April 24, 2024

sai tamhankar

पूर्ण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम अर्थातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ १५ ऑगस्टपासून परत येतो आहे. आठवड्यातले चारही दिवस हास्यरसिकांना हा कार्यक्रम बघायला मिळणार आहे.  काही दिवसांची क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर जत्रेकरी आता रसिकांना हसवण्यासाठी पुन्हा  सज्ज झाले आहेत. हास्यजत्रा ब्रेक घेतेय हे समजल्यावर रसिकांनी हळहळ व्यक्त केली. टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखला जाणारा हा कार्यक्रम खरोखच रसिकांच्या घराघरांत पोचला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ह्या मंचाने रसिकांना निखळ आनंद दिला आहे. हास्यजत्रेतील एकेक पात्र रसिकांना त्यांच्या घरातलं वाटतं.  रसिकमायबाप प्रेक्षक कलाकारांना त्यांच्या कामामुळे ओळखतात. जेव्हा संपूर्ण जग कोवीडसारख्या महामारीने हैराण होतं, तेव्हा या कार्यक्रमानी रसिकांना दुःख, त्रास, टेन्शन सगळं विसरायला भाग पाडलं. अनेकांना हास्याचा डोस देऊन ठणठणीत बरं केलं. त्यामुळे हास्यजत्रा पुन्हा सुरू होतेय ही रसिकांसाठी पर्वणी असणार आहे. येणाऱ्या नव्या पर्वात रसिकांना अनेक गोष्टी बघायला मिळतील. नवीन सेट, स्कीटचे वेगळे विषय, नवीन पात्रं आणि बरंच काही.  निवेदिका प्राजक्ता माळी हिचं ‘वाह दादा वाह’ पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. हास्यरसिक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांचं दर्जेदार परीक्षण बघायला मिळेल. समीर, गौरव, नम्रता, प्रसाद, दत्तू आणि इतर कलाकार यांचे दमदार अभिनय बघायला मिळतील. त्यामुळे हास्यजत्रा पुन्हा कधी सुरू होतेय आणि कधी रसिकांना खळखळून हसायला मिळतंय याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतो. ज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळते. या शनिवारच्या भागात  ‘प्रोजेक्ट बाला’ संस्थेच्या अध्यक्षा सौम्या डाबरीवाल या उपस्थित राहणार असून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री  सई ताम्हणकर ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहे. सईबरोबर सौम्या डाबरीवालही ‘कोण होणार करोडपती’ या खेळात सहभागी होणार आहेत. या दोघी जणी नागपूर येथील  ‘विमलाश्रम घरकुल’ या संस्थेसाठी खेळणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’च्या या पर्वातही दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी  होतात.  समाजकल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या  विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येते. आत्तापर्यंत या भागांत काजोल, तनुजा, अशोक सराफ, सुधा मूर्ती, अधिक कदम, संदीप वासलेकर यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते. या आठवड्यात प्रसिद्ध आणि लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सौम्या डाबरीवाल या मंचावर उपस्थित राहून ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. या दोघी नागपूर येथील वारांगना व त्यांची मुले यांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या ‘विमलाश्रम घरकुल’ या संस्थेसाठी खेळणार आहेत. १९९२ साली ‘विमलाश्रम घरकुला’ची स्थापना झाल्यापासून ही संस्था उपेक्षित व वंचित मुलांचं पुनर्वसन करत आहे. त्यांना समाजात सन्मानाने जगता यावं म्हणून स्वावलंबी बनवत आहे. तर ‘प्रोजेक्ट बाला’ या संस्थेच्या अंतर्गत सौम्या डाबरीवाल आणि त्यांचे सहकारी मासिक पाळी संदर्भात महिलांमध्ये जनजागृती करतात. मूळची सांगलीची असणारी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने तिच्या अभिनय कारकिर्दीचा सुरुवातीपासूनचा प्रवास ‘कोण होणार करोडपती’च्या या विशेष भागात  उलगडला. ‘आयुष्यात मिळालेले अनुभव हे सगळ्यात मोठे गुरू असतात’, असे मत सईने या कार्यक्रमात व्यक्त केले. वयाच्या १७ व्या वर्षी सईने काम करण्यास सुरुवात केली. सईचं सांगलीवरचं प्रेम, सांगलीच्या भाषेवर, लहेजावर असणारं प्रेम तिनी या भागात आवर्जून सांगितलं. त्याचबरोबर सई आणि तिची आई यांच्यामधले नाजूक बंधही ‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागात उलगडण्यात आले. समाजकार्य आणि मनोरंजन क्षेत्र यांतले मोठं नाव असा मेळ असणारा, हा विशेष भाग निश्चितच रंगतदार ठरणार आहे.