STAR OF THE WEEK 35-Kiran Gaikwad

“देयर यु आर” हा संवाद आठवला की डोळ्यांसमोर उभे राहणारे “भय्यासाहेब” म्हणजेच किरण गायकवाड. 
“लागींर झालं जी” या मालिकेतून त्याने भय्यासाहेब हे पात्र साकारलं आणि प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय. किरण गायकवाड अभिनयाच्या सोबतीने उत्तम लिहितो आणि भविष्यात त्याला कोणत्या भूमिका साकारायच्या आहेत आणि कोणत्या दिग्दर्शका सोबत काम करायचंय अश्या काही विशेष गप्पा वाचायला विसरू नका प्लॅनेट मराठी मॅगझिनच्या या “स्टार ऑफ द वीक मधून” …

  • संपूर्ण नाव : किरण बाबुराव गायकवाड
  • जन्मठिकाण : पुणे 
  • वाढदिवस : १२ जून १९९०
  • शिक्षण : एमकॉम 

“वेगळ्या धाटणीची भूमिका करतोय”
    भय्यासाहेब हे पात्र खलनायक (नकारात्मक) होतं. या भूमिकेत विविध छटा लपलेल्या होत्या. आता मी असं काही तरी करतो आहे जी नकारात्मक भूमिका नसून वेगळ्या धाटणीची भूमिका आहे. जेवढं प्रेम प्रेक्षकांनी भय्यासाहेब या भूमिकेला दिलंय तेवढंच प्रेम नवीन भूमिकेला सुद्धा देतील अशी आशा आहे. 

“वेबची दुनिया अनुभवायची” 
“खासरे” या युट्युब चॅनेल साठी आम्ही दोघांनी (मी आणि निखिल चव्हाण) याने एक व्हिडिओ केला होता तर हा अनुभव कमालीचा होता. वेब सिरीज हे माध्यम मला अजून जवळीने बघायचं आहे. मी वेब चा खूप मोठा फॅन आहे आपल्याकडे येणारा वेब चा कन्टेन्ट खूप जास्त चांगला आहे. अश्या कामाच्या शोधात मी आहे. आपल्याला मिळालेला “वेब” हा भन्नाट प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं. 

“प्रेक्षकांनी खूप सारं प्रेम दिलं” 
    भय्यासाहेब या भूमिकेने मला प्रेक्षकांच खूप सार प्रेम दिलं. एखाद्या नकारात्मक भूमिकेला लोकं एवढं डोक्यावर घेतील असं वाटलं नाही. त्यांनी ती भूमिका आपलीशी करून घेतली. सकारात्मक भूमिकांना मिळणारी प्रसिद्धी या पेक्षा नकारात्मक भूमिकांना लोकांचं मिळणार तेवढंच प्रेम बघून आनंद मिळतो आणि आपल्या कामाची पोचपावती मिळते. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की भय्यासाहेब सारख्या भूमिकेला लोकांनी एवढं भरभरून प्रेम दिलं.

  “लवकरचं नवीन भूमिका साकारणार” / नवीन भूमिका गुलदस्त्यातच”
    मी लवकरचं काहीतरी वेगळं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे पण योग्य वेळ आली की मी ते प्रेक्षकांना सांगेन त्यामुळे नवीन काय असणार हे थोडं गुलदस्त्यात आहे.

“अनुराग कश्यप सोबत काम करायचंय” 
  मला सगळ्यांसोबत काम करायचंय कारण प्रत्येक कलाकारांकडून नवीन काहीतरी शिकायला मिळत असतं. पण मला अनुराग कश्यप सोबत काम करण्याची इच्छा आहे त्यांच्या सोबतीने एकदा काम करावं हे स्वप्न आहे. त्याचं कारण असं की मी त्यांच्या कामाचे अनेक किस्से माझ्या सह कलाकार मित्रांकडून ऐकले आहेत. तो माणूस म्हणून कमाल आहे तर अश्या व्यक्ती सोबत काम करायला नक्कीच आवडेल. 

“देयर यु आर हे टोपण नाव” 
  “देयर यू आर” या संवादा मागे अनेक किस्से आहेत. कधीकधी गर्दीतुन चालताना लोकं माझ्या खऱ्या नावापेक्षा “देयर यु आर” या नावाने जास्त ओळखतात. माझ्यासाठी हे टोपण नावचं आहे.

“आव्हानात्मक खलनायक” 
  खलनायक साकारणं सोप्प काम नाही आहे. कारण आपलं मन हे सकारात्मक असतं आणि यात तुमच्या मनाला न पटणारं असं काम करायचंय तर खलनायक साकारताना ही मानसिक तयारी करावी लागते. मालिकेतली भय्यासाहेब ची भूमिका फार नकारात्मक होती तो आर्मी ला पाठींबा न देणारा होता, आर्मीच्या विरुद्ध बोलणारा, आई शी नीट न वागणारा असा होता  तर या गोष्टी आधी मनाला पटायच्या नाहीत. खलनायक साकारताना पहिल्यांदा ज्या गोष्टी पटत नाहीत त्या शांतपणे मनाला पटवून द्याव्या लागतात. मग लोकांना ही भूमिका कोणत्या तऱ्हेनं आवडू शकते यांसाठी त्या भूमिकेतील वेगळ्या छटा शोधू लागलो. तेजपाल वाघ यांचा फार पाठींबा होता ही भूमिका करताना. त्याने मला भूमिकेसाठी विविध छटा शोधून काम करायला सांगितलं. प्रेमळ, विक्षिप्त, राजकारणी, एकतर्फी प्रेमात बुडालेला अश्या विविध अंगी भूमिका एका रोल साठी करायच्या होत्या म्हणून त्या पात्रातील छटा शोधून काम करायचो आणि भय्यासाहेब सकारायचो. 

“प्रत्येक भूमिका मोलाची” 
  भूमिकेत कुठलंही उजवं – डाव करायला मला आवडतं नाही. मग ती भूमिका अगदी दोन मिनिटांची असू देत किंवा खूप मोठी असू देत काम हे काम असतं आणि मी प्रत्येक काम उठावदार पणे मी करेन याची मला शाश्वती असते. मी कुठलंही काम फार प्रामाणिक पणे करतो त्यामुळे मी भूमिकेत डाव-उजवं असं कधीच करत नाही.


“कविता आणि बरंच काही….” 
संगीत, लिखाण, कविता, चित्रपट आणि नाटक बघणं या गोष्टींशिवाय मी राहू शकत नाही.

“विरुद्ध भूमिका साकारणारा किरण”  
खऱ्या आयुष्यातला किरण आणि मालिकेतून लोकांच्या भेटीला आलेला किरण या दोन्ही फार विरुद्ध भूमिका आहेत. मी फार हळवा आणि संवेदनशील आहे तसा भय्यासाहेब नव्हता तो एकदम तापट आणि सतत काही न काही कुरघोड्या करणारा होता. 
“महेश मांजरेकरासोबत काम करायचंय” / अभिनया व्यतिरिक्त लिखाण” 
लोकांच्या दृष्टीकोनातून मी बरा लिहितो असं लोकांचं म्हणणं आहे. मी आजवर काही स्क्रिप्ट आणि शॉर्ट फिल्म लिहून त्या दिग्दर्शित केल्या आहेत तर अभिनया व्यतिरिक्त मी लिखाण करू शकतो आणि दिग्दर्शन करू शकतो. मला इथे एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो की मी आणि माझा एक मित्र महेश मांजरेकरांकडे एक स्क्रिप्ट घेऊन गेलो जी फिल्म आम्हाला दिग्दर्शित करायची होती. तेव्हा ते नटसम्राटचं दिग्दर्शन करत होते. आम्ही दबकत पाऊल टाकत सरांकडे गेलो सरांना स्क्रिप्ट ऐकवायला सुरुवात केली त्यांना माझा उडालेला गोंधळ समजला आणि त्यांनी स्वतः स्क्रिप्ट वाचली ती वाचून झाल्यावर त्यांनी मला एक प्रश्न विचारला तर तेव्हा मला त्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं त्या दिवशी रात्री तीन वाजता मी त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि ते फिल्म करायला तयार झाले पण काही कारणामुळे ती फिल्म काही झाली नाही म्हणून मला महेश मांजरेकर सरांसोबत काम करण्याचं स्वप्न आहे. 

रॅपिड फायर…हे कि ते..

  • शिवानी बावकर की मुक्ता बर्वे – शिवानी बावकर 
  • नितेश चव्हाण की निखिल चव्हाण – निखिल चव्हाण 
  • आवडतं पुस्तक : दुनियादारी 
  • अभिनय की दिग्दर्शक – अभिनय 

किरण गायकवाड ह्या हरहुन्नरी कलाकाराला प्लॅनेट मराठी मॅगझीन तर्फे पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा! 

Share your valuable opinion

%d bloggers like this: