वयाच्या प्रत्येक वळणावर आपल्यातील प्रत्येक जण वेगवेगळी स्वप्नं बघतं असतो. यानेही तशीच स्वप्नं बघितली. सुरुवातीला त्याला बस कंडक्टर बनायचं होतं, तर काही दिवसांनी आपणं पोलीस व्हायचं हे त्याने ठरवलं.
दिवसागणिक नवनवीन स्वप्न बघत अखेर तो अभिनेता बनला. ‘तुज विण सख्यारे…’ या मालिकेच्या निमित्तानं त्याने टीव्हीवर पदार्पण केलं.
जेष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांचा तालमीत अभिनयाचे धडे गिरवलेल्या या अभिनेत्याने आजवर अनेक इंज्राजी आणि उर्दू नाटकांमधून काम केलंय.
वझनदार, तुझी माझी लव्हस्टोरी, काय रे रास्कला अशा अनेक चित्रपटांमधून त्याने त्याच्या अभिनयाची अनोखी छाप रसिकांच्या मनावर कोरली आहे. ‘प्लॅनेट मराठी मॅगझीन’च्या ‘स्टार ऑफ द विक’च्या माध्यमातून जाणून घेऊया अभिनेता ‘गौरव घाटणेकर’विषयी…
संपूर्ण नाव : गौरव जयंत घाटणेकर
जन्म तारीख आणि ठिकाण : १५ मे, मुंबई
शिक्षण : मास्टर्स इन ॲक्टिंग
स्वप्न माझी अनेक….
मी अजिबातचं ठरवून या क्षेत्राकडे वळलो नाही. पण वेळोवेळी माझ्याकडून त्या गोष्टी होत गेल्या. लहानपणापासून सोसायटीच्या विविध कार्यक्रमांमध्ये मी सहभागी होत असे. त्यानंतर शाळा-कॉलेजच्या दिवसांतही हे सत्र कायम सुरु होत. पण पुढे जाऊन भविष्यात आपल्याला अभिनेता म्हणून काम करायचंय हे माझ्या कधीही डोक्यात नव्हतं. त्यामुळे मी अभिनेता होईन कि नाही यापेक्षा मी माझ्या इतर गुणांच्या बाबतीत अधिक सजग असायचो. माझं वक्तृत्व, खिलाडु वृत्ती आणि महत्त्वाचं म्हणजे, माझ्यात एखादी गोष्ट अधिक उत्तम पद्धतीने मांडण्याची कला लहानपणापासून अवगत होती. यातून मी घडतं गेलो. लहानपणी प्रत्येकजण विविध स्वप्न बघतो. तसचं मी ही बघायचो. शाळेतील प्रवासादरम्यान बस कंडक्टरला पाहून आपणही बस कंडक्टर व्हावं असं मला वाटायचं. थोडा मोठा झाल्यावर आपण पोलीस व्हावं असं मला वाटू लागल. माझे वडील नौदलात कार्यरत आहेत, त्यांना पाहून मी नेव्ही मध्ये जाण्याचा विचारही केला होता. त्यानंतर एअरफोर्समध्ये सामील व्हावं असाही मला वाटलं. मुळात मला अनेक गोष्टी वाटतं होत्या, त्या मला पूर्णपणे आवडतं नव्हत्या. त्यामुळे अखेर मला विविध पात्र साकारायला, लोकांच्या नकला करायला आवडतात हे माझ्या लक्षात आलं. शिवाय, त्याचवेळी केलेल्या एका नाटकासाठी माझ प्रचंड कौतुकही झालं. दरम्यानच्या काळात नसिरुद्दीन शहा यांच्याशी भेट झाली आणि ते माझे अभिनयातील गुरु बनले. त्यानंतर अभिनयाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनही बदला आणि मी या क्षेत्रात आलो आणि इथेच रुळलो. स्ट्रगल रोजचाचं…इंडस्ट्रीमध्ये काम करायचं म्हणजे स्ट्रगल हा नेहमीचा आहे आणि तो असावा. माझ्या पालकांपैकी कोणी इंडस्ट्रीमध्ये नाही. माझा कोणत्याही प्रकारचा वशिला नव्हता. त्यामुळे माझ्यासारख्या नवख्या मुलाला इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्यापासूनच स्ट्रगलचा सामना करावा लागतो. आजवर जे केलं ते स्वतःच्या मेहनतीमुळे केलं आहे. खरं हा इंडस्ट्रीमध्ये येण्याचा निर्णय हा माझा होता त्यामुळे संपूर्ण जिद्दीने इथे काम करायचं हे डोक्यात ठेऊनच या समुद्रात उडी मारायचं ठरवलं. त्यामुळे या प्रवासातील प्रत्येक गोष्ट मला वेगळा अनुभव आणि आनंद देत असते एवढं मात्र नक्की.
माझी पहिली भूमिका…
मी एका इंग्रजी नाटकामध्ये नसिरुद्दीन सरांसोबत काम करत होतो. त्यावेळी तो प्रयोग पाहण्यासाठी आलेल्या त्या वाहिनीकरता काम करणाऱ्या एका व्यक्तीने माझं नाटकातील काम पाहून माझ्या पहिल्या मालिकेसाठी विचारलं होतं. ‘तुज वीण सख्यारे…’ ही माझी पहिली मालिका आणि त्याच्यातील माझ्या पहिल्या भूमिकेचं प्रचंड कौतुकं झाल होतं. त्यामुळे पहिल्या प्रेमा इतकीच माझी पहिली भूमिका माझ्यासाठी अत्यंत जवळची आहे. याचं मालिकेने मला मोठा चाहतावर्ग ही मिळवून दिला. ड्रीम रोल…एक अभिनेता म्हणजे प्रचंड ‘हावरट’ वृतीचा असतो आणि असावा, असं मला वाटतं. त्यामुळे असे बरेच रोल आहेत जे मला करायची प्रचंड इच्छा आहे. त्यातही मला इंग्रजी सिनेमांचं प्रचंड आकर्षण असल्याने मला ‘मायकल कोरीओन’ची भूमिका साकारायला नक्की आवडेल. मी अनेक फिल्म्स बघतो आणि त्यातील अनेक कलाकार मला आवडतात. त्यामुळे तसे अनेक रोल आहेत जे मला साकारण्याची प्रचंड इच्छा आहे.
नव्या भूमिका लवकरच…
अनेक नवनवीन कामांसाठी माझं बोलणं सुरु आहे. त्यामुळे तूर्तास सगळ्या गोष्टी नाही सांगता येणारं मात्र, लवकरच दोन नव्या वेबसिरीजच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांच्या भेटीला येतं आहे. शिवाय, ‘एक प्रेम कहानी’ या उर्दू नाटकातही मी काम करतोय. लवकरचं हे नाटकही तुम्हाला बघता येईल. मराठी नाटकं करायचं, पण….मी गेली अनेक वर्ष उर्दू आणि इंग्रजी नाटकांमधून काम करतोय. पण, मला मराठी नाटकांमध्येही काम करण्याची प्रचंड इच्छा आहे. मला अजून कोणीही मराठी नाटकात काम करण्यासाठी विचारलं नाही. पण एखादी उत्तम भूमिका असलेलं नाटकं मला मिळालं, तर मराठीमध्ये नाटकं करण्यास मी तयार आहे. कारण, माझ्या मते नाटकामुळे आपल्याला अनेक गोष्टी शिकतात येतात. नाटकं आपल्याला समृद्ध करत जातो. त्यामुळे नाटकं करताना मला मिळणाऱ्या पैशांपेक्षा, तिथून मला मिळणारे अनुभव आणि नवी शिकवण माझ्यासाठी मोलाची आहे. त्यामुळे माझ्या अभ्यासाठी नक्की मी मराठी नाटकं करेन. मी उत्तम खेळाडू…अभिनयाव्यतिरिक्त मला खेळायला खूप आवडतं. मी स्कॉश प्लेअर आहे. मला घोडेस्वारी करायला प्रचंड आवडतं. शिवाय, मी क्रिकेटचा मोठा चाहता आहे. मला क्रिकेट खेळायला आणि बघायला आवडतं. शिवाय, मला फिटनेसमध्ये मदत करणारे सगळेच खेळ मला आवडतात.
हे खटकतंय…
मराठी इंडस्ट्रीमध्ये थोडा पैसा येणं गरजेचं आहे, असं माझं मतं आहे. शिवाय, मला अजूनही वाटतं कि, आपल्याकडे टॅलेंटला वाव मिळत नाही. अनेकदा कलाकारांमधील वेगळेपणापेक्षा त्याच्या आधीच्याच कामावर त्याला नवीन काम मिळत. हे चुकीचं नाही. पण इतरानाही समान संधी मिळणं तेवढच गरजेचं आहे. सोबतच, प्रत्येकवेळी कलाकारांसोबत होणारं ट्रोलिंग मला अजिबात आवडतं नाही. पण मी त्याकडे दुर्लक्ष करणं अधिक पसंत करतो. फिटनेस फंडा…खेळ हा माझ्या फिटनेसचा मंत्र म्हणता येईल. त्यामुळे फुटबॉल, स्कोश, अगदी घाम काढणारे खेळ मला प्रचंड आवडतात. जिम म्हणजे बोगसपणाचं लक्षण असं मला वाटतं. त्यामुळे खेळताना होणाऱ्या दुखापती जास्त असतील तरी फिटनेसच्या दृष्टीने अनेक फायदे खेळांमुळे होतात. आणि म्हणून माझा खेळांवर अधिक भर असतो.
रॅपिड फायर….
० गौरवची आवडती अभिनेत्री – Kate Winslet (केट विन्स्लेट)
० गौरवाचा आवडता अभिनेता – Dustin Hoffman (डस्टीन हॉफमन)
० गौरव अभिनेता नसता तर – भिकारी (कारण मला अभिनया व्यतिरिक्त दुसरं काही जमत नाही आणि मी दुसऱ्या कशात रमत नाही)
० गौरवला स्वतःमधील आवडणारी एक गोष्ट – कधीही हार मानत नाही.
० गौरवला स्वतःमधील न आवडणारी एक गोष्ट – मी फार जास्त गंभीर (Over Critical) आहे
० गौरवचा लाईफफंडा – जगा आणि जगु द्या, खूप पैसा कमवा…
मुलाखत : अजय जयश्री उभारे (प्लॅनेट मराठी)