायचंय. 

“गरिबांची रॉबिनहूड” 
    मला लोकं असं कुठेच सांगत नाहीत की शितली सारखी भूमिका आहे. मला प्रेक्षकांनी नवीन भूमिकेत देखील तितक्याच आपुलकीने स्वीकारलं आहे. पल्लवी  सुद्धा त्यांना आवडते आहे. लुक्स वर एखादी भूमिका अवलंबून असते तर लोकांना माझा नवीन लुक देखील आवडला. हल्ली  ड्रेसिंग, स्टायलिंग यावर लोकं कंमेंट्स करतात. गरिबांची रॉबिनहूड अशी प्रतिक्रिया मला प्रेक्षकांकडून मिळते.

“भाषेचं अनोखं आव्हानं” 
     लागींर च्या वेळी भाषा शिकताना मला खूप मेहनत घ्यावी लागली. भाषा अवगत होण्यासाठी आपल्याला थोडेफार कष्ट करावे लागतात. भाषेच्या विविध पायऱ्या शिकत ती बोलली जाते. 
“जर्मन थिएटर करायचंय” 
    मी ज्या इन्स्टिट्युशन मधून जर्मन शिकले आहे तिथे परफोर्मिंग आर्टस् आणि थिएटर आहे तर तिकडे अनेक इव्हेंट्स होत असतात म्हणून मला एकदा जर्मन थिएटर करायचंयं.

“हिंदीत काम करायला आवडेल / उत्तम स्क्रिप्ट असल्यास हिंदीत काम करेन” 

    मला हिंदीत सुद्धा काम करण्याची संधी आली तर नक्कीच मी हिंदी इंडस्ट्रीत काम करेन. जेवढं मला मराठी उत्तम जमतं तेवढ्याच सहजतेने मी हिंदी बोलू शकते. मी कॉन्व्हेंट शाळेत होते तर आजूबाजूला सगळी कॉस्मो लोकं होती. तिकडे फार मराठी बोललं जायचं नाही. मी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत अगदी सहजतेनं काम करू शकते. मला भाषा शिकण्याची आवड असल्याने ती पटकन अवगत होते. म्हणून उत्तम स्क्रिप्ट आलं तर कुठल्याही भाषेत मी काम करू शकते. 

“बोल्ड भूमिकेसाठी मनाची तयारी” / सध्या बोल्डनेस भूमिका नको” 
    मला नाही वाटत मी बोल्डनेस भूमिका साकारेन. कारण जरी भूमिका बोल्ड असली तर ती आपण एक भूमिका म्हणून त्याकडे बघून ती साकारतो. मला असं वाटतं नाही की मी सध्या बोल्ड भूमिकेसाठी तयार आहे. यासाठी मला मानसिक तयारी करावी लागेल.


     रॅपिड फायर….हे की ते….
चित्रपट, वेब की मालिका : चित्रपट आणि मालिका दोन्ही. कारण काम काम असतं. 
अलटी पलटी की लागींर झालं जी – लागींर झालं जी. 
शीतली की पल्लवी – पल्लवी 
आवडता अभिनेता : निखिल चव्हाण, राहुल मगदूम, नितीश चव्हाण – निखिल चव्हाण आणि नितीश सोबत केमिस्ट्री सीन करायला आवडतात. 
आवडती अभिनेत्री : लक्ष्मी विभुते, अनिता दाते, किरण धाने – लक्ष्मी विभुते 
जर्मन की मराठी : मराठी! कारण गोडवा आहे या भाषेत.
सगळ्यात जास्त कोणतं सोशल मीडिया फॉलो करतेस? : इन्स्टाग्राम

आवडता लुक / आऊट फिट : वेस्टर्न की पारंपरिक – वेस्टर्न 

स्टाईल आयकॉन – आलिया भट 

शिवानी बावकर ह्या गुणी अभिनेत्री ला तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी प्लॅनेट मराठी कडून खूप शुभेच्छा!! 

Share your valuable opinion

%d bloggers like this: